नवीन लेखन...

माझे शिक्षक भाग – ३. (आठवणींची मिसळ १७)

माधवदास अमरसी हायस्कूलची स्थापना १९३९ मधे झाली.
अंधेरीमधे तेव्हां मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांचं प्रमाण ऐंशी टक्क्याहून जास्त होतं.
हायस्कूलमधे मराठी आणि गुजराती मुलं एकत्रच शिकत.
१९५१ सालापासून मराठी माध्यमाच्या तुकड्या सुरू झाल्या.
पुढे इंग्रजी माध्यमाची मागणी वाढल्यानंतर मराठी तुकड्या बंद झाल्या.
तसेच मराठी माध्यमातून शिकवणाऱ्या या इतर शाळाही निघाल्या.
आज एम. ए. हायस्कूलमधे फक्त इंग्रजी आणि गुजराती माध्यमातूनच शिक्षण उपलब्ध आहे.
मराठी केव्हांच (बहुदा १९६०-६५मधे) बंद झालं.
आम्ही होतो, तो मराठीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे.
मला वाटतं त्यावेळचे शिक्षक हायस्कूल सोडून गेल्यावर आठवीपासून एक एक वर्ग बंद करायला सुरूवात झाली.
ह्यामुळे आम्हा त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आणि सरांना एकमेकांबद्दल आपुलकी कायम राहिली तरी एम. ए. हायस्कूलबद्दल ती आपुलकी कधी वाटली नाही.
एम. ए. हायस्कूलशी आमचा त्यानंतर कोणताही संबंध राहिला नाही.
१९५६ नंतर मी फक्त एकदा एका लग्नाला हजर राहण्यासाठी त्या इमारतीत गेलो होतो.
एम.ए.हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यात आमची कधी गणनाच झाली नाही.
आम्हालाही कधी त्याच वैषम्य वाटलं नाही.
आम्ही जेव्हा एकत्र येत असू तेव्हा आम्हाला मंत्री सरांच्या विद्यानिधीमधे हवा तसा हॉल विनामूल्य मिळत असे.

पहिल्या भागात मी हायस्कूलच्या शिक्षकांबद्दल सांगितले.
आता अजून कांहीच्या माझ्या मनांत राहिलेल्या प्रतिमा इथे सादर करतो.
त्यांत चितळे सर हे एक वल्लीच होते.
छोटीशी मूर्ती, किरकोळ देह पण त्यांची जीभ ती सर्व कसर भरून काढी.
वर्गात शिरल्यापासून त्यांची टकळी सुरू होई.
त्यांत विद्यार्थ्यांना खूप उपदेश असे.
इतिहास आणि भूगोल हे विषय त्यांनी आम्हांला शिकवायचे असत.
पण ते त्यांनी कधीच शिकवले नाहीत.
त्या विषयांची पुस्तकेही कधी आम्हांला वर्गात उघडावी लागली नाहीत.
ते म्हणत की इतिहास, भूगोल हे विषय वर्गात बसून शिकण्यासारखे नाहीत.
हे म्हणणं योग्य होतं.
पण प्रत्यक्षात ते आम्हांला बाहेरही कधी कुठे घेऊन गेले नाहीत.
प्रत्येक मुलाचं ते निरिक्षण करत.इतर शिक्षकांकडूनही त्यांना मुलांची हुषारी, मस्ती, इ. माहिती मिळे.
त्यावरून ते प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल मत बनवतं.
त्यावरून प्रत्येकाला ते कांही न कांही सांगत.
ते मला “टेंपररी मॕग्नेट” म्हणत.
माझं पाठ लवकर होत असे पण पुढे मी दुर्लक्ष करत असे, त्याला उद्देशून ते असं म्हणतं.
माझ्या चांगल्या मार्कांचा उल्लेख ते “वासरांत लंगडी गाय शहाणी” असा करत.
त्यांचे मत फारसं चुकीचं असे असं नाही.
पण आपण परखड आहोत हें सिध्द करण्यासाठी तीच तीच मत परत परत सांगत.
त्याने तो दोष कसा दूर करावा याबद्दल कांही मार्गदर्शन करत नसत.
ते खूप भराभर बोलत.
पण तरीही बोलणं स्पष्ट असे.
ते शिकवत असलेल्या विषयाच्या धड्यांबद्दल ते कांहीच बोलत नसत त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्या तासाला आपापल्या वहीत दुसरंच कांही लिहिण्यात किंवा चितारण्यांत मग्न असत.
ते कधीच शिक्षा मात्र करत नसत.
एकदा त्यांचा तास असताना इन्स्पेक्टर आले.
ते येणार हे आधीच माहित होतं.
त्या दिवशी चितळे सर किती छान शिकवू शकतात ते आम्हाला कळलं.
त्यांनी फळ्यावर विषय आणि मुद्दे सुध्दा लिहिले व त्याला धरूनच ते बोलले.

त्यावेळी सर्व सर तरूणच होते.
एकानेही तिशी पण गांठली नव्हती.
मंत्री आणि दाभोळकर सोडून सर्व अविवाहित होते.
प्रेम हा चितळे सरांच्या बोलण्यातला एक नेहमीचा विषय असे.
मुलांनी उथळ प्रेम कोणावरही करू नये, असं ते सांगत.
दिसली मुलगी कि बसलं प्रेम असं होता कामा नये आणि पुढे म्हणत,
“प्रेम बसलंच कुणावर तर सरळ सांगावं.
तिने नाही म्हटलं तर सांगून टाका, ‘प्रेम तुझ्याने होईना, प्रेम माझे राहूं दे.’
मग पॉकेट इट (प्रेम) अँड प्रोसीड ऑन.”
अडकून पडायचं नाही.”
त्यांची खात्री होती की ते एक दिवस मोठ्ठे कुणीतरी होणार.
त्यांच्या विद्यार्थ्यांनीही कारकुनी नोकऱ्या करायला त्यांचा कडवा विरोध होता.
ते म्हणत, “मी शॉवरलेट गाडीने रस्त्याने जात असेन.
रस्त्यावर वाटेत तुमच्यापैकी कोणी भेटले, समजा राजे भेटले तर मी गाडी थाबवून विचारणार, ” काय करतां हल्ली ?
जर ते कांही वेगळं करत असले तर त्यांना गाडींत घेईन.
जर ते म्हणाले, ५०-५-१००-१०-१५० (कारकुनी वेतनाचं त्या काळचं स्केल.)
तर धाडकन् दार लावून घेईन आणि शोफरला सांगेन,
“गाडी आगे जाने दो.”
माझ्या पूर्वीच्या लेखनांत मी त्यांचा उल्लेख केला आहे.
हायस्कूलमधले शिक्षक मारत नसत पण शिक्षा करत असत.
पण चितळे सर कधीच शिक्षाही करत नसत.
ते इतिहासाबद्दल विशेषतः दत्तो वामन पोद्दारांबद्दल आदराने भरभरून बोलत.
इतिहासाच्या संशोधनांच्या साधनांबद्दलही बोलत.
खरं तर त्यांना शिक्षकी पेशा फारसा पसंत नसावा.
ते तसं सांगतही.
अनेक पेटंट वाक्यांपैकी त्यांचे एक पेटंट वाक्य होतं,
“मिळत नाही भीक, म्हणून मास्तरकी शीक.”
अशी शिक्षकांची अवस्था असते, असं ते म्हणत.
आम्ही अकरावी-एसेस्सी झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली.
सर भारत इतिहास संशोधन मंडळात काम करू लागले.
पुढे त्यांचे काय झाले नीट कळले नाही.
पण ते कायम त्या मंडळातच राहिले.
त्यांची शोवरलेट गाडीची इच्छा मात्र पूर्ण झाली की नाही ते कळलं नाही.

नववीत असतांना एक दिवस आम्हाला “ऑफ पिरीयड” मिळाला.
एखादे सर आले नाहीत की तो पिरीयड “ऑफ पिरीयड” म्हणत.
त्यावेळी बहुदा दुसरे त्यांचा कोणत्याही वर्गावर तास नसलेले सर वर्गात येत.
ते कधी कांही शिकवत किंवा गप्पा गोष्टी करत.
एकदा मात्र आम्हाला खरा ऑफ पिरीयड मिळाला.
त्यादिवशी वर्गावर दूसरे कोणीही सर आले नाहीत.
वर्ग आमच्याच ताब्यांत होता.
मग काय धमाल सुरू झाली.
बघतां बघतां सर्व सरांच्या नकला करणे सुरू झाले.
एकेकजण आपली कला सादर करू लागला.
हंसणे, ओरडणे चालूच राहिले.
बाजूच्या गुजराती वर्गातील सरांनी एकदां येऊन दम भरला.
थोडा वेळ आवाज कमी झाला.
मी वर्गासमोर चितळे सरांची नक्कल सादर केली.
त्यांची “प्रेम”, “मास्तरकी” इ. बद्दलची पेटंट वाक्ये त्यांच्या स्टाईलमधे फेकली.
त्यांना मधून मधून दोन बोटे तोंडावरून, वरचा ओठ आणि हनुवटी यावरून, आडवी फिरवायची संवय होती.
ती सुध्दा मी व्यक्त केली.
मधूनच खिशांतील रूमाल काढून ते तोंडावरून फिरवत.
त्याचीही झलक दिली.
सर्वांनी खूप दाद दिली.
पण ही बातमी कशी कुणास ठाऊक आमचे क्लास टीचर घाटे ह्यांच्या कानावर पोहोचली.
दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हांला ऑफ पिरीयडला वर्गात काय चालले होते म्हणून विचारले.
कोणी बोलत नाही आसं पाहून ते म्हणाले,
“नकला करणं ही एक चांगली कला आहे.
तेव्हां घाबरू नका.
काल केल्यात त्या नकला आता सुध्दा इथे करून दाखवा.”
वर्गात शांतता पसरली.
कोणी पुढे येईना.
मग मी पुढे झालो आणि सरांच्या समोर पुन्हां धीटपणे चितळे सरांची नक्कल सादर केली.
सहाध्यायी हंसत होतेच.
पण चितळे सरांची पेटंट वाक्ये ऐकून घाटे सरही हंसले.
नक्कल संपल्यावर त्यांनी शाबासकी दिली नाही पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना ती पटल्याचे दिसत होते.

घाटे सरांची सर्वांना आदरयुक्त भीती वाटे.
कारण ते थोडे गंभीर वाटत.
तेही तेव्हां अविवाहित होते.
ते संस्कृत, मराठी आणि इतिहास शिकवत.
आठवीला फक्त संस्कृत शिकवीत.
त्यांचे शिकवणेही छान असे.
मला स्वतःला संस्कृतची गोडी असल्यामुळे मला त्यांत रस वाटे.
घाटे सर गंभीर असले तरी विनोदही करत असत.
गोष्टीही सांगत असत.
संस्कृत शिकवतांना ज्या मूळ कृतीतला तो धडा असे, त्याची पूर्ण माहिती गोष्टरूपाने सांगत.
समजा बाणभट्टाच्या कादंबरीतला उतारा असला, तर त्या कादंबरीची छान ओळख करून देत.
त्याची वैशिष्ट्ये, त्याची महती उदाहरणांसकट समजावून सांगत.
सुभाषितांचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून व्यवहारांतली चपखल उदाहरणे देत.
तेही कोणाला शिक्षा करत नसत.
पण एकदां काळे नांवाच्या वेसाव्याहून येणाऱ्या मुलाने सर वर्गात येतांच मुले उठून उभी राहिली असतांना त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गुप्ते नांवाच्या मुलाच्या खाली बांकावर टोंकदार पेन्सिल धरली.
खरं तर गुप्तेच नेहमी अशी खोडी करत असे.
पण कोणी सरांपर्यंत तक्रार नेत नसे.
त्या दिवशी सरांनी बसा म्हणताच सर्वांबरोबर खाली बसलेला गुप्ते अचानक कळवळून ओरडला.
पेन्सिल आंतच घुसली असावी.
त्याने तक्रार केली नाही पण सरांनी काय झाले ते ओळखले.
त्यांनी काळेला आपल्या टेबलाजवळ अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा केली.
काळेने अंगठे धरून मान खाली घातली आणि पठ्ठ्या चाळीस मिनिटे हलला पण नाही.
तो वर्गातला सर्वात उंच धिप्पाड मुलगा होता.
तास संपला तेव्हां सरांनी त्याला जागेवर जायला सांगितले.
पण एवढा वेळ रक्तप्रवाह डोक्याकडे जरूरीपेक्षा वेगाने गेला असेल, त्यामुळे उभं रहाताच काळेला भोंवळ आली.
सरांनाच त्याला आधार द्यावा लागला.
मग इतर मुलं पुढे होऊन त्याला जागेवर घेऊन गेली.

काळे आणि इतर कोळी मुलांच्यामुळे आमचा वर्ग नेहमी शाळेंतल्या कबड्डी, खोखो आदी बऱ्याच स्पर्धा जिंकत असे.
ही गोष्ट घडली तेव्हां आम्ही नववीत होतो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे घाटे सरच आमचे वर्गशिक्षक होते.
त्यांना ह्या खेळांडूंबद्दल प्रेम होतं.
त्यांनी आम्हांला ऑलिम्पिक गेम्स, त्याचा इतिहास, त्यांचं महत्त्व, त्यासाठीच्या कोचिंग आणि सरावाची गरज ह्याबद्दल सांगितले.
सर नेहमी धांवण्याचा सराव करत.
रविवारी १५-२० किलोमीटर धांवत.
त्यांनी धांवण्याची स्फूर्ती
दिल्यावर आम्हीही कांही जणांनी रोज
नवरंग थिएटर ते सात बंगला व परत असा धावण्याचा सराव सुरू
केला.
पण आमचा उत्साह चार पाच महिन्यांतच मावळला.
घाटे सर रा.स्व.संघाचे प्रचारक म्हणून आसामला जाणार होते.
पण जाण्याच्या आदल्या दिवशी शौचालयाकडे जात असतांना वाटेंतली एका कुंपणाची तार त्यांच्या डोळ्यांत घुसली.
त्या अपघाताने त्यांचं प्रचारक होण्याचं राहिलं.
त्यांचा एक डोळा कायमचा गेला.
तिथे कृत्रिम डोळा लावण्यांत आला.
ते एम.ए. हायस्कूलमधे आले.
पुढे त्यांनी शाळा सोडली.
ते म्युनिसिपल एज्युकेशनमधे इन्स्पेक्टर म्हणून सुरूवात करून खात्याच्या प्रमुख पदापर्यंत पोहोंचले.
त्यांच्या सौ. ही एज्युकेशन इन्स्पेक्टर होत्या.
उपनगर शिक्षण मंडळ आणि विद्यानिधी संस्थापनेमधे मंत्री सरांना त्यांनी महत्त्वाची साथ दिली.
घाटे सरही हृदयविकाराच्या झटक्याने ५३व्या वर्षी निधन पावले.
दाभोळकर स्मोकींग करायचे तर घाटे सर निर्व्यसनी होते.

विजयकर टीचर एम. ए. हायस्कूलला इंग्रजी माध्यम होतं तेव्हांपासूनच्या जुन्या शिक्षिका.
त्या नंतर फक्त फ्रेंच आणि इंग्लिश शिकवीत.
विजयकर टीचर खूप लठ्ठ होत्या.
पण विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल इतका आदर होता की त्यांच्या मागेही मुलं त्यांच्या लठ्ठपणाची चेष्टा करत नसत.
माझा एक मित्र नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणाला,
“मला फक्त त्या हातवाल्या खुर्चीत बसल्या की भीती वाटायची की त्या खुर्चीत अडकणार तर नाहीत ना !”
विजयकर टीचरांच मराठीही जेमतेमच होतं.
त्याने आमचा असा फायदा व्हायचा की इंग्रजीचा पूर्ण तास इंग्रजीच बोललं जायचं.
विजयकर इंग्रजी छान शिकवायच्या.
प्रश्न विचारून सर्वांना बोलायला लावायच्या.
वही किंवा पुस्तक विसरल्यावर आय शाल नॉट फर्गेट असं १००/२००वेळा मला लिहायला लावणाऱ्या बाई ह्याचं.
त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असाव्यात.
मला एसेस्सीला मिळालेल्या फर्स्ट क्लासवर मी खूष होतो.
पण विजयकर टीचरना पेढे द्यायला गेलो तर त्या मला म्हणाल्या,
“Student from Gujarati division gets place in merit list and why you couldn’t”.
मी पहिल्या शंभरात तर सोडाच पण पाच हजारात पण नसेन, त्यांच्या लेखी माझ्यात ते पोटेन्शियल होतं.
एवढंच काय ते खरं.

विजयकर टीचर जरी इंग्रजी चांगलं शिकवायच्या तरी मराठी माध्यमांतून शिकणा-या बऱ्याच मुलांना त्यांच इंग्रजी अवघड वाटे.
एक उदाहरण सांगतो.
हा प्रसंग आमच्या वर्गात नाही घडला.
माझा एक मित्र नेहमी त्याच्या वर्गात घडलेली गोष्ट सांगत असे.
इंग्रजीचा धडा शिकवून झाल्यावर विजयकर टीचरनी एक सोप्पा प्रश्न विचारला.
नेमका एका बुजऱ्या आणि इंग्लिश बोलणं विशेष न कळणाऱ्या मुलाला उत्तर द्यायला उभा केला.
तो उभा राहिला पण त्याला प्रश्न कळलाच नाही.
टीचरनी परत प्रश्न विचारला.
त्यावर तो कांहीतरी पुटपुटला.
विजयकर टीचरना ते ऐकू न आल्यामुळे त्या म्हणाल्या,
“I beg your pardon !”
त्याचा समज झाला की त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर टीचरनी दिले.
म्हणून तोही उत्तर दिल्यासारखे बोलला,
“I beg your pardon.”
ज्या मुलांच्या लक्षांत आलं, ती हंसली.
टीचरनी त्याला खाली बसायला सांगितले.
तो मुलगा पुढे सॉलिसीटरच्या अॉफीसमधे क्लार्क म्हणून रिटायर होईपर्यंत राहिला.
मला चर्चगेटला भेटत असे.
त्याचा मुलगा सी.ए. झाल्याचे मला त्यानेच एक दिवस सांगितले, तेव्हां मला आनंद वाटला.

देसाई बाई वयस्क होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत.
आम्हाला त्या मराठी शिकवत.
म्हणजे एक धडा आळीपाळीने सर्वांकडून पूर्ण वाचून घेत.
पूर्ण झाला की विचारत की कुणाला कांही हा कळण्यात अडचण आली कां?
कोणता शब्द कठीण वाटतो कां ?
मग धड्याखालचे प्रश्न घरून सोडवून आणायला सांगत.
मग धडा पूर्ण होई.
तेच कवितेच्या बाबतीत.
नाव न घेता माझी करीअरमधे मी हा उल्लेख केला आहे.
ह्यांच कविता शिकवणंही असंच असे.
कविता घरून पाठ करून यायला सांगत.
पाठांतर झालं की त्या कविता एकेकाला म्हणायला सांगत.
बरेच जण खाली ठेवलेल्या पुस्तकांत बघून कविता म्हणत.
हे त्यांच्या लक्षांत आल्यावर त्यांनी त्यांच्या टेबलापाशी उभं राहून कविता म्हणायला सांगू लागल्या.
असा उभ राहिलेल्या मुलाला समोरून मुलं तोंड वेडीवाकडी करून हंसवत.
त्याची गाडी एक दोन ओळींच्या पुढे जायची नाही.
मग तो ह्याबद्दल देसाई बाईंकडे तक्रार करी.
ह्यावर उपाय म्हणून बाईंनी मुलांना भिंतीकडे तोंड करून कविता म्हणायला लावायची पध्दत सुरू केली.
ती सर्वानाच मान्य झाली.
कारण कोणीतरी पूर्ण कविता आधी भिंतीवर लिहून ठेवी.
मग एकएक जण भिंतीवरची कविता वाचून “तोंडपाठ” म्हणू लागला.
बाईंच्या तासाला सर्व प्रकारची मस्ती चाले.
शेवगाठ्या टेबलाखालून वाटणं, त्या खाणं.
चपलांचा फुटबॉल करणं.
एकमेकांच्या खोड्या काढणं आणि बाईंकडे तक्रारी करणं, इ. कधीतरी शिक्षा म्हणून बाहेर जायला सांगत, ते हवंच असे.
कोठारे बाई चित्रकला शिकवत.
माझी चित्रकला अल्ट्रा मॉडर्न आर्ट असल्यामुळे त्या मला १००पैकी ३५ मार्क देऊन पास करत, ही माझ्यावर कृपाच असे.
बाकी त्यांच्यात सांगण्यासारखं वैशिष्ट्य नव्हतं.

ह्या लेखांतही मी हायस्कूलच्या सर्व शिक्षकांबद्दल नाही लिहू शकलो.
मुख्य म्हणजे मंत्री आणि वर्तक सरांचा आतापर्यंत केवळ उल्लेख आलेला आहे.
त्या दोघांचा माझ्यावर बराच प्रभाव पडला आहे.
त्यामुळे पुढल्या भागांत त्यांच्याबद्दल सविस्तर लिहिन.
अजून मित्रांबद्दलही लिहायचे आहे.
माझ्या हायस्कूलच्या आठवणी थोड्या चघळत चघळतच मी तुम्हाला सादर करत आहे.
मला ते मजेचे दिवस आठवतांना खूप आनंद होतो.
आमच्या काळी स्पर्धा नव्हती.
निदान ती आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती.
पास होणे हा एकच उद्देश सर्वांपुढे असे.
त्यामुळे मौजच जास्त होती.
आशा आहे की तुम्ही सुध्दा या माझ्या शाळेंत रेंगाळणाऱ्या आठवणींना दाद द्याल.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..