
मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला – लेखांक २७ वा
माजगांवची म्हातारपाखाडी; मुंबईचा एक ऐतिहासिक ठेवा..
काल काही कामानिमित्त डाॅकयार्ड रेल्वेस्टेशनजवळ गेलो होतो. काम काहीसं लवकर आटोपलं. त्या अगोदर दोन दिवस माजगांवातल्या ‘म्हातारपाखाडी’ या मुंबईतल्या अद्याप बऱ्यापैकी गांवपण टिकवून असलेल्या ‘गांवा’बद्दल वाचलं होतं. काल म्हटलं, की जवळच आलोय, तर जाऊ फिरत फिरत आणि पाहू प्रत्यक्ष काय आहे ते..
काल तिकडे जाण्यापूर्वीच माझ्या कामाचा अंदाज घेऊन मुंबईवर प्रेम करणारा माझा धाकटा मित्र श्री. चंदन विचारेला फोन करुन, ‘तू तयार राहा, आता आपल्याला माजगांवातल्या ‘म्हातार पाखाडी’ला भेट द्यायची आहे’ असं सांगून ठेवलंच होतं.
तसा या पूर्वी मी अनेकदा या रस्त्यावरून गेलो होतो. या रस्त्याला लागून असलेलं आणि पाहायचं नाही असं ठरवलं, तरी सहज नजरेस पडणारं ‘लायन्स डेन’ हे नितांत सुंदर लाकडी सज्जा, ‘नाजूक’ या शब्दाची नजाकत आपल्या रुपात बरोबर उतरवलेला लाकडी जीना आणि छोटेखानी प्रवेशद्वारावरील दोन बाजुचे लहानच, परंतू आपला रुबाब पुरेपूर दाखवणारे दोन सिंह असलेलं हे प्रमाणबद्ध खानदानी देखणं घर मला अतिशय आवडायचं, आवडतंही. हे घर असलं, तरी त्याला ‘बंगली’ हे असं संबोधन बरोबर शोभून दिसेल. बंगला म्हटलं, की पुरुषाप्रमाणेच अंगावर येणारा दांडगटपणा नजरेसमोर येतो, तो या नाजूक घरात नाही, म्हणून ‘ती’ बंगली..! ‘लायन्स डेन’ या नांवातला ‘डेन’ या शब्दाचा मराठी अर्थ ‘गुहा’ असा असला, तरी तो या घराला वाच्यार्थाने अजिबात शोभत नाही. एकेकाळी या घरात राहात असलेल्या माणसांच्या सिंहासारख्या रुबाबामुळे कादाचित या बंगलीला ‘लायन्स डेन’ असं नांव मिळालं असण्याची शक्यता आहे..
येता-जाता सहज नजरेस पडणाऱ्या या ‘लायन्स डेन’समोरच्या छोट्याश्या गल्लीत मुंबईच्या इतिहासाचा एवढा मोठा खजिना लपलाय, हे तेंव्हा माहितच नव्हतं. चंदननेच यासंदर्भातली पाठवलेली माहिती वाचली आणि मग काल तो खजिना याची डोळा पाहिला.
माजगांवातला हा भाग अगदी पोर्तुगीज काळापासून वसलेला आहे. त्यांतर आलेले ब्रिटीश, त्याकाळी काही प्रमाणात इथे व्यापारानिमित्त आलेले फ्रेन्च, डच, लढाईसाठी येणारी सि्द्धीची माणसं यांची वस्ती या भागात होती. मुंबईतल्या फोर्ट परिसरानंतरची मोठी मानवी वसाहत याच परिसरात होती व अजुनही या परिसरावरची युरोपियन, विशेषत: ‘पोर्तुगीज’ छाप या साऱ्या परिसरावरच दिसून येते. वरच्या परिच्छेदात उल्लेख केलेलं ‘लायन्स डेन’ हे घरही पोर्तुगीज-युरोपियन पद्धतीचं आहे. इथली बहुतेक सर्वच घरं अशी देखणी आहेत. पोर्तुगीज पद्धतीची घरं, इथली ख्रिस्ती बहूल वस्ती, नाक्यांवर असणारे पोर्तुगीज धाटणीचे क्रुस, इथल्या लोकांची आडनांवं, गल्ल्यामधली स्वच्छता आणि हमरस्त्याशेजारी असुनही इथली कमालीची शांतता, मधूनच ऐकू आलेले गिटारचे स्वर, हे सारं पोर्तुगीज-ब्रिटीश काळाची आठवण करून देणारं आहे. चार-पाचशे वर्षापूर्वींची ‘कलोनिअल’ काळातली मुंबंईची वस्ती कशी असेल हे कुणाला पाहायचं असेल, तर माजगांवातल्या या ‘म्हातार पाखाडी’मध्ये एखादी चक्कर जरूर टाकावी.
