छे हो मला बालवाडी हे माहित नव्हते. पाच वर्षे पूर्ण झाली की थेट पहिल्या इयत्तेत. आणि पु. ल. यांच्या भाषेतील पालक केजी वगैरे काही नव्हते. चार मैत्रीणीसोबत शाळेत जायचे आणि यायचे. रडले नाही कधीच. पण नोकरी करत असताना मात्र बालवाडीत बसण्याची संधी मिळाली होती ती अशी. माझी नगर परिषदेची शाळा. त्यामुळे पहिल्या इयत्तेत मुलांना प्रवेश मिळणे सोयीचे व्हावे आणि शाळेची सवय व्हावी म्हणून बालवाडी सुरू करण्यात आली होती. ती ही बऱ्याच वर्षांनी. एकदा एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन शाळेत आले. बालवाडीत नांव घातले. आणि सांगितले की या मुलाची आई मानसिक दृष्ट्या बरोबर नाही म्हणून तो घाबरतो. मोकळ्या पणाने रहात नाही आणि हट्टी स्वभाव आहे त्याचा. हात जोडून विनंती करतो की कृपया त्याला समजून घ्या आणि रागवू नका. ते स्वतः निवृत्त शिक्षक होते. पहिल्याच दिवशी वर्गात गेला मी सोबत होते त्याच्या. आणि माझा मुलगाही त्याच बालवाडीत होता म्हणून मी त्याला मुलाकडे जा असे सांगितले. पण तो माझा पदराला घट्ट धरून उभा होता. पद्धतीप्रमाणे मुलांनी नवीन मित्र आला आहे म्हणून टाळ्या वाजवल्या तरीही तो ढिम्म जागचा हलला नाही. आणि कावराबावरा झाला घाबरून थरथर कापत डोळे भरून आलेले. मला समजले की याची काय अवस्था आहे. त्यामुळे मी त्याला घेऊन मुलांच्या रांगेत सतरंजीवर त्याला जवळ घेऊन बसले. तसा तो शांत झाला. आता शिक्षिकेची परिस्थिती बिकट झाली. कारण मुख्याध्यापिका खाली मुलात बसल्या आहेत. त्यामुळे त्याच गोंधळून गेल्या. मग मुलांच्या मधल्या सुट्टीत एकत्रित जेवण. गाणी. गोष्टी यात रमला आणि मी हळूच बाहेर पडले. शाळा सुटायची वेळ झाली होती म्हणून. त्याचे आजोबा आले तेही वेळेपूर्वीच. काळजीनं घामाघूम झाले होते म्हणून मी त्यांना घेऊन बाहेरुन नातवाला दाखवले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला होता.
नंतर त्यांनी वर्ग शिक्षिकेला विचारले होते की काय जादु केली तुम्ही आता तो रोज शाळेत जायला लवकरच तयार होतो. बाईंनी सांगितले की माझी नाही मु. अ. बाईंची जादू आहे ही आणि सगळे सविस्तर माहिती दिली. आजोबांना जे वाटले होते ते त्यांना बोलून दाखविता आले नाही पण त्यांच्या डोळ्यातील पाण्याची भाषा मला समजली. त्यामुळे मला बालवाडीत प्रवेश मिळाला याचा जास्त आनंद झाला. एका अंकुरणाऱ्या छोट्याश्या जीवासाठी मी काही तरी करु शकले. पण आता अंगणवाडी बालवाडीत मुलांना रमण्यासाठी खूप खेळणी असतात. प्रशिक्षण घेतलेल्या बाई टिचर. मदतनीस. रिक्षा. पालक यांची मदत असते. हे सगळे पाहून वाटत की आमच्या काळी का नव्हते हे. असो काही का होईना बालवाडीत मुलांच्या समवेत एक दिवस घालवला तिथे.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply