अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला हा लेख
तत्कालीन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय डॉ. टी. के टोपे यांच्या शिफारसीमुळं मी वसईत प्राचार्य म्हणून रुजू झालो. त्याकाळी वसईगाव ही ग्रामपंचायत होती. त्यामुळं प्राध्यापकांना नियमाप्रमाणं घरभाडे, अन्य भत्ते मिळत नव्हते. बाहेरील प्राध्यापक इथं आर्थिक अडचण सोसून येण्यास तयार नव्हते. आर्थिक पात्रता असलेले विद्यार्थी मुंबईतील
महाविद्यालयात प्रवेश घेत. मुंबईच्या नामवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी मोठ्या मनानं सहाय्य केले. आपले उत्तम प्राध्यापक दिले. हळूहळू परिस्थिती बदलली. पण प्रारंभी काही वर्षे अडचणींना तोंड देऊन मी महाविद्यालयाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न केले. मी साहित्याचा विद्यार्थी. इंग्रजीचा प्राध्यापक.त्यामुळं मराठी बरोबरच इंग्रजी साहित्याचं मी वेळ काढून वाचन करीत असे. विनोदी वाङ्मय हे इंग्लंडचं खास वैशिष्ट्य! चॉसर पासून ते शेक्सपियर पर्यंत, डिकन्स पासून ते प्रिस्टले, वुडहाऊसपर्यंत या सर्व प्रतिभासंपन्न लेखकांनी विनोदी नाटकं, कादंबऱ्या लिहिल्या. उत्तम, दर्जेदार विनोद निर्मिती एकूण समाजाच्या अभिजात संस्कृतीची साक्ष देते!
मी संभाषणातून अधूनमधून विनोदी बोलतो. त्याचप्रमाणं आपण विनोदी लेखन करावं असं मला राहून राहून वाटतं.
मी कोकण साहित्यपरिषदेच्या कार्यात सहभागी असताना सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. राजा राजवाडे यांच्याशी माझा परिचय झाला. ते खूप विनोदी लेखन करीत. एकदा रत्नागिरी ते मुंबई कारनं प्रवास करताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुर्दैवानं त्या अपघातात ते गेले ! प्रत्येक वर्षी ते दिवाळी अंक काढत असत.त्यांच्या अपघाती मृत्युमुळं त्यांच्या पत्नी, त्यांचे सुपुत्र प्राचार्य माधव यांना धक्का बसला. पण त्यांनी आपल्या पित्याच्या दुर्दैवी देहावसानानंतर दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. श्री. राजवाडे यांनी एक विनोदी कादंबरी लिहावयास घेतली होती. पण ती अर्ध्यावरच राहिली. प्रा. माधव राजवाडे यांनी ही अडचण श्री. माधव गडकरी, प्रा. वि.शं. चौघुले याच्यापुढं मांडली. मी समोरच होतो. त्यांना मी ती कादंबरी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. विनोदी लेखन करण्याची संधी सहजच चालून आली होती मी ती कादंबरी पूर्ण केली. सर्वांनीच माझ्या या प्रयत्नाचं कौतुक केलं.
