नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग २

खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल.

एवढ्या वर्षांत वाढदिवस एखाद्या खास ठिकाणी साजरा करावा असे कधीच मनीमानसी आले नाही. पण या निमित्ताने आमच्या ‘ह्यांचा’ वाढदिवस चक्क लंडन शहरात साजरा झाला.सोबत असणाऱ्या समुहाने आणि आमच्या टिम लिडर ने खास युरोपियन चॉकलेट्स व ग्रीटिंग तसेच बर्थडे बॉय चा खास बॅच दिवसभर लावण्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून दिला.त्या मूळे आणखीनच रंगत वाढली. खरी गंमत तर पुढेच आहे अहो, हा बॅच लावून दिवसभर शहरात फिरत असताना ज्याचे लक्ष त्याकडे गेले, त्या प्रत्येक युरोपियन व्यक्तीने बर्थडे बॉयला आवर्जुन शुभेच्छा दिल्या. हा अनपेक्षितपणे मिळणारा आनंद शब्दातीत आहे. यातूनच त्यांचे शिष्टाचार डोकावले नक्कीच.

लंडनमधील वास्तव्य संपवून आम्ही पॅरिस साठी रवाना होण्याच्या दिवस खूपच उत्साहवर्धक ठरला. स्वप्नवत वाटणार्या युरोस्टार मधून लंडन ते पॅरिस हा प्रवास अनुभवायचा होता तर!लंडन ते पॅरिस चक्क एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश आणि तोसुद्धा ट्रेन ने आश्चर्य वाटले ना? हा ३०७ मैलांचा प्रवास युरोस्टार ने केवळ दोन तास वीस मिनिटात आटोपला. लंडनच्या स्टेशनवर या प्रवासाला निघण्या साठी प्रवेशते झालो. आणि अक्षरशः थक्क व्हायला झाले.आम्हाला आपली भारतीय रेल्वे स्टेशनं अस्वच्छ, अगदी नकोशी वाटणारी, नाकाला रुमाल लावूनच बसावयास लावणारी, बघण्याची सवय. या तुलनेत युरो स्टार साठीचे हे स्टेशन म्हणजे चक्क स्वर्गच होता.किती ती स्वच्छता आणि पद्धतशीरपणा! कौतुक करावे तेवढे कमीच.

गिल्बर्ट स्कॉट यांनी १८६८ मध्ये म्हणजे दिडशे वर्षांपूर्वी एवढ्या आधुनिक पद्धतीने आणि तंत्रज्ञानाने या स्टेशनची केलेली रचना तोंडात बोट घालावयास लावते.नाही म्हणायला येथे थोडी गर्दी होती.पण तीसुद्धा टूरवर आलेल्या भारतीयांचीच.आवाज फक्त त्यांचाच होता. युरोपियन लोकांना बोलण्याची खरच गरज पडत नसावी अशी तेथील सिस्टिम होती. आपण एकदा प्रवेश घेतला की बरोबर संपूर्ण सिस्टिम पूर्ण झाल्यानंतर आपोआप प्रशस्त अशा वेटिंग हॉलमध्ये येऊन बसतो. ट्रेनचे स्टेशन पण मोठ्या एअर पोर्टचे स्वरुप असणारे होते! बोर्डिंग चालू झाल्यानंतर एस्केलेटर ने आपणअलगदपणे प्लॅटफॉर्मवर येवून उतरतो. प्लॅटफॉर्म व ट्रेन एकाच लेव्हलला असते. त्यामुळे कसे चढावे? वगैरे प्रश्न अजिबात पडत नाहीत.

वेळेच्या बाबतीत युरोपियन लोक खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ट्रेनच्या डिपार्चर वेळेत एक सेकंदाचाही फरक पडला नाही काय सुंदर अनुभव होता तो!या प्रवासाचा! ट्रेनमधील सारीच व्यवस्था काय भारी होती म्हणून सांगू! वाय-फाय फ्री,मूव्हीज फ्री, आरामदायी आसन व्यवस्था. अहो,पण ताशी ३०० किलोमीटर अशा भन्नाट वेगाने चालू असतानाही पोटातले पाणी हलू न देणाऱ्या या गाडीतून बाहेरचा निसर्ग डोळ्यात साठवताना मिळणारे नयनसुख कोण सोडेल बरं ?
आमच्या सहलीचा ऋतू हा तेथील वसंत ऋतु होता सर्वत्र हिरवेगार गालिचे, त्यावर मनसोक्तपणे रवंथ करत असलेल्या गाई ,पक्षाचे बागडणे, लांबच लांब हिरवीगार गव्हाची आणि मोहरीची पसरलेली पिवळी धमक शेतं. त्यावर निळ्या,जांभळ्या आकाशाची महिरप.मधून मधून नितळ निळाईच्या पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या फार सुंदर दृश्य होते सारेच !

लंडन पॅरिस ही युरोस्टार जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या पाण्याखालच्या बोगद्यातून जाते. खाडीच्या पाण्याखालून बोगदा बनवत,तो सुद्धा दीडशे वर्षां पूर्वी एवढ्या जलदगतीच्या गाडी साठी रेल्वे रूट बनवणे म्हणजे तांत्रिक दृष्ट्या ते लोक आपल्यापेक्षा किती प्रगत आहेत याचे द्योतकच होय.त्यांचे तंत्रज्ञान अक्षरशः थक्क करणारेआहे!

या प्रवासात जेंव्हा हा पाण्याखालचा बोगदा लागतो ना,तो प्रवास अगदी अवर्णर्णीयच.आपण २० मिनिटापर्यंत बोगद्यात पाण्याखाली आहोत, ही कल्पना अंगावर रोमांच उभे करते. असा अविस्मरणीय अनुभव घेत घेत आपण फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये ‘गॅरेडू नॉर्ड’ या स्टेशनवर कधी येऊन पोहोचतो हे कळतही नाही.

मुंबईहून लंडनला उतरल्यानंतर साडेचार तास मागे घेतलेला आमच्या घड्याळांचा वेळ पॅरिसला उतरल्याबरोबर एक तास समोर नेला.

युरोप सहलीवर असताना आमचा ब्रेकफास्ट,लंच आणि डिनर हे सर्व दिवस असेपर्यंतच होत होते. सकाळी साडेचार वाजताच सूर्योदयाची आभा आकाशात पसरलेली असायची, तर रात्री 8 वाजेपर्यंत चक्क ऊन असायचे नऊ साडेनऊ वाजता सुर्यास्त व्हायचा.निसर्गचक्राचे खरच मोठे कुतूहल वाटले तेथे असताना. शिवाय हवामानही लहरी.ऊन असतानाच आकाशात अचानक ढग भरून यायचे. नि पावसाची सरही.त्याच्या साथीला थंडगार हवेची सोबत.असा हा बदल हवा हवासा होता.

पॅरिसमध्ये आगमन झाल्यानंतर आमचे पहिले आकर्षण होते ते,आयफेल टॉवर ला भेट देणे.एखाद्या छोट्या टॉवर सारखे दुरुन दिसणारा हा मनोरा, जवळ गेल्यानंतर जमिनीचा विशाल काय भाग व्यापत आपले चार पाय चार दिशांना रुजवत दिमाखात उभे असलेले दिसले.

फ्रेंच इंजिनिअर गस्टेल आयफेल यांनी डिझाइन केलेला संपूर्णपणे लोखंडी असणाराअसा हा भव्य मनोरा १०५० फूट एवढ्या उत्तुंग उंचीचा आहे. विशेष म्हणजे हा मनोरा उभा करत असताना कुठेही वेल्ड केलेले नाही हे आश्चर्यच!१७८९ मध्ये बांधून तयार झालेले हे टॉवर,फ्रेंच राज्यक्रांतीला १०० वर्ष पूर्ण झाल्या नंतर १८८९ मधे लोकांना बघण्यासाठी खुले करण्यात आले. पॅरिस चे खूप महत्त्वाचे लँडमार्क अशी त्याची ओळख आहे.एके काळी जगातील सर्वात उंच टॉवर मानले जात होते. आजही ते “सिंबॉल आॅफ द सिटी आॅफ लाईट्स” असे मानले जाते.

टॉवरच्या टॉप (तिसऱ्या) लेव्हलपर्यंत जाण्यातही वेगळीच मजा आहे. आम्हाला काचेच्या लिफ्ट मधून तीनही लेव्हलस् वरतून पॅरिस शहराचे अवलोकन करताना खूप आनंददायक अनुभव मिळाला. दोन लेव्हलस् पर्यंत पायऱ्या सुद्धा उपलब्ध आहेत.पण काचेच्या लिफ्टमध्ये तिरपे चढत उतरत जाताना नजारा काही औरच म्हणायचा. रात्रीच्या ल्बिंकिंग लाईट मध्ये आयफेल टॉवर बघणे म्हणजे आपल्या डोळ्यांना सुखावणारी एक मेजवानीच असते. आणि या लाईट्स ची रचना केली आहे ती आपल्या भारतीय फिलिप्स कंपनीने.

युरोपात कोणतेही डेस्टिनेशन बघण्यासाठी भरपूरच चालावे लागते.आपली दमछाक होते. पण आल्हाददायक हवामानामुळे थकवा जाणवत नाही.

यानंतर पॅरिस सिटी ओरिएंटेशन टूर आटोपून एव्हाना सायंकाळ झालेली असते.सीन नदीच्या भल्या मोठ्या पात्रात आपण क्रुझ मधून शहर निरीक्षणाचा आनंद घेऊ लागतो.या वेळी सन सेट तर काय अप्रतीम दिसतो! आणि आकाशातील रंगछटाही.दोन्ही किनाऱ्यावर ‘ऊन खात’बसलेले फ्रेंच नागरिक गोव्याच्या बीच ची आठवण करुन देतात.क्रुझ रायडिंग चा हा अनुभव भरपूर हवेच्या सान्निध्यात आपल्याला खूप ताजेतवाने बनवतो.

मला स्वतःला लंडन पेक्षा पॅरिस आणखी थोडे जास्तच आधुनिकीकरणाकडे जाताना दिसते. आपण ज्याला स्वैराचार मानतो तो थोड्या अधिक प्रमाणात येथील स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येतो. त्यांना कदाचित त्याचे काहीच वाटत नसावे. पण आपल्या डोळ्यांना ते नक्कीच डाचते हेच खरे.

पॅरिसमधील उत्तुंग आणि खूप कमी जागा व्यापणाऱ्या इमारतींना बघून डोळ्याचे पारणेच फिटते.
पॅरिस ला ‘म्युझियमस् चे शहर ‘असेही संबोधले जाते त्यासंदर्भात पुढच्या भागात बघूया.

भाग.२. समाप्त.
क्रमशः

— नंदिनी म. देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..