दो लब्जो की है,
दिल की कहानी,
याद है मोहब्बत,
याद है जवानी.
ये कश्ती वाला,
क्या गा रहा था,
कोई उसे भी,
भी याद आ रहा था.
लाला लाललाला लाला लालाऽ
लाला…
माझ्या वयाच्या साधारण १३,१४ व्या वर्षी अमिताभ व झिनत या जोडीवर चित्रित झालेला हा मुव्ही मी बघितलेला. द ग्रेट गॅम्बलर च्या उपरोक्त गाण्याने रसिकांच्या मनावर गारुड केले होते. कित्येक वर्षांपूर्वी बघितलेल्या या गाण्याचा सीन जशाचा तसा आठवला.या गाण्यातील गंडोला, ज्याला आपण होडी म्हणतो यात आज बसण्याची संधी मिळणार होती. व्हेनिस शहरामध्ये पोहोंचल्या नंतर .
मला वाटतं या शहराला याच गाण्यांमुळे, ‘द सिटी ऑफ रोमान्स’असे म्हटले जात असावे. व्हेनिस शहर नव्हे ,आयलँडच (बेट) ते!कारण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले हे शहर. पाण्याला तेवढ्यापुरते बाजूला सारत या शहराची वस्ती उभी राहिली असणार,यावर पूर्ण विश्वास बसतो. शहरात प्रवेश करतानाच मुळी,बऱ्याच लोकांना सामावून घेणाऱ्या एका वॉटर बस चा पंधरा मिनिटं प्रवास करावा लागतो. हा प्रवास आपल्याला व्हेनिस आयलॅंड वर घेऊन जातो. तेथून थोडे चालत जाऊन आपण पोहोचतो, गंडोला राईड च्या स्टेशन वर.
येथे पोहोचल्यावर मात्र व्हेनिसला ‘कालव्यांचे शहर’ का म्हणत असावेत? याची प्रचिती येते.तार्किकतेवर घासून मत मांडावयाचे म्हटले, तर पाण्याचे साम्राज्य पुर्विच असावे तेथे. पाण्याला बाजूला सारत शहराची निर्मिती झाली असावी. हे माझे म्हणणे मी मांडलेले आहेच. पण वस्ती झाल्यानंतर आपल्याला आता दिसू लागते ते पाणी कालव्यांच्या रूपात.
येथे दळणवळणासाठी भरपूर होडी वजा गंडोला नामक पाण्यातली वाहनं उपलब्ध आहेत.शिवाय पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेच. या गंडोला मध्ये राईड करून किमान प्रत्येक भारतीय स्वतःला अमिताभ आणि झिनत या रुपात बघत असणार. यात वादच नाही. सुरुवातीला वाॅटर बस मधून स्वच्छ दिसणारे पाणी,गंडोला चा प्रवास चालू झाला की, काहीच वेळात ती जेव्हा शहराच्या आतल्या भागात जाऊ लागते, त्यावेळी अतिशय अस्वच्छ दिसते. किंबहुना,आपण का करतोय ही राईड?असा प्रश्न पडून अंतर्मुख व्हायला होते. या भागातील पूर्वीची रहाती घरं आता हॉटेल्स मध्ये रूपांतरीत केलेली आहेत.तेथील सांडपाण्याची व्यवस्था याच वाहत्या पाण्यात सोडलेली आहे हे जेंव्हा आपल्याला लक्षात येते, तेव्हा आपण नाल्यांतून फिरत आहोत असा भास होतो.त्यामुळे ‘दुरून डोंगर साजरे’या म्हणीमध्ये चपखल बसेल अशी ही राईड आहे.
लंडन पासून ईन्सब्रूक पर्यंत बघितलेल्या अनुभवलेल्या स्वच्छतेचे, इटलीमध्ये आल्यानंतर विसर्जन झाले किंवा काय अशी शंका मनात येते.आपण भारताच्या जवळ जात आहोत, हे पण लक्षात येते. इटलीतील अस्वच्छते मुळे.
गंडोला मधून दिसणारा शहराचा लूक मात्र छान आहे.वाहत्या पाण्यातील हे शहर दुरुनच बघावयास मजा येते.
राईड संपवून तेथेच आसपास असणाऱ्या,ग्लास फॅक्ट्री ला आपण भेट देतो. येथे उच्च तापमानावर द्रवरूप काचेला आकार देत विविध प्रकारची काचेची उपकरणे, प्राणी,मोठमोठे फ्लॉवर पॉट, वगैरे वस्तू बनवताना आपल्याला प्रत्यक्ष बघता येते. हे बघत असताना आपल्याकडच्या मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभारी कलेची मात्र आवर्जून आठवण होतेच.चकाकणारी रंगीबेरंगी पानाफुलांच्या डिझाईन्स ने बनवलेल्या वस्तू खूपच महागड्या.केवळ विंडो शॉपिंगचा आनंद घ्यावा.
व्हेनिस मध्ये मर्यादित आकारमानाची जमिनीची उपलब्धता आहे. म्हणून गर्दीही भरपूर असते. येथे आपण ओरिएंटेशन टूर ज्या वेळी करतो त्यावेळी,अति उत्कृष्ट नमुन्यांची बांधकामं आपल्याला बघावयास मिळतात.खरोखरच अचंबित व्हायला होते.
सेंट मार्क्स स्क्वायर मध्ये तर तिन्ही बाजूंनी प्रचंड संख्येने आर्चस् असणाऱ्या व इमारतींवर माणसांचे मोठेच मोठे पुतळे असणाऱ्या लांबच लांब वास्तू बघून डोळे विस्फारायला होतात. बॅसिलिका चर्च ची वास्तु प्रचंड मोठी. बांधकाम कलेचा सुंदर नमुना आहे.याच ठिकाणी,सुर्य,चंद्राच्या भ्रमणाच्या गतीवर आधारित घड्याळ व बारा राशी यांमधील गणित एका प्राचीन ईमारतीवर कोरलेले आहे.
इटालीत प्रवेश केल्यानंतर या देशांना समृद्ध इतिहास असल्याच्या खुणा ठिक ठिकाणी दिसू लागतात.प्रवेश घेण्यापूर्वीच आम्हाला सुशांतने येथील गर्दी तसेच पॉकेट मारीची दाट शक्यता असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे जवळचे पैसे, पासपोर्ट सांभाळण्याकडे आपोआपच लक्ष केंद्रित व्हायचे. गोरे गोमटे लोक सुद्धा चोर असतात, हे ऐकून आश्चर्य वाटले.
इटली मध्ये आणखी एक वेगळेपण जाणवले ते सॅनिटरी सिस्टीम मध्ये! टॉयलेट मधील दोन कमोड्सची असणारी पध्दत सुरुवातीला आपल्याला चक्रावून टाकते. तसेच वाॅश बेसिनच्या पाण्याची तोटी चालू बंद करण्यासाठी, आपल्याकडे चार चाकी गाड्यांना जसा क्लच असतो, तसा पायाने चालू बंद करण्याचा क्लच बघून गंमत वाटली. डेंटिस्टच्या पेशंट तपासावयाच्या खुर्चीला अशी पद्धत उपयोगात आणली जाते. हे लगेच लक्षात आले.अशा पद्धतीने कालव्यांच्या शहरात बराच वेळ घालवत, आइस्क्रीमचा आस्वाद घेत पुन्हा वाॅटर बसने आम्ही आमच्या बसथांब्याजवळ जाऊन मुक्कामासाठी पाडोवा येथे आलो.
हे शहर, येथील हॉटेल जरी चांगले होते, तरी इतर ठिकाणी डिनर किंवा ब्रेक फास्ट ची जशी व्यवस्था होती तशी काही या देशात कुठेच मिळाली नाही, हेच खरे.
सकाळी काहीतरी खाऊन ब्रेकफास्टचा अनुभव घेतला, आणि पिसा या ठिकाणी जावयास निघालो. रस्त्यात फेरारी गाड्यांच्या म्यूझियम ला भेट दिली.सचिन तेंडुलकरला बक्षीस मिळालेल्या फेरारी गाडी विषयी ऐकले होते.पण या अतिसुंदर म्युझियमला भेट देऊन, १९५९ सालापासून ते, २०१५ सालापर्यंतच्या गाड्यांचे सर्व मॉडेल्स अगदी जवळून बघितले.आवडलेल्या गाड्यांबरोबर फोटो शूटिंग करण्याची हौस भागवून घेतली. ‘दुधाची तहान ताकावर’ म्हणतात तसेच.
इटलीतील आणखी काही आकर्षणं बघण्यासाठी येथील लहरी निसर्गाबरोबर पिसा येथे प्रयाण केले. युरोपात आत्तापर्यंत वाजली नाही, तेवढी थंडी, गार हवेच्या रुपांत आम्हाला येथे जाणवत होती. शिवाय मधेच उन्हाचे चटके तर अचानक पावसाच्या सरी, असा अनुभव. आणि निसर्गाचा लहरीपणा येथे जास्त दिसून आला.
तुलनेने इतर देशांपेक्षा इटलीत अस्वच्छता दिसून आली. याचा मी आवर्जून उल्लेख केला.पण बाकी युरोपात राखली जाणारी स्वच्छता, वाखाणण्याजोगीच.ठिक ठिकाणी डस्टबिन्स. रस्त्यांवर तुम्हाला जराही धूळ, कचरा नावालाही सापडणार नाही. टॉयलेट्स बाथरूम्स अगदी सार्वजनिक ठिकाणची सुध्दा आरशासारखी चकचकीत. पेपर नॅपकिन्स ची मुबलकता. त्यामूळे युरोपात फिरताना स्वच्छता गृह म्हणजे आल्हाददायक अनुभव होता. बऱ्याच ठिकाणी वॉशरुम वापरावयास खिशाला चाट बसायची. पण असे असतानाही टॉयलेट्स मध्ये कमोड स्प्रे ची व्यवस्था न ठेवता,टिश्यू पेपर्स वर एवढा खर्च का केला जातो?हे कोडे काही सुटत नाही. पाण्याची कमी असावी हे पुष्टी देणारे कारण अजिबातच नाही यासाठी. पण ही आपल्याला अजिबात पचनी न पडणारे गोष्ट आहे. हे अगदी खरे.
भाग ९ समाप्त
क्रमश:
© नंदिनी म. देशपांडे.
Leave a Reply