मज सवड नाही कशाची
कामे सांगू नये कोणी
कलयुगी मी जगतो
अंगठ्याच्या तालावरी
आवड मज खूप
जाणुनी सर्व घेतो
पण सांगावयास कोणी
समोर येत नाही
प्रश्न- “अरे भेटतोयस का?”
उत्तर- “नाही”
प्रश्न- “का एवढा बिझी आहेस? काय एवढं करतोयस?”
उत्तर- ” हो मी खूप बीझी आहे, फेसबुक live जायचंय मला थोड्यावेळाने, त्याचीच तयारी करतोय, आपण नंतर बोलूया का? प्लिज, सॉरी यार.”
आभासी जगात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला, वास्तवात असलेले मित्र कधीच टिकवता येत नाहीत. जे मुळात अबोल, शिष्ठ, खतरुड या कॅटेगरीत येतात ते सुद्धा सोशल मीडियावर इतके प्रसिद्ध असतात की त्यांना वाटतं माझ्या सारखा या जगात दुसरा कोणीच नाही. पण खरेपण हे सोशल मीडियावर नाही तर समोर येऊन भेटलं की समजतं.
आवड आणि सवड या दोन्ही गोष्टी येथे खूप महत्वाचा रोल पार पाडतात असं मला वाटतं. एखाद्या गोष्टीची आवड असली, लागली की माणूस कितीही व्यस्त असला तरी थोडावेळ का होईना त्या आवडी करीता काढतोच. मग तिथे कारणं येत नाहीत. पण सवड कोणत्या गोष्टींना काढावी आणि आवड कोणत्या गोष्टींची लागावी यालाही काही महत्व आहे. व्यसनांच्या करिता काढलेली सवड नक्कीच त्रासदायक ठरते कदाचित इतरांना सुद्धा. पण चांगल्या सवयींची आवड ही नक्कीच सवड काढून पूर्ण करावी त्यातून नक्कीच फायदा आहेच.
आवड आणि सवड ही योग्य ठिकाणी एकत्र आली की आयुष्य आनंदी आणि सुखाचे झालेच समजा, पण यांची एकमेकांत गफलत झाली की मग समोरून येणाऱ्या खऱ्या मित्राची साद सुद्धा त्या सोशल मीडियासमोर ऐकायला येत नाही आणि आपण खऱ्या आनंदाला मुकतो असं मला वाटतं.
आवड असावी योग्य ठिकाणी सवड सुखं घेऊन येते…
— सुमंत परचुरे.
Leave a Reply