रांगणाऱ्या मुलाला चालायला शिकवणारे आणि चालणाऱ्या मुलाला सावरायला शिकवणारे जे शब्द वा वृत्ती असते तशी काही पत्रे माझ्या संग्रही आहेत.
ती पत्रे जेव्हा येत होती तेव्हा त्या त्यावेळी मला धक्के बसत होते.
अर्थात सुखद धक्के.
कारण मराठी साहित्यातील नामवंत लेखक, समीक्षक, कलाकार आपण होऊन माझे साहित्य वाचतील आणि अभिप्रायार्थ पत्र लिहितील ही मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
पण आज फाईल्स चाळताना काही पत्रे मिळाली आणि पुन्हा एकदा धन्यता वाटली.
अर्थात सर्वांनी केवळ कौतुक केलेले नाही, तर दोष दिग्दर्शन सुद्धा केले आहे. पण ते मला गरजेचे वाटले. पडत झडत उभा राहत असताना, चालत असताना दिशा दाखवणाऱ्या या मान्यवरांनी कळत नकळत लेखन संस्कार केले.ज्यामुळे मी पुढे चालू शकलो. लेखनात सातत्य ठेवू शकलो.
या सगळ्यांची पत्रे देणे जागेअभावी शक्य नाही, पण त्यांचे काही मुद्दे देत आहे…
नामवंत समीक्षक म. द. हातकणंगलेकर
शल्य ही कथा सूचक आणि परिणामकारक आहे. शैली संवेदनक्षम आणि नेमकी आहे. पसरटपणा नसल्याने त्याला टोकदार स्वरूप आले आहे. कथानक वेगळे असल्याने आणि नेटकेपणाचे भान असल्याने कथा मनात घर करते.
नामवंत समीक्षक डॉ. सु.रा. चुनेकर
आपल्या कथा वाचनात असतात. आपण कोकण नव्याने मांडत आहेत, हे लक्षणीय आहे.
पोलीस चातुर्यकथा आणि रहस्यकथा लेखक व. कृ. जोशी
राजाज्ञेची अक्षरे ही सुगंध दीपावली अंकातील कथा चित्तवेधक वाटली. सर्व कथेला अध्यात्माची झालर आहे. मध्यवर्ती व्यक्तिचित्र दादाजी आपण अतिशय संयमाने रेखाटले आहे. वास्तवाधिष्ठित कथा आहे का ?
मधु मंगेश कर्णिक
मधुभाईंनी माझ्या अनेक कथा कादंबऱ्यांवर आवर्जून अभिप्राय पाठवला आहे.
‘ तुमच्या कादंबरी लेखनाबद्दल मला नेहमी औत्सुक्य आणि स्वारस्य वाटत आले आहे. कथालेखनसुद्धा तुम्ही तेवढ्याच ताकदीने पेलू शकता हे अनुभवलं आहे. उत्स्फूर्तता, आविष्कार आणि त्याचा संकलित परिणाम तुम्हाला चांगला जमतो.
ग. प्र. प्रधान
मेनका दिवाळी अंकातील भुईचाफा ही कथा आवडली. चित्तवेधक आणि रोमहर्षक. कोकणची पार्श्वभूमी डोळ्यासमोर उभी राहते.
ज्ञानेश्वरीचे अभ्यासक, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य गोपाळराव मयेकर
संगीत घन अमृताचा आणि संगीत शांतिब्रह्म या दोन्हींचे प्रयोग पाहिले. संहिता आवडल्या. संगीत रंगभूमी लुप्त होत असताना नव्या ताज्या दमाने तुम्ही उभे राहत आहात, हे अपूर्वाईचे आहे. आम्हा गोवेकराना संहिता उपलब्ध करून दिल्यास आम्हीही इकडे त्या नाटकांचे प्रयोग करू.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. शिवरायजी तेलंग
आपली शल्य ही शिक्षकी पेशावरची कादंबरी वाचली.आवडली. आपण रेखाटलेली व्यक्तिचित्रे, निसर्ग डोळ्यासमोर उभे राहतात.
कथालेखिका वैशाली पंडित
मिळून साऱ्याजणी या मासिकातील, तिचे क्षितिज ही कथा वाचली. त्यातली शिवानी मनाच्या तळात थेट उतरलीय. तिच्या वन मॅन आर्मीत दाखल व्हावंसं वाटतंय. वाईट इतकंच वाटतंय की ती या समाजात एकाकी पडतेय. अर्थात हीच तिची नियती आहे. आणि तिच्या जगण्याची मूलाधार अशी प्रेरणा आहे.
एकपात्री कलाकार रंगनाथ कुलकर्णी
लेक टॅपिंग ही सुगंध दिवाळी अंकात कथा वाचली. आवडली, शक्य होईल तेव्हा रसिकांसमोर सादर करणार आहे.
प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे
रानोमाळ ही कादंबरी मी वाचली. त्यातली सिच्युएशन्स, कॅरॅक्टर्स आणि एकूण डेव्हलपमेंट पाहता रानोमाळ वर एक चांगले व्यावसायिक नाटक होऊ शकेल. आपण विचार करावा, मी नक्की मदत करीन.
सांगलीचे कथा लेखक आणि कवी श्रीरंग विष्णु जोशी, लेखक अनंत तिबिले, प्रभाकर दिघे अशा अनेक नामवंतांनी आवर्जून अभिप्राय लिहिले आहेत. पुण्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री आरती देवगांवकर यांनी तर माझ्या खडूचे अभंग यावर समाज माध्यमात सतत चर्चा घडवून आणली होती.
अर्थात, संघर्ष नेमका टोकदार नाही, कथा विषय लवकर संपवला, नायिकेला न्याय दिला नाही, कथेचा शेवट परिणामकारक हवा होता…
असा अभिप्राय नोंदवला आहे काहींनी.
पण मी त्याकडे विधायक दृष्टीने पाहिले, त्यामुळे माझे लेखन सुधारले. पाथेय म्हणून मला ते उपयोगी ठरले.
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply