माझ्या धाकट्या भावाला गावी असताना पोलिओ झाला आणि आईने त्या रागात कायमची मुंबई जवळ केली. त्यानंतर आमचं कोकणातील गावी जण जवळ जवळ बंद झालं. लहान असताना काकाच्या लग्नाला गेलो होतो त्या नंतर एक – दोनदा त्यामळे मला गावी कोणी चेहऱ्याने ओळखत नव्हते. मी आठवीत असताना आमची वेडसर झालेली आजी आमच्या झोडीत राहायला आली. म्हणजे काकानेच मुंबईला आमच्याकडे धाडली होती. तेव्हा आमची आई कामाला होती त्यामुळे तिला सांभाळता सांभाळता आमची दमछाक व्हायची त्यावेळी आम्ही तिला त्रास देतो अशी अफवा कोणी पसरवली होती देव जाणे पुढे कधीतरी एकजण पचकला तेव्हा मला कळले. एके दिवशी ती आमच्या झोपडपट्टीत रस्ता चुकली तेव्हा तिचा फोटो नव्हे तिला केबलवर लाईव्ह दाखविले होते. त्यावेळी आमच्याकडे टी. व्ही. होता पण केबल नव्हता. त्यावेळी आमच्या विभागात आम्ही एकटेच बामणे होतो त्यामुळे शोधण्याची काही गरज नव्हती. आणि आमचे बाबा विभागात त्यावेळी नारळवाले म्हणून प्रसिद्धीस आले होते. मी ही बसायचो बऱ्याचदा नारळ विकायला त्यामुळे खराब नारळ कसा ओळखायचा, नारळ कसा फोडायचा आणि नारळातील खोबर अक्क कसं काढायचं याच कसब मी शिकलो होतो. एक – दोन वर्षांनी आजी गावी गेली आणि तिथेच अचानक वारली. ती जर मानसिकदृष्टया सदृढ असती तर फार बरं झालं असतं. तिचा प्रेमळ सहवास आम्हाला लाभला असता. पण माझ्या आईची आई तिचे प्रेम आम्हाला भरभरून लाभले.ती गेली तेव्हा मी माझी आजी ही कविता लिहिली होती. तिचे सारे आयुष्य काबाड कष्ट करण्यात गेले तरीही शेवटी तिच्या वाट्याला सुख का आले नाही ? हे कोडे मला आजही उलगडले नाही आमच्या झोडपट्टीत बाथरूमची व्यवस्था जवळ नसल्यामुळे तिला तिच्या शेवटच्या काळातही मनात असतानाही आमच्या जवळ ठेवता आले नाही.
ती गेली त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही एस आर ए च्या टॉवर मध्ये राहायला गेलो. आजी कशी असावी याच ती जिवंत उदाहरण होती. ती फक्त नावाने लक्ष्मी नव्हती तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी होती. आमची गरिबी तिने पाहिली होती आणि श्रीमंतीही पाहिली.पतवंडे ही पाहिली. माझ्या आईवर तिचे खूप प्रेम होते. त्या धक्क्यातून सावरायला आईला एक वर्ष गेलं.
आम्ही नवीन घरात आलो आणि चार वर्षे भाड्याच्या घरात राहण्याच्या त्रासातून मुक्त झालो. नवीन घरात राहायला आल्याव आम्ही गावी जुनं घर पाडून नवीन घर बांधायला घेतले. त्या घराच्या गृहप्रवेशाच्या वेळी मी गावी गेलो. तेव्हा गावातील लोकांशी आई बाबांना माझी ओळख करून द्यावी लागत होती. यापूर्वी मी गावी गेलो होतो तो २००४ साली माझ्या लहान बहिणीच्या लग्नाला. तेव्हा मी पंचवीस वर्षाचा होतो. माझ्यासोबत माझे स्वाध्याही मित्रही होते . त्या स्वाध्यायी मित्रांच्या सहवासात आल्यामुळेच मी मांसाहार सोडला होता. २६ जुलैला मुंबई तुंबापुरी झाली आणि २८ जुलैला मी मामा झालो म्हणजे माझ्या भाच्याचा वेदांतचा जन्म झाला. त्याच्याच नावाने पुढे माझ्या धाकट्या भावाने आणि मी वेदांत कॉम्पुटर नावाने कॉम्पुटर क्लास सुरू केला जो आजही सुरू आहे. आज क्लासचा पसारा वाढवला नाही पण संगणका संबंधीच्या कामाचा पसारा भावाने खूप वाढवला, नाव झालं पण पैसा त्या मानाने नाही मिळवता आला.
आमच्या घरातील प्रत्येकाच्या हातून अगदी नकळत समाजउपयोगी कामे आम्ही गरीब असतानाही होत होती आणि होत आहेत आजही. माझी बहिण आज आरोग्य सेविका आहे, लहान भाऊ विमा क्षेत्रात आहे धाकटा भाऊ संगणक क्षेत्रात आहे अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याने प्रसंगी मोफत संगणक शिकविले आहे. मी पत्रकारिता क्षेत्रात आणि आमचे बाबा आता गॅस – शेगडी दुरुस्ती संबंधी कामे स्वस्तात करून लोकांची आजही सेवा करत आहेत. आज त्यांना समाजात खूप मानसन्मान आहे तो त्यांनी स्वतः कमावला आहे.
मी शिक्षण सोडले त्या काळात माझे बाबा काडसिद्धेश्वर महाराज यांच्या सानिध्यात आले आणि त्यांनी दारू सोडली आणि ते आध्यात्मिक झाले. संगत मनुष्याचे आयुष्य बदलते जगण्याला एक नवीन अर्थ देते. त्यामळे मी संगत करताना फार जागरूक असतो. म्हणूनच मला मोजके मित्र आहेत. माझा एकही मित्र दारू पित नाही.
माझ्या आयुष्यात माझा खरा मित्र एकच होता तो म्हणजे विजय ! माझा एकमेव मित्र ! त्या व्यतिरिक्त माझे मित्र माझे भाऊच होते. विजय एकमेव मित्र होता ज्याच्या घरी मी जेवलो होतो. त्याची आई माझे खूप लाड करायची ! तो मुंबई सोडून नालासोफाऱ्याला गेला आणि आम्ही शरीराने दुरावलो. पुढे त्याच लग्न झालं तो संसारात रमला. आणि मी माझ्या कवितेत रमलो. विजय एक अजब रसायन होतं. आमच्या वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी ! आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा पण थोडासा लाजाळू माझी आणि त्याची मैत्री नक्की कशी झाली मला आठवतही नाही. पुढे तो विज्ञान शाखेत गेला वनस्पती शास्त्रांत काहीतरी शिकला आणि पुढे फार्मा कंपनीत स्थिरावला आमच्यात आजही फोन होतो पण कामासाठी !
आम्ही सहावीत असताना आमच्या वर्गातील नीलम नावाच्या मुलीला त्याच्या नावाने एका वात्रट मुलाने चिट्टी लिहिली आणि हा तिचा भाऊ झाला. तिच नीलम मी जेव्हा तिसरीत सरकारी शाळेत शिकत होतो तेव्हां माझ्या वर्गात होती. दिसायला एखाद्या बहुलीसारखी ! मी ही तेव्हा बाहुलाच होतो पण सुकड्या बाहुला ! एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही डबा खात होतो. नीलम त्यावेळी आमच्या वर्गाची वर्ग प्रमुख होती. तिने डबा खाल्ला आणि माझी पाण्याची बाटली पिऊन रिकामी केली. त्यात तिच्यासोबत तिचे आणखी मित्रही होते. मला या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि मी तसाच दप्तर उचलून एकटाच घरी गेलो. मला अचानक घरी आल्याच पाहून आईला आश्चर्य वाटले. आई मला पुन्हा शाळेत घेऊन गेली आणि त्यावेळी आमच्या वर्ग शिक्षिका असणाऱ्या कांबळे बाईंकडे तिने नीलमची तक्रार केली . योगायोगाने त्या बाईंच्या मुलाच नावही निलेश होतं. त्यांनी नीलमला विचारले असता तिने आपला गुन्हा ताबडतोब कबूल केला. मग बाईंनी तिच्या नाजूक हातावर छडीने फटके मारले ती रडून रडून लाल झाली. शाळा सुटल्यावर कळले की तिची आई आणि माझी आई ओळखीच्या होत्या.
क्रमश:
— निलेश बामणे.
Leave a Reply