नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग ४

लंडन आणि पॅरिस ही फार मोठी अशी राजधानीची शहरं. नितांत सुंदर रचना असणारी. कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं अशीच. तेवढीच व्यापारीकरणाची लागण झालेली. सुंदर रचनेच्या उत्तुंग इमारतींनी सजलेली,आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी झकपक.

येथून आम्ही निघालो ते बेल्जियम ची राजधानी ,ब्रुसेल्स च्या दिशेने. तोही आरामदायी बसने.आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत. युरोपातील देश आकाराने आणि लोक संख्येने छोटी छोटी आहेतच. शिवाय अंतराने ही जवळजवळ. दिवसभरात भरपूर प्रवास केला तरीही आपल्याला अजिबात थकायला होत नाही.आल्हाददायक हवामान, भरपूर ताजी हवा,सुबक रस्ते, सुबक म्हणजे खड्डेमुक्त, स्पीडब्रेकर मुक्त, गुळगुळीत, खूपच रुंद रुंद शिवाय गर्दी नाही गोंगाट नाही. हॉर्नचे आवाज तर नगण्यच .मग कशाला माणूस थकून जाईल?

तेथे बसच्या ड्रायव्हरला ‘कोच कॅप्टन’असे संबोधले जाते. हा सुद्धा अगदी चकाचक असतो. त्यांना दिवसभराच्या ड्रायव्हींगचे प्रत्येक देशातील नियमानुसार तास ठरवून दिलेले असतात. शिवाय सहा दिवस ड्रायव्हिंग झाल्यानंतर दोन दिवसाची सुट्टी अपरिहार्य असते.ड्रायव्हरच्या आरोग्याचा विचार आपल्या देशातही याचप्रमाणे झाला, तर दररोज भारंभार अपघाताच्या बातम्या वाचण्या पासून आपली सुटका होऊ शकेल असे वाटते.

जीपीएस च्या सहाय्याने प्रवासाचे सेटिंग करणाऱ्या कोच कॅप्टन सोबत,डाव्या बाजूला असणाऱ्या स्टिअरिंग व्हील बरोबर प्रवासाची सुरुवात होते. आपल्या देशातील रस्ते वाहतुकीच्या अगदी विरोधाभासी, अर्थात सर्वच दृष्टीकोणातून प्रवास करताना मजेशीर तर वाटते. किंबहूणा आपणही प्रवासाचा आनंद भरभरून उपभोगू शकतो हे विशेष.

नेदरलॅंड ला जाता जाता वाटेत बेल्जियम देश लागतो म्हणून ब्रुसेल्स ला भेट देणे.असा प्रकार होता.पण तरीही येथील जगप्रसिद्ध असणाऱ्या तीन ठिकाणी भेट देऊन आम्ही ती डोळ्यात साठवून ठेवणार होतो.

त्यांपैकीच पहिले म्हणजे एक जागतिक कीर्तीचे मोन्यूमेंट,मॅनकिंग पीस स्टॅच्यू. हे बघण्यासाठीची ताणलेली उत्सुकता हा पुतळा बघून पटकन आनंदात बदलली.आणि ‘अरे हे तर शू करणारे छोटे खोडकर बाळ आहे’ हे वाक्य लगेच तोंडातून बाहेर पडले.त्या बालकाच्या खोडकरपणाचे कौतुकही आपल्याच चेहऱ्यावर ओसंडताना जाणवले.आहे की नाही मग जगावेगळा हा पुतळा !

महायुद्धाच्या धुमसत्या निखाऱ्यांमध्ये बेल्जियम राष्ट्र होरपळत असताना या छोट्या बाळाने धुमसणाऱ्या त्या निखाऱ्यांवर शू केली आणि हे निखारे शांत केले.मोठे संकट/ गंडांतर टळले आपल्या राष्ट्रावरचे, या बाळामुळे अशी येथील लोकांची भावना वाढीस लागली. त्याविषयी कृतज्ञता म्हणून हा गोड पुतळा उभा करण्यात आला.

सद्यस्थितीत अगदी गावातच एका बाजूला असणारे हे बालक आज जागतिक कीर्तीचे बनले आहे.पूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत असणाऱ्या या मूळ पुतळ्याला नंतर लोकांनी कित्येक प्रकारच्या वेशभूषा या लाडक्या बाळासाठी प्रेमाने बनवलेल्या आहेत.त्याला दररोज या कपड्यांनी सजवले जाते.

शहराच्या मुख्य भागातून फेरफटका मारत मारत आपण हे बघत असतो. थोडे पुढे गेले की सेरक्लेस नावाचे एक संत होऊन गेले आहेत. या व्यक्तीचा आडवा झोपलेला एक पुतळा आहे.त्या पुतळ्यावरून डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवल्यास, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते .अशी एक श्रद्धा तेथील लोकांची आहे.भारतात असणार्‍या अशा श्रद्धा यरोपियन राष्ट्रातही आहेत हे ऐकून आश्चर्य वाटले.माझा मात्र अशा अंधश्रद्धांवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे स्पर्श न करता दुरुन बघण्यातच मी धन्यता मानली.

युरोपियन राष्ट्रांच्या काही शहरांमध्ये चौकांना खूप महत्त्व आहे. असे चौक सौंदर्यर्पूर्ण पद्धतीने सुशोभीत केलेले दिसून येतात. शहरातील कुठलेही राजकीय सामाजिक स्वरूपातील मुख्य कार्यक्रम चौकातआयोजित करण्याची प्रथा येथे आहे. त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक तेथे जमतात आणि एकत्रितपणे आनंदाच्या, दुःखाच्या किंवा इतर स्वरूपाच्या क्षणांचे जवळून साक्षीदार होतात.आणखी थोडे चालत गेल्यास आपण अशाच एका सुंदर चौकात प्रवेश करतो.ज्याचे नामकरण ग्रॅंड प्लेस’ असे झालेले आहे.

टाऊन हॉल, गिल्ड हाऊसेस अशा टोलेजंग इमारतींनी वेढलेल्या समोरच्या प्रांगणात तयार झालेला चौक खूपच ऐसपैस आहे.इमारती तर वेगवेगळ्या शिल्पांनी पुतळ्यांनी आणि रंगसंगतीने खुपच देखण्या बनवलेल्या आहेत. आपली मान आकाशाला समांतर करत वर बघितले तर आकाशाशी हातमिळवणी करत आहेत त्या, असा भास व्हावा.असा हा सुशोभित चौक,रंगीबेरंगी फुलांनी सजलेला तर असतोच पण प्रसंगानुरूप या चौकात फुलांची सतरंजी बनवली जाते.केवळ कल्पनेनेसुद्धा हे दृश्य डोळ्यांसमोर आणले तरीही आनंद मिळावा असे आहे हे सारे. चालून चालून थकलेल्या शरीराने बेल्जियममधील चॉकलेट्स खरेदी करून त्यावर ताव मारला. त्या दिवशीचा मुक्काम ब्रुसेल्स मध्येच घेत ताजेतवाने होऊन दुसऱ्या दिवशी नेदरलँडच्या दिशेने कूच केली.

युरोपातील वसंत ऋतूमध्ये निघणाऱ्या निसर्गाचे साथी बनत, आम्ही हळूहळू त्या निसर्गाचे विविध आविष्कार बघत त्याच्याशी जास्त जवळीक निर्माण करण्याच्या मार्गावरून चालण्यास एव्हाना सुरुवात केली होती.

बेल्जियम मधून नेदरलँड देशाकडे सुरू झालेला हा प्रवास नजरेला सतत बाहेरच खिळवून ठेवत होता. गव्हामोहरीची शेतं,फिकट निळाईने व्यापून राहिलेल आकाश. मध्येच कुठेतरी पांढरेशुभ्र कापसासारखे ढगांचे पुंजके. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे,नेमक्याच‌ तोडलेल्या ट्यूलिपच्या फुलांची शेती.फारच सुंदर होते हे.

दोन देशांमधील प्रवास असला तरीही दर दोन तासांनी एक पंधरा मिनिटांचा आणि दुसरा चाळीस मिनिटांचा ब्रेक घेणं हा कोच कॅप्टन साठी असणारा नियम प्रवाशांनाही आवश्यकच असायचा.

दोन देशांतील हद्द पार करताना तेथील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोचकॅप्टन एकटाच खाली उतरून दहा मिनिटांत परत यायचा. मला वाटतं गाडीचे कागदपत्र वगैरे दाखवून तो कर भरुन येत असावा.असो.

‌‌आमच्या रस्त्यावर आम्ही एक फोटो स्टॉप घेतला.अॉटोनियम हे त्याचे नाव.

बेल्जियम मध्येच असणारं ऑटोनियम म्हणजे,बेल्जियमची आयकॉनिक बिल्डिंग.काय आकर्षक दिसत होती! ही 120 मीटर उंच असणारी इमारत! पण हिला इमारत का म्हणावे असा संभ्रम पडला मनाला. कुठेही दगड,विटा,सिमेंट यांचा उपयोग नाही.तर स्टेनलेस स्टीलची नऊ अर्धगोलांची एवढी सुंदर रचना बनवली आहे ही. शिवाय आतल्या आत एकमेकांना जोडलेली. एखाद्या मोठ्या आयर्न क्रिस्टल सारखी वाटावी अशी सौंदर्यपूर्ण होती ती!अँड्रू वॉटरकेन या अभियंत्याने ‘५८ एक्सपो’या जागतिक प्रदर्शनासाठी ही इमारत बांधण्याचे डिझाईन तयार केलेले आहे .अशी माहिती मिळाली. आम्ही बाहेरूनच बघितली असली तरीही, आतुन सुध्दा खूप मोठी आणि आकर्षक आहे ही असे समजले.पुन्हा एकदा युरोपियन माणसाच्या तंत्रज्ञानाला सलाम करावासा वाटला. या ठिकाणी भरपूर फोटो काढत कॅमेरात कैद करत आम्ही निघालो रॉटरडॅम नेदरलँड्च्या क्रमांक २ वर असणाऱ्या सर्वात मोठ्या शहराकडे. अर्थातच जगातल्या सर्वात मोठ्या बंदराच्या दिशेने.जेथे विशाल असे ट्यूलिप गार्डन आम्हाला खुणावत होते.

केऊकेनॉफ हे जगातले सर्वात मोठे स्प्रिंग गार्डन.८० एकराच्या मोठ्या जमिनीवर अच्छादलेले.ज्याने ट्यूलिप च्या सात लक्ष जाती व इतर बऱ्याच फुलझाडांना सामावून घेतले आहे. त्यांच्या सोबतीला आकर्षक अशा कृत्रिम निर्झरांची रचना म्हणजे जणू काही,धरित्रीने रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घालत निर्झराची सुरेख शहनाई या निसर्गराजा च्या स्वागतासाठी ठेवली असावी. वेगवेगळ्या थीम नुसार रचना केलेल्या या सुंदर फुलांच्या सानिध्यात अक्षरशः मन हरखून गेल्यास नवल ते काय! आपण मनाने आणि शरीराने सुध्दा स्वैर अशी रपेट मारुन येतो.या नितांत सुंदर बागेत आपले वय विसरुन.

ट्यूलिपचे नानाविध रंग,आकार फुलांची जमिनीपासून असणारी ठराविक उंची आणि तेथे घेतली जाणारी त्याची निगा या सर्व बाबी आपले भान हरपून टाकतात.निसर्गातील वैविध्याची कमाल वाटावी अशी ही गोष्ट. आपल्याला फुलांच्या प्रत्येक रंग व आकार यां बरोबर फोटोमध्ये सोबत करण्याविषयी लुभावते. एवढी अप्रतिम आहे !

अमिताभ रेखा यांच्या सिलसिला मधलं गाणं आठवल्या शिवाय राहील का अशावेळी?पण त्याचं शूटिंग या बागे मध्येे नव्हे तर, ट्यूलिपच्या शेतांमध्ये झाले होते असे समजले. किंबहुना आम्हाला आपल्या काश्मिरमध्ये बघितलेल्या ट्यूलिप गार्डन ची आठवण आवर्जून झाली याठिकाणी.

२२ मार्च ते१३मे या ठराविक काळातच असणाऱ्या या फुलांचा आम्हीही अतिशय हसतमुखाने निरोप घेऊन कृतकृत्यता व्यक्त केली.

नेदरलँड, समुद्राला अक्षरशः बाजूला सारून तयार झालेल्या या राष्ट्राला मागे सारत आम्ही जर्मनीतील कोलोन शहराकडे निघालो. क्रुझमधुन फेरफटका मारत असताना ॲमस्टरड्यमचा इतिहास ऐकायला मजा आली. अथक प्रयत्नांनी तयार केलेला हा देश कृषीप्रधान आहे याचा फार अभिमान वाटला. दुधाचे पदार्थ उत्तम व मुबलक प्रमाणात मिळणारा असा हा देश,आपल्या नागरिकांना देखील भरपूर उंचीचे वरदान देत आहे असे वाटले. कारण येथील नागरिकांची उंची सरासरी सहा फुटांपेक्षा जास्त आहे. हे लक्षात आले होते.

जाता जाता डोकाऊन जावे अशा माफक हेतूने आम्ही जर्मनीच्या कोलोन मध्ये प्रवेश केला.तेथील सर्वात मोठ्या चर्चला भेट दिली.उंचच उंच कॅथॅड्रल समोर आपोआप मान झुकवाविशी वाटते.ख्रिश्चन धर्मातील महत्वाच्या व्यक्तींचे, धर्मगुरूंचे पुर्णाकृती रेखीव शिल्प बघताना आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.

हे चर्च म्हणजे शहराचे आयकॉनिक सिम्बॉलआहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जळत्या सत्तर बॉम्बचा मारा सहन करणाऱ्या या शहराच्या इमारतींवर आजही त्यावेळच्या धुराचे काळे डाग दिसतात. दुसर्‍या महायुद्धात बेचिराख झालेला हाच तो जर्मनी देश,ही आठवण करून देतात.

भाग ४ समाप्त.

क्रमश:

– नंदिनी म.देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..