यावर्षी बळीराजाला,
सोयाबिननं तारलं !
पण जगाच्या पोशिंद्याले,
मजुरीनं मारलं !!१
…
हजार रुपय एकरानं,
मागील वर्षी सोंगलं !
दोन हजार एकरानं,
मजुर यंदा बोंबलं !!२
…
मळणीवाला म्हणतो मला,
दोनशे रुपये पोतं !
मी म्हटलं त्याचा काय,
आता जीव घेतं !!३
…
आलं आभाळ, झाकण्यासाठी,
ताडपत्री नेतो !
दोन हजारानं इथे त्याचा,
खिसा कापला जातो !!४
…
एवढ सार करुन सोयाबीन,
बाजारात नेतो !
ओलं आहे म्हणून भाव,
सोळाशाचा येतो !! ५
…
घरी आल्यावर सारा हिशेब,
चुकता करुन देतो !
हाती नाही राह्यलं काही,
म्हणून रोगर घेवून घेतो !!६
…
यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
वाली कोणी व्हा रे !
नका देवू दुजे काही,
हिंमत तरी द्या रे !! ७
…
असाचं जर बळीराजा,
जहेर पिऊन मेला !
आपलाही पुढे समजा,
खेळ खलास झाला !!८
…
सरकारच्या दरबारी,
आवाज उठला पाहिजे !
त्याच्यासाठी प्रतिनिधी,
आमचा झटला पाहिजे !!९
…
जय किसान जय जवान,
आठवा आता नारा !
दोघांसाठी खरचं आता,
काहितरी करा !!१०
…
फेसबुकवरुन आलेली ही कविता… कवी अज्ञात
प्रेषक – विनय साटम
Leave a Reply