नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग १

युरोप टूर पूर्ण करत परतूनही आठ दिवस झाले. मन अजूनही युरोपातून त्या अविस्मरणीय अनुभवातून बाहेर येण्यासाठी राजी होत नाहीये. गेली तीन-चार महिन्यांपासून चाललेली आमची युरोप टूर दिवसागणिक उत्कंठा आणि उत्सुकता ठेवण्यात खुपच यशस्वी ठरली आहे.दोन महिने अगोदर पासून शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. सुचनांचा भडीमार तर विचारूच नका!

त्यांपैकी काही….‌ तिकडे थंडी खूप असते हां खूप गरम कपडे घेऊन जा.खूप चालावे लागते बर का? आतापासूनच भराभर
चालण्याचा सराव करा.भरपूर ड्राय फ्रुट्स खाऊन एनर्जी मिळवा.तिकडच्या पद्धतीचे कपडे शिवून घ्या.परस्परांचा हात सोडु नका बरं का?खूप काही खरेदी करू नका हल्ली आपल्याकडे सगळेच मिळते.तिकडचे पदार्थ आणि पेये दोन्हीही चाखून बघा,वगैरे वगैरे.यांपैकी किती गोष्टीचे पालन आमच्याकडून होणार ही एक शंकाच होती.महिना दीड महिना पुर्वि पासून टूर साठीच्या तयारीला सुरुवात झाली.बॅगा किती घ्याव्यात?पर्स कोणती? कपड्यांचे जोड किती नि कोणते? यांवरआम्हा दोघांच्यामध्ये दररोज चर्चेच्या फैरी झडू लागल्या.शेवटी एकमताने ठरलेला प्रस्ताव म्हणजे कमीत कमी सामान घ्यायचे तरच ट्रीप ची मजा घेता येईल.

एका दिवसासाठी जायचे म्हटले तरी, एक मोठी बॅग घेणारी मी,पंधरा दिवसांसाठी कमीत कमी सामान कसे घ्यावे ?याचा तास न् तास विचार करत असायचे.

प्रवासाला निघण्यापूर्वी आठ दिवस शिल्लक असताना औरंगाबाद मुंबई मार्गे पुणे एक दिवस मुक्काम आणि येताना मुंबईहून सरळ ट्रेन ने औरंगाबाद असे सारे ठरले होते.तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासासाठी जात आहात फार दगदग नको या सबबीखाली अचानक विमानाची तिकिटे बूक केली, आमच्या बंधू राजाने, माझ्या काटकसर नावाच्या नियोजनावर पाणी फिरले….

‌‌एकदाचा ३ मे २०१८ हा आमचा टूरसाठी मुंबईला प्रस्थान करण्याचा दिवस उजाडला. आप्तेष्टांनी दिलेल्या असंख्य सुचनांचा संग्रह डोक्यात ठेवत, सूर्यनारायणाने दिलेल्या सलामीला त्रिवार वंदन करत, प्रवास सुरू करण्यासाठी विमानात पाऊल ठेवले.थोडीशी भीती आणि खूप प्रचंड मोठी उत्सुकता सोबत घेत विमानाबरोबर मनाचे पाखरू सुद्धा उंच उंच झेपावले….

खूप खूप लांब म्हणजे, सातासमुद्रापलीकडे हे लहानपणी गोष्टीत ऐकलेले वाक्य आज आपल्याच बाबतीत कधी तरी सत्यात उतरेल असे वाटलेच नव्हते.माझ्या मनात तर कधी असा विचार नाही आला, पण केवळ ह्यांच्या जबरदस्त इच्छेमुळे हे शक्य होऊ लागले होते.पंधरा दिवस आपली माणसे आपली माती घरदार सोडून दोघंच दोघं एवढ्या दूर देशी जातो आहोत सुखरूप परतू ना?अशी थोडी धास्ती मनाने घेतली होती रात्री दीड वाजता टेक अॉफ झालेले आमचे फ्लाइट आपल्या वेळेनुसार दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता म्हणजे युरोपातील आमचे पहिलेच डेस्टिनेशन, लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सकाळच्या अकरा वाजता लॅंड झाले.

आपल्या भारतावर दिडशे वर्षे राज्य केलेले, भारतासारख्या दुभत्या गाईच्या दुधाची संपूर्ण मलयी आपल्या देशात घेऊन जाणारे हे इंग्रज. त्यांचा देश आहे तरी कसा? याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.

एव्हाना बसमध्ये विराजमान होऊन डोळे मोठे करत माझे संपूर्ण निरीक्षण चालू झाले.पाऊल ठेवताक्षणी वातावरणातील आल्हाददायक स्पर्श अंगावर रोमांच उठवुन गेला सकाळचे साडेबारा वाजले होते तरी सगळीकडे कसे शांत शांत होते.रस्त्यावर तुरळक रहदारी दिसत होती.माणसेसुद्धा कुठेतरी एखादा,किमान सायकलवर स्वार झालेला असायचा. हे शहर मुंबईसारखेच. अशी नेहमीच तुलना केली जाते.पण मला नाही वाटले तसे नाही. गाड्यांचे हॉर्नस् धावपळ असे काहीच नव्हते. आपल्या देशातही प्रदूषणमुक्ती आणि आरोग्यासाठी सायकलींचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे असे वाटून गेले.
काचेच्या बस मधून कुतूहलाने तेथील माणसे टिपत , आकाशाला गवसणी घालण्याऱ्या मोठ्या मोठ्या इमारती दोन्ही बाजूंनी मी बघत होते.किती तरी सुनियोजित नगर रचना होती शहराची! या शहराला सांस्कृतिक देणगी मिळाली असल्याचे स्पष्टपणे प्रतिबिंबित होत होते. जुन्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा सुरेख संगम बघावयास मिळत होता पण प्रत्येकाचे आपले असे खास वैशिष्ट्य होते त्यापैकीच एक विंडसर कॅसेल ही एक भव्य वास्तू.

थेम्स‌नदीच्या किनाऱ्यावर असणारी ही भव्य दिव्य वास्तू. गेल्या नऊशे वर्षांपासून राजघराण्याचे निवासस्थान आहे. आजही इंग्लंडचे अधिकृत निवासस्थान हेच आहे. रॉयल फॅमिली मधील महत्त्वाचे कार्यक्रम येथे होत असतात. गेल्याच आठवड्यात झालेला प्रीन्स हॅरी चा विवाह सोहळा हे त्याचे ताजे उदाहरण.

लंडन हे जगातले सर्वात जुने व सर्वात मोठे शहर आहे. हा वास्तुकलेचा उत्तम नमुना असून त्यात असणारे सर्व पेंटिंग्ज, चित्रं, शिल्प कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय इतिहास सांगणाऱ्या कहाणीशी जोडल्या गेलेले आहे. ते अतिशय अप्रतिम बनवलेले आहेत. प्रत्येक कक्ष वेगवेगळ्या थीम वर फर्निचरसह सजवलेले दिसून येतात त्यात शयनकक्ष सुद्धा सुटले नाही. राजाचे आणि राणीचे स्वतंत्र कक्ष त्या त्या पद्धतीने सजवलेले दिसतात. यातून त्यांची संस्कृती तर दिसतेच पण सोबतच त्यांची श्रीमंती ही प्रदर्शित होते.प्रत्येक गोष्ट बघताना डोळे विस्फारल्याशिवाय रहात नाहीत.

टॉवर ऑफ लंडन एक अशीच विशाल वास्तू. यामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे संग्रहालय, चित्रांचे प्रदर्शन,छायाचित्रांचा संग्रह तसेच राजघराण्याचा ऐतिहासिक संबंध असणाऱ्या अनेक गोष्टींचे प्रदर्शन पहावयास मिळते त्यात अनेक प्रसंगाचे चित्रणही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशातून नेलेला ‘कोहिनूर हिरा’येथेच बघावयास मिळतो तो डोळ्यात किती साठवून ठेवू असे झाले होते अगदी. आत फोटो काढण्यास मनाई होती.गंमत म्हणजे तो भारतातून आणलेला आहे या गोष्टीचा गाईडच्या बोलण्यात उल्लेख झाला नाही याचे खूपच आश्चर्य वाटले. वास्तुकलेचे एक एक सुंदर नमुने लंडन मध्ये बघावयास मिळतात.मला, येथील इमारतींवर आणखी एक वैशिष्ट्य असे लक्षात आले की बहुतेक जुन्या म्हणवल्या जाणाऱ्या इमारती या दोन किंवा तीन मजली आहेत आणि त्यांच्या प्रत्येक दोन खिडक्यांच्या रिकाम्या भिंतीवर पुरुष किंवा स्त्री वर्गातील एखाद्याचे मोठमोठे पुतळे (शिल्प)आहेत त्यांचा इतिहास समजावून घेण्यास तेवढा वेळ मिळत नाही आपल्याला.पण शिल्पकलेचे अतिशय उत्कृष्ट नमुने आहेत ते.तसेच येथे बिल्डिंग्ज वर मनोरे बनवण्याची आणि अशा मनोरऱ्यांवर मोठी मोठी घड्याळं ठिक ठिकाणी दिसून येतात.सरळ एका रेषेत असणाऱ्या या ईमारती फार रेखीव दिसतात.कोपऱ्यावरील ईमारतींचे डिझाईन विशेष मोहक दिसते.मला येथे आपल्या सारखे घरांना कपाऊंड वॉल मात्र दिसलीच नाही.

मॅडम तुसॉं वॅक्स म्युझियम, एक गंमत आणि फोटो काढून घेण्यासाठी बघणे ठीक आहे. त्यात भारतातील आणि इतर काही देशातील महत्वाच्या व्यक्तीमत्वांचे,ज्यात राष्ट्रीय व्यक्ती, खेळाडू आणि सिनेस्टार यांचा समावेश आहे अशांचे मेणाचे पुतळे बनवून उभे केले आहेत त्यांपैकी सर्वच हुबेहूब आहेत असे मला तरी जाणवले नाही.पण आपल्या सचिन तेंडुलकरचा आणि प्रिन्सेस डायना यांचा पुतळा मनाला भावला खरा.येथेच मेणाचे पुतळे कसे बनवले जातात याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

बकिंगहॅम पॅलेस ही अशीच एक भव्य वास्तू इंग्लंडच्या राणीच्या स्वतःच्या मालकीची नाही, पण उन्हाळ्यात राणी या वास्तूत राहावयास येते. ही वास्तू केवळ बाहेरून बघण्यासाठीच खुली होती. येथे तीनही सेनादलांच्या सेनापतींशी राणी बरोबर सल्लामसलत होतअसते. शिवाय जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तींसोबत चर्चेसाठी या वास्तूचा उपयोग होतो.रॉयल फॅमिलीच्या म्हणजे त्यांच्या निवासस्थानातून(विंडसर कॅसेल) ते बकींग हॅम पॅलेसमध्ये येण्याचा सोहळा विलक्षण देखणा असतो म्हणे. राणीच्या वास्तव्य काळात इंग्लंडचा राष्ट्रध्वज यावर फडकवला जातो.

हाइड पार्क, बिग बेन,टॉवर ब्रिज, थेम्स नदी वेस्टमिनिस्टर कॅफे, हाऊस ऑफ पार्लमेंट ही सर्व ठिकाणे सिटी ओरिएंटेशन टूर द्वारे बघावयास मिळतात.लंडन आय राईड मधून या साऱ्या गोष्टी व संपूर्ण लंडन शहराचे देखणे चित्र हर्षोल्हासाने आपण डोळ्यात साठवून घेत असतो.भल्या मोठ्या उंचच उंच आकाश पाळण्यावजा संथ गतीने चालणाऱ्या आय राईड मधून लंडन शहर न्याहाळणे ही एक पर्वणीच होय.

नंदिनी म. देशपांडे.

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..