“काय झाले आई? तुझा मूड का ऑफ आहे आज? काय घडलेय?”
“काही नाही ग असंच!”
“कुछ तो हुआ है मॉम… नही तो तुम ऐसी गुमसुम नही बैठती”
लेकीच्या ह्या वाक्याने नेहाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. स्वतःला कसेबसे सावरत ती लेकीला म्हणाली, “तुम्हा मुलांचा एवढा मोठा मित्र परिवार असतो, सर्वांशी तुम्ही अगदी जीवश्च-कंठश्च असल्यासारखे वागतात. खरंच तुम्ही एवढे क्लोज्ड असतात?”
“ हो…अर्थात! सगळे क्लोज्ड असतात; पण त्या त्या विषयापूरते. बाकी सर्व विषयांच्या संबंधित किंवा सर्वस्व म्हणता येईल असे फार थोडे असतात.
“म्हणजे? मला नाही कळाले. अशी विषयाप्रमाणे मैत्री असते? ती ही जिवाभावाची?” नेहाने आश्चर्याने विचारले.
“ अरे जमाना बदल गया है भाई. तो दोस्ती की परिभाषा भी बदलनी चाहिये ना मॉम.”
“ जरा मला समजेल अशा भाषेत बोलाल का मॅडम!!!! आधीच माझा मूड ठीक नाहीये.”
“ मी तर आधीच तुला विचारले ना की काय झालेय तुला?”
“अगं, सगळं कसं अचानक बदलल्यासारखे वाटते. कोण आपला आणि कोण परका काहीच कळत नसल्यासारखे वाटते. कोणासोबत राहावे, कोणावर विश्वास ठेवावा काहीच कळत नाही ग. माणसं अशी बदलू शकतात ह्याचा विचार करून खूप त्रास होतो.” नेहा अजूनही खूप अस्वस्थ होती.
“कम ऑन मॉम, किती विचार करतेस ग प्रत्येक गोष्टीचा? खरं सांगू का आई, व्यक्ती बदलत नसते. पण आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चुकलेलो असतो आणि आपली ती चूक आपल्याला मान्य नसते. म्हणून मग खापर दुसर्यावर फोडले जाते. तुझे वागणे म्हणजे मैत्री करायची तर शंभर टक्के नाहीतर लगेच तू अंतर्मुख होतेस आणि सगळ्यांपासून तुटल्यासारखी बाजूला होतेस. दॅट्स नॉट फेअर मॉम. यू हॅव टु अॅडजस्ट विथ ऑल टाइप्स ऑफ पीपल.”
“ कळते ग मलाही ते, पण कसे? अॅडजस्ट होणे आणि अप्रामाणिक असणे हयातला फरकच मला कळत नाहीये.” नेहा खूपच वैतागली होती.
“आईड्या, तुझा गोंधळ कुठे होतो सांगू का? तू ना मैत्रीचे ते जूनेच समीकरणे डोक्यात घेऊन बसली आहेस. अमुक एक व्यक्ती आपली मैत्रीण म्हणजे तिच्याशी सर्व काही शेअर करायचे. बरं, शेअर करणेही ठीक आहे, पण तुला लगेच वाटायला लागते की तिने पण तुझ्याशी तसेच राहावे.”
“बरोबरच आहे ना मग??? मी तर आजवर अशीच मैत्री केली आहे प्रत्येकाशी.” नेहा ठामपणे बोलली.
“यही तो लोच्या है न भाई, जमाना किधर जा रहा है और तू वही अटक के पडी है. सून भाई,
“एक मिनिट, तू तुझे ते भाई बी आधी थांबव आणि नीट बोल माझ्याशी”. नेहा चिडून बोलली.
