नवीन लेखन...

माझं गाव – निसर्गरम्य कर्जत

 

माझ्या माहेरचे गाव जसे देवाचे वरदान
निसर्गही प्रसन्न इथे बहरला भरभरून||

माझ्या माहेरच्या गावी वाहे वारा सुगंधीत
सोन्याचा निघे धूर पीक डोलते शेतात||

वाटे विसावा मनास देई क्षण आनंदाचे
साऱ्या जगात सुंदर गाव माझ्या माहेरचे||

प्रत्येक स्त्रीला विचारले कि तुझे आवडते गाव कोणते? तर तिच्या तोंडून अगदी सहजपणे माहेरच्या गावचेच नाव येईल. मीही त्याहून काही वेगळी नाही. “स्वर्ग जरी दिला तरी याची तोड नाही, माहेरच्या गावची सर कशातच नाही”. हेच खरे. मुंबई पुण्याच्या मध्ये असलेले माझे कर्जत. भरभरून निसर्गाची कृपा असलेले माझे कर्जत. जेष्ठ साहित्यिक कै. राम गणेश गडकरी, कै. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले माझं लाडकं कर्जत. छोटंसं टुमदार शहर. इथे शहराच्या सुविधाही आहेत आणि गावातले सौंदर्यही आहे. कर्जतची हीच खासियत मुंबई पुणे सारख्या शहरातल्या लोकांना आकर्षित करते. या माझ्या गावाबद्दल लिहिताना शब्दही अपुरे पडतात.

कर्जत काल, आज आणि उद्या : कर्जतचा पूर्व इतिहास (काल)

कर्जत परिसरातील किल्ले

कर्जत परिसरात राजमाची, भिवगड, सोनगिरी, पेव, पदरगड, कोतळी गड चंदेरी हे किल्ले आहेत. कर्जतच्या पूर्वेस ७-८ किलोमीटरवर ढाक किल्ला आहे. पेठचा किल्ला कर्जतच्या ईशान्येस २१ किलोमीटर व नेरळच्या पूर्वेस १ किलोमीटरवर आहे. कोतळीगड किंवा कोथळागड या नावानेही इतिहासात त्यांचे उल्लेख सापडतात. १६८४ साली अब्दुल कदर या सरदाराने किल्ल्याचा ताबा मिळवला होता. नोव्हेंबर १६८४ व एप्रिल १६८५ ला हा किल्ला परत घेण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

कर्जत परिसरातली पुरातन लेणी

कर्जतच्या उत्तरेस २५ किलोमीटरवर आंबिवली आणि टेंभरे येथे बौद्ध लेणी आहेत. या व्यतिरिक्त इथल्या डोंगरावर इतरही अनेक दुर्लक्षित लेणी आहेत. स्थानिक त्याला ‘याड’ किंवा ‘पांडवाई’ म्हणतात. राजमाची किल्ल्याच्या परिसरातली ‘कोंढाणे लेणी’ ही खूप पुरातन आहेत. ती इसवीसनाच्या चौथ्या शतकाच्या पूर्वार्धात या लेण्यांची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे.

काही जणांच्या मते कर्जत गाव साधारणपणे १८०२ च्या सुमारास वसले असावे. अहमदनगर जिल्ह्यातील ‘कर्जत’ येथील बहुसंख्य नागरिक दुष्काळामुळे येथे स्थलांतरित झाले असावेत व त्यांनी आपल्या जुन्या गावाचे नाव ह्या गावाला दिले असावे असा काही जाणकारांचा अंदाज आहे. तर काही जाणकारांच्या मते गावात भरणाऱ्या बाजारावर ‘कर’ व ‘जत’ घेतला जात असे त्यातून या गावाचे नाव ‘कर्जत’ पडले. कर्जतला रेल्वे येईपर्यंत फारसे महत्व नव्हते. तेंव्हा ‘नरसापूर’ तालुका होता. नरसापूर मुख्य गाव होते. पेशवे यांचे सरदार पिंपुटकर यांच्या वास्तव्याने ‘दहिवली’ ला खूप महत्व होते. दहिवली गावातील विठ्ठल मंदिराच्या स्थापनेच्या वेळी सवाई माधवराव पेशवे थेथे येऊन गेल्याने दहिवलीला विशेष महत्व प्राप्त झाले.

१८५६ च्या सुमारास कर्जत पर्यंत रेल्वे आली व पुढे खंडाळा घाटापर्यंतचे काम पूर्ण होऊन रेल्वे मार्ग पुण्याकडे गेला. सुरवातीला पळसदरीला रेल्वेचे महत्वाचे ठाणे होते पण कर्जत परिसरात मुबलक मोकळी जागा असल्यामुळे कर्जतला जंक्शन स्टेशन बनवले.

