मेहंदी सजण – सवरनं फेकून हातात खड्ग घे पोरी…
स्वत: चा पदर आता तुलाच सांभाळायचा आहे..
जमलं तर तुझ्यातल्या क्रोधाग्निचं जतन कर.
जागोजागी शकुनी ‘सरीपाट’ मांडून बसलेत…दुर्योधन आणि दुष्यासनही बसला आहे सोंगट्या पुढं करून..!
सर्वांची मती विकली जाईल, या अगणित जरासंधाने भरलेल्या दुनियेत…
भीष्म असतील तरी आवाज निघणार नाही, ते शब्दाने बांधील आहेत ‘आंधळ्या’ धृतराष्ट्राच सिंहासन वाचवण्यासाठी…
कोणी अंगराज येऊन तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे पण उडवीलं…
ज्या पांडवांनी तुला सरीपटाच्या चौकड्यात कुरुक्षेत्र दाखवलं त्यांच्यावर तर विसंबून राहूच नकोस
माझं ऐक, तू स्वतः शस्त्र उचल द्रौपदी, आता कोणी गोविंद येणार नाही तुझ्या रक्षणाला…!
ज्यांनी स्वतःची लाज विकली, तुझी लज्जा
ते काय वाचवतील…?
म्हणून माझं ऐकं द्रौपदी, तू शस्त्र उचल, आणि जोपर्यंत या कलियुगी मानसिकतेचा संहार होणार नाही, थांबू नकोस..
आता कोणी कृष्ण येणार नाही .. !!!
— © अनिलराव जगन्नाथ
Leave a Reply