“अगं माते मी काय सांगते ते नीट ऐक आधी. आता काळाप्रमाणे तू स्वतःच्या राहणीमनात बदल केलेस ना??? तशी आता मैत्रीची परिभाषाही बदलून बघ. तू काय कर, माझ्यासारखे मैत्रीचे वेगवेगळे कप्पे मनात तयार कर. कोणतीही मैत्रीण किंवा मित्र भेटला की पहिल्यांदा कप्पा आठवायचा. मग पटकन तो कप्पा उघडून मनोसक्त मजा करायची. बाकी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती काय करते, कोणाबरोबर राहते त्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो. मग बघ तुलाही प्रत्येक मैत्रीचा आनंद लुटता येईल.”
“ असे केल्याने तर आपली जीवाभावाची अशी मैत्री कशी होणार ग?” नेहाला हे सर्व वेगळेच वाटत होते.
“अरे यार ऐक तर पूर्ण. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी मैत्री येते तेव्हा लगेच तिला जवळची सखी असे मानण्याची घाई नाही करायची. तिला पटकन एखाद्या कप्प्यात टाकायचे. जसे शाळेची मैत्री, कॉलेजची मैत्री, व्यावसायिक मैत्री, सामाजिक मैत्री असे किंवा इतर अनेक विषय घेऊन कप्पे करायचे आणि त्यात त्या व्यक्तीला टाकायचे. हळूहळू काही मैत्री त्या कप्प्यापूर्तीच राहते किंवा कधीकधी खरोखर जवळची, आपली अशी वाटू लागते. मग त्या व्यक्तीला आपण जीवलग मैत्रीच्या कप्प्यात टाकायचे.”
“बाप रे… मैत्रीतही असे असते?” नेहाचा विश्वासच बसत नव्हता.
“असे काही नियम नाहीयेत ग आई….पण आपल्याला त्रास होऊ नाही म्हणून मी आपले असे करते. म्हणजे कसे होते की एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात उगाचच आपली लुडबूड नको आणि ती कोणाबरोबर कुठेही गेली तरी जोपर्यन्त आपल्या विषयाशी तिचे आपल्याशी चांगले संबंध आहेत तोपर्यंत आपणही काही वाईट वाटून घ्यायचे नाही.”
“पण ह्या कप्प्यांच्या नादात आपली जीवाभावाची अशी मैत्रीच झाली नाही तर?” नेहाला लेकीचे म्हणणं एकीकडे पटत होते. पण हे वास्तव स्वीकारणे जड जात होते.
“तसे तर कधी होत नाही ग आइडू. पण कधी कधी कप्पा चुकू शकतो. जेव्हा आपल्याला असे वाटते ना की समोरची व्यक्ती बदलली आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला कप्पा चुकला आहे. मग कप्पा बदलला की आपल्या त्या व्यक्तिविषयीच्या वागण्याच्या अपेक्षाही बदलतात. पण ह्या कप्प्यांना थोडा वेळ दिला ना की त्यातूनही जिवाभावाचे सख्य होऊ शकते ग. समजा नाहीच झाले तर एकला चलो रे म्हणत जीवन आनंदात घालवायचे. आपल्या आयुष्यात आपला आनंद कायम स्वतः कडे असतो असे तूच म्हणतेस ना. तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. त्यामुळे काहीही चढउतार आले तरी शो मस्ट गो ऑन म्हणत जगण्याचा आनंद घेत जायचा. जीवनाच्या रंगमंचावर कायम हाऊसफूल शो करण्यासाठी यू मस्ट हॅव टू अॅडजस्ट विथ एव्हरी सिचुएशन. नाहीतर तुम्ही दुनियेच्या अशा कोपर्यात फेकले जाल की स्वतःच स्वतःला सापडणार नाही.”
“कुठे शिकलीस ग ही सर्व??? थॅंक्स डियर!!! असे म्हणत नेहाने लेकीला गच्च मिठी मारली, खुशीतच स्वतःभोवती एक गिरकी घेतली. “आधी शोधा कप्पा मग करा मैत्रीच्या गप्पा” असा मंत्र जपत ती मैत्रीच्या नवीन परिभाषेत स्वतःस फिट करायला सज्ज झाली.
— @ सौ. मंजूषा देशपांडे, पुणे
Leave a Reply