संदर्भ : लोकसत्ता, मुंबई पुरवणी, दि. ३०.०५.२०१९, ‘शब्दबोध’, डॉ. उमेश करंबेळकर यांचें सदर
वरील लेखात करंबेळकरांनी ‘मक़्ता’ या शब्दाबद्दल लिहिलें आहे. प्रथमत:, करंबेळकर यांचा प्रांजळपणा अॅप्रिशिएट करायला हवा, कारण ते स्पष्टपणें सांगतात, ‘मक्ता शब्दाचा उगम नेमका कोणत्या भाषेतून झाला तें कळलें नाहीं’.
- सुरेश भटांच्या ‘एल्गार’ मधील या शब्दाचा उल्लेख करंबेळकरांना कदाचित पुरेसा वाटला असावा. मात्र, एका गोष्टीचा उलगडा झाला नाहीं, आणि ती ही की, जर ग़ज़लच्या संदर्भात भटांनी या शब्दाचा उल्लेख केलेला आहे, तर मग तो शब्द फारसी-उर्दूमधून आलेला असावा, असा विचार करंबेळकरांनी कां बरें केला नाहीं ?
- पुढें जाण्यापूर्वी आपण उर्दूचा एक शब्दकोश पाहूं या.
- श्री. श्रीपाद जोशी व प्रा. एन्. एस्. गोरेकर यांचा उर्दू-मराठी शब्दकोश हा महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळानें प्रकाशित केलेला कोश काय सांगतो पहा –
मक़्,त‘अ – पुल्लिंग, (अरबी) – (१) ग़ज़लचा शेवटचा शेर, यांत सामान्यत: कवीचें टोपण नाव असतें; (२) शेवट ; (३) ताटातूट होणें.
- म्हणजेच, हा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ( हें मुद्दाम सांगण्याचें कारण हें की, कांहीं अरबी शब्दांचा मराठीत शिरकाव फारसीद्वारा न होतां, थेट अरबी ते मराठी असा झालेला आहे, जसें की ‘व’ हें अव्यय).
- या शब्दकोशावरून अर्थ बराच स्पष्ट होतो. आधी ग़ज़लच्या संदर्भातील स्पष्टीकरण –
ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते.
( माहितीसाठी टीप – उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात).
- कांहीं संभाव्य शंकांचें निरसन –
- मूळ शब्द जर “मक़्,त‘अ” असा आहे, तर त्याचें ‘मक़्ता’ हें रूप कसें झालें ? तर, उर्दूतही असें रूप होतें, जसें की, ‘शमअ’ – ‘शमा’ ( ज्यापासून मराठीतील ‘समई’ हा शब्द आलेला आहे).
- हा शब्द मराठीत उर्दूमधून आला कां ? तर, हा शब्द मराठीत थेट फारसीमधूनच आलेला आहे.
- तें कसें ? तर, १४व्या शतकाच्या मध्यापासून ते १७व्या शतकाच्या जवळजवळ अंतापर्यंत महाराष्ट्र व आजूबाजूच्या भूभागात विविध ‘शाह्यां’ची राज्यें होती. ( तेथूनच ‘दखनी हिंदी’ चा उगम झाला, जी उर्दूची पूर्वज आहे).
- त्यामुळे फारसीचा मराठीशी बराच संबंध आला. बरेच लब्धप्रतिष्ठ जन सरकारी नोकरीत होते, त्यामुळे त्यांना फारसी येत होतीच. पण इतर जनांचाही विविध कारणांनी सरकारी कामकाजाशी व सरकारी कर्मचार्यांशी संबंध येत होताच, जसें की शेतसारा, वतनें, दान-देणग्या, कज्जे-खटले वगैरे. त्यामळे फारसी शब्दांचा वापर मराठी लोकही करूं लागले. त्याचप्रमाणें, तत्कालीन अमराठी लोक ( जसें की, शह्यांशी संबंधित तेलगुभाषी, कन्नडभाषी किंवा अन्यभाषी कर्मचारी) मराठी जनांशी मराठीतून बोलायचा प्रयत्न करत असतांना , त्यांच्या बोलण्यांत मराठी वाक्यरचना पण कांहीं फारसी शब्द, असें होत होतें. ( ही नॅच्युरल भाषिक प्रक्रिया आहे. उर्दू भाषासुद्धा अशाच प्रकारें निर्माण झालेली आहे). अशा परिस्थितीमुळे फारसी शब्दांचा मराठीत शिरकाव झाला.
- अशी अनेकानेक शब्दांची उदाहरणें देतां येतील, जसें की, आज़ार, बाज़ार, गुदस्ता, खुर्द, बद्रुक, खुर्दा, रिकीब, रिसाला, चिटणीस (चिट्ठीनवीस), कारखानीस, डबीर (दबीर), पेशवा, जंजीरा (जज़ीरा), दर्या, नाखवा, गुत्ता, दप्तर, दवाखाना, नेस्तनाबूद, बेचिराख (बेचिराग़) , इमारत, तारीख (तवारि.ख), इत्यादी इत्यादी.
(माझ्या गज़लविषयक लेखात अशी बरीच उदाहरणें दिलेली आहेत. तो लेख माझ्या वेबसाईटवर पाहावा. अथवा, जिज्ञासूंनी जवळजवळ १०० वर्षांपूर्वीचा माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचा ‘फार्शी-मराठी कोश’ , किंवा कांहीं वर्षांपूर्वी प्रसिद् झालेला यू.म. पठाण यांचा ‘फार्सी-मराठी व्युत्पत्तीकोश’ पहावा ).
- आतां आपल्याला हा विचार करायचा आहे की, ‘शेवट’, ‘ताटातूट’ या मूळ अर्थाऐवजी मराठीत या शब्दाचा अर्थ ‘ठेका, कंत्राट, काम करण्याची जबाबदारी’ वगैरे कसा झाला असावा.
- ‘अ’ या व्यक्तीनें एखाद्या गोष्टीचा ‘ब’ या व्यक्तीला ‘मक्ता दिला’ , म्हणजेच, त्या ‘अ’ व्यक्तीचा त्या गोष्टीशी असलेल्या संबंध संपला. यातून असा अर्थ स्पष्ट होतो की, त्या गोष्टीशी ‘ब’ व्यक्तीचा संबंध सुरूं झाला.
- ‘मक्ता देणें’ हा वापर रूढ होता, तेव्हां त्याचा काऊंटरपार्ट म्हणून ‘मक्ता घेणें’ हा वापर सुरूं झाला.
- ‘मक्ता देणें’ म्हणजे ‘संबंध संपणें’; म्हणून ‘मक्ता घेणें’ म्हणजे ‘संबंध सुरूं होणें’, हें उघड आहे. अर्थात्, हें ‘संबंध ट्रान्सफर होणें’ कांहीं अटींवर असतें, (तें कांहीं दान नव्हे), आणि म्हणून, मक्ता घेणें म्हणजे ‘कांही अटींवर जबाबदारी किंवा हक्क घेणें’ हा अर्थ रूढ झाला.
- हलक्याफुलक्या पद्धतीनें आपण या टिप्पणीचा शेवट असा करूं शकतो की, कुणी कसलाही मक्ता घेतलेला नसला तरी, ‘मक्ता घेणें’ हा शब्दसमूह कसा वापरात आला हें वाचकांना आतां स्पष्ट झालें असेल.
— सुभाष स. नाईक
भ्रमणध्वनी – ९०२९०५५६०३, ९८६९००२१२६.
ईमेल – vistainfin@yahoo.co.in
Leave a Reply