मी लिहायला कधी सुरूवात केली.अर्थात अ, आ, इ, ई हे आईने पाटीवर प्रथम लिहून घेतलं, तेव्हांपासून मी लिहायला लागलो हे ही खरंच आहे.पण जाणूनबुजून एखाद्या स्वतंत्र विषयावर, गोष्टीवर लिहायची सुरूवात कधी झाली.मी मागे वळून पहातो तर माझ्या लक्षांत अनेक गोष्टी येतात.पहिली गोष्ट आठवते की माझे वडील मला रोज झोपताना एक गोष्ट सांगायचे.किंबहुना गोष्ट ऐकल्यावाचून मला झोप येत नसे.आईवडीलांनी इतर कितीही काटकसर केली तरी माझ्या मोठ्या बहिणीसाठी त्यांनी खूप छोट्या मुलांची पुस्तकं घेतली.त्या पुस्तकांची किंमत केवळ एक आणा, दोन आणे, चार आणे अशी असे.परंतु पैशा दोन पैशाला कोथिंबीरीची जोडी मिळे.एक मध्यमवयस्क बाई महिन्या दोन महिन्यांनी आमच्याकडे नियमितपणे फेरी टाकत.त्यांच्याकडे कापडाने गुंडाळलेलं एक बोचकं असे.ते उघडलं की पुस्तकांचा खजिना बाहेर येई.मग आम्ही ती पहायला सुरूवात करत असू.प्रत्येक वेळेस एक दोन पुस्तक घेतली जात.मी हातांत आलेलं प्रत्येक पुस्तक तात्काळ वाचून काढत असे.मग ती पुन्हा पुन्हाही वाचली जात.आमच्या घरी कधी चणे-शेंगदाण्याची पुडी घेतली तर ते खाऊन झाल्यावर त्या पुडीचा कागद सरळ करून वाचला जाई.किंबहुना घरांत आलेला प्रत्येक कागद निदान मी तरी वाचत असे.पुढे वडिल गिरगांवच्या लायब्ररीमधून बाबूराव अर्नाळकरांची रहस्यकथांची पुस्तके आणू लागले.मी ती त्यांच्या आधीच नॉन स्टॉप वाचून काढी.तेव्हा ती आवडतही.त्याशिवाय बहिणीसाठी दर महिन्याला पोष्टाने ‘आनंद’ हे पुण्याहून प्रसिध्द होणारे मासिक येत असे आणि माझ्यासाठी नागपूरहून निघणारे “मुलांचे मासिक’ येत असे.दोन्ही मासिकांची मी आतुरतेने वाट पाही.तीं येताच मी त्याच दिवशी वाचून काढत असे.ह्याचा अर्थ माझा दिवसाचा पूर्ण वेळ वाचनात जाई असे नव्हे.मला वाटते वाचनाची आवड हा लेखन करावेसे वाटण्याच्या प्रक्रीयेचा आवश्यक भाग आहे.
▪
अंधेरी लोकल बोर्डाच्या चौथीच्या परीक्षेत मला “हिरवळ” हा अनंत काणेकरांचा ललितलेखांचा संग्रह बक्षिस मिळाला.तो वाचल्यानंतर मला लेखनातले वेगवेगळे प्रकार कळायला लागले.ते पुस्तक माझ्या पांचवीच्या वर्गशिक्षकांनी वाचायला मागून घेतले, ते मला परत मिळालेच नाही.कांही वर्षानी मी दुसरी प्रत विकत घेतली.त्याच वर्गशिक्षकांनी मला लिहिण्याचे उत्तेजन दिले.सहावीत असतांना एक हस्तलिखित अंक काढण्यात आला.त्यासाठी कांहीतरी लिहून घेतल्याचे आठवते.कदाचित तेच पहिले लेखन असावे.त्याच सुमारास मी वक्तृत्वांत भाग घ्यायला सुरूवात केली.मला वाटते, लेखन आणि वक्तृत्व ह्या दोन्हीसाठी स्वतंत्र विचार करण्याची क्षमता जोपासावी लागते.ती ह्या अवांतर वाचनामुळे जोपासली गेली.मी सातवी पास होऊन आठवीत हायस्कूलला जाण्याआधीच्या सुट्टीमधे रविवार सकाळने एक नाटक लिहायची स्पर्धा जाहीर केली.मला वेळ खूप होता.मी चांगले तीन अंकी नाटक लिहिलं.नाटकाचे हस्तलिखित स्पर्धेसाठी पाठवले.सकाळने स्पर्धेचा निकाल जाहीर करताना ८४ नाटके स्पर्धेसाठी आल्याचा उल्लेख केला.पहिल्या तिघांची नांवे जाहीर केली.अर्थात् माझे नाव त्यात असण्याची शक्यताच नव्हती.मी नाटकं वाचली होती.नाटकांबद्दल वाचत होतो.पण एकही व्यावसायिक नाटक पाहिलं नव्हतं.गणेशोत्सवांत एखादं नाटक पहायला मिळायचं तेवढचं.नाटकाला कथानक हवं आणि चटकदार संवाद हवेत एवढाच माझा समज होता.’भरता’च्या नाट्यशास्त्राच्या मूलभूत नियमांमधे ते कदाचित बसत होत असेल.त्याच काळांत रहस्यकथा वाचत असल्यामुळे कथानक रहस्यावर आधारीत होते.निकाल लागल्यानंतर सकाळने माझी नाटकाची वही परत पाठवली.त्यावर ८१ क्रमांक होता.तो बहुदा रीसीट क्रमांक असावा.पुढे कांही वर्षांनी तेच नाटक वाचले तेव्हां स्पर्धेत भाग घ्यायच्या स्वतःच्या धाडसाचे हंसू आले.अवाजवी आत्मविश्वासाचे आकलन झाले.पुढे ती वही कुठेतरी हरवली.
▪
पुढे हायस्कूलमधे नववीत एक हस्तलिखित काढण्यात आले.त्यांत मी एका इंग्रजी कवितेवरून लिहिलेली मराठी कविता समाविष्ट केली होती.त्यानंतर एसएससी अकरावी झाल्यावर एक लघुकथा लिहिली.ती मी लिहिलेली पहिली लघुकथा.त्यावेळी लोकसत्ता रविवारच्या अंकात एक लघुकथा छापत असे.माझी कथा उत्तम नव्हती पण बरी होती.छापण्याजोगी नक्कीच होती.मला वाटते तुकाराम कोकजे त्यावेळी हा विभाग पहात असत.त्यांना कांही ती पसंत पडली नसावी.कथा छापून तर नाहीच आली पण परतही नाही आली.माझ्याकडे त्या कथेची प्रतही नव्हती.आज मला ते कथानक फारच पुसट आठवतयं.ती पुन्हां लिहिण्याचाही मी प्रयत्न केला नाही.कथा लिहिण्याचा माझा उत्साह मावळला.शाळेत नोकरी करू लागलो.कामांत आणि पुढे संसारात व्यस्त झालो.अनेक वर्षे कांहीच लिहिलं नाही.कांही नाटकाच्या किंवा कथांच्या कल्पना मनात येत.त्यातल्या कांही डायरीत टिपून ठेवल्यांत.त्यांतली एक ठळक आठवण म्हणजे मला “मृगजळ” ह्या नांवाचे नाटक लिहायचे होते.परदेशी गेलेल्या मुलाची वाट पहाणाऱ्या वृध्द आईवडिलांची तडफड मला त्या नाटकांत दाखवायची होती.परंतु माझ्याकडून ते झाले नाही.पुढे जयवंत दळवींचे “संध्याछाया” आल्यावर मला माझ्या मनांतली कल्पना इतक्या समर्थपणे साकारलेली पहायला मिळाली.मी असा न्याय त्या विषयाला देऊच शकलो नसतो.इतर कांहीं कथाबीजंही कुणा ना कुणाच्या लेखनांत मला दिसली.त्या त्या काळांत लेखकांच्या मनांत तो किंवा तत्सम विषय येणं साहाजिकच नाही कां ?
▪
त्यानंतर १९७२पर्यंत मी कांही लिहिलं नाही.कांही कविता लिहिल्या पण त्या कधी प्रसिध्द करण्याइतपत बऱ्या आहेत असं मलाच वाटलं नाही.त्यामुळे त्या आजही वहीतच आहेत.त्यातलीच एक इंग्रजी कवितेवरून लिहिलेली “असते जेव्हा मिठीत तुझिया” ही कविता गृपवर पोस्ट केली होती.१९७२च्या सुमारास कै. श्री केदारे रिफायनान्सचे प्रमुख (डीजीएम-ई ग्रेड) होते.आयडीबीआयमधे तेव्हा सात-आठ डीजीएम असतील.ते खूप सिनीयर तर मी नुकताच स्टाफ अॉफीसर झालेलो.पण ते कामांतून मोकळे असले की मला बोलावीत.अनेक विषयांवर बोलत.खूप गप्पा करत.त्यांनी एक लघुकथा लिहिली व त्यानी मला ती वाचायला दिली.निव्वळ त्यात कथानक होतं आणि ते थोडक्यात होतं म्हणून ती लघुकथा म्हणता आली असती एवढचं.त्यांनी माझी प्रतिक्रिया विचारली, तेव्हां मी गुळमुळीत उत्तर दिलं.मला कथा विशेष आवडली नाही हें त्यांच्या लक्षांत आलं.पण त्या प्रसंगाने माझी कथा लिहिण्याची हौस परत जागी झाली.मी अनेक वर्षे कांही लिहिलं नव्हतं.परंतु त्याच काळांत वाचन खूप केलं होतं.मराठी बरोबरच इंग्रजी वाचनही बरंच केलं होतं.चांगली कथा कशी असावी याचा थोडा अंदाज मला आला होता.मी परत कथा लिहायचे ठरवले.
▪
नेमकी त्याच सुमारास महाराष्ट्र टाईम्सने कथा स्पर्धा जाहीर केली.मग मी माझ्या मनात असलेली एक कथा लिहून काढली.मी ती महाराष्ट्र टाईम्सला स्पर्धेसाठी पाठवली.स्पर्धेत तिला कांही यश मिळालं नाही.पण उल्लेखनीय कथा म्हणून तिचा उल्लेख झाला.महाराष्ट्र टाईम्समधे अधूनमधून लिहिणाऱ्या एकाने माझ्याशी संपर्क साधला.तोही एक होतकरू कवि-लेखक होता.माझी कथा खूप आवडल्याचे सांगितले.एकमेकांशी संपर्कात राहून लेखनाबद्दल चर्चा करता येईल असे त्याला वाटत होते.बऱ्याच वर्षानंतर ती कथा एका नियतकालिकाच्या दिवाळी अंकात “सूत्रधाराची किमया” या नावाने प्रसिध्द झाली.नंतर माझ्या दुसऱ्या कथासंग्रहात ती समाविष्ट केली.तिचे इंग्रजी भाषांतर “मास्टर प्लॕनर” आजही तुम्हांला माझ्या arvindkatha.blogspot.in ह्या ब्लॉगवर वाचतां येईल.पहिल्या कथेपासूनच मी कथाकथनही करायला सुरूवात केली.बोरीवलीला झालेल्या पहिल्या उपनगर साहित्य संमेलनांतहीमी कथाकथन केले.त्याच सुमारास ग्रंथाली चळवळीत काम करणाऱ्या एकाने बोरीवलीमधे एक वाचकांची मिटींग घेतली.तेव्हा आलेल्यांमधे ज्यांना लेखनाची आवड होती अशा बोरीवलीच्याच चारपाच जणांना मी म्हणालो की आपण सर्वांनी अधूनमधून एकत्र यावं.नवं कांही लिहिलेलं एकमेकांना वाचून दाखवावं.एकमेकांच्या लिखाणाबद्दल बोलावं, सुधारणा सुचवाव्या, इ. ह्यातून चांगले लिहिलं जावं ही माझी इच्छा होती.आमच्या चार पाच बैठका झाल्यासुध्दा.परंतु माझ्याशिवाय इतर कोणी कांही फारसं वाचून दाखवत नव्हतं.मग ते मंडळ बारगळलं.त्याच सुमारास दूरदर्शनवर “रजनी” ह्या अन्यायाविरूध्द लढणाऱ्या व त्यात यशस्वी होणाऱ्या स्त्रीची कहाणी सिरियली येत होती.रजनी प्रिया तेंडूलकरने रंगवली होती.माझा स्वतःचा अन्यायाविरूध्द भांडण्याचा अनुभव वेगळाच होता.तेव्हा मी एक लेख लिहिला, ” ‘रजनी’गिरी करून पहाच” आणि महाराष्ट्र टाईम्सला पाठवला.माझा लेख छापून आला नाही पण पुढच्याच रविवारी महाराष्ट्र टाईम्सने लोकांकडून “रजनीगिरीचे” अनुभव लोकांकडून मागवले.त्यांनी त्यात मी कॉईन केलेला रजनीगिरी शब्द वापरलेला पाहून माझ्या लक्षात आले की त्यांनी माझा लेख वाचला पण तो न छापता हे सदर सुरू करायचं ठरवलं.मी म.टा.च्या अॉफीसमधे गेलो.दिनकर गांगल उपसंपादक म्हणून हे काम पहात होते.मी त्यांना म्हणालो, “रजनीगिरी” हा शब्द मी प्रथम वापरला म्हणून माझा त्यावर हक्क निर्माण होत नाही हे मला समजते.परंतु त्याचा अर्थ तुम्ही माझा लेख वाचलात आणि त्यावरून असे लेख मागवण्याचे तुम्हाला सुचले, हे स्पष्ट आहे.”ते म्हणाले,”तुमचा लेख वाचला. प्रसंग योग्य आहेत. परंतु तो घडल्याची तारीख आणि अन्य तपशील त्यांत नाही. म्हणून लेख स्वीकारला नाही.”मी म्हटलं, “एक तर ह्या गोष्टी तुम्ही माझ्याकडे सहज मागू शकला असतात.तें नाही तर तुम्ही नवे त्याच विषयावरचे लेख मागवून नवे सदर सुरू करताना माझ्या लेखाचा किमान उल्लेख करण्याची सभ्यता पाळायला हवी होती.”माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर कांही परिणाम झाला नाही.गांगलांच साहित्यविश्वात नाव असलं तरी माझा ग्रह त्यांच्याविषयी बरा झाला नाही.
▪
१९७८ला आयडीबीआयमधे भरती झालेल्या तरूणांपैकी तिघा चौघांनी ‘आविष्कार’ सुरू केलं.त्यासाठी मी लेखन करायला सुरूवात केली.पहिल्याच अंकास एक कविता दिली.नंतर एक दोन कथाही लिहिल्या.भाबल, अरूण आणि भारती हे नेहमी लिहिण्याचा आग्रह करीत.मी कॕलिडोस्कोप ह्या सदरांत अनामिक म्हणूनही कांही लेख लिहिले.पण त्या सदरांत आलेले सर्व लेख माझे नाहीत.ट्रेनिंगसाठी लंडनला दीडमहिना राहून आल्यावरआविष्कार मधे”लंडनवारी” वर सहा-सात लेख लिहिले.ह्या आधी विविध वर्तमानपत्रांमधे माझी बरीच पत्रे वाचकांच्या पत्रव्यवहारांत प्रसिध्द झाली होती.आता मी माझ्या कथा प्रसिध्दीला पाठवाव्या असा विचार करू लागलो.लोकप्रभा साप्ताहिक सुरू झालं होतं आणि त्यांत सुरूवातीला कथा छापत असत.मी एक कथा लिहिली होती तिचं नाव होतं “माय झाली मावशी”.नरीमन भवन पासून लोकप्रभेचं अॉफीस जवळ असल्यामुळे मी ती कथा तिथे प्रत्यक्ष नेऊन दिली.त्याच सुमारास इंडीयन एक्स्प्रेसमधे दीर्घकालीन संप झाला.लोकप्रभा कांही महिने बंदच होता.तीन महीने मधे गेल्यावर माझी गोष्ट छापून येण्याची शक्यताच राहिली नाही असं मला वाटू लागलं.रविवारचा लोकप्रभाचा अंक गुरूवारीच मिळत असे.एका गुरूवारी सकाळी पेपरवाल्याने पेपरबरोबर लोकप्रभाही दिला.त्यावेळी शाळेत असणाऱ्या माझ्या मुलाने तो घेतला आणि चाळला.त्यांत चित्रासह छापलेली माझी कथा त्याला दिसली आणि त्याने आनंदाने उडीच मारली.त्याने मोठ्याने सांगितले,”बाबांची गोष्ट छापून आलीय.”जुलै १९८२ मधे लोकप्रभामधे आलेली ती पहिली गोष्ट.१९८४मधे मी तीन छोटी छोटी स्वतंत्र नाटुकली लिहिली.दहा दहा मिनीटांच्या त्या तिन्ही नाटीकांचा विषय एकच होता, “मुखवटा.”ते लिखाण मी दूरदर्शनच्या “गजरा” ह्या कार्यक्रमासाठी विनायक चासकर यांच्या नावे पाठवले.पण मला त्यांनी साधी पोहोच देखील कळवली नाही.
▪
त्यानंतर मी आणखी एक कथा लिहिली.ती कथा मी लोकप्रभाच्या अॉफीसमधे देऊन आलो.तिचं नाव होत “अखेरचं द्वंद्व”.तिथे तांदळेकर नावाचे सद्गृहस्थ त्या कथा स्वीकारीत.ती कथा लोकप्रभाने मला “साभार परत” केली.मला नवल वाटले.ती कथा चांगली होती.मग मी ती घेऊन लोकप्रभाच्या संपादक वसुंधरा पेंडसे यांना भेटलो.सर्व नियतकालिकांचा एक नियम पक्का असतो की “साभार परत” केलेल्या लिखाणाविषयी कोणताही पत्रव्यवहार किंवा चर्चा करतां येणार नाही.मी त्यांना सुरूवातीलाच म्हणालो, “तुमचा असा नियम असतो हे मला ठाऊक आहे व तो मान्यही आहे.पण एक वाचक म्हणून मी सांगतो की लोकप्रभात प्रसिध्द होणाऱ्या गोष्टींचा जो सर्वसाधारण दर्जा आहे, त्यापेक्षा माझी कथा निश्चित चांगल्या दर्जाची आहे.”त्यांनी माझे बोलणे नीट ऐकून घेतले.मला कांही प्रश्न विचारले.गांगलांच्या उलट अनुभव इथे आला.मग त्या म्हणाल्या, “ही कथा इथेच ठेवून जा. मी वाचेन.”मी कथा तिथे ठेऊन आलो.सावकाशपणे पुन्हां चौकशी करायचे ठरवले.परंतु आठवडा झाला आणि गुरूवार आला, पहातो तर “अखेरचे द्वंद्व त्या आठवड्याच्या लोकप्रभेत छापलेली होती.लोकप्रभाचे चित्रकार कथेबरोबर सुंदर चित्र रेखाटत असतं.त्याने ती कथा जास्तच आकर्षक वाटे.त्यानंतर मी दिलेली प्रत्येक कथा लोकप्रभेने छापली.माझ्या प्रत्येक कथेला वाचकांचा छान प्रतिसाद मिळाला.लोकप्रभेकडे त्या अर्थाची पत्रे येऊ लागली.लोकप्रभा कथेखाली माझा पत्ता देत असे.त्यामुळे अनेक वाचक आपला प्रतिसाद थेट माझ्या पत्त्यावरच पाठवू लागले.पुढे लोकप्रभेने लघुकथा छापणेच बंद केल्यावर मी कथा दुसरीकडे पाठवू लागलो.माझ्या कथा लोकमत, सह्याद्री, धर्मभास्कर, इ. नियतकालिकांत प्रसिध्द होऊ लागल्या.फक्त दिवाळी अंक काढणाऱ्यांनीही माझ्याकडून कथा मागून घेतल्या.पण हे सर्व १९९०-९१ नंतर.१९८३मधे लोकसत्ताने समस्यापूर्ति म्हणून एक स्पर्धा जाहीर केली.कवितेचा एक चरण देऊन बाकी कविता पूर्ण करण्याची स्पर्धा.ओळ होती,”कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली”.मी ती समस्या अशी पूर्ण केली.अता रक्त जाळूनी अपुले पेटवा मशालीकसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखालीउगे सूर्य स्वातंत्र्याचा कल्पिले सुराज्यआज दिन दुबळ्यांसाठी सौख्यकिरण वर्ज्यस्वार्थ होई सत्ताधारी निती बटीक झालीकसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली.त्याग होई मातीमोल भोग राजमान्यकरूनी नित्य अत्याचारा सबळ होती धन्यदेहदंड हयांची सज्जनांस झालीकसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखालीमी ती कविता पत्नीच्या नावावर स्पर्धेसाठी पाठवली.दिवाळीच्या दिवशी स्पर्धेचा निकाल लागला.तिसऱ्या बक्षिसाची कविता पत्नीच्या नावासकट आली होती.तिला दिवाळीची भेट मिळाली.तिला फोन येऊ लागले,”तू कविता कधीपासून करायला लागलीस ?”पुढे सुरेश भटांची उषःकाल होता होता काळरात्र झाली ही कविता ऐकली व “कसा सूर्य अंधाराच्या…..” ही ओळ त्या कवितेंतली आहे व त्या कवितेचा अर्थ तसाच आहे हे कळलं.
▪
लोकप्रभामधे १९८२-८५ ह्या काळांत बऱ्याच कथा प्रसिध्द झाल्यावर मला आपला एखादा कथासंग्रह असावा असे वाटू लागले.मी प्रथम कांही प्रकाशकांना पत्र लिहून अथवा भेटून कथासंग्रह छापण्याविषयी विचारले.परंतु सर्वांचा नकार आला.दोन-तीन प्रकाशकांनी माझ्या खर्चाने कथासंग्रह छापण्याची तयारी असल्याचे मला कळवले.ते मला मान्य नव्हते.मग मला असे समजले की नवीन लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकार अनुदान देतं.मी पहिला कथासंग्रह सरकारी अनुदानाने काढायचं ठरवलं आणि १९८६मधे अठरा कथांचा संग्रह “ऋण फिटता फिटेना” या नावाने सरकारी अनुदानाने प्रसिध्द व्हावा यासाठी अर्ज दिला.”ऋण फिटता फिटेना” आणि “जगी ज्यास कोणी नाही” या दोन कथा फार फार आवडल्याचे सांगणारी वाचकांची बरीच पत्रे मला आली होती.म्हणून कथासंग्रहाचे नांव ‘ऋण फिटता फिटेना’ ठरवले आणि अर्ज मंत्रालयांत सादर केला.मंत्रालयाने अर्ज मिळाल्याचेही ताबडतोब कळवले.पण कांही महिन्यांनी पेपरमध्ये बातमी वाचली की अनुदान समितीच बरखास्त करण्यात आली.नवी अनुदान समिती नेमायला बराच वेळ गेला.प्रत्यक्ष अनुमती मिळायला तब्बल अडीच वर्षे लागली.१९८९मधे मला पत्र आले की अठरापैकी पंधरा कथांचा संग्रह छापायची अनुमती आहे.तीन कथा गाळण्यात येतील, हे मान्य असल्यास कळवावे.मी संमति दिली.त्यानंतर मला पुण्याच्या नीळकंठ प्रकाशन यांचे नांव कळवण्यात आले.कथासंग्रह छपाईसाठी त्यांच्याकडे स्वाधीन करण्यांत आला होता.त्यांनी छपाईसाठी दीड वर्ष घेतली.शेवटी सप्टेंबर १९९१मधे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माझ्या २५० आप्तमित्रांच्या साक्षीने गोरेगांवच्या केशव गोरे सभागृहामधे त्यावेळचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पार पडला.
▪
मध्यंतरीच्या काळांत खूप कांही घडलं होतं.१९८६च्या दिवाळीच्या प्रतिपदेला एन. एस. वैद्य हे दिग्दर्शक माझे घर शोधत आले.स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाले,”आम्हाला तुमची “ऋण फिटता फिटेना” ही कथा खूप आवडली.मी त्या कथेवर मराठी सिनेमा काढण्याचे हक्क घ्यायला आलो आहे.शिवाय सिनेमासाठी कथानक वाढवावे लागेल.तर ती कथासुध्दा अडीच तासांच्या सिनेमासाठी तया करून द्याल कां ?एन.एस. वैद्य तीस वर्षांहून अधिक काळ सिनेमा उद्योगात होते.आधी संकलक मग दिग्दर्शक.त्यांना कथा आवडली.पुढे “नशीबवान” चित्रपट आला.मला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट कथाकार हा पुरस्कार १९८९मधे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या हस्ते मिळाला.ह्या गोष्टी मी माझी करीअरमधे दिल्यातच.त्यानंतर मी कोणत्याही मासिकाला पाठवलेली कोणतीही कथा परत आली नाही.सन २०००च्या जानेवारीमधे डींपल पब्लिकेशनतर्फे अठरा कथांचा दुसरा कथासंग्रह “दिव्याखाली अंधार” ह्या नावाने रवींद्र पिंगे ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला.परंतु १९९४पासून नव्या बँकेच्या निर्मितीत गुंतल्यामुळे हातून कांही लेखन झाले नाही.
▪
निवृत्त झाल्यावर खरे तर परत लेखनाकडे वळायला हवे होते.पण त्यावेळी मी “नेतृत्व” आणि “व्यक्तीमत्त्व विकास” ह्यांचे प्रशिक्षण देण्यात आणि एनएसईच्या आर्बिट्रेशनमधे गुंतून राहिलो.लिहिण्याची उर्मी क्वचितच आली.आणि आली तेव्हां प्रशिक्षणाच्या विषयांवरच लिहिण्याची इच्छा झाली.रोज थोड थोड लिहून मी “यश एका पावलावर” हे व्यक्तीमत्व विकासावर मराठीत पुस्तक लिहिले.मग त्याचेच भाषांतर “Success Is Just A Step Away” ह्या नावाने इंग्रजीत केलं.दोन्हीच प्रकाशन डॉ. दवे (माजी सेबी चेअरमन आणि युटीआय चेअरमन) यांच्या हस्ते २०१२मधे मोठ्या थाटामाटांत पार पडलं.त्यानंतर माझे मित्र व बँकेचे माजी एमडी, मुकर्जी ह्यांच्या आग्रहामुळे कांही कथांच इंग्रजीत भाषांतर करून ते पॉप्युलर प्रकाशनतर्फे २०१५ मधे “The Stories Of Inconsequential People” ह्या नांवाने प्रकाशित सीडबीचे माजी चेअरमन डॉ. नारायण ह्यांच्या हस्ते प्रकाशित झालं.मला वाटलं होतं हा माझ्या लेखनाचा पूर्णविराम ठरेल.परंतु जयंतने आपला व्हॉटसॲप गृप सुरू केला.त्यांत माझ्याबद्दल इतरांनी लिहिलेलं वाचून मलाच माझ्याविषयी लिहिण्याची स्फूर्ती झाली.आणि जून २०१६पासून माझी करीअरचे तीस भाग लिहिले.(जूननंतर गृपमधे आलेल्या सदस्याना पूर्वीचे लेख वाचायचे असल्यास माझ्या वैयक्तिक व्हॉटसॲपवर कळवावे).सर्वांचा सातत्याने उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे त्यापुढेही लिहिणे चालूच राहिले आहे.असा हा पॕसेंजर गाडीसारखासर्व स्टेशने घेतकधी सायडींगला पडून रहातधीम्या गतीने चालला आहे.माझ्या लेखनप्रवासांत “आविष्कार”पासून आतापर्यंत तुमची साथ मिळाली आहे.ती साथ आहे आणि मोबाईलवर लिहिण्याइतपत ताकद आहे, तोपर्यंत हा प्रवास चालूच राहिलं असे दिसते.
— अरविंद खानोलकर.
खूपच छान,प्रवास असाच सुरु राहू दे