मी अकरा-बारा वर्षांचा असतांना माझे पणजोबा वारले. तेव्हां ते ९२-९३ वर्षांचे होते. मृत्यूच्या आधी आठ दिवस कांठी टेकत कोर्टात जात असतांना ते वाटेत कोसळले व बेशुध्द झाले. आठ दिवस त्यांनी तसेच काढले व ते निधन पावले. त्यांना दोन मुलगे, त्यापैकी एक माझे आजोबा. तेही कोल्हापूरांतच वकील म्हणून प्रसिध्द झाले. ते काँग्रेसतर्फे कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्ष होते. तर आईचे काका लंडनला कायद्याचे शिक्षण घेऊन पुढे मुंबई हायकोर्टात प्रसिध्द न्यायाधीश झाले. ते गेल्यावर आचार्य अत्रेंनी “महाराष्ट्राचा रामशास्त्री गेला” असे अग्रलेखांत लिहिले. पणजोबांच्या पाच मुली म्हणजे आईच्या पाच आत्या. त्यापैकी मंगेश देसाईंच्या आईचा उल्लेख आधीच आलाय. दुसरी आत्या म्हणजे पुणे विश्वविद्यालयाचे प्रा. देवदत्त दाभोलकर, नरेंद्र दाभोलकर आदी भावंडांची आई. तिच्यावरचा प्रा. देवदत्त दाभोलकरांचाच लेख मी ह्या मालिकेत नंतर देणार आहे. आणखी एक आत्या दुस-या दाभोलकरांकडे दिली होती. पण ती लौकर गेल्यामुळे आम्ही तिला पाहिले नाही. इतर दोघींचे आडनांव परूळेकरच. एक पालघरचे तर एक कोंकणातले वेंगुर्ल्याचे.
▪
पणजोबा असतांना एकदा सुप्रसिध्द सरन्यायाधीश श्री छागला हे त्यांना भेटायला घरी आले. न्यायमूर्ती तेंडोलकरांचे ते मित्र आणि सहकारी. कोल्हापूरात काही कामानिमित्त आले होते. ते आवर्जून पणजोबांच्या भेटीला येणार होते. मग आजोबांनी आम्हा मुलांना कामाला लावले. कचेरी आणि बैठकीची खोली यांतली मोठी जाजमे ब्रशने साफ करून घेतली. दोन्ही खोल्यांमधे अनेक सुंदर तैलचित्रे मोठ्या मोठ्या फ्रेम्समधे लावलेली होती. त्यांच्याकडे आता दुर्लक्षच झालेली होतं. त्या उघडून चित्रं पूसून घेतली. मग ओल्या फडक्याने कांचा स्वच्छ करून घेतल्या. हे काम आम्हा तीन-चार मुलांना चार दिवस पुरलं.
▪
न्या. छागला येण्याच्या दिवशी चहाच्या किटली, ट्रे, खाण्याच्या वस्तू अशी सर्व जय्यत तयारी झाली. बाहेरच्या दुसऱ्या जिन्याने आजोबा त्यांना घेऊन आले. आजोबा दरबारी जामानिमा करूनच होते. आम्हाला बाजूच्याच खोलीत उभे रहायला सांगितले होते. न्यायमूर्ती आल्यावर प्रत्येकाने बैठकीच्या खोलींत समोरील छोट्या मेजावर काय आणून ठेवायचे हेही ठरवून दिलेले होते. माझ्याकडे केळ्यांची बशी नेऊन ठेवण्याचे काम होते. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवल्यासारखे मला वाटत होते. एकावेळी एक असे, आम्ही शिस्तीत जाऊन वस्तू ठेवून येत होतो. मी केळ्यांची बशी ठेवतांना छागलांना जवळून नीट पाहिले. पुढे अनेक वर्षे त्यांचा पेपरमधे फोटो पाहिला की मला त्या क्षणाची आठवण होई. त्यांचे काय बोलणे होत होते, ते आम्हाला ऐकू येत नव्हते. एक गोष्ट नंतर कळली, ती अशी की क्रिमिनल प्रोसिजर कोड तोंडपाठ असणाऱ्या व्यक्तीला (माझे पणजोबा) प्रत्यक्ष भेटण्याची न्या. छागलांची बऱ्याच दिवसांची इच्छा होती, असे त्यांनी पणजोबांना सांगितले. अर्थात पणजोबांची अशी ओळख त्यांना न्या. तेंडोलकरांनीच त्यांना सांगितली असणार.
▪
माझे आजोबा उंच गोरे आणि सुदृढ होते. त्यांनी टिळकांसारख्या छपरी मिशा ठेवलेल्या होत्या. त्यांचे व्यक्तीमत्त्व खूप भारदस्त दिसे. ते बाहेर जातांना डगला घालत. डोकीवर फेटा बांधत. पायांत जोडे घालत. त्यांनी छपरी मिशा ठेवल्या होत्या. त्यांना कधी काठीची गरज मात्र लागली नाही. ते व्यायाम करत आणि मेहनतीची कामेही करत. आजोबा टिळकांचा कर्मयोगही पाळणारे असावेत. त्यांच्या डोळ्यांत फक्त एकदाच किंचित पाणी तरळलेलं मी पाहिलं, ते माझे वडिलांच निधन झालं तेव्हां. एरव्ही सदैव धीरगंभीर वाटत. ते आस्तिक होते. पण देवाच्या सेवेत वेळ वाया घालवणारे नव्हते. पणजोबांच्याकडून देवपूजा करण्याचे काम सरळ नातवंडाकडे आणि पणतवंडाकडे आले. अंबाबाईच्या मंदीरांतून पलिकडे जातांना (तेव्हां अशी गर्दी नसे) महाद्वारांतून लांबूनच देवीचे दर्शन घेत. इतर देवांनाही तसाच नमस्कार करत.
▪
त्यांना हळू आवाजांत बोलणे ठाऊक नव्हते. ते न्हाणीघरांत अंग पुसताना ‘भीमरूपी महारूद्रा’ हे हनुमानस्तोत्र म्हणत बाहेर येत असत. त्यांचा पाठ दुसऱ्या मजल्यापर्यंत ऐकू येई. कोर्ट शेजारीच होते. कोर्टात ते बोलत असले तर ते घरी ऐकू येई. माझ्या एका मावशीचे यजमान हे कांही काळ कोल्हापुरांतच पब्लिक प्रॉसिक्युटर होते. त्यांचाही आवाज मोठा होता. जेव्हां कोर्टात ते समोरासमोर असत, तेव्हा त्या दोघांचे वाद म्हणजे कोर्टातील आर्ग्युमेंटस स्वयंपाकघरात ऐकू येत असत. मावशीचे कुटुंबही वाड्यात असल्यामुळे स्वयंपाकघरात बसलेल्या आजीला व मावशीला ते भांडण ऐकू येत असे. पण त्यांना त्याची संवय झाली होती. त्यांना माहित होते की खटल्याची वेळ सोडल्यास दोघे आपले नाते चोख सांभाळतात. भांडण घरापर्यंत येत नाही.
▪
पणजोबा असतांना तिथे तिथे खूप तरूण मंडळी शिकायला होती. आमचे सख्खे मामा, मावश्या तर होत्याच. शिवाय आत्तेमामा, मामेमामा, कोकणातून शिकायला आलेले विद्यार्थी असे बरेच जण तिथे राहिले. पुढे साउंड रेकॉर्डीस्ट म्हणून जगप्रसिध्द झालेले मंगेश देसाई हे माझे आत्तेमामाही तिथे रहात. १९४२च्या क्रांतीत त्यांचा सक्रीय भाग होता. त्यावेळी त्यांनी बाँबही बनवायचे ठरवले व दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या खोलीतच त्याची प्रयोगशाळा सुरू केली. पण दुर्दैवाने तो बाँब पूर्ण होण्यापूर्वीच धमाका झाला. खूप मोठा आवाज झाला. घराचे कौलारू छप्परही उडून गेले. स्वतः मंगेश बाँबस्फोटांत जखमी झाला, भाजला. आवाज मोठा असल्यामुळे बातमी सर्वत्र पसरली. पोलिस घरी आले आणि घरातील सर्व म्हणजे अठरा तरूणांना पकडून घेऊन गेले. आजोबा/पणजोबा त्यांना थांबवू शकले नाहीत. घरांतील बायका हवालदिल झाल्या. नंतर चौकीवर जाऊन आजोबांनी इतर सर्वांना सोडवून आणले. मंगेशला जखमा असल्यामुळे त्याला ते सोडवू शकले नाहीत. गुन्हेगारीबरोबरच त्याच्यावर राजद्रोहाचा आरोपही ठेवण्यात आला व त्याला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. साडेचार वर्षांनंतर देश स्वतंत्र होताच त्याची सुटका झाली. पुढे तो राजकमलमधून साऊंड रेकॉर्डीस्ट म्हणून प्रसिध्द झाला.
▪
पणजोबांनी आपल्या हयातीतच आजोबांकडे सर्व कारभार दिला. ते शिस्तीचे भोक्ते होते. पणजोबा असतानाही आजोबांचा सर्वांना धाक होता. नंतर घरांतली सर्व तरूण मंडळी कामाच्या निमित्ताने मुंबई आणि इतरत्र पसरली. सख्खे मामाही दूर गेले. दोन-तीन लहान भाचे, माझ्या मोठ्या मामाचे दोन मुलगे आणि माझा मोठा भाऊ एवढेच तिथे राहिले. मामांच्या खोल्या गरजूंना अल्प भाड्याने दिल्या. पण आजोबांनी कधीही भाडेवसुली केली नाही. पणजोबा थोडीबहुत वसुली करत. त्यांच्यानंतर ते काम आजीकडे आणि आजीच्या नातवंडांकडे आलं. भाडे अगदी नाममात्र म्हणजे रूपया, दोन रूपये असे. पण त्याचीही थकबाकी खूप असे. जुन्या घराकडच्या चाळींमधल्या भाडेकरूंकडून भाडे वसूल करायला आजी दुपारी जेवणं आटोपल्यावर जात असे.
▪
मुख्य वाड्यातील भाड्याची थकबाकी खूपच असल्यामुळे आजी वसूलीसाठी दुसरा उपाय करी. मे महिन्यांत सर्व गोतावळा जमा झाला की आम्हां मुलांना न्हाव्याकडे केस कापायला पाठवी. प्रत्येकी चार आणे प्रमाणे अडीच-तीन रूपये भाड्यात वळते करून घेई. सायकलवाला तासाचे दोन आणे घेई. त्याच्याकडून सायकली भाड्याने घेऊन भाडे वसूली होई. सर्व लहान-मोठ्यांना चपला मिळत, त्यांतून जमेल तेवढे चांभाराचे भाडे वसूल होई. जुन्या घराकडे शिंपी होता, त्याच्याकडे मुलांचे कपडे शिवायला देत असे. तो आमच्या तगाद्याला दाद न देतां अगदी शेवटच्या दिवशी परत यायच्या एखादा दिवस आधी तयार कपडे आणून देई. चांभाराने तर एकदा चपला परतीची गाडी पकडायला आम्ही टांग्यात बसल्यावर आणून दिल्या होत्या.
▪
पूर्वी आईच्या आत्याकडे असणारं तीन खणी घर नंतर एका खानावळवाल्याला दिलं होतं. त्याची खानावळ बरी चाले. पण तोही भाडे वेळेवर देत नसे. अगदी शेवटी शेवटी आजी कधी कधी त्याच्याकडून भाकऱ्या मागवून घ्यायची. त्याच्यावर मोरे फोटोग्राफरचं घर आणि स्टुडीओ दोन्ही होतं. जवळच्या सर्व नातेवाईकांचे फोटो त्या स्टुडीओत काढले जात. तो ब्लॕक आणि व्हाईट फोटो फार छान काढी. आम्हां भावंडाना तिथे रिटचिंग, डेव्हलपिंग आणि प्रिटींग शिकता आलं. भावाने तर खोलीतच लहान ‘डार्क रूम’ केली होती आणि स्वतः काढलेले फोटो स्वतः डेव्हलप आणि प्रिंट करत असे. आजी फोटोग्राफरकडून गरजेप्रमाणे प्रती काढून घेई. त्या त्या नातेवाईकाला हव्या तेवढ्या प्रती देऊन इतर प्रती स्वतःजवळ ठेवी. त्या त्यांच्या भावा-बहिणींपर्यंत पोंचत. फोटोग्राफरकडे पहिल्या मजल्याचा मोठा भाग होता. त्याचे भाडे जास्त होते आणि थकबाकीही. एवढी वसुली करूनही बाकी राहीच. मला वाटते बऱ्याच भाडेकरूनी रोख भाडे कधी दिलेच नाही. इतर गरजू नोकरी करणारे तरूण मात्र आजीकडे स्वतःहून भाडे आणून देत.
▪
भाडे म्हणून वसूल केलेला पैसा कसा वापरायचा हे ठरविण्याचे काम म्हणा किंवा हक्क म्हणा, आजीकडेच होता.
आजी त्यातून आलेल्या मुलांना खाऊ देई. लेकी, सुना, नातींना छोटे छोटे दागिने करून देई. मोलकरणी, गवळी किंवा इतरांच्या अडीअडचणीला मदत करी. आजोबांना हिशोब देण्याचा प्रश्नच नव्हता.ती फार शिकली नव्हती. हिशोब लिहूनही ठेवत नसे. पण तिचे तोंडी हिशोब पक्के असत. कुणी भाडेकरू तिला फसवू शकत नसे. पण त्यांच्या गयावया ऐकून ती भाडेवसुली पुढे ढकलत असे. वयाच्या आठव्या वर्षी ती लग्न होऊन तेंडोलकरांकडे आली. ती ९७व्या वर्षी वारली. ८९ वर्षे तिने तेंडोलकरांचे घर सांभाळले. नदीवरून पाणी आणण्यापासून भाडेवसुली, घरदुरूस्तीसारखी कामेही केली. पुढच्या भागांत आपण तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊ.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply