रोममधील पवित्र व्हॅटिकन सिटी या संपूर्णपणे धार्मिक अधिष्ठानावर उभ्या असणाऱ्या छोट्याशा देशातून मूळ रोम शहरात प्रवेश केला, तेव्हा सायंकाळ होत आलेली होती. रोम शहरात प्रथम शिरल्यानंतर “Rome is not built in a day”ही प्रसिद्ध म्हण प्रत्यक्षात कशी उतरत गेली याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्ही ही सायंकाळ राखून ठेवली होती. एका फोर डी मूव्हीतून तीन हजार वर्षे जुनी असणारी इटलीची,रोमची संस्कृती, कला ,चित्रकला याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
थिएटर बाहेर ठेवलेल्या काळ्या चष्म्यांना सोबत ठेवत आत प्रवेश केला,तेंव्हा मीट्ट काळोख होता.एखाद्या भयाण जंगलाच्या खोल गुहेत आहोत की काय आपण? असा भास झाला.सोबत बरेच जण होते, म्हणून नाहीतर हिम्मत नसती झाली बाबा,दोघंच दोघं आत जाण्यासाठी, असो.
अशा मिट्ट काळोखात बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये अडकवण्यात आलेल्या पुतळे वजा मुखवट्यांवर प्रकाश झोत टाकत, हा इतिहास सांगण्याचा श्रीगणेशा केला गेला. दहा मिनिटानंतर मुख्य थिएटरमध्येे गेलो आम्ही.कोणत्या खुर्च्यांवर बसायचे स्थिर किंवा हलत्या? असे दोन पर्याय होते समोर. म्हटलं साध्या खुर्च्यां वर तर नेहमीच बसतो, बघूया या दुसऱ्या नवीन हलत्या खुर्च्यांवर बसतअनुभव घेऊन. स्थानापन्न झालो आम्ही. लगेच सेक्युरिटी गार्डने जवळ येत आमच्या खुर्च्यांना दांडा लावत कुलूप घातले.त्यावेळी मात्र हे काही वेगळेच प्रकरण आहे सांभाळूनच राहावयास हवे याचा अंदाज आला.
खरी मजा तर तो मुव्ही चालू झाल्यानंतरच होती. मजा कसली!राहून राहून सारखे पोटात गोळे येणे आणि गर्भगळीत होऊन जाणे, याचा अनुभव घेतला.पिक्चर चालू झाल्यानंतर जणू आपल्या अगदी जवळ अवतीभवतीच हे सारे घडते आहे. आपणही त्याचा एक भाग आहोत. असे वाटू लागले.कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या तालावर आणि गतीनुसार आमच्या खुर्च्या मागे पुढे अगदी अर्धगोलाकार अशा जोर जोरात फिरवल्या जात होत्या.अर्थात यांत्रिकी पद्धतीने. सुरुवातीला पिक्चर बघण्यात लक्षच नव्हते.आपण पडणार नाही ना?या भीतीने दांड्यावर दोन हात घट्ट पकडून ठेवण्याविषयी मी ह्यांना वारंवार बजावत होते. कारण कोणताही मूव्ही बघत असताना माझ्या पती देवांची झोपण्याची सवय मला चांगलीच परिचयाची होती.
मूव्हीमध्ये पाण्याचा प्रसंग आणि आवाज आला की ते पाण्याचे काही थेंब आमच्या अंगावर आल्याची ही अनुभूती मिळाली.त्यावेळी शंकेची पाल मनात चुकचुकत गेली. न जाणो आग लागल्याचा प्रसंग असेल तर तिचा दाह पण आपल्याला सोसावा लागेल की काय? हा अनुभव नक्कीच थरारक होता. तोंडचे पाणी पळवणारच ठरला.
जेवढा काही मूव्ही लक्ष देऊन बघितला,त्यात तो तो काळ दाखवत रोमच्या उभारणीचे यथार्थ चतुरस्त्र वर्णन अतिशय परिणामकारक केलेले दिसून आले. छतावर रंगवलेल्या चित्रांचा दाखवलेला प्रसंग अद्भुत वाटला. ४५ मिनिटांचा एकदाचा हा शो संपला आणि आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला. “परत कधीही आणि कुठेही असा खुर्च्यांवर बसण्याचा अनुभव घेऊन बघावयाचा नाही.” असा कानाला खडा लावला. गटागटा पाणी पीत कोरडा पडलेला घसा ओला केला.रात्रीचे जेवण आटोपून आराम करण्याची नितांत गरज भासली यावेळी.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून सामाना सहितच निघालो आम्ही रोमच्या शहर सफारीला. महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात असते तसे ऊन चमकत होते.शहराच्या आतल्या भागातच भटकंती असल्यामुळे थंड हवेचा लवलेशही नव्हता. भर बाजारात असावा असे वाटणारा ट्रेव्ही फाउंटन बघण्यासाठी बसच्या खाली उतरलो. एवढी मोठी बस अशा गर्दीच्या ठिकाणी येणे शक्यच नव्हते. पर्यायाने आमची दोन पायांची गाडी भराभर वेग घेत होती.
ट्रेव्ही फाऊंटन दृष्टीपथात आले आणि चालण्याचा शीण कुठच्या कुठे पळून गेला. प्रचंड मोठ्या क्षेत्रफळाच्या जमिनीवर, जमिनीच्या खालच्या लेव्हल वर कृत्रिम पद्धतीने बनवलेले असे हे सौंदर्यपूर्ण ठिकाण.पाण्याच्या सभोवती अतिशय भव्य अप्रतीम मानवी शिल्प बनवून ,सभोवती बागडणारे फेसाळ पाणी. जणू काही शिल्पाच्या मांडीवर एखाद्या छोट्या बाळाने हात-पाय हलवत नाचवत आनंदाने खेळावे असे. हेच ते रोममधील प्रसिद्ध ट्रेव्ही फाउंटन.या फाउंटनच्या वाहत्या पाण्यात आपण आपल्या एका हाताने खांद्यावरून पाठीमागे नाणं फेकलं तर ,पुन्हा कधीतरी रोमला येण्याचा योग आपल्याला येतो अशी युरोपियन लोकांची श्रद्धा(?).आपण भारतीय सुद्धा तेथे गेल्यानंतर पाळतो. मी मात्र याला अपवाद ठरले.
कोलोझियम, कोलोेझिअम म्हणजे प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास हजार प्रेक्षक बसतील एवढे अगदी गावात असणारे एक स्टेडियम.रोम शहरा मध्ये फिरत असताना कुठूनही त्याचा एखादा तरी भाग दृष्टीस पडायचाच. आणि खंडहर झालेली ही एक ऐतिहासिक वास्तू असावी,हे मनाने आगोदरच ताडले होते. पण प्रत्यक्ष प्रवेश केला नि, एवढे प्रचंड स्टेडियम बघून डोळेच विस्फारले. तीन स्तरांवर बैठकीची व्यवस्था, प्रत्येक स्तरावरील प्रेक्षकांना प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते,नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यावर वेगळ्या पांघरुणाची असणारी व्यवस्था, राजाच्या प्रवेशासाठी खास सोय,हिंस्र प्राणी बांधून ठेवण्यासाठी विशेष जागा इत्यादी गोष्टींची मिळालेली माहिती खरोखर विस्मयचकित करते.
कलेचे भोक्ते, संस्कृतीचा इतिहास जपणारे,शिल्पकलेला आणि चित्रकलेला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवणारे रोमन राजे आणि रोमन प्रजा हळुवार मनाचे असतील हा समज खोटा ठरवणारे ठिकाण म्हणजे कोलोजझियम.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कोलोजियम हे प्रचंड मोठे स्टेडियम,
हिंस्त्र स्वरूपाच्या खेळांसाठी प्रसिद्ध होते.दोघांपैकी एकाचा मृत्यू होईपर्यंत कुस्ती स्पर्धा येथे रंगत असत.असे ऐकण्यात आले.या कुस्त्या किंवा खेळ कैदी लोकांच्यात होत असत पुष्कळदा. राजा व प्रजा अत्यानंदाने या अमानवीय खेळाचा आसूरी आनंद घेत असायचे.खेळामध्ये हारणाऱ्याच्या छातीवर पाय ठेवत, पराक्रमाचा माज चेहऱ्यावर दाखवत जिंकणारा व्यक्ती ज्या वेळी राजाकडे बघत असे.त्यावेळी राजाने आपल्या तळहाताचा अंगठा जर खालच्या दिशेने दाखवला तर, हारणाऱ्याला मारून टाकावे.व हाच अंगठा वरच्या दिशेने दाखवला तर त्याला जीवदान द्यावे.असे संकेत दिले जायचे म्हणे.
एवढे कलाप्रेमी लोक क्रौर्याची परिसीमा गाठायचे, ज्यावेळी कैदी आणि वाघ-सिंह यांसारखे हिंस्त्र पशू यांच्यात खेळ होत असायचा.याची परिणीती काय होणार हे अंध व्यक्ती सुध्दा पटकन सांगू शकेल.
अंगावर शहारे आणणारी ही माहिती म्हणजे सौंदर्याला गालबोट लावणारीच आहे हे नाकारता येणार नाही कधीही. कोलोझियमची अफाट मोठी वास्तू आश्चर्याने बघत बघत बाहेर पडलो.पण रोममध्ये रस्त्यात ठिकठिकाणी मोठे मोठे मानवी रूपातील अप्रतिम शिल्प मनाला भुरळ घालत होतेच .
आज आपण युरोपचा निरोप घेणार ही जाणीवही व्याकूळ करत होती. आम्ही मागच्या जवळ जवळ पंधरा दिवसांपासून युरोपिअन्स बनून गेलो होतो.
आपल्या मातीची ओढ या व्याकुळते पेक्षा निश्चितच जास्त होती. म्हणूनच आपली माती, आपली माणसं,आपलं अन्न,साद घालत होतं “या,आता परत”.केंव्हा एकदा मायदेशी जाऊन खमंग पिठलं,भाकरी,ठेचा खाईन आणि जीभेला चव आणीन असे झाले होते.
ठरल्याप्रमाणे मुंबईला आल्यानंतर मातृभूमीला वंदन करत, घराकडे जाणाऱ्या वाटेवर विचार चक्राने मनाचा ताबा मिळवला. आपण युरोपात अनुभवलेल्या, बघितलेल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायला हव्यात असे वाटले.तसेच आपण भारतीय आपल्या देशात असताना उपयोगात आणणारी बेशिस्त, परदेशात जाऊन जेव्हा प्रदर्शित करतो ना ही गोष्ट निरीक्षणातून खूपच वेदनादायक वाटली.आपल्या देशाची प्रतिमा जगात कशी असावी याचे भान प्रत्येक भारतीयाने ठेवावयास हवेच. असे प्रकर्षाने म्हणावेसे वाटते.जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आपण,तरी ती एक सर्वांगसुंदर अशी अनुभूती असते. चांगल्या गोष्टींचे, तत्त्वांचे, तंत्रज्ञानाचे,कलेचे आदान प्रदान करण्याचे पर्यटन हे एक मुख्य माध्यम असते. असेच असावे. हे पूर्ण सत्य होय.
समाप्त
© नंदिनी म. देशपांडे
Leave a Reply