नवीन लेखन...

माझा पहिला विमान प्रवास

चेन्नईला निघण्याची लगबग, त्यातच सकाळी १० चे इंडिगो पकडायची घाई. साधारणपणे एक तास अगोदरच विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. सुख म्हणजे डोमेस्टिक हवाई तळावर विमान पकडावयाचे असल्यामुळे त्यात वेळ जाणार नव्हता, कारण हा तळ हायवे पासून जवळच होता. एक तास अगोदर जाण्याचे कारण म्हणजे विमानात प्रवेश देण्यापूर्वी सिकीरुटी चेक केला जातो, तो पार पडणे गरजेचे होते.

विमानात बसणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काही येईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतो असे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती. वर गेल्यावर खालचे काही दिसत नाही, असे ऐकण्यात होते, ते खरे असणार काय? सर्वत्र ढगच दिसणार कि आणखी काही दिसणार ह्याबद्दल चिंता लागून राहिली होती. चेन्नईचा हा विमान प्रवास तसा थोडक्या अवधीचा म्हणजे फक्त दीड ते दोन तासांचा होता. ह्या दीड दोन तासात काय काय घडणार ह्याची मनामध्ये विचारधारा चालू होती.

नेहमी जमिनीवरून आकाशातील उडत असलेले विमान पहात आलो, आणि आज तर मी विमानातून जमीन पाहणार होतो. खरच वरून जमीन दिसेल का, कि फक्त ढगच दिसतील? पायलट हवेतून मार्ग कसा बरे काढेल, ह्याची काळजी होती तशीच मनाजवळ हुरहूरही होती. मनामध्ये बालिश प्रश्न उभे राहत होते. त्याला कसे बरे हे कळत असेल कि चेन्नईचा हाच मार्ग बरोबर आहे? खरोखरीच आपण योग्य मार्गाने जावू ना, कि कुठेतरी आकाशात भरकटत राहू, अशी मनाची चलबिचलता चालू होती, घालमेल होत होती. परंतु मनामध्ये एक प्रकारचा आनंदही दाटला होता. ह्या चेन्नई सफरीच्या निमित्ताने माझ्या मनातील इतक्या वर्षाच्या शंकांचे निरसनही होणार होते व प्रत्यक्षात हवाई सफारीचा आनंदही लुटता येणार होता.

अशा स्थितीत रात्री झोप कधी लागली ते समजलेच नाही. सकाळचा ६-३० चा अलार्म लावलेला होताच. त्यामुळे अलार्म वाजताच झोपेतून खडबडून जागा झालो आणि माझी जाण्याची, प्रवासाला निघण्याची लगबग सुरु झाली. कसे बसे एकदाचे सर्व कार्यक्रम भराभर आटोपले आणि भगवंतांचे दर्शन घेवून मार्गस्थ झालो. बरोबर नऊ वाजताच एअरपोर्टला हजर झालो. माझ्याबरोबर चेन्नईला जाण्यासाठी माझी बहिण, भाची, भाचा, भाचे सून आणि भावोजी असे पाचजण मिळून वसईवरून वेळेवर पोहचले होते. मी हि दक्षिण मुंबईतील माझ्या घरून निघून त्यांच्याबरोबर एकाच वेळी तेथे हजर झालो होतो, त्यामुळे वेळेचा खोळंबा झाला नाही. ताबडतोब इंडिगोच्या काऊन्टरवर हजर झालो, ई-तिकीटची प्रिंट दाखवून विमानात चढण्याचा बोर्डिंग पास घेतला आणि सिकिरूटी चेकसाठी पुढे प्रयाण केले.

सिकिरूटी चेक करणे किंवा हा सोपस्कार पार पाडणे हा मोठा वेळखाऊ प्रकार असतो. हल्ली सगळीकडे होणारे बॉम्ब स्फोट व त्यासाठी घेण्यात येणारी काळजी, हि ह्या सिकिरूटी चेक करून घेण्यामागचे एक महत्वाचे कारण आहे. (कारण पासपोर्ट काढताना पूर्वी ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर यांना यातून मोकळीक देण्यात आलेली होती, परंतु आता नवीन सोयी सवलतींप्रमाणे दहावी व वरील इयत्ता पास झालेल्यांना ती मोकळीक आहे. परंतु सिकिरूटीच्या कारणांवरून ती सवलत मिळत नाही.) त्यामध्ये एक कॅालम असतो, त्यामध्ये नमूद केलेले असते, कि इमिग्रेशन चेक नॅाट रिक्वायर्ड, ज्याला संक्षिप्त स्वरुपात इसीएनआर असे म्हटले जाते, परंतु हे सगळे बाजूला ठेवून हल्ली सिकिरूटी चेक हा मात्र केलाच जातो. त्यामुळे तो टाळून पुढे जाताच येत नाही आणि आपण जर एक तास आधी किंवा लवकर पोहोचलो नाही, तर त्यामुळे आपल्याला त्यासाठी रखडून राहिल्यामुळे आपले विमान चुकण्याची भीती असते.

तर हे रामायण येथेच थांबवून आपण आता विमानात बसण्याची पुढील पायरी गाठलेली बरे. हे सोपस्कार पूर्ण करून आपली विमानात बसण्याची तयारी पूर्ण झालेली असते. त्यामुळे तेथून पुढे आपण लाउंज मध्ये जातो व आपल्या इच्छित विमानाच्या बोर्डिंग गेटकडे रवाना होतो. त्याप्रमाणे आम्ही आमच्या विमानाच्या बोर्डिंगसाठी ई-६ गेटकडे वळलो आणि तेथे लवकर पोहोचल्यामुळे स्थानापन्न झालो. आता आमचे विमान कधी एकदा येते व आम्ही त्यात बसतो असे झाले. हा चित्तथरारक अनुभव घेण्यासाठी मन अगदी आसुसलेले होते. मनात घालमेल चालू होती. असाच थोडा अवधी गेला आणि आमचे विमान आमच्यासमोर गाडी जशी फलाटाला लागते, तसे गेटच्या समोरील भागात आले आणि उभे राहिले. ताबडतोब प्रवाशांची लगबग सुरु झाली, गेटच्या समोर लाईन लावली गेली आणि एका मागोमाग एक प्रवाशांना आतमध्ये सोडण्यात येवू लागले.

आमचा नंबर आला आणि आम्ही पाऊले पुढे टाकू लागलो. पहिल्यांदाच आतून विमान पाहण्याचा योग आला होता. त्यामुळे जरा हबकूनच आम्ही सगळेजण विमानात प्रवेश करते झालो. समोरच विमान कंपनीच्या क्रु मेम्बरनी आमचा बोर्डिंग पास तपासला आणि पुढे जावू दिले. पुढे जाताच समोरच सुहास्य मुद्रेने प्रवाशांच्या स्वागत करणाऱ्या दोन हवाई सुंदरी विमानात तुमचे स्वागत असो असे म्हणत सगळ्यांना सामोर्या जात होत्या. हवाई सुंदरी का म्हणतात ते त्यावेळेस कळले. कारण खरोखरीच त्या रूपाने सुंदर होत्या. सडपातळ बांधा, चेहऱ्यावर हास्य, डोक्यावर गांधी टोपीसारखी दिसणारी परंतु त्यांच्या कंपनीची निळसर रंगाची टोपी त्यांनी डोक्यावर ठेवलेली होती. संपूर्ण निळ्या रंगाचा युनिफोर्म त्यांनी परिधान केला होता. एकंदरीत त्या आमच्या छोटेखणी विमानात चारजनी होत्या. विमानात प्रवेश करता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे दोन्ही बाजूला तीन तीन खुर्च्यांच्या अशा मागेपर्यंत जवळ जवळ २८ ते ३० रांगा होत्या. अगदी दाटीवाटीने त्या बसविलेल्या असल्यामुळे अंमळशा एकमेकाला खेटूनच त्यामध्ये बसावे लागणार होते. तशा त्या पाठीमागेही जास्त सरकत नसल्यामुळे पाय काही लांब करता येत नव्हते. चित्रपटात किंवा जाहिरातींमध्ये बघतो तसे हे विमान प्रशस्त नव्हते. परंतु एकंदरीतच जवळ जवळ १५० ते १८० किंवा २०० प्रवाशांसाठी हे विमान असावे, आणि त्यामुळे त्याची तशी रचना केलेली असावी हे आतील व्यवस्था पाहताक्षणीच लक्षात येत होते. आमचा नंबर मागेच असल्यामुळे आम्ही मागे आलो. आपापल्या जागेवर स्थानापन्न झालो. इतरांची लगबग न्याहाळू लागलो. मनामध्ये एकप्रकारची कंपनता होती. आता पुढील प्रवास आणि पुढील अनुभव कसा असणार ह्याचीच उत्सुकता लागून राहिली होती.

सगळे प्रवाशी आपापल्या जागेवर बसताच विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला. जस जशी प्रवाशी मंडळी स्थिरावू लागली व बसली, त्यानंतर हवाई सुंदरीने घोषणा दिली कि आता थोड्याच वेळात आपले विमान सुटणार आहे, तरी सगळ्यांनी आपल्या खुर्च्यांचे बेल्ट बांधून घ्यावेत व आपले लॅपटोप व मोबाईल बंद करावेत.

