आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला शारीरिकदृष्ट्या साथ-सोबत करणारे, मानसिक आधार देणारे, अंतर्मनाला धीर देणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षमता देऊ करणारे, सामजिक पत निर्माण करणारे, शैक्षणिक प्रगतीची दिशा दाखवणारे, कौटुंबिक एकोपा टिकवणारे, आपली नातीगोती जपणारे, उणीवा दूर करणारे, आपल्या जाणीवा जपणारे, आपल्या जाणीवांना नेणीवेपर्यंत घेवून जाणारे, आपल्या जीवनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे आपले हक्काचे नाते हे दुसरे-तिसरे कोणतेही नसून ते असते मैत्रीचे नाते. आपल्या प्रत्येक सुख-दु:खांत मनापासून सहभागी होत असल्याने मनाला आश्वस्त करणारे ते एक निराळे “रसायन” असते. आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्वाचे आणि जिव्हाळ्याचे नाते म्हणजे आपली परस्परांशी असलेली मैत्री. या मैत्रीचा थेट संबंध आपल्या भाव-भावनांशी आणि आपल्या आवडी-निवडीशी देखील असतो. अगदी लहानपणापासून आपले शिक्षण आपल्या बरोबर शिकणाऱ्या आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींबरोबर सुरु असते. त्यादरम्यान आपल्या आयुष्यांतील प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यात त्या मित्र-मैत्रिणींचा खूप मोठा सहभाग असतो.
आपल्या आयुष्यांत अनेक घडामोडी घडत असतात. कितीतरी लोक आपल्या आयुष्यांत येतात आणि जातात. पण सगळ्यांत अधिक लक्षात कोण रहात असेल तर, ते म्हणजे सगे-सोबती अर्थात आपले मित्र-मैत्रिणी. अगदी बालपणीच्या मित्र-मैत्रिणींची नावेही त्यांच्या स्वभावासहित लक्षात राहतात. हे सगे-सोबती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेटत असतात. आपण आपल्या आयुष्याची नवनवीन रांगोळी काढत असतो आणि त्यांत विविध रंग भरण्याचं काम आपले सगे-सोबतीच करत असतात. प्रसंगी आपले मन मोकळे करण्याची एक सुरक्षित जागा सुद्धा मित्र-मैत्रिणींपैकीच असते. आपल्या चुका हक्काने दाखवणे असेल अथवा आपले कौतुक करणे असेल, मित्रमंडळी शिवाय ह्यात सहसा पुढाकार इतर कोणी घेत नाही. थट्टा मस्करी करून आणि विनोद सांगून डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसवणाऱ्या मित्रमंडळी शिवाय आपल्याला मनाने अधिक जवळ फारसे कोणी नसते. मैत्रीचे नाते अगदी दुध-पाण्यासारखे असते. दोन्ही एकत्र केले कि ते वेगळे करता येत नाही. “तुझं माझे जमेना पण तुझ्याविना करमेना”, अशी गत ह्या मैत्रीच्या बाबतीत झाल्याचे आपण अनुभवतो. एकही क्षण ज्या मित्र-मंडळींशिवाय जात नाही, तेच काही वेळा केवळ सगे-सोबती ठरतात. आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply