प्रस्थापितांनो मी तुमच्या विरुद्ध आहे
मला माहीत आहे,
साहेबाला न पटणाऱ्या त्या अंधश्रद्धा बनतात
साहेबाला रुचणाऱ्याच गोष्टी विज्ञाननिष्ठ असतात
कदाचित साहेबाचे बूटही विज्ञाननिष्ठ असावेत
कारण ते चाटण्यात प्रस्थापितांचा पुढारलेपणा असतो
म्हणूनच मी अंधश्रद्धाळू आहे
कारण साहेबाची लाचारी मला जमत नाही
‘पिंजऱ्यातील’ पुढारलेपण मला भावत नाही
मी मागासलेला आहे, कारण-
माझ्या पूर्वजांचा मला यथायोग्य अभिमान आहे
माझ्या हृदयातील कोरीव लेण्यांचं नाव शिवाजी आहे
माझ्या देशातून गंगा वाहते याचा मी गर्व करतो
माफ करा प्रस्थापितांनो
तुमच्या ‘पुढारलेल्या’ वाटेने मला चालता येत नाही
कारण- त्या वाटेवर होणारं अस्मितेचं वस्त्रहरण
मी पाहू शकत नाही
त्या वाटेवरच्या स्वाभिमानशून्यतेच्या छायेला मी भितो
त्या वाटेवरची लाचारीची लक्तरे मला झेपत नाहीत.
मला ठाऊक आहे
माझ्या मागासलेपणाची तुम्हाला लाज वाटते.
पण, तुम्हाला ठाऊक नसेल- प्रस्थापितांनो,
तुमच्या पुढारलेपणाची मी कीव करतो
देहरुपी घराचा अस्मितेचा पाया उखडून टाकून
त्यावर पुढारलेपणाचा कळस चढवण्याचा
मूर्खपणा मी करत नाही
माझ्या कंठातल्या मराठीचं अस्तित्व हिमालयाएवढं आहे
तुमच्या बंदिस्त पुढारलेपणात ते सामावणारं नाही
प्रस्थापित पुढारकांनो तुम्हीही मराठीकडे येऊ नका
कारण तिच्या केवळ संसर्गाने,
तुमचं तकलादू पुढारलेपण वितळून जाईल
मराठी अस्मितेचा आवेग तुम्हाला सहन होणार नाही
सह्याद्रीचा कडा चढताना कदाचित तुम्हाला दम लागेल
नि स्वाभिमानागत घातक चीज तुमच्या मनात घर करेल
जी बाळगणं आज तुमच्या ताकदी बाहेरचं आहे
तेव्हा प्रस्थापितांनो,
तुम्ही स्वस्थपणे साहेबाचे बूट चघळत बसा
कारण ते विज्ञाननिष्ठ आहेत
सोडून द्या माझा नाद, कारण,
संस्कृतीचा अभिमान बाळगणारा मी एक मागासलेला वेडा आहे
असे बिचकू बिलकूल नका,
संस्कृती अस्मिता, उदात्तता यांचं गुंडाळलेलं गाठोडं
बिनधास्तपणे माझ्याकडे सोपवून
नि:शंकपणे पुढारलेपणात बंदिस्त व्हा
साहेबाचे बूट तुमचीच वाट पहात आहेत-
त्यांचा योग्य तो आदर राखा
संस्कृती सांभाळायला मी आहेच, विश्वासू माणूस गंगेच्या काठावर
अनादिपासून अनंतापर्यंत, असाच
गाठोड्याची आठवण झालीच कधी तर जरुर या
मी आहे तिथेच असणार आहे
अखेर प्रत्येकाला कुणीतरी मैलाचा दगड हवाच असतो
मी मागासलेलाच रहाणार कारण,
या मागासलेपणाचा मला जबरदस्त अभिमान आहे
हीच तर माझी जीवनमूल्यं आहेत
पण लक्षात घ्या;
तुमचं गाठोडं सांभाळण्यासाठी तुम्ही गहाण टाकलेला
तुमचा स्वाभिमान, तुमची अस्मिता मात्र
मी तुम्हाला परत करणार नाही
कारण, तेच माझं एकमेव खाद्य आहे- मागासलेपणाचं
— यतीन सामंत
Leave a Reply