बरोबर दहा वाजता विमानाचे इंजिन सुरु झाले. पायलटने विमान सुरु करून एक वळसा मारून आमचे विमान रन वे कडे घेण्यास सुरुवात केली. मध्ये मध्ये थोडा वेळ ते थांबायचे व पुन्हा सुरु होवून पुढे सरकायचे. इकडे तर मन नुसते बेचैन झाले होते. धाकधूक सुरूच होती. कधी हा रन वे मोकळा होणार व आम्ही आकाशात झेपावणार असे झाले होते. ह्या गडबडीत जवळ जवळ २५ मिनिटे गेली आणि एकदाचा रन वे मोकळा मिळाला, त्याबरोबर इंजिनाचा जोराचा आवाज करीत आमचे विमान धावपट्टीवरून लगबगीने जोरात पळू लागले आणि थोड्याच अवधीत ते जे जमिनीबरोबर धावत होते, त्याचा पुढील भाग आकाशाकडे झेपावला गेला आणि आमच्या विमानाने धावपट्टी सोडली. मनात थोडीसी भीती दाटून आली. पुढे ते एका ठराविक उंचीवर जाईपर्यंत त्याची थरथर सुरु होती. अंदाजे १० मिनिटानंतर ते आकाशात स्थिरावले.

मी आतील बाजूला बसलेला असल्यामुळे मला खिडकीतून बाहेर खाली पाहता येत नव्हते, परंतु नजरेसमक्ष असणारे दृश्य दिसत होते. वर गेल्यावर विमान चालत आहे असे वाटतच नव्हते. नजरेसमोरील खिडकीतून फक्त ढग व क्षितीज तेव्हढे दिसत होते. सर्वत्र निळे आकाश आणि मधून मधून पांढरे ढग मात्र दिसत होते.

अशाप्रकारे आकाशात विमानाचा प्रवास चालू होता, परंतु तो होतो आहे असे कुठेही जाणवत नव्हते. आपण एका ठिकाणी अवकाशात स्थिर उभे आहोत अशी जाणीव सतत होत होती. त्यामुळे सर्वसाधारणपणे रेल वे ने गेल्यास चेन्नईला जाण्यास कमीत कमीत २३ तास लागतात, मग आपण विमानाने दीड दोन तासात कसे बरे पोहचणार? अशी मनी उगीचच शंका निर्माण झाली. सगळे स्थिरस्थावर झाल्यावर हवाई सुंदरींची लगबग सुरु झाली. हवाई प्रवासात घेण्यात यावयाची खबरदारी “सेफ्टी रुल्स” चे हवाई सुंदरींनी प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या समोरील खुर्चीच्या आपल्या कडील भागात पुस्तक होते ते डोळ्याखालून घालण्यास सांगण्यात आले. अशाप्रकारे पाच दहा मिनिटांचा हा कार्यक्रम आटोपण्यात आला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसाठी पदार्थ भरलेली ढकल गाडी आणली व ज्याला कोणाला काही हवे नको का ते त्या विचारता विचारता त्या त्या वस्तू त्यांना देवू लागल्या. मधूनच एकाद दुसरी उद्घोषणा सुरूच होती.

ज्यावेळेस विमानाने आकाशात झेप घेतली त्यावेळेस थोडे जाणवले कि आपण हवेत उचलले गेलो आहोत. त्यानंतरची थोडी थरथर, त्यानंतर विमानाचे हवेत स्थिर असल्यासारखे वाटणे, पण प्रत्यक्षात ते फारच गतीने पुढे जात असल्याचे जाणवणे, इत्यादी प्रकार माझ्यासाठी व माझ्या नातलगांसाठी एक नवीनच अनुभव होता. त्यात बहिणीची तब्येत थोडीशी नाजूक असल्यामुळे, तिने विमान प्रवासाचे जे धैर्य दाखविले ते खरोखरीच वाखाणण्याजोगे होते.

मधील तासाभराचा प्रवास झाल्यावर माझा भाचा जो पुढे बसला होता, तो माझ्या मागील सीटवर आला व मला पुढे जाण्यास सांगितले. त्यामुळे हवेत विमान असताना मी पुढे जाण्यासाठी निघालो, परंतु मला हे जाणवले कि मघापासून जे मला वाटत होते कि विमान स्थिर आहे, ते तसे मुळीच नव्हते, कारण चालताना माझा तोल इकडून तिकडे जात होता. एकदाचा मी पुढील सीटवर पोहोचलो. भाच्याची सीट हि खिडकी लगतच असल्यामुळे, मला पुढील पंधरा वीस मिनिटांचा प्रवास हा खिडकी बाहेरील दृश्य बघून करता आला. ती सीट पुढून २ -या रांगेत असल्यामुळे हा पंधरा वीस मिनिटांचा प्रवास हा प्रवास केल्यासारखा वाटला, हि एक पर्वणीच होती व ती मी साधू शकलो. बाहेरील दृश्य बघत, क्षितीज न्याहाळत, खालील भाग कसा दिसतो त्याची जी उत्कंठा अगोदर होती, ती शमवत कधी हा प्रवास संपला ते कळलेच नाही.

