नवीन लेखन...

माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.आपल्या पु. ल. देशपांडेनी चितळे मास्तरांना मराठी साहित्यात अजरामर केलय.इतर अनेक थोर व्यक्तींनीही आपापल्या शिक्षकांचे भावपूर्ण उल्लेख केले आहेत, त्यांच्या आपल्यावरील ऋणाची नोंद केली आहे.मीही माझ्या शिक्षकांच्या ऋणाची प्रथम नोंद करून त्या सर्व शिक्षकांबद्दल जे आठवतय ते लिहितो.शिक्षकांबद्दलचे कांही उल्लेख “माझी करीअर” मधे आले आहेत.कदाचित थोडी पुनरूक्ती होईल, ती माफ करावी.

गोष्टीत मी सांगितलं होतं की एका पिशवीत पाटी पेन्सिल घेऊन मी वाडीतल्या त्या मोठ्या मुलांबरोबर शाळेत गेलो,तो बिग्रीत (आताची के.जी.) जाऊन बसलो.मला सहा वर्षे पुरी व्हायची होती त्यामुळे पहिलीत बसणे शक्य नव्हते.बिग्रीला वर्गात अठ्ठावीस मुलं होती.खाड्ये नावाचे शिक्षक आम्हाला शिकवत असत.थोडेसे पाढे आणि थोडं अक्षर लेखन.मला वाटते बिग्रीत मुख्य शिकायची गोष्ट असते, ती म्हणजे आपापसात न बोलतां वर्गात गप्प बसणे.खाड्ये सरांनी ही गोष्ट आमच्या मनावर व्यवस्थित ठसवली.त्यांच्या हातांत रूळ असे.तो हातावर किंवा पाठीवर चांगलाच लागे.आम्हाला शिस्त लावण्यासाठी ते त्या रूळाचा सढळ हाताने उपयोग करत.मी तसा शांत असे.त्यामुळें मला मार खावा लागला नाही.परंतु एकदा त्यांनी गलबला करण्यावरून संपूर्ण वर्गालाच शिक्षा देण्याचे जाहिर केले.मग पाठीमागून सुरूवात करून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर रूळाचा जोरकस फटका मारला.त्यातून मीही सुटलो नाही.पण मला त्यांचा राग आला.त्या काळी शाळेत झालेली शिक्षा घरी सांगायची पध्दत नव्हती.मी बिग्रीत तीन चार महिनेच होतो.पण खाड्ये गुरूजी त्यामुळे लक्षात राहिले.

बिग्रीत प्रवेश घेण्याआधी माझं घरी बरचं शिकणं झालं होतं.बिग्रीनंतरच्या सुट्टीत माझा पहिलीचा अभ्यास घरीच पूर्ण करून घेण्यात आला.तीस पर्यंतचे पाढे, वाचन लेखन मला येत होतं.शालेय वर्ष सुरू होताच माझे वडील मला हेडमास्तर नाबर ह्यांच्याकडे घेऊन गेले.माझी परीक्षा घेऊन मला दुसरीत घालण्याची विनंती वडिलांनी त्यांना केली.नाबर गुरूजीनी माझी ताबडतोब तिथेच परीक्षा घेतली.मी त्यावेळी एक चूक केली, तीच नेमकी माझ्या लक्षांत आहे.चौदा नव्वे चं उत्तर मी एकोणीसासे असं सांगितलं.परंतु नाबर सरांनी मला पहिली पास करून दुसरीत घातले.दुसऱ्या दिवसापासून मी दुसरीत बसू लागलो.दुसरीत कोणते गुरूजी होते, ते आता आठवत नाही.एखादे साधे निरूपद्रवी आणि तितकेच शिकवण्यात रस नसलेले कुणीतरी होते.नक्की आठवत नाही पण बहुतेक दुसरीत एक दोनदा गुरूजी बदलले.तिसरी मधे आम्हांला किणी नावाचे शिक्षक होते.ते फारच मारायचे.एकदा दुवाड नावाच्या मुलाच्या डोक्यावर त्यांनी रूळ हाणला.रक्ताची धार वहायला लागली.खडूची पूड जखमेत भरून रक्त थांबवण्यात आले.प्रकरण हेडमास्तरांपर्यंत गेले.पण किणी सरांच्यात फार फरक पडला नाही.कांही महिन्यांनी दुवाडची शाळा कायमची सुटली.त्याने शिक्षणच सोडलं.किणी सरांच शिकवणं मात्र बरं होत.गणित, मराठी हे विषय त्यांनी चांगले शिकवले.त्याचा मला चौथीत फायदा झाला.मला कधी त्यांचा मार खावा लागला नाही.त्यावेळी वर्गातल्या कांही मित्रांबरोबर मधल्या सुट्टीत बाजूच्याच एका डबक्यांतल्या पाण्यांत डुंबायला मीही जाऊ लागलो.एकदा वर्गात परतायला उशीर झाला.आता मार खावा लागणार म्हणून मनाची तयारी ठेवली पण किणी गुरूजींनी फक्त दम भरला.

चौथीमधे आम्हाला प्रथम किणी गुरूजीच कांही काळ शिक्षक होते.नंतर आम्हाला शिकवायला पांचवीचे पेडणेकर गुरूजी येऊ लागले.चौथीमध्ये असतांना किंवा त्या आधी मार्क मिळवणं हे कांही माहिती नव्हतं.पण चौथीत अचानक अंधेरी लोकल बोर्डाच्या शाळांमधे पहिला नंबर आला.बक्षिस समारंभही झाला.मी सुट्टीत कोल्हापुरला आजोळी असल्यामुळे समारंभाला नव्हतो.बक्षिस म्हणून देण्यात आलेलं अनंत काणेकरांचं “हिरवळ” हे पुस्तक जूनमधे मला मिळालं.माझं वाचून झाल्यावर पेडणेकर गुरूजींनी ते वाचायला मागून घेतलं आणि हरवलं सांगून कधीच परत दिलं नाही.खरंच हरवलं असेलही.चौथीत पहिला नंबर मिळायला त्यांचे शिकवणं उपयोगी पडलं असावं.त्यामुळे त्यानी ते पुस्तक हरवलं तरी ठीकच म्हणायचं.

पेडणेकर गुरूजी अतिशय नीटनेटके असत.नेहमी पांढरे शुभ्र कपडे घालत.ते छान शिकवत.मला खूप उत्तेजन देत.भिंतीला लावायला तक्ते बनवणं, प्राथमिक चित्रकला, इ. गोष्टींमधे ते प्रवीण होते.ते चित्रकला, हस्तकला हे विषय पाचवी ते सातवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना शिकवत.शाळेत दर वर्षी प्रदर्शन भरत असे.त्यावेळी ते सर्वाना त्यात सहभागी व्हायला उत्तेजन देत.चौथीचे कांही महिने आणि पाचवीचे सुरूवातीचे कांही महिने ते आम्हाला होते.पाचवीमधे आमची दर आठवड्याला परीक्षा असे.मला त्यांत चांगले मार्क मिळत.दर महिन्याला त्या मार्कांप्रमाणे नंबर लावत.माझा पहिला नंबर येई.ते माझे खूप कौतुक करत.पाचवीत असताना पहिल्या महिन्याच्या चार शनिवारच्या परीक्षेपैकी एका इतिहासाच्या परीक्षेला मी बसू शकलोनाही.तीन पेपर्सचे माझे मार्क सर्वात जास्त होते.तरी ते चारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांपेक्षा कमी होते.परंतु पेडणेकरानी पहिला नंबर मलाच दिला.मायजीकर नांवाच्या एका मुलाने ह्या गोष्टीला हरकत घेतली.तेव्हां सर म्हणाले, “इतिहासाच्या या धड्यांवर कोणतेही प्रश्न त्याला विचारा.त्यानुसार त्याला मार्क देऊ.”इतर कोणी प्रश्न विचारला नाही.मायजीकरने एक दोन प्रश्न विचारले. त्यांची उत्तरे मी सहज दिली.मग गुरूजीनी मला इतिहासांत पन्नासपैकी पन्नास मार्क देऊन त्या महिन्यांत माझा पहिला नंबर लावला.त्यावेळी मला आनंद झाला पण मागे वळून पहाताना आता ते तितकं योग्य वाटत नाही.असा नंबर देण्याची कांही गरज नव्हती.मायजीकर मात्र एक वाया गेलेला मुलगा होता.आम्ही सातवी किंवा आठवीत असतांना तो घर सोडून पळून गेला.पळून जायच्या आधी मी घरांत नसतांना कांही नाटक करून, रडून, माझ्या आईकडून पैसे उधार घेऊन गेला.त्यानंतर तो कधीच दिसला नाही.पेडणेकर गुरूजीनी माझा आत्मविश्वास खूप वाढवला.सातवीनंतर हायस्कूलला गेलो तरी कांही वर्षे त्यांच्याशी संपर्क होता.