त्यानंतरही मी अधूनमधून विनोदी लेखन करण्याचा प्रयत्न केला. ‘मी मुख्यमंत्री झालो तर’ या विषयावर विद्यार्थ्यांना लेख लिहायला सांगितले जाते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आपल्या लेखात आपल्या अधिकाराचा (गैर) वापर करुन आपण संपत्ती कशी कमावणार, आपल्या नातेवाईकांचं कसं भलं करणार याचं वर्णन करतात. ‘मन की बात’ द्वारे पंतप्रधान जनतेशी संवाद साधतात. एक सामान्य पोलीस ‘मन की बात’ द्वारे आपल्याला होणाऱ्या त्रासाचं आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या छळाचं वर्णन करतो. बडे अधिकारी मंत्री सर्वकाही करतात. पण गरीब बिचारा पोलीस मात्र अडकतो. पैशाअभावी तो कोर्टकचेऱ्या, बडे वकील यावर पैसे खर्च करु शकत नाही. ही त्याची ‘मन की बात’ मी विनोदी पद्धतीनं कथन केली. एक महाविद्यालय. तेथे एक विद्वान उत्तम विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्राचार्यासह अनेक प्राध्यापकांना त्याची विद्यार्थी, पालकप्रिय प्रतिष्ठा अस्वस्थ करते. त्यांच्यावर एक प्राध्यापिका अतिप्रसंग केल्याचा आरोप करते. प्रत्यक्ष न्यायालयात कॅमेऱ्यामधील चौकशीत ती प्राध्यापिका रडते आणि सर्वांनी माझ्यावर ‘अतिप्रसंग केल्याचा बहाणा करते.’ असा दबाव आणला म्हणून मी खोटे आरोप केले असे न्यायाधीशांना सांगते. मी अशा कथा लिहिल्या. त्या मासिकात प्रसिद्धही झाल्या. विनोदी लेखन करण्याची माझी अजूनही तीव्र इच्छा आहे. माझे लेखन विनोदी आहे की हे विनोदी लेखन म्हणजे एक ‘विनोदच’ आहे असेही म्हणतील पण विनोदी लेखक म्हणून लिहिण्याची इच्छा मात्र माझ्या मनात शत्रूंवर हल्ला करण्यासाठी लपून बसलेल्या सैनिकांप्रमाणं आजही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ही इच्छा दबा धरुन बसलेली आहे. बऱ्याच वेळा शत्रू आसपास आल्याची खबर मिळते. झाडाझुडपात लपून बसलेल्या शत्रूंच्या हालचालीची खबर मिळते. सैनिक गोळीबार करतात. शत्रू सावध होतो. माझ्या विनोदी लेखनाच्या या गंभीर प्रक्रियेत असेही काही घडत राहते. त्यामुळं विनोदी लेखक म्हणून सातत्यानं लेखन करण्याचे मनोरथ आकाशात दाटलेले मेघ सोसाट वाऱ्यानं विखुरले जावे त्याप्रमाणे माझे मनोरथ एक प्रचंड भिंत कोसळावी त्याप्रमाणं अलगद कोसळतात. हे असं का होतं हे माझ्या मनाला समजत नाही. पण त्याची खंत मात्र माझ्या मनाला अस्वस्थ करते. यासाठी मी एखाद्या नामवंत मनोवैज्ञानिकांना माझे मन उघडे करुन माझी ही खंत, मनातील सल स्पष्ट करुन त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घेण्याचा गंभीरपणे विचार करत आहे!
सध्या समाजात उघडपणे दिसणारी विसंगती मला विनोद लेखन करण्यास अधूनमधून अस्वस्थ करते. राजकीय क्षेत्रात नेते एकमेकांविरुद्ध ‘तुम्ही चोर’ असे प्रच्छन्नपणे आरोप करण्यात जितके पारंगत आहेत. तितकेच त्यांना वंदनीय असणाऱ्या थोरपुरुषांच्या पुतळ्यांची उंची वाढवण्यात मग्न आहेत! ही विसंगती माझी झोप उडवते.’पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये आपले स्थान समाजात अत्यंत गौण आहे’ असा नारा नारी मंडळी छेडतात पण त्याच नारी – महिला विवाहानंतर पुरुषांवर वर्चस्व गाजवतात. त्यामुळं आता स्त्रीमुक्ती ऐवजी पुरुषमुक्ती असा नारा देण्यात येईल असे मला वाटतं! सध्या फॅशन्सचे युग आहे. अनेक आकर्षक जाहिराती, चित्रपट, मालिकेमधील अभिनेत्रींच्या केशभूषा, वस्त्रे यांचे (अंध) अनुकरण तरुणी करतात, मग साहजिकच तरुणांची मने विचलीत होतात. पण आता त्यांच्या पोटात ‘मीटू’ मुळे भीतीचा गोळा उठला आहे! सर्व क्षेत्रांत विसंगतीचे थैमान आहे. विनोदी लेखनासाठी हे विषय मला सतत खुणावतात. पण ‘संध्याछाया भिवविती हृदया!’ ही माझी आजची शारीरिक आणि मानसिक अवस्था! त्यामुळं विनोदी लेखक होण्याचं काय म्हणतात ते स्वप्न की काय ते अधुरेच राहणार हे नक्की. हीच एक खंत माझ्या मनाला सतत डॉक्टरांच्या इंजेक्शनच्या टोचणीप्रमाणे टोचत राहणार. त्यामुळं काही मिनिटं गुंगी येणार! पण त्याला आता माझा म्हणाल तर ईश्वराचाही इलाज नाही!
— प्रा. पु. द. कोडोलीकर
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply