पुढच्या वर्षी चौथीला मी गुरुकुल विद्यालय या तेव्हा नव्याने सुरू झालेल्या शाळेत प्रवेश घेतला आणि वर्गात पाऊल ठेवतो तर काय ? त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका बाबांच्या ओळखीच्या होत्या आणि योगायोगाने निलनीलमनेही त्याच शाळेत प्रवेश घेतला होता. त्या प्रसंगा नंतर मी शाळेत शक्यतो मुलींपासून लांबच राहू लागलो होतो. ती अभ्यासात तर हुशार होतीच पण खेळातही हुशार होती. मी अभ्यासात आणि चित्रकलेत हुशार होतो. माझा चित्रकलेचा छंद पुढे बरेच वर्ष मी लहान मुलांना चित्रे काढून देऊन जोपासला पण नंतर माझ्यातील चित्रकार जगण्याच्या धावपळीत कोठे हरवला ते माझं मलाच कळलं नाही. नीलमला माझी म्हणजे मी काढलेली चित्रे आवडत त्यामुळे आमच्यात अभ्यासात स्पर्धा होती पण पुढे जाऊन मी मागे पडलो ती पदवीधर झाली तेव्हा मी कारखान्यात हात काळे करत होतो. तरीही त्यांनंतरच्या काळात आमच्यात मैत्री वाढली इतकी की आमचे मित्र आमच्या नात्याबद्दल संशय घेऊ लागले. पण तिच्या धडाडी स्वभावाचा मला आदर वाटे आणि सौंदर्याचा हेवा ! तिच्याबद्दल माझ्या मनात तशा भावना कधीच नव्हत्या पण माझी पहिली मैत्रीण म्हणता येईल तिला. पण काही वर्षांपूर्वी तिच्या आईने आत्महत्या केली. ती गोष्ट मात्र माझ्या हृदयाला चटका लावून गेली त्यानंतर तिच्या आयुष्यात तिच्या कुटुंबात बऱ्याच गोष्टी घडल्या त्याचा मी साक्षीदार नव्हतो. त्या नंतर ती मला कधीच भेटली नाही. माझ्या शाळेतील मोजून पाच सहा मित्र तेवढेच आज माझ्या संपर्कात आहेत ते ही व्हाट्स अँपवर ! ते त्यांच्या आयुष्यात रंगलेले मी माझ्या आयुष्यात गुणलेलो!
माझं त्यांच्यावर प्रेम आहे नाही हा प्रश्नच नाही पण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. पण मीच हळू स्वतःला जगापासून अलिप्त करून घेतलं कारण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना पटतील अशी माझ्याकडे नाहीत. माझ्या शाळेतील आठवणी खूपच प्रेरणादायी होत्या.
मी सहावीत असताना आमच्या वर्गशिक्षिका सावंत मॅडम होत्या. पाचवा तास त्या घेत होत्या मी दरवाजा जवळच्या पहिल्या बेंचवर बसलो होतो वर्गाबाहेरील दुसऱ्या सरांनी मला बाहेर बोलावलं म्हणून मी मॅडमला न विचारता बाहेर गेलो खरं तर हे चूकीच होतं पण झाली चूक! मी माघारी आल्यावर मॅडमनी मला विचारून बाहेर न गेल्यामुळे हातावर दोन फटके मारले! माझ्या शालेय जीवनात मी खाल्लेला तो पहिला आणि शेवटचा मार होता. तो मार माझ्या इतका जिव्हारी लागला की पुढचे दोन तास मी रडून काढले शेवटच्या तासाला त्या मॅडम पुन्हा आल्या तेंव्हा त्यांनी मला रडताना पाहून पुढे बोलावलं आणि स्वतःच्या हातातील रुमालाने माझे डोळे पुसून मला गप्प केलं.
त्यावेळी आम्हाला हिंदीला एक शिक्षक होते ते ज्याला प्रश्नच उत्तर बरोबर येईल ते त्याला उत्तर चूकलेल्या विद्यार्थ्यांच्या कानाखाली मारायला सांगत. एकदा त्यांनी एक प्रश्न विचारला मुलींपासून सुरुवात केली. शेवटचा नंबर माझा होता अक्का वर्ग उभा राहिला जर मी त्या प्रश्नाच उत्तर दिलं नसत तर अक्का वर्ग वाचला असता पण मी उत्तर दिलं आणि वर्गातील सर्व मुलांना माझा मार खावा लागला मुलींना सरांनी पट्टीने मारले पण माझ्यावर त्याचा राग एकानेही धरला नाही विजयलाही मला तेव्हा मारावे लागले होते. असे अनेक प्रसंग आले जेंव्हा मी माझी हुशारी सिद्ध केली. पण दुर्दैवाने माझी हुशारी जगाने मान्य करूनही दुर्दैवाने माझ्या खाजगी आयुष्यात मी स्वतःला यशस्वी सिद्ध करू शकलो नाही. कारण भौतिक जगाची यशाची परिभाषा खूपच वेगळी आहे. मला वाटलं होतं मी माझ्या बुद्धीच्या जोरावर फार मोठा कोणीतरी होईन पण माझ्या नशिबाने मला साथ काही दिली नाही. त्यामुळे आज मी खात्रीने सांगू शकतो की नशीब नावाची एक अजब गोष्ट या जगात असते.माझ्या हुशारिचा उपयोग करून घेणारे सर्वच आज त्यांच्या आयुष्यात यशस्वी आहेत मग ते यश माझ्या वाट्याला का आले नाही. या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध शेवटी मी घेतला माझ्या परीने. पण ती उत्तरे थोडी विचित्र,अगम्य, अनाकलनीय आणि कल्पनातीत होती.
माझी वयाची पस्तीस वर्षे झोपडपट्टीत गेली पण ते झोपडपट्टीतील आयुष्य खूप सुंदर आनंदाने गेली सोबत काही काळ गरिबी असतानाही ! मला आजही आठवते आमची झोपडी कुडाच्या काठीने शेण आणि माती मिसळून तयार केलेली होती वर कलकाचे बांबू त्यावर लोखंडी पत्रे आणि प्लास्टिक होते खाली जमीन मातीची शेणाने सारवलेली. मी स्वतःही कित्येकदा जमीन शेणाने सारवलीही होती आणि वलंयही केली होती. त्यावेळी तेथे लाईट नव्हती सर्वांकडे चिमणीचे दिवे होते काही कार्यक्रम असेल तर लोक गॅसबत्ती भाड्याने आणत त्यावेळी त्याचा प्रकाशही खूप जास्त वाटे मी चिमणीच्या प्रकाशात केलेला पाठीवरचा अभ्यास मला आजही आठवतो. त्यावेळी आमच्या झोपडीच्या आजूबाजूला खूप फुलझाडे होती. केळीची झाडे होती. एक दोन पेरू बदाम आंबे आणि वडाची झाडे होती. थोड्या अंतरावर जंगल होतं त्या जंगलातून एक नाला वाहत होता. त्या नाल्यातच एक विहीर होती. त्यावेळी आमच्या झोपडीत दिवसा ढवल्याही साप – विंचू येत. जवळ असणाऱ्या जंगलात आम्ही प्रातर्विधीला जायचो आणि तेथील झाडांवर झोपाळे खेळत राहायचो! आणि मोठं मोठ्या दगडांवर चढून बसायचो मी तर कित्येकदा त्या दगडांवर बसून इंग्रजीचे शब्द पाठ करायचो ! त्या जंगलातील मोकळ्या जागेत आम्ही तासनतास क्रिकेट, गोट्या, कबडी, खो खो , लंगडी खेळायचो आणि पतंगही उडवायचो ! पावसाळ्यात पत्ते खेळायचो अगदी भिकारी – भिकारी पासून रमी पर्यत. पावसाळ्यात छत्री हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता. पावसात भिजायचं चिखलात खेळायचं आणि नाल्यावर जाऊन पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डबक्यात मस्त डुंबायच !
त्यावेळी आम्ही आमच्या घरापासून दूर असणाऱ्या विहिरीवर पाणी भरायला जायचो तेव्हा आमच्या सोबत मुलीही असायचा आजच्या भाषेत ती विहीर म्हणजे आमचा लव्हर्स स्पॉट होता. आणि दुसरा लव्हर स्पॉट पावसाळ्यात तो नाला व्हायचा ! जेथे आम्ही चादरी धुवायला घेऊन जायचो आणि दिवसभर दगडावर बसून राहायचो ! कधी – कधी तेथेच दगडाच्या खपरित लपलेले खेकडे पकडून आणायचो आणि चुलीवर त्याचा रस्सा करून पार्टी करायचो ! त्यावेळी आम्ही गरीब असतानाही सर्वार्थाने सुखी होतो. प्रसंगी भंगार विकुनही आम्ही एक किलो तांदूळ आणून भात करून मसाला आणि मिठासोबत चवीने खाल्ला होता. पण त्यावेळी त्या भाताचा सुखाने खाल्लेला घास पुन्हा खायला मिळाला नाही.
त्यावेळी आम्ही जंगलात जाऊन करवंदे आणि चिंच तोडून आणायचो ! त्यामुळेच कदाचित मला आंबट खायची सवय लागली की लिंबू मी संत्री सारखा सोलून खायचो ! एके दिवशी मी माझ्या मित्रांसोबत माझ्या एका मित्राच्या गावी म्हणजे ओझरला पिकनिकला गेलो होतो त्याच्या घरासमोर एक लिंबाचे झाड होते. मी म्हणालो, मी हा लिंबू सोलून खाईन ! पण माझ्या मित्रांना ते खोटे वाटले. पण मी लिंबू खाल्ल्यावर सर्वांनी तोंडात बोटे घातली. त्याच वेळी मी पहिल्यांदा ओजरच्या गणपतीचे, लेण्याद्रीच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि शिवनेरी किल्ल्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. आम्ही माघारी येताना ड्रायव्हरचा गाडी चालवताना डोळा लागला. पण नशीब आमचा मित्र सहदेव जागा होता. नाहीतर त्या दिवशी आमचा निकाल लागला असता.
क्रमशः
— निलेश बामणे.
Leave a Reply