१९३० पर्यंत कल्याण येथे आगगाडीला बँकर लागत असे. परंतु त्यानंतर कर्जतला बँकर लागण्यास सुरवात झाल्यामुळे पुणे किंवा त्यामार्गे जाण्याऱ्या सर्व गाड्या कर्जतला थांबू लागल्या आणि कर्जतचे महत्व वाढू लागले. पूर्वी मारुती मंदिर परिसरातल्या टेकाडावर सात आठ घरे असलेल्या भागाला कर्जत समजले जायचे. त्या नंतर त्या भागाला ‘पाटील अळी’, ‘दगडे अळी’ व खालच्या भागाला ‘डेक्कन जिमखाना’ असे म्हणू लागले. रेल्वेच्या आगमनानंतर शासनातर्फे कर्जत परिसरातील भिडे, गांगल, पाध्ये, काळे, कोडिलकर, मुळे, आरेकर इत्यादी श्रीमंत घराण्यांना रेल्वे परिसरातील मोक्याच्या जागा ९९ वर्षांच्या कराराने देण्यात आल्या. तेथे त्यांनी टुमदार घरे बांधली. खंडाळा घाटाचे काम चालू होते. तेंव्हा तिथे काम करणाऱ्या मजुरांसाठी ठेकेदाराने उल्हास नदीच्या काठी छोटी छोटी घरे बांधली. ते काम पुरे झाल्यावर त्या जागा विकण्यात आल्या तीच सध्याची महाविरपेठ आहे.

१८९३ साली कर्जत येथे ‘जीवन शिक्षण मंदिर’ शाळा सुरु झाली. ह्या शाळेत कै. श्री. राम गणेश गडकरी, श्री. प्रबोधनकार ठाकरे, शेतकरी कादंबरीकार श्री. र.वा. दिघे यांचे शिक्षण झाल्यामुळे ही शाळा ऐतिहासिक ठरली आहे. १८९३ च्या दरम्यान पोस्टाची व पोलिसांसाठी निवास्थाने बांधण्यात आली. टेकडीवर मामलेदार कचेरी व पोलीस स्टेशन चालू झाले.

१४ ऑगस्ट १९१९ रोजी कर्जतला आशियातील सर्वात मोठे भात संशोधन केंद्र चालू झाले. १९५६ साली मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना कर्जत परिसराला ‘ग्रीन झोन’ म्हणून जाहीर गेले. त्यामुळे हा परिसर प्रदूषण मुक्त राहिला आहे.

वर्तमानातले कर्जत (कर्जत आज)

१९९२ साली कर्जत आणि दहिवली यांची मिळून कर्जत नगरपरिषद स्थापन झाली आणि नंतर कर्जतचा विकास झपाट्याने झाला. पूर्वीचे वाडे जाऊन त्याठिकाणी तीन, चार माजली इमारती झाल्या. पंचवीस वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी बांधलेल्या इमारती पाडून सध्या त्यांच्या जागेवर आठ-नऊ मजली टोलेजंग इमारती होत आहे. कर्जत शहर कात टाकून झपाट्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. कर्जतचे रेल्वे स्टेशन सुद्धा आधुनिक बनत आहे. बाहेरगावच्या लोकांना कर्जतची ओळख खास करून म्हणजे दिवाडकरांचा वडापाव. दिवाडकरांनी कर्जतच्या वडापावची चव सर्वप्रसिद्ध केली. कर्जत म्हटलं कि दिवाडकरांचा वडापाव हे समीकरणच होऊन बसलं. आता काही वर्षांपासून दगडे, मावकर, खोत, सट्टू असे अनेकजण या स्पर्धेत आहेत. प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. बेडेकर यांचे मक्याचे तेल आणि वैद्य यांची आवळा सुपारी यांनी कर्जतचे नाव अखिल भारतीय पातळीवर नेऊन ठेवले. यांचे नुसते नाव घेतले तरी कर्जतकर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असुदे त्याची मान अभिमानाने उंचावते.

कर्जत मध्ये लेखन साहित्य परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. कर्जतच्या ‘जीवन शिक्षण मंदिर’ या शाळेत राम गणेश गडकरी काही वर्षे शिकले होते. या महान साहित्यिकाची आठवण म्हणून कर्जतमधील काही गुणी साहत्यिकांनी पुढाकार घेऊन या शाळेतील सभागृहाला ‘कै. राम गणेश गडकरी सभागृह’ असे नामकरण केले आहे.

कर्जत परिसरातले शुद्ध वातावरण आणि निसर्गरम्य परिसर यामुळे सुरवातीपासूनच इकडे पर्यटक आकर्षित होतात. कर्जतच्या आसपासच्या भागात अनेक चित्रपट कलाकारांचे, व्यावसायिकांचे फार्म हाउसेस आहेत. तिथेच अनेकांनी शेततळी केली आहेत त्यात मत्स्यपालन केले जाते, फार्म हाऊस व आसपासच्या परिसरात भाजी लागवड केली जाते, तसेच विविध प्रकारच्या फळांची झाडेही लावली आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकांना तसेच कर्जतकरांना ताजी मच्छि, फळे, भाज्या सहज उपलब्ध होतात. अनेकांनी कर्जतला आपले ‘सेकंड होम’ म्हणून पसंती दिली आहे. येणाऱ्या उच्च्भ्रू लोकांच्या गरजा आवडीनिवडी लक्षात घेऊन कर्जतमध्ये जिम, तरणतलाव, गोल्फ क्लब अशा सुधारणा होत आहेत. यातून अनेकांना रोजगाच्या संधी नक्कीच उपलब्ध होत आहेत.

कर्जत जर पर्यटकांना, जागेमध्ये गुंवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना इतके आकर्षित करते तर चित्रपट व्यावसायिकांना आकर्षित केले नाही तर नवल! त्यांनाही कर्जतच्या निसर्गरम्य परिसराची भुरळ पडते. त्यातूनच १५ मे २०२० रोजी निर्माण झाला ND स्टुडिओ. प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत परिसरात या भव्य अशा स्टुडिओची निर्मिती केली. या ठिकाणी ह्रितिक रोशन आणि ऐश्वर्या राय अभिनित ‘जोधा-अकबर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. तसेच डॉ. अमोल कोल्हे अभिनित ‘ छत्रपती शिवाजी महाराजांची’ सिरीयल, ‘बाजीराव मस्तानी’ ही सिरीयल अशा अनेक मालिकांची निर्मिती या ठिकाणी झाली.

असे माझे कर्जत सुधारणेच्या दिशेने वाटचाल करत असले तरी आपल्या परंपरा सांभाळून पुढे जात आहे. दहिवली मधले विठ्ठल मंदिर, काडावचे गणपती मंदिर, तमनाथचे, वैजनाथचे शंकराचे मंदिर, वेणगावची देवी, मदर मेरी चर्च या सर्व देवस्थानांची जत्रा, पालखीची परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरु आहे.

भविष्यातले कर्जत

मुंबईमधील किंवा परिसरातील अनेक धनवंतांनी व मध्यमवर्गीयांनी कर्जतची निवड आपले सेकंड होम म्हणून केली आहे. लवकरच निर्माण होणाऱ्या नवी मुंबई विमानतळामुळे कर्जत येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी येणाचाही एक प्रघात अलीकडे निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक गृहनिर्माण प्रकल्प कर्जत परिसरात येत आहेत. रस्त्यांची सुविधा, योग्य हवामान, पुरेसे पाणी नियोजन, योग्य वीज पुरवठा, उत्तम शिक्षणाची सोय, अभियांत्रिकी महाविद्यालय, यामुळे कर्जतकडे येण्याची लोकांची ओढ वाढत आहे. जवळच असणाऱ्या पाताळगंगा या औदयोगिक वसाहतीत काम करणारे लोकही कर्जतला राहण्यास पसंती देतात. कर्जतमध्ये अनेक ठिकाणी सुशोभीकरण होत आहे. जिथे लोक कचरा टाकत असत तिथे आता सुंदर पुतळे, कॉर्नर गार्डन नगरपालिकेकडून बनवण्यात येत आहेत. मुळात सुंदर असलेल्या कर्जतचे रूप अजून अजून खुलत आहे. इथल्या सोयी सुविधांमुळे कर्जत शहराला ‘तिसरी मुंबई’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. अजूनही कर्जतमध्ये सुधारणा होत आहेत होत राहतील. पण इथले लोक हे बदल होत असताना निसर्गाचा समतोलही सांभाळतील यात शंकाच नाही.

असं हे मनाला भुरळ पडणारं माझं देखणं गाव. आपल्या भारतीयांच्या ‘अतिथी देवो भव!’ या परंपरेला जागून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला नेहेमीच सज्ज असतं आणि आम्हा माहेरवाशिणींना तर याइतकं आपुलकीचं ठिकाण नाही. शेवटी इतकंच सांगीन…

साहित्यिकांच्या पदस्पर्शाने झाले हे पावन
माझे गाव माझ्यासाठी साऱ्या जगात महान ||

समाप्त.

— सौ. संपदा राजेश देशपांडे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..