इथे आम्ही डेनीस, डेव्हीड आणि स्टॅन्ली या बाप्टीस्टा आडनांवाच्या बंधूंना भेटलो. यांचं वाड्यासारखं मोठं घरं १८८० साली बांधल्याची पाटी त्यांच्या घरावर आहे. तेंव्हापासून हे कुटूंब इथे राहात आहे. इथून जवळच त्यांची गोन्सालविसांकडे दिलेल्या बहिणीचं लालचुटूक रंगात रंगवलेलं, एक मजली देखणं घर आहे. याच गोन्सालविसांच्या घरात आम्ही बाप्टीस्टा बंधूंशी गप्पा मारत बसलो होतो.
म्हातार पाखाडीत पूर्वी सर्व वस्ती ख्रिश्चनांची होती. फक्त उत्तर-दक्षिण सीमेवरच्या दोन टोकांच्या दोन चाळीत हिंन्दू होते. सर्वच बंगल्या किंवा वाडे. पोर्तुगीज बांधणीची स्वतंत्र घरं. हा परिसर काहीसा उंचावर आहे, म्हणून ही ‘माथा-र पाखाडी’. काळाच्या ओघात ती ‘म्हातार पाखाडी’ झाली. इथले बहुतेक सर्व ख्रिस्ती वसई-पालघर पट्ट्यातले, शांतताप्रिय लोक. बहुतेक सर्व मुळचे हिन्दू परंतू पोर्तुगिज काळात बाटलेले किंवा बाटवलेले व त्याची जाण बाप्टीस्टा बंधूंना आहे, असं त्यांना गप्पांमधे सांगीतलं. ‘म्हात्रे’ ह्या पालघर पट्टातल्या मूळ आडनांवावरुन ‘म्हातार’ हा शब्द आल्याचंही कुठेसं वाचलं होतं. आता इथं वसलेले लोक मुळच्या वसई-पालघरपट्ट्यातले चौधरी, चुरी, म्हात्रे, पाटील वैगेरे असल्याने, ही व्युत्पत्तीही पटण्यासारखी आहे. पाखाडी म्हणजे छोटा रस्ता किंवा वसती.
परंतू आता हे सर्व लोक अत्यंत अस्वस्थ आहेत. एकेकाळी शंभरच्या आसपास असलेल्या ह्या देखण्या घरांपैकी फक्त सत्तर-एक घरं तग धरून आहेत. ‘विकास’ उर्फ ‘रिडेव्हलपमेंट’ नांवाच्या लावसटीची काळी नजर यांच्या वस्तीवर पडलेली असून, त्याने परिघावरील वस्ती गिळंकृत करायला सुरुवात केलेली आहे. ह्या ‘विकासा’ने नको नको त्या प्रवृत्तीची माणसं इथे आणून ठेवली आहेत. ज्या ऐसपैस घरात एखाद कुटूंब राहायचं, तिथे आता पंचवीस कुटूंब राहायला आली आहेत आणि त्याचे दुष्परिणामही दिसू लागलेत. माझ्या लहानपणी माझं एक गमतीदार निरिक्षण होतं. ‘विकास’ नांवाची मुलं वर्णानं काळी असतात हे ते निरिक्षण..! याच कारण त्याकाळात माझ्या संपर्कात आलेली ‘विकास’ नांवाची सर्वच मुलं कृष्णवर्णाची होती. अर्थात ती लहानपणाच्या मर्यादित जगातील समजूत होती, (कृपया ज्यांचं नांव विकास आहे त्यांनी वाईट वाटून घेऊ नये ही नम्र विनंती.). तर लहानपणीचे ‘विकास’, आता काहीशी मॅच्युरीटी आल्यावर (अशी माझी स्वत:बद्दलची समजूत आहे, आपण गांभिर्यानं घेऊ नये.), खरोखरच काळा असतो हे नव्याने उमजलं आणि काल तर हे वास्तव मनाला झोंबलं..
विकासाचा वरवंटा फिरू लागला लागला, हे दु:ख इथल्या रहिवाश्यांना आहेच, त्याहीपेक्षा मोठं, काळजाला डागण्या देणारं दु:ख त्यांना मुंबईची पालक म्हणवणारी मुंबई महानगरपालिका देते आहे. ही चार-पांचशे वर्षांपूर्वीची टुमदार घरांची ‘हेरीटेज’ दर्जाची वस्ती, महानगरपालिकेच्या दृष्टीने ‘झोपडपट्टी’ आहे. महानगरपालिकेच्या दृष्टीने मुंबईचं हे सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वैभव, निर्बुद्ध आणि गलिच्छ विकासासाठी योग्य आहे हे इथल्या रहिवाश्यांचं दु:ख आहे. त्यांना ‘झोपडपट्टीवासी’ म्हणून गणलं जातंय, ही त्यांच्या हृदयातली जळजळ आहे. आजच्या लोकसत्तेतही मुंबईचे आद्यनिवासी असलेल्या कोळी बंधूंचं निवासस्थान असलेला ‘वरळी कोळीवाडा’ ही शासनाच्या लेखी ‘झोपडपट्टी’च असल्याची दुर्दैवी बातमी आहे.
मि. बाप्टीस्टा बंधूंचं घर सन १८८० सालातलं आहे. इकडची बाकी इतर घरही त्या दरम्यानची किंवा त्याही अगोदरची आहेत. इतक्या पूर्वी झोपडपट्टी हा शब्दही जन्माला आला नव्हता, मग ही झोपडपट्टी कशी, हा प्रश्न येथे पिढ्यान पिढ्या राहाणारे रहिवाशी स्वत:लाच विचारत आहेत. हा प्रश्न त्यांना स्वत:लाच विचारावा लागतोय, कारण त्यांचं हे दु:ख ऐकायला ना पालिकेकडे वेळ आहे ना स्वत:ला सेवक म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे..! त्यांच्या डोळ्यावर येथील जागा आणि तेथे प्रति चौरस फुटामागे मिळू शकणाऱ्या करोडो-अब्जोंच्या काळ्या-पांढऱ्या मायेचं हिडीस कातडं त्यांनी ओढून घेतलं आहे.
आपल्या या देशी पार्श्वभुमीवर परदेशी लोकांचं वागणं नजरेत भरण्यासारखं आहे. पोर्तुगाल, युरोपातून आर्किटक्चरचे विद्यार्थी आजही मुंबईचा हा बहुमोल ठेवा पाहायला, त्याचा अभ्यास करायला आवर्जून येतात. अनेक परदेशी पर्यटकही मुंबईतला हा वारसा पाहायला इथे आवर्जून येतात. काही वर्षाॅपूर्वी ह्याच परिसरात असलेलं एक पोर्तुगीजकालीन मोठं गेट होतं व ते पाहायला पोर्तुगालहून काही लोक आले होते. त्यांनी सोबत त्या कमानीचा फोटोही आणला होता. पण दुर्दैवाने त्या कमानीचा कोणताही मागमूस त्या परदेशी लोकांना लागला नाही, ना तेथील कोणी त्यांना काही माहिती सांगू शकलं, असं डेनीस बाप्टीस्टा सांगत होते. आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे..
खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे.
हा सारा परिसर जर आहे तसा जपून ठेवला, तर पर्यटनाचं एक उत्तम साधन होऊ शकतं, हे आमच्या लक्षात का येत नाही, हाच मोठा प्रश्न आहे. प्राचिन मुंबई कशी होती हे वर्तमान आणि भावी पिढ्यांना दाखवण्यासाठी राखून ठेवायला हवी. परदेशी पर्यटकांतही या गोष्टींचं प्रचंड आकर्षण आहे. परदेशांत तेथील सरकारांनी अशा वस्त्या पर्टकांना दाखवण्यासाठी त्यांच्या त्याकाळच्या स्वरुपात मुद्दाम राखून ठेवल्या आहेत व त्या पाहायला येणाऱ्या पर्यटकांना अभिमानाने दाखवल्या जातात. हे असं आपल्याकडे का होऊ शकत नाही?
होऊ शकत नाही असं नाही, प्रश्न मानसिकतेचा आहे..मुंबई शहराचा आणि पर्यायाने देशाचाही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, राज्यकर्ते आणि अधिकारी, यांनी एवढ्यापुरता तरी स्वार्थ थोडासा बाजूला सारून विचार करण्याची गरज आहे आणि त्यांनी असा विचार करावा यासाठी लोकमताचा दबाव निर्माण करण्याची जबाबदारी आपलीही आहे..
— ©️ नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply