नवीन लेखन...

मखमली शुद्ध कल्याण

संध्याकाळ उलटत असताना, रात्रीचे रंग आकाशात पसरत असताना, कानावर “रसिक बलमा” ही काळीज चिरून टाकणारे शब्द येतात आणि डोळ्यातील उरलेली झोप पूर्णपणे उडून जाते!! गाण्याचा पहिल्याच आलापित अवघे स्वरशिल्प उभे करणारा तो अविस्मरणीय आवाज, पहिल्याच झटक्यात आपल्या मनात रुतून बसतो. “रसिक बालमा हाये, दिल क्युं लगाया, तोसे दिल क्युं लगाया” या ओळीतील पहिल्या “लगाया” वर जी भावनांची थरथर दाखवली आहे, ती शास्त्राच्या पलीकडची आहे!! बहुदा श्रुती शास्त्र त्याचे स्वरांचे थोडेफार विश्लेषण करू शकेल तरीदेखील तो नेमका झालेला परिणाम, शब्दापलीकडचा आहे आणि तो ऐकून “भोगावा” लागतो. त्याशिवाय, त्याची विखारी खुमारी जाणवणार नाही!!

“रसिक बलमा, हाये दिल क्युं लगाया,
जैसे रोग लगाया”.
या गाण्यात एक आणखी खास बात आहे. पहिला अंतरा सुरु व्हायच्या आधी जो वाद्यमेळ आहे, तो सतारीच्या सुरांनी सुरु होतो आणि त्याच्या पाठीमागे सारंगीच्या सुरांचे “अस्तर” आहे. सतारीचे सूर वरच्या सुरांत वाजत आहेत आणि सारंगीचे सूर किंचित ठाय लयीत तसेच मंद्र सप्तकात वाजत आहेत आणि ही स्वरांचा खेळ, काही क्षणांपुरता(च) आहे. लगेच व्हायोलिनचे सूर अवतरतात, ते वेगळ्या पट्टीवर!! अखेर मात्र, सुरवातीच्या सुरावर सतार येउन थांबते!! हा खेळ फार विलक्षण आहे. संगीतकार म्हणून शंकर/जयकिशन यांना या सांगीतिक वाक्यांशाचे संपूर्ण श्रेय द्यावेच लागेल. यात आणखी मजा म्हणजे हा जो वाद्यमेळ आहे, तिथे हा राग दूर सारलेला आढळतो पण तरीही परत चाल मुखड्याला अप्रतिमरीत्या येउन मिळते. सुगम संगीतात प्रयोग कसे करता येतात, याचे हे गाणे म्हणजे उत्तम उदाहरण ठरेल.
शुद्ध कल्याण रागाची ओळख करून घेण्यासाठी या गाण्याकडे नि:संशयरीत्या बघता येईल. “भूप” रागाचा “तोंडावळा” दिसत असताना, “मध्यम” आणि “निषाद” स्वर किंचित अस्तित्व दाखवतात आणि हा राग पूर्ण वेगळा म्हणून अवतरतो. यात आणखी गंमत म्हणजे “भूप” राग सकाळचा मानला जातो तर “शुद्ध कल्याण” मात्र रात्रीचा पहिला प्रहर घेतला जातो. याचे मुख्य कारण हा राग पूर्वांगात भूप रागाशी नाते सांगतो तर उत्तरांगात यमन रागाशी. त्यामुळे, “औडव-संपूर्ण” या प्रकारात, हा राग येतो. “सा”,”रे”,”ग”,”प” हे स्वर आणि याचे संगती, यामुळे या रागाची वेगळी ओळख मनात ठसते.
या रागावर भूप रागाची सावली इतकी आहे की पूर्वीच्या ग्रंथात,या रागाची ओळख “भूप कल्याण” या नावाने केलेली वाचायला मिळते. खरेतर या रागाचे आरोही स्वर आणि भूप रागाचे आरोही स्वर, यात सत्कृत्दर्शनी काहीही फरक नाही पण खरी गंमत इथेच आहे. स्वर लावण्याची पद्धत आणि कुठल्या स्वराला प्राधान्य द्यायचे, याचे नियम, यामुळे भारतीय रागदारी संगीत अतिशय गुंतागुंतीचे आणि त्याचबरोबर विलोभनीय झाले आहे.
भारतीय रागदारी संगीतात, “धृपद-धमार” गायकी वगळल्यास, दोन भाऊ एकत्रितपणे गायन करताना फारसे आढळत नाही. राजन-साजन मिश्रा (कदाचित वडाली बंधू) याला अपवाद असावेत. दोन तंबोरे एकत्रित सुरात रुणझुणत असावेत त्याप्रमाणे या व्दयीचे गाणे जमते. एकाने हरकत घ्यावी आणि दुसऱ्याने त्या हरकतीचे दीर्घ तानेत रुपांतर करावे, हा खेळ तर हे दोघेजण फारच बहारीने करतात. गाण्यातील लय किती वेगवेगळ्या पद्धतीने घेता येते तसेच “वाकवता” येते, यासाठी तर यांचे गायन उद्मेखूनपणे ऐकावे.
“सकल गुण निधी ध्यान” ही बंदिश जवळपास ५० मिनिटांची आहे म्हणजे या रागाचे सगळे वैभव आपल्याला या रचनेत बघता तसेच अनुभवता येईल. आलापीत लागलेला खर्जातील स्वर इतका विलक्षण आहे की आपण, त्या स्वराकडे एकटक “बघत” बसतो!! वर मी जी स्वरावली मांडली आहे, त्याचे नेमके प्रत्यंतर या रचनेत ऐकता येईल. प्रत्येक स्वर आणि त्या स्वराला जोडलेली हरकत, काही ठिकाणी अतिशय लोभसवाणी आहे. तसेच रचना अगदी, द्रुत लयीत सुरु होते तेंव्हा मध्येच एके ठिकाणी जो असामान्य “खर्ज” लावलेला आहे, तो खास ऐकण्यासारखा आहे.गायनात एखाद्या तानेत “खटका” घेऊन, त्या स्वराचे निराळेच सौंदर्य दाखवण्याची त्यांची शैली केवळ लाजवाब अशीच म्हणावी लागेल.
प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांनी अनेक अप्रतिम भजने गायली आहेत त्यातील एक रचना – “ओमकार प्रधान रूप गणेशाचे” ही रचना ऐकुया. संगीतकार कमलाकर भागवत यांची चाल आहे. लेखाचे नाव “मखमली शुद्ध कल्याण” असे जे मला द्यावेसे वाटले, ते या गाण्याच्या संदर्भात. गमतीचा भाग असा आहे, या गाण्याचे सूर बघितले तर यात, थोडा “भूप” आहे, थोडा “देसकार” आहे पण तरीही “शुद्ध कल्याण” राग या गाण्यात प्रकर्षाने आढळतो. खरतर चित्रपट गीते काय किंवा भावगीते काय, त्या गाण्याची चाल म्हणजे रागाची प्रतिकृती किंवा आराखडा नव्हे. अर्थात, याला अपवाद अशी काही गाणी असतातच.
“ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान”.
पारंपारिक भजनाचा ताल न वापरता वेगळ्याच ढंगाचा ताल वापरला आहे. “आकार तो ब्रह्म, ऊकार तो ब्रह्म” इथे मात्र राग दूर गेला आहे पण परत अंतरा संपताना, सूर मात्र नेमके जुळवून घेतले आहेत. सुमन कल्याणपूर इतकी सुरेल आवाजाची गायिका पण त्यामानाने तिच्या गायकीची “परीक्षा” घेणारी फारशी गाणी वाट्याला आली नाही, इतकेच नव्हे बहुतेकवेळा तिच्या आवाजाची तुलना लताबाईंच्या गायाकीशी होत गेली आणि बहुदा याच तुलनेच्या आग्रहापायी या गायिकेला मराठी चार भावगीते वगळता,  फारशी संधी मिळाली नाही आणि गायनाचे तसे “चीज” झाले नाही.
असेच एक गाणे इथे देण्यासारखे आहे. देशभक्तीवर आधारित गाण्यात “शुद्ध कल्याण” राग किती अप्रतिमरीत्या मिसळला आहे, हे बघण्यासारखे आहे. “जहां डाल डाल पर सोने की चिडिया” हेच ते गाणे. जवळपास, ७ मिनिटांचे गाणे पण ऐकताना, गायन, कविता आणि रचना, या सगळ्या बाबतीत गाणे कुठेही जरादेखील रेंगाळत नाही. केरवा तालात जरी गाणे सुरवातीला बांधले असले तरी पुढे त्यात अनेक ताल वापरले आहेत. गाण्यातील शब्दानुसार, गाण्याची चाल आणि ताल, बदलले आहेत आणि हे सगळे करत असताना, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी, गाणी फार खुबीने रंगतदार ठेवले आहे.
“जहां डाल-डाल पर सोने की चिडियां करती है बसेरा,
वो भारत देश हमारा,
जहां सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा,
वो भारत देश हमारा.”
मोहमद रफीचा मुळातला जोरकस, अतिशय सुरेल आवाज अशा गाण्यात फार विलक्षण खुलतो. सुरवातीचा संस्कृत श्लोक इतक्या वरच्या सुरात आहे की, तिथे गायकाचा “गळा” पोहोचणे, हीच मुळातली एक परीक्षा आहे. देशभक्तिपर गाण्यात नेहमी आवाजात एक जोरकस स्वर आवश्यक असतो, जेणेकरून शब्दातील भावना तितक्याच ओतप्रोतपणे रसिकांच्या मनात ठाण मांडून बसतील. अर्थात असे करताना, गाणे जरादेखील प्रचारकी वाटता कामा नये, ही काळजी जरुरीची असते अन्यथा सगळी रचना, एखाद्या पक्षाच्या जाहिरात वाटण्याची शक्यता असते. इथे, या गाण्यात ही सगळी व्यवधाने, संगीतकार म्हणून हंसराज बहेल यांनी फारच समर्थपणे सांभाळली आहे. हिंदी चित्रपट गीतांत अशी बटबटीत गाणी भरपूर सापडतात. त्यादृष्टीने बघता, हे गाणे इतके मोठे असून देखील अतिशय श्रवणीय झाले आहे. हिंदी चित्रपट संगीतात, हा प्रश्न मला बरेचवेळा पडलेला आहे. हंसराज बहेल सारखा प्रतिभावंत संगीतकार हाताशी असून, याला त्यामानाने फारशी संधी कधीच मिळाली नाहीत. हंसराज बहेलच्या मानाने निकृष्ट दर्जाच्या संगीतकारांना, इथे कितीतरी संधी मिळाल्या आहेत आणि संधी मिळून देखील त्याला वाया घालवलेल्या आढळतात. केवळ दैवगती, असेच फडतूस नाव द्यावे लागते.
आह” चित्रपटात “ये शाम की तनहाइयां” हे गाणे आपल्याला “शुद्ध  कल्याण” रागाचे आणखी वेगळे स्वरूप दाखवते. गंमत बघण्यासारखी आहे,  सुरवातीला मी “रसिक बलमा” या गाण्याचा उल्लेख केला तो रागाच्या संदर्भात. आता याच संगीतकार जोडीने हे गाणे दिले आहे. शंकर/जयकिशन हे रागाच्या बाबतीत किती चोखंदळ होते, हे या गाण्यावरून समजून घेता येईल. या दोन्ही गाण्यांच्या चाली संपूर्णतया भिन्न आहेत पण तरीही चालीच्या अंत:प्रवाहातून याच रागाची धून ऐकायला मिळते. खरेतर कुठल्याही सुगम संगीताच्या रचनेतून रागाची संपूर्ण ओळख करून घेण्याच्या फंदात पडू नये कारण एकाच रागाची अनंत रूपे आपल्याला गोंधळात टाकू शकतात. किंबहुना नेहमीच गोंधळात टाकतात.
“ये शाम कि तनहाइयां, ऐसे में तेरा गम;
पत्ते कही फडके, हवा आयी तो चौके हम”
हाच प्रकार इथे घडतो. अर्थात या विचाराची दुसरी बाजू अशी, सुगम संगीताने, रागदारी संगीत किती व्यामिश्र आहे, किती वैविध्याने नटलेले आहे हे सगळे फार सहजतेने अनुभवता येते.
हिंदी चित्रपट, “पेईंग गेस्ट” मध्ये देखील या रागाची ओळख दाखवणारे नितांत रमणीय गीत आहे – चांद फिर निकाला मगर तुम ना आये”. गाण्याची चाल आणि पडद्यावरील सादरीकरण इतके महत्वपूर्ण आणि परिपूर्ण आहे की, गाणे ऐकताना, कुठल्या रागावर आधारित?  असला प्रश्नच मनात उद्भवत नाही आणि याचे श्रेय, संगीतकार सचिन देव बर्मन आणि गायिका लताबाई, यांच्याकडे नि:संशय जाते.या संगीतकाराला, चित्रपट गाणे कसे “सजवायचे” याचे नेमके भान होते आणि प्रसंगी त्यासाठी रागदारी नियमांना तिलांजली देण्याचे धार्ष्ट्य त्यांनी वेळोवेळी दाखवले.
“चांद फिर निकाला मगर तुम ना आये,
जला फिर मेरा दिल, करु क्या मैं हाये”.
इथे देखील हाच प्रकार घडला आहे. रागाचे सूर आणि चलन ध्यानात घेता, प्रथमत: या गाण्यात “शुद्ध कल्याण” कुठे आहे, याचाच शोध घ्यावा लागतो!! गाणे हे शब्दानुरूप असणे जरुरीचे आहे आणि त्यासाठी चाल निर्मिती करताना, सूर कुठून घेतले, कशा प्रकारे वापरले, हे मुद्दे नेहमीच गैरलागू ठरतात. थोडक्यात, केवळ हे गाणे या रागावर आहे म्हणून हे गाणे सुंदर आहे,असे ध्वनित करणे, हा रागदारी संगीताचा फाजील दुराभिमान ठरतो. मग प्रश्न असा येतो, शुद्ध कल्याण रागाच्या लेखात, या गाण्याची जागा कुठे? प्रश्न जरी वाजवी असला तरी काही प्रमाणात अस्थानी ठरू शकतो कारण, आपल्याला इथे या रागाची ओळख करून घ्यायची आहे, तो राग संपूर्णपणे समजून घ्यायचा नाही. एकदा का हा विचार नक्की केला म्हणजे मग वरील सगळेच प्रश्न निकालात निघतात!!
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..