ह्यातून एक समजले कि वरून जमीन दिसत नाही, फक्त ढगच दिसतात, हि समजूत खोटी ठरली. कदाचित आमचे डोमेस्टिक विमान असल्यामुळे त्याची आकाशात प्रवास करण्याची उंची हि कमी असावी असे वाटले. एखाद्या उंच इमारतीवरून खाली पाहिल्यास जसे दृश्य दिसेल, तसेच हेहि थोड्याफार फरकाने तसेच दृश्य होते. फक्त येथे उंची खूप होती. खालील जमीन दिसत होती, डोंगर दिसत होते, नद्या दिसत होत्या, उंच उंच इमारती चित्रात जशा छोट्या दिसतात तशा दिसत होत्या. वर आजूबाजूला ढग दिसत होते. लांबवर क्षितीज दिसत होते. अशाप्रकारे एक नवीन अनुभव पदरात पडला होता.

थोड्याच वेळात चेन्नईचे विमानतळ येणार आहे अशी हवाई सुंदरीने उद्घोषणा केली आणि आपले मोबाईल आणि चालू असल्यास लॅपटोप बंद करण्याची विनंती केली. त्यामुळे मी आता बाहेरील दृश्यांवर माझे लक्ष्य केंद्रित केले. आता हे विमान विमानतळावर कसे उतरणार हे पाहणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. तो अनुभव कसा असेल, ह्याची वाट पाहणे हेच शिल्लक राहिलेले होते. खालील दृश्य खूपच मनोहारी होते. विमान हळू हळू खाली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले. कधी ते खाली जाते आहे असे वाटायचे, तर मध्येच ते वर उचलले जाते आहे वाटायचे. अशाप्रकारे पाच दहा मिनिटे असेच चालले होते. वाटायचे हे आता खाली जाईल आणि आम्ही लॅंड होवू. परंतु तेव्हढ्या सहजपणे ते होणार नव्हते कारण त्याला रन वे मोकळा मिळावयास हवा होता व नियंत्रण कक्षातून त्याला खाली उतरण्याची परवानगी हवी होती, ती मिळाली असता ते खाली जाणार होते. अन्यथा ते वरच घोटाळत राहिले असते. एकदाची परवानगी मिळाली असे दिसते, त्याने एक छोटेसे वळण घेतले आणि आता ते भरभर खाली जावू लागले. त्यामुळे खिडकीतून दिसणारे दृश्य जवळ जवळ आल्याचे भासमान होवू लागले. विमानातील आणि जमिनीतील अंतर कमी कमी होवू लागले आणि विमानाचा टायर जमिनीला लागला. जोरात टायर घासल्याचा आवाज होवून, विमान जमिनीवर उतरून पळू लागले व हळू हळू त्याची गती कमी झाली व थोड्याच अवधीत त्याने मुख्य रन वे सोडून विमानतळाकडे येण्यास सुरुवात केली. एकदाचे हायसे वाटले. थोड्याच वेळात ते बाजूला येवून थांबले. त्याबरोबर उतरणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरु झाली. आम्हीही सगळ्यात शेवटी शांतपणे उतरून खाली आलो व बसची वाट पाहू लागलो. तद्नंतर बसमध्ये बसून आम्हाला मुख्य गेटवर सोडण्यात आले. ह्या संपूर्ण प्रवासात एकच गोष्ट राहून गेली ती म्हणजे मला आवड असणार्या चित्रीकरणाची. मनोमन वाटत होते कि हा संपूर्ण अनुभव कॅमेर्‍यामध्ये बंदिस्त करणे गरजेचे होते, परंतु ते मला साधता आले नाही, ह्याची खंत मनाला लागून मात्र राहिली. त्यातही सुखाची गोष्ट हि कि भाची व भाचे सून ह्यांनी थोडा बहुत हा आमचा विमान प्रवास विडीयो कॅमेर्यामध्ये बंदिस्त केलेला होता, त्यामुळे तो अनुभव पुन्हा कधीतरी घेता येईल, ह्या आशेबरोबर हा विमान प्रवास आम्ही संपविला.

— मयुर गंगाराम तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..