नवीन लेखन...

माझ्या प्रोफाईल फुटुची गोष्ट

मी फेसबुकला कधीच माझा प्रोफाईल फोटो लावत नाही..
नाही..नाही..गैरसमज करून घेऊ नका..कोणी फोटोचा गैरवापर करेल असला विचारही माझ्या आसपास फिरकत नाही.कारण तसं करायला सुंदर तर सोडाच पण जरा बरा चेहरा लागतो..माझा तो आजिबात नाही..
दोन चार महिन्यांपूर्वी आपणही जरा बरं दिसावं असं उगीचच मनानं घेतलं..म्हटलं छानसा हेअर-कट केला तर कदाचित वय दोन-पाच वर्षे कमी दिसेल.
म्हणून लेक पुण्यात असताना (तिला आल्यावर सर्प्राइज द्यावं म्हणून) केस कापायचा घाट घातला.
माझ्या “बॉयकटच्या” मागणीला धुडकावून ब्युटिशियने “छान वेगळाच हेअरकट करते “च्या नावाखाली पाचशेची नोट खरी केली..
आरशात पाहिल्यावर ब्युटिशयनशी “मी पूर्वी कधी फार वाईट वागले होते का” हे अनेकदा आठवून पाहिलं पण आठवेना..आणि तरीही तिने असा माझा सूड का घेतला असावा हे समजेना.
नव-याची हेअर-कटला डायरेक्ट नावे ठेवण्याची हिम्मत झाली नाही.पण त्या दिवसापासून तो घरी आलेल्यांना मी घरात नाहीये ,असं परस्पर सांगून टाकतो. डोक्याला रुमाल किंवा ओढणी बांधल्याशिवाय त्याच्याबरोबर गाडीतून बाहेर नेतच नाही..!!
” आई हा प्राणी बावळट असतो ” ही समजूत ज्या वयात पक्की होते त्या वयात असलेल्या लेकीने पुण्याहून आल्यावर माझा हेअर-कट पाहून गोंधळ घातला नि ” आपली आई बावळटपणाच्याही पुढे गेलीय ” अशा तिच्या समजुतीवर शिक्कामोर्तब झालं..!
” आईला काय झालं गं?” असं जेंव्हा तिच्या घरी आलेल्या मैत्रिणीने तिला सहानुभूतिपूर्वक विचारलं तेंव्हा तर तिने मला ” डिस्ओन” करायचं ठरवलं होतं..
आता अशी परिस्थिती असताना फोटो फेसबुकच्या प्रोफाईलला लावणं बरं दिसतं का?
आणि अगदी लावायचा म्हटलं तरी लावता आला पाहिजे नं?
आपली धाव एखादा लेख लिहून तो स्वत:च्या वॉलवर किंवा एखाद्या ग्रुपवर शेअर करण्यापुरती!
परवा काय झालं..नेहमीप्रमाणे पहाटे दोनला जाग आली..( झोपेच्या बाबतीत मी घुबडाची वारस आहे)
आता पहाटे दोनला आपल्याला फेसबुकशिवाय दुसरा सहारा नसतो.

मग लेख वाच,कविता वाच,बायांनी टाकलेल्या पदार्थांचे फोटो बघ आणि त्यावर कमेंट कर..असा कार्यक्रम असतो..
हे झालं की स्वामी समर्थ,गोंदवलेकर महाराज,निरनिराळे देव, देव्या ..यांचे फोटो येऊ लागतात.
” स्वामी समर्थ ” लिही तुला चांगली बातमी मिळेल ..असं वाचलं की कुठंतरी चांगल्या बातमीचा मोह पडतो नि बोटं “श्री स्वामी समर्थ” लिहितात. मग अनेक महाराज,देव यांची नामे लिहून मी मधमाशीनं मध गोळा करावा तसं पुण्य गोळा करत सुटते..
मन अगदी प्रसन्न होतं आणि सकाळ सकारात्मक होते.
काल असच झालं.
श्री स्वामी समर्थांचा फोटो आला.मी नेहमीप्रमाणे ” श्री स्वामी समर्थ ??? ” असं लिहिलं . लगेचच नोटिफिकेशन आलं ” Your comment is declined “.
मला काही समजेनाच. माझी कमेंट का नाकारली गेली?
म्हटलं काहीतरी टाईप करण्यात चूक झाली असेल.पुन्हा टाईप केलं.पुन्हा तसच नोटिफिकेशन आलं..Comment declined.त्याचवेळी इतरांच्या कमेंट्स मात्रं accept होत होत्या.
आता गोंदवलेकर महाराजांच्या फोटोवर ” जयश्रीराम ???” लिहिलं ..
लगेच ” Your comment is declined ” नोटिफिकेशन..
आतामात्रं मी पुरती खचले.
माझा नमस्कार स्वामी समर्थ,गोंदवलेकर महाराज का स्वीकारत नसतील? माझ्या हातून काही पाप घडलं असेल का?
हं ,म्हणजे मी देवाचं खूप काही करत नाही..पूजाही अगदी षोडशोपचारे वगैरे नाही..सवाष्णी घालणे वगैरे तर लांबच..हे स्वामी आणि महाराजांना कळलं असेल का? म्हणून ते रागावले असतील ?
पण मी रामनाम आणि समर्थांचा जप तर मनापासून करते ….मग असं का व्हावं?
आता लेकीच्या फेसबुक अकाऊंटवरून लिहिलं …मान्य झालं..
नव-याचा मोबाईल पळवला..
बराच वेळ खपून अन्लॉक केला.

आणि वरकरणी नास्तिक असलेल्या आणि कामालाच ईश्वर मानणा-या नव-याचं नामही चक्क कबूल झालं..
आता मात्रं माझ्या अस्मितेचा,माझ्या श्रद्धेचा प्रश्न होता..
सगळ्या कमेंट्सचं नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की सगळ्या कमेंट्सकर्त्यांच्या प्रोफाईलला फोटो आहे नि मला नाहीये..
तो ये बात है!
आता मी इरेला पेटले.
प्रोफाईलला फोटो टाकायचा नि नाम लिहायचं.
पण फोटो कसा टाकायचा ते कुठं माहीत होतं?
शेवटी गुगलमामांची मदत घेतली..
आता फोटो कुठला टाकायचा हा प्रश्न होता..
शेवटी हेअरकट केल्यावर “किती भयानक दिसतो” हे पहायला काढलेली सेल्फी हा एकमेव फोटो मदतीला आला..
प्रोफाईलला फोटो लावू , नाम लिहू आणि मग लगेच फोटो परत काढून टाकू … रात्रीची वेळ असल्याने असला फोटो कुणी पहाणार नाही..या विचाराने एकदाचा फोटो आणि प्रोफाईल यांची मोट बांधली..
लगेच समर्थांच्या नि गोंदवलेकर महाराजांच्या ग्रुपवर कमेंटही केली नि चक्क ती कमेंट मान्य झाली..
मी स्वत:ची पाठ थोपटली..
आता तो दिव्य फोटु काढून टाकायचा म्हणून ” वॉलवर ” आले..
तर तेवढ्यात अमेरिकेतल्या मैत्रिणीची फोटोचं कौतुक करणारी ” काव्यमय” कमेंट आलेली..
जीव लाजेनं अगदी चूर झाला..
तेपर्यंत अमेरिकेतल्याच तिच्याच बहिणीची कमेंट..
आतामात्रं लाजेनं जीव अर्धमेला झाला..
अजून इतरांनी हा फोटो पहायच्या आत काढून टाकला पाहिजे..
पण फोटो काढायचा कसा?
पुन्हा गुगलची झडती घेतली..
त्याच्या सूचनेनुसार गॅलरीतल्या माझ्या ” त्या ” फोटोवर गेले नि क्लिक् केलं..पण प्रोफाईलचा फोटो काही जाईना..
पुन्हा तीन-चार वेळा तसच केलं.पण फोटोकाही जाईचना ..झुकुमामांना फोटो फारच आवडलेला दिसत होता..
एवढ्यात मेसेंजरवर अमेरिकेतल्या मैत्रिणीचा, बाळीचा मेसेज आला..
” कौतुक केलं म्हणून किती फोटो टाकतीयस? तोच फोटो पाच -सहा वेळा आलाय ..एकच पहिला फोटो ठेव ,बाकीचे काढून टाक..”
म्हणजे मी फोटो काढायला बघत होते नि तोच फोटो पुन्हा नवीन म्हणून पडत होता..!!
वॉलवर माझ्या फोटोंची एकामागून एक बरसात होत होती..
” फेसबुकफ्रेंड काय म्हणतील” ,या विचाराने जीव अर्धमेला होत होता.
अभिमन्युसारखी अवस्था झालेली होती..
फोटो घालण्याच्या चक्रव्यूहात शिरता आलं होतं पण आता बाहेर पडता येत नव्हतं..
लेकीची मदत घ्यावी तर आदले दिवशीच तिच्याशी भांडण झालेलं..
” तुझं कोणतंही काम यापुढे करणार नाही ” ही धमकी मिळालेली..तिच्यापुढे हात कसे पसरणार ?
शेवटी फोन बंद करून लांब ठेऊन दिला..
दुसरे दिवशी घाबरत घाबरत फोन उघडला तर फेसबुक फ्रेंड्सच्या फोटोचं कौतुक करणा-या केवढ्या तरी कमेंट्स आलेल्या..
लागोपाठ चार-पाच फोटो टाकल्यावर कौतुक करण्यावाचून त्यांना पर्यायच राहिला नव्हता..
जीव थोडा-थोडा झाला..
कमेंट्सना उत्तर द्यायचं धाडसही झालं नाही..
काल रात्री लेकीशी सलोखा झाला..
” आई , तू कधीकधी लाज आणतेस बघ …प्रोफाईलला कसला बेकार फोटो टाकलायस …बरं तोही एखादा टाकावा…चार-पाच फोटो
एकामागून एक?
दे तुझा मोबाईल …काढून टाकते सगळे…”
आता लेक ते सगळे फोटो कधीही काढून टाकेल..
त्यापूर्वी येड्यागबाळ्या माझ्या फोटोचं मनापासून कौतुक केल्याबद्दल सगळ्यांना “खूप खूप धन्यवाद “!

नीला महाबळ गोडबोले
सोलापूर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..