आमच्या विभागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने कोणी बदलले असेल तर ते कास्प प्लॅन या संस्थेने. त्यांनी आमच्या अंधारमय झोपडीत विजेचा प्रकाश आणला, ज्ञानाचा प्रकाश आणला, प्रौढ साक्षरतेचा प्रकाश आणला इतकंच काय घरं पक्की व्हावी म्हणून साहित्यही दिले. आमचे घर पक्के होण्यासाठी तेव्हा आईच मंगळसूत्र विकावे लागले होते. पुढे आम्ही आमच्या स्व: खर्चाने दुमजली छान घर बांधले पण काही वर्षातच ते एस.आर. ए. त गेलं आणि आम्ही टॉवरमध्ये राहायला आलो. मधल्या काळात आम्हाला काही वर्षे भाड्याच्या घरात राहावे लागले. स्वतःच्या हक्काच्या घरात राहणाऱ्यांसाठी भाड्याच्या घरात राहणं ही खरं तर शिक्षाच असते. आमच्या पूर्वीच्या झोपडपट्टीत कसा मोकळा श्वास होता. नेमकी त्यावेळीच ज्योतिषी भाषेत सांगायचे तर माझी शनीची महादशा सुरू होती त्यात शनीची अंतर्दशा होती आणि शनीची साडेसाती सुरू होती. असं म्हणतात की शनीच्या साडेसातीत माणसाला स्वतःच्या घरापासून दूर राहावे लागते, चप्पल लवकर झिजतात, लोकांचे खरे चेहरे समोर येतात, प्रसंगी आत्महत्येचे विचार मनात येतात, चारी बाजूने आर्थिक कुचंबणा होते, पायपीट करावी लागते, अपमान सहन करावा लागतो, समाजातील आपल्या पत प्रतिष्ठेला धक्का लागतो. नवीन शारीरिक व्याधी निर्माण होतात खास करून त्वचारोगाशी संबंधित ! साडेसातीत मला हे सर्व अनुभव अनुभवता आले दुर्दैवाने ! याच काळात मी स्वतःला स्वतःच अनेक प्रश्न विचारले. कित्येकदा तर मला वाटले माझे आयुष्य निर्थक वाया गेले. कवी लेखक पत्रकार म्हणून मी केलेले कार्य कोठे गिणतीतच नाही मला त्या प्रसिद्धीचा काडीचाही उपयोग झाला नाही उलट त्या सगळ्यांच्या नादात मी स्वतःच आर्थिक नुकसान करून घेतलं असं मला वाटतं. मी ते सगळं करण्यात आयुष्य अक्षरशः वाया घालविले असे माझ्या कुटुंबातील लोकांसह बहुतांश लोकांचं असच मत आहे. त्याकाळातच माझा दैवी शक्तींवरचा विश्वास वाढला कोठेतरी नास्तिकतेतून माझा प्रवास आस्तिकतेकडे सुरू झाला.
साडेसाती संपल्या संपल्या आम्ही आमच्या टॉवरमधील नवीन घरात राहायला गेलो ती तारीख होती ८ एप्रिल २००१६ आणि आश्चर्य म्हणजे आमच्या जुन्या घराचा दरवाजा उत्तर दिशेला होता आणि या घराचा दरवाजाही उत्तर दिशेलाच आहे. या नवीन घरात राहायला आलो आणि मन शांत झालं. आता तेथे राहायला येऊन पाच वर्षे पूर्ण झाली या घरात राहायला आल्यावर माझ्या भाच्याचा आणि पुतण्याला जन्म झाला. मी पुन्हा मामा आणि काका झालो. माझे आर्थिक उत्पन्न पुन्हा सुरळीत झाले पण त्यापूर्वीच्या आयुष्याने घेतलेल्या खडतर परीक्षांच्या झळा स्वस्थ बसू देत नव्हत्या म्हणून मला अगोदरच आवड असणाऱ्या ज्योतिष या विषयाचा मी ऑनलाईन अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली.
मी इतका हुशार असूनही आयुष्यात यशस्वी का झालो नाही ? हा प्रश्न माझ्या घरच्यांना सतत सतावत होता पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते म्हणून त्यांनी एका तंत्रमंत्र विषयाचा जाणकार असणाऱ्या व्यक्तीकडे सहज विचारणा केली असता ती व्यक्ती म्हणाली , माझ्यावर वशीकरण मंत्राचा प्रयोग झालेला आहे. म्हणजे सध्या मी ज्या कंपनीत काम करतो ती सोडून जाऊ नये म्हणून ! ती कंपनी सोडण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला पण तो फसला मला पुन्हा पुन्हा नाईलाजाने का होईना त्याच कंपनीत कामाला जावे लागत होते आजही मी तिथे माझ्या सोयीने काम करत होतो पण माझ्या कामाच्या तुलनेत मला मिळणारा मोबदला खूपच कमी होता इतका कमी की तो इतरांना सांगायलाही मलाच लाज वाटावी ! पण तरीही मी ते काम धरून होतो माझ्यावर हा प्रयोग करणाऱ्यांची त्याने सांगितलेली नावे होती संगिता, रमेश आणि सिताराम ! त्याने पुढे जाऊन हे ही सांगितले मी जोपर्यंत त्या कंपनीत आहे तोपर्यंतच ती कंपनी चालेल. मी इतका मनापासून काम करत होतो. तरीही माझाच उपयोग करून घेतला. म्हणा किंवा हा प्रयोग फक्त माझ्यावर केलेला नसेलही पण सगळे काम सोडून गेल्यावरही मी एकट्याने ती कंपनी सावरली पण त्या बदल्यात मला काय मिळालं फक्त आणि फक्त बोलणी ! माझ्या कामाची किंमत खूप जास्त होती पण त्याची किंमत मला मिळत नव्हती. मान मिळत होता पण पैसे मिळत नव्हते. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला पूर्वी घडून गेलेल्या सर्व गोष्टींचे संदर्भ मला लागले आणि मी सावध झालो. पण तरीही या अशा गोष्टी असतात यावर माझा विश्वास बसत नव्हता म्हणून मी आता त्या गोष्टीची पुन्हा परीक्षा घेणार होतो. ज्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी कळल्या त्याच दिवशी माझ्यावरील त्या वशिकरण मंत्राची शक्ती नष्ट झाली. कारण हे मंत्र तुमच्या नकळत तुमच्या मनाला वशीभूत करत असतात एकदा का तुमच्या मनाची शक्ती वाढली की त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आता त्या मालकाच्याच मनात कंपनी बंद करायचा विचार येऊ लागला आहे. कारण त्यांनतर मी माझ्यातील शक्ती जागृत केल्या. मला स्वतःला भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल अगोदरच लागते. मी सहज बोलून गेलेल्या गोष्टी खऱ्या होतात. कोणत्याही वशीकरण शक्तीने मला तिथे गुंतवून ठेवले नव्हते मी गुंतून पडलो होतो. माझ्या पायगुणाने ती कंपनी चालत होती आणि आता बंदही पडेल.
माझ्याबद्दल अनेक गूढ गोष्टी कोणालाच माहीत नाहीत. माझ्याकडून उसने घेतलेले पैसे भल्या भल्याना परत द्यायला जमत नाही. माझ्या संपर्कात येणाऱ्या करोडपती माणसालाही माझी गरज पडते पण तो माझ्या कामी येत नाही. मला माझ्या आयुष्यात कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नाही. ही माझ्यावर देवाची कृपा असल्याचे लक्षण आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणालाही माफ केले नाही ! माझ्या बाबतीत चुकणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळतेच ! मी चुकलो तर मला मिळते म्हणून मला चुकण्याचा अधिकार नाही हे मला पक्क माहीत होतं. म्हणूनच मी प्रत्येकाला माझ्या बाबतीत चुकण्याची संधी देतो. माझ्या आयुष्यात घडलेल्या छोट्यात छोटी गोष्ट का घडली हा प्रश्न मी स्वतःला विचारतो !
मी माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासून कित्येक अपघातातून वाचलो ! ते योगायोगाने झालं नव्हतं. माझ्या आयुष्यात काहीच विनाकारण घडलं नव्हतं प्रत्येक घटना घडण्यामागे एक विशिष्ट कारण होतं. माझ्या आयुष्यात कोणीही विनाकारण आलं नव्हतं आणि विनाकारण गेलं नव्हतं. त्यामुळेच मी कधीच कोणाच्यातच गुंतून पडलो नाही. मी माझ्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा दोष इतरांना देतो पण ते विनाकारण असत कारण सामान्य माणसे मोहातून बाहेर पडत नाहीत. मी असामान्य आहे हे खरंतर मला त्यांना सांगायचे नसते. ते माझ्या नात्यात गुंतले आहेत पण मी नाही. मी ज्या दृष्टीने जगाकडे पाहतो त्याच दृष्टीने माझ्या कुटुंबातील व्यक्तींकडे पाहतो. जगाला माझं वागणं हा वेडेपणा वाटतो पण मी सहज बोलून गेलो तरी ते तत्वज्ञान असते. कित्येकांना वाटत राहते की त्यांनी मला फसवले पण खरंतर त्यांनी स्वतःलाच फसवलेले असते. लवकरच मी बेचाळीस वर्षाचा होणार आहे आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. मला उत्सुकता आहे त्या वळणाची !
क्रमशः
— निलेश बामणे.
Leave a Reply