पाचवीमधे कांही काळ आम्हाला गोगटे नावाच्या शिक्षिका होत्या.त्याकाळी शिक्षिकांना बाई म्हणत.त्याही पांढरी पण रंगीत किनारअसलेली साडी नेसत.मला वाटते शिक्षकांनी पांढरेकपडे वापरण्याचा नियम किंवासंकेत असावा.गोगटेबाई तरूण सडपातळ आणि सुंदर होत्या.त्या गणित शिकवतही उत्तम.तरूण शिक्षकांची त्यांच्याशी बोलण्याची धडपड त्या वयांतही आम्हाला जाणवायची.एक गुरूजी वर्गातील मुलांना कांहीतरी अभ्यास देत.मुलं तो करू लागली की ते वर्गाच्या दाराबाहेर येऊन उभे रहात.गोगटे बाई बाजूच्या वर्गावर असल्या की त्याही मुलांना उदाहरणे घालून दाराशी येऊन उभ्या रहायच्या.मग त्यांच्या गप्पा रंगायच्या.पण लौकरच त्यांचा अन्यत्र विवाह झाला.शाळेंतून त्यानी बदली घेतली.सहावीमधे आम्हाला चव्हाण बाई होत्या.त्याही अविवाहीत होत्या.त्या काळांत लोकल बोर्डाच्या शाळेत लिपस्टीक लावून येणाऱ्या त्या एकमेव बाई असाव्यात.त्या स्टार्च केलेल्या सफेद साड्या नेसत.त्यांचं शिकवणं मध्यम प्रतीच होतं.’माझी करीअर’मधे एका लाडवाच्या मोबदल्यात माझ्याकडून वर्गातील सर्व मुलांचे गणिताचे पेपर आपल्या घरी बोलावून तपासून घेणाऱ्या बाईंबद्दल लिहिले होते, त्याच ह्या बाई.सातवीत पुन्हा आम्हाला एकच असे शिक्षक नव्हते.कांही काळ चव्हाण बाईच होत्या.तर बराच काळ डेप्युटी एच.एम. असणारे चौधरी सर आम्हाला शिकवत असत.त्यांचा शाळेत दरारा होता.कडक शिस्तीसाठी ते प्रसिध्द होते.ते सर्व विषय छान शिकवत.विशेषतः गणित, भूगोल फार चांगले शिकवत.ते गोरे होते आणि त्यांचा चेहराही लाल होता.ते वयाने ४५-५० असावेत.अंगकाठी त्याही वयांत सडपातळ पण सशक्त होती.सुटसुटीत धोतर, सफेद शर्ट, वर फिकट पिवळसर कोट हा त्यांचा कायमचा वेष असे.त्यांचा चेहरा नेहमीच गंभीर असे.

आम्ही सहावीत असताना नाबर गुरूजी हे हेडमास्तर म्हणून रिटायर झाले.त्यांच्या जागी एक कानडे नावाच्या बाई हेड मिस्ट्रेस म्हणून आल्या.त्याही नेहमी पांढरी नऊवारी साडी नेसत.डोक्यावरून पदर घेत.मोठं कुंकू लावत.चष्मा लावत.त्या पन्नाशीच्या पुढेच होत्या.उन्हासाठी नेहमी छत्री वापरत.पुढे शांताबाई शेळकेंचे फोटो पाहिले की त्यांची आठवण यायची.त्यांनी आम्हाला सातवीत कांही काळ शिकवले.परंतु शांताबाईंची तुलना दिसण्यापुरतीच होती म्हणायची.त्यांचं शिकवणं थोडं कंटाळवाणं असे.कदाचित् आम्हांला फारच थोडेदिवस शिकवल्यामुळेमाझा तसा गैरसमजही झालाअसेल.

त्या शाळेतल्या आमच्या पी.टी.च्या सरांची ओळख करून दिल्याशिवाय त्या शाळेच्या शिक्षकांची ओळख पूर्ण होऊच शकत नाही.शारिरीक शिक्षण हा विषय पांचवी ते सातवीसाठी नियमित होता.चौथीपर्यंतच्या मुलांना कार्यक्रमाच्या वेळी कसे उभे रहावे वगैरे सूचना देत.त्या सरांच नाव होत देशमुख.त्यांची उंची पी. टी. च्या शिक्षकाला शोभेशी होती.सहा फूट तीन इंच तरी असेल.उंच, शिडशिडीत, सांवळे, कुरळ्या केसांचा आडवा भांग पाडलेले देशमुख गुरूजी सर्व अंधेरीकरांना परिचीत होते.पण म्हणूनच एखादा वाह्यात अंधेरीकर ते रस्त्याने जाताना “ए जपान रिटर्न” म्हणून हांक मारत असे.ते तिकडे बघतही नसत.ते आपल्या गतीने चालत रहात.”जपान रिटर्न” मागची पार्श्वभूमी मला नक्की माहिती नाही.पण कोणीतरी सांगितले होतं की देशमुख गुरूजी तरूणपणी अॉलिम्पिक गेम्ससाठी जपानला जाणार असल्याचे सांगत.पण प्रत्यक्षात गेले नाहीत.तेव्हांपासून त्यांनी जपानच्या थापा मारल्या असं मानून त्यांना “जपान रिटर्न” चिडवू लागले.खरं काय होतं ते कुणालाच माहित नव्हतं.त्या काळी अॉलिम्पिक गेम्सचं महत्त्व सामान्य लोकांच्या लेखी शून्य होतं.अनेकांना अॉलिम्पिक गेम्सची माहिती नव्हती.तर बऱ्याच जणांना सामान्य ज्ञान म्हणून मुलाखतीत अॉलिम्पिक गेम्स किती वर्षांतून एकदा होतात, तेवढचं ठाऊक असे.त्या चिडवण्याने देशमुख गुरूजींना काय यातना होत असतील, त्या त्यांनाच माहिती.त्या काळांतही त्यांनी जपानला जाण्याचं स्वप्न कांहीं काळ मनाशी बाळगलं होतं असेल या विचारानेच मला आता त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

देशमुख गुरूजी तीनही वर्गाच्या मुलांचं त्या त्या वर्गाच्या तासाला “ड्रील” करून घेत असत.तेव्हा पी. टी. हा शब्द नव्हता.तर शारिरीक व्यायाम प्रकारांना ड्रीलच म्हणत.राकट आणि काटक देशमुख गुरूजींना आळस, अर्धवट हातवारे अजिबात चालत नसत.ते तीक्ष्ण नजरेने चुकणाऱ्याला हेरत आणि शिक्षा करत.देशमुख गुरूजींची अत्यंत आवडती गोष्ट म्हणजे पिरॕमीडस् रचणे.मुलांच्या वेगवेगळ्या रचना विशिष्ट रीतीने करायच्या एकावर एक उभी राहिलेली मुलं, कमान टाकलेली मुलं, दोन हातांवर उलट उभी होणारी मुलं, ह्यांचा एक आकृतीबंध तयार करायची त्यांना खूप आवड होती.एक-दोन-तीन अशा मोजणीबरोबर त्या लयबध्द हालचालींनी आकृतीबंध तयार होई.मोडला जाई आणि पुन्हां नवा तयार होई.सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमाना पिरॕमीडस् असतच.मग त्याची तयारी खूप आधीपासून चालू होई.मी ह्यांत भाग घेत असे.मला दोन हातांवर उभं रहाणं जमत असे.अर्थात् पाय वर केल्यानंतर कोणीतरी ते पकडत असे.कधी कधी एखाद्या मोठ्या मुलाने कमान टाकल्यावर त्याच्या पोटावर उभं रहायच काम मी कमी वजनाचा म्हणून माझ्याकडे येई.नंतर एकदा नवीन रचना बसवताना गुरूजीनी मला दुसऱ्या मुलाने मागे हात धरून केलेल्या ओंजळीत पाय ठेऊन, वर चढून त्याच्या खांद्यावर उभं रहाण्याच काम दिलं.मी वर सहज चढलो पण त्याच्या खांद्यावर उभं रहाताना माझा तोल गेला व मी पडलो.तेव्हां ती माझी चूक मानून देशमुख गुरूजीनी फाडकन् माझ्या मुस्काटांत मारली.माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकले.मग त्यांनी मला ते काम दिलं नाही.असे हे देशमुख गुरूजी.सफेद किंवा फिकट निळी पँट आणि तसाच बुश शर्ट ते घालत.किंवा त्यांचा सफेद वेषनीळ घालून घालून नीळा झालाहोता.जवळजवळ सफारीसारखा वेष वाटे.कधी एखादे गुरूजी आलेनाहीत तर तो तास देशमुखसर घेत.अशा वेळी ते कोडी घालत.अशी कोडी सोडवण्यातमाझा हातखंडा होता.मग ते मला शाबासकी देत.असे हे देशमुख गुरूजी दोन तपांहून जास्त काळ त्या शाळेचा अविभाज्य भाग होते.

लोकल बोर्डाच्या शाळेतलं चौथीपर्यंतच शिक्षण फुकट होतं.तर पांचवीपासून महिना दोन रूपये फी होती.हायस्कूलमधे त्यापेक्षा बरीच जास्त फी द्यावी लागे.त्यामुळे सातवीपर्यंतचं माझं शिक्षण तिथेच झालं.आठवीपासून मी अंधेरीच्या माधवदास अमरसी हायस्कूलमधे जाऊ लागलो.सुरूवातीची सात वर्षे माझे शिक्षण ह्याच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली झाले.किणी, पेडणेकर, गोगटे, चौधरी ह्या गुरूजींची मला चांगली आठवण राहिली.माझ्या शालेय शिक्षणाचा पाया त्यांनी रचला असं म्हणायला हरकत नाही.आठवी ते अकरावी मी एम. ए. हायस्कूलला होतो, तिथे बऱ्याच शिक्षकांनी वेगवेगळे विषय शिकवले.त्या सर्व शिक्षकांबद्दल पुढल्या भागात.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..