नवीन लेखन...

मला देव दिसला – भाग १

बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विरोध न करता गृहण करणे, आत्मसात करणे ही मनाची ठेवण व स्वभाव बनू लागला. अनेक कविता, श्लोक, सूभाषिते ज्यांचा अर्थ त्यावेळी मुळीच कळला नव्हता, ती मुखोलगत करू लागला.  त्यात महान तत्वज्ञान भरलेले आहे. चांगले विचार आहेत. भावनांचे उच्च स्तर आहेत. ईश्वरी श्रध्देचे वर्णन आहे. जीवन कशासाठी व जगायचे कशाकरीता ह्याचा अर्थ भरलेला आहे. हे सारे आम्हास सांगितले गेले. ते आम्ही जसे आहे तसेच पाठांतर करून नियमीत रूपाने व्यक्त करीत होतो, म्हणत होतो. त्यावर फारसे चिंतन केले नव्हते. कित्येक संस्कृत श्लोक मुखोलगत केले व म्हटले गेले ज्याचा आजही अर्थ व्यवस्थित कळत नाही. एक मात्र झाले की सर्वांमधून त्या ईश्वराची महानता, भव्यता, दिव्यता, अथांगपणा, शक्तीसामर्थ ह्या गुणांची प्रचिती येवू लागली. फक्त ओळख पटू लागली. ह्यातच जाणीव निर्माण होवू लागली की त्या दिव्य अशा परमात्म्याला कसे भेटावे, बघावे आणि खऱ्या अर्थाने कसे जगावे.

कौटूंबीक धार्मिक संस्काराचा पगडा मनावर बसत असताना पूजाअर्चा, मंत्र विधींचा प्रभाव पडू लागला. देवघरातील मुर्ती, तसबीरी मनाला आनंद देणाऱ्या वाटू लागल्या. कर्मकांडात मन गुंतू लागले. पूजापाठ, भजन ह्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. धार्मीक पुस्तक संग्रह गोळा करू लागला. पूजा विधी कशी निटनेटकी होईल. ह्याकडे लक्ष केंद्रीत करू लागला. कोणतीही वस्तू वा साधने जर पूजाविधीत कमी पडली तर खंत वाटू लागली. त्याची योजना व काळजी घेतली जायी. समोर असलेल्या मुर्ती व तसबीरीबद्दल ज्ञान मिळण्याची उत्सुकता लागली. माहीतीसाठी अनेक पौराणीक ग्रंथाचे वाचन करू लागलो. अर्थात ते अभ्यासाने म्हणण्यापेक्षा चाळने असावयाचे. प्रचंड धार्मिक पुस्तके वाचली. देवदेवतांची वर्णने, त्यांच्या विषयीच्या अनेक कथा, त्यांची उत्पती अथवा अवतार पावने, प्रासंगीक कथा, शाप-वरदानाच्या गोष्टी   वाचल्या. अनेक संस्था असलेले म्हणजे ३३ कोटी देवांची संख्या असलेले वर्णन, अनेकांची कार्ये व विश्वाची योजना इत्यादी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती वाचता वाचता, संकलन करता करता, मन आनंदून जसे जात असे. त्याचवेळी मनात असंख्य प्रश्नाची गर्दी होवू लागली. कित्येक कथा प्रसंग, वर्णने आणि परिणाम मानव जीवनचक्राला समोर ठेवून केल्याचे भासले. त्यामध्ये थोडीशी भव्यता, दिव्यता प्रदर्शीत होत आहे. मानवी जीवनाचा वरचा स्थर, उच्चता फक्त प्रतीत होत होती. कित्येक प्रसंग वा वर्णने मनाच्या श्रध्येला विचलीत करीत होते. ती अंधश्रध्देच्या दालनात नेवून ठेवीत होते. मनाचा एक प्रकारे कोंडमारा होत असल्याची जाणीव होत होती.

आपलीही एक बुध्दी आहे, विचार करण्याची आपलीपण क्षमता आहे. हे वाटू लागले. एखादा विचार जो वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्याचे मुळ अज्ञात आहे. त्यात बरेच फेर बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो विचार आजच्या घडीला स्थिर झाल्याप्रमाणे भासतो. तो आहे तसाच मान्य करावा का? ह्यामध्ये मन हेलकावे घेवू लागले. तरी आपल्या अभ्यासाच्या मर्यादा जाणल्या. ते पौराणीक चित्र, त्या कथा तशाच मान्य कराव्यात हे मनाने ठरविले. जे पूर्ण पटले, आवडले त्याला श्रध्येने मान्यता दिली. जो भाग विपरीत वाटला, त्यावर भाष्य न करता विचारांच्या दालनातून वेगळा करून दिला.

पौराणीक कथा व कथासार वाचण्यानी मनाच्या धार्मिक वृत्तीना, ईश्वरी सानिध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण इश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ऊँ नमो भगवते वासूदेवायन् महा ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. जय जगदंबेच्या स्वरूपात विश्वाची जगत जननी श्री. अंबामाता तीच्या सिंहरूप वाहन व आयुध्ये यांनी मन प्रसन्न होण्याचा अनुभव आला. श्री. गजानन, श्री. कृष्ण, श्री राम, श्री सुर्यनारायण अशा अनेक भव्य आणि दिव्य देवदेवतांचे प्रतिमामय वर्णनात्मक स्वरूप मनात तरंगु लागले. त्यांची अनेक कार्ये, शक्ती महत्व आणि कृपादृष्टी यांची वर्णने धार्मिक पुस्तक संग्रहामधून होवू लागली. त्याचा मनावर पगडा बसू लागला. सर्वांविषयी श्रध्दा निर्माण होवू लागली.

पुस्तकांच्या ह्या संग्रहामधून पौराणीक जगातून आधूनिक जगामध्ये येवू लागलो. आधूनिक जगाचा ईश्वरी मार्गदर्शनाच्या इच्छेने अभ्यास होवू लागला. थोर संत मंडळी, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज श्री. संत नामदेव  महाराज आणि चरित्रे व कार्य वाचले. ह्यांनी अशाच थोर संत मंडळींनी आपल्या ज्ञानांनी, भक्तीरसांनी आणि विशेष म्हणजे आपल्या उच्चतम मानवी वागणूकींनी जो समाजात आदर्श घालून दिला. भक्तीमार्गाच्या दिशांचे मार्गदर्शन केले ते मनाला खूपच आनंद व समाधान देणारे वाटले. अनेक देवदेवतांचे वर्णन व त्यांचे दिव्यत्व ह्याचे ज्ञान होवू लागले. परमेश्वराचे एक रूप, त्याचे सर्व ठीकाणचे अस्तित्व आणि तो सर्वशक्तीमान असल्याची जाणीव त्यांच्या लेखनातून, अंभगातून तीव्रतेने होवू लागली. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही एका देवाला समर्पीत व्हा, त्याच्यावरच आपली श्रध्दा, भक्ती अर्पण करा, त्याच्या एकाच सगुणरूपामध्येच त्या निर्गुण, निराकार परमात्म्याला बघा. त्या तुमच्या इष्ठ देवामध्येच तुम्ही त्याला जाणू शकाल. तुमचे प्रेम, समर्पण व भक्ती ही शेवटी जी प्रमुख देवता शक्ती असेल तीलाच मिळते. निरनिराळ्या सगुण देवतांच्या वर्णनामुळे चंचल मनाची जी संभ्रमावस्था होत असे तीला बंधन पडले. कोणता देव मोठा, कोणता महान, कोणता कृपावंत वा कोणता आपल्या भक्तीला पावेल ह्या वैचारीक वादळाची शांतता झाल्याचे वाटले. आता भक्ती व समर्पण भावना फक्त एकाच देवाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प मनाने घेतला. माझे गुरू श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे संकल्प मनाने घेतला. श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे मार्गदर्शन झाले. त्यांची पाठ्यपुजाकरून आशिर्वाद घेतले. “तुझ्या कुळाची घराण्याची देवता कोणती?” अर्थात कुलस्वामी वा कुलस्वामिनी श्री. जगदंबा रेणुकादेवी आहे. त्यामुळे त्याच श्री जगदंबेचे सतत चिंतन करणे, तीची सदैव आठवण ठेवणे, तीचे नामस्मरण करणे आणि जी विविध देवता रूप आहेत त्या सर्वाना भक्तीपूर्वक फक्त त्या जगदंबेमध्येच असल्याचे समजणे, तीच्याच रूपांत, नावात सर्व देवतांचे दर्शन झाल्याचे समाधान मनात निर्माण करणे, हा उपदेश मिळाला. वैचारीक व्दिधा परिस्थीती एकदम नाहीशी झाली. माझी इश्वरी संकल्पना जी होती तीचे स्वरूप मी फक्त श्री जगदंबेच्या, फक्त एकाच देवतेमध्ये केद्रींत करू लागलो. तीचेच नामस्मरण व आठवण सतत राहील याची काळजी जाणीवपूर्वक घेवू लागलो. काही काळानंतर जगदंबेच्या नामस्मरणाची इतकी सवय होऊ लागली की इतर कोणत्याही देवतेचे नाव जवळ जवळ विसरले जावून फक्त “जय जगदंब” हेच मनात येवू लागले. कोणत्याही देवाच्या मंदीरामध्ये जर दर्शनाला जाण्याचा योग आला तर त्या देवतेच्या मुर्तीला श्रध्दापूर्वक अभिवादन करताना, त्याचे स्तुती श्लोक म्हणण्याऐवजी फक्त “जय जगदंब” म्हणत मी त्या देवतेच्या ठिकाणी श्री जगदंबाच असल्याची भावना व्यक्त करून नमस्कार करीत असे. असल्या वागण्याची प्रथम प्रथम मनात खंत व शंका येत होती. मन बहकले असावे असे वाटे. समोर श्री गजाजनाची वा  श्री. शंकराची अथवा श्री विष्णूची , रामकृष्ण यांची मूर्ती बघत असताना, त्याना अभिवादन करीत असताना मी मात्र ‘जय जगदंब’ म्हणत असे. त्या त्या देवताना तीच्याच रूपात नमस्कार करीत असे. परंतू माझ्या मनाचा दृढनिश्चय आणि मी केलेला संकल्प मला सतत धीर देत होता.

थोड्याशाच काळानंतर मनाची संभ्रमी अवस्था एकदम नाहीशी झाली आणि माझ्या भक्तीची दिशा व नामस्मरण मी केवळ जय जगदंबेच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी होवू लागलो. त्या जगदंबेचे सततचे नामस्मरण व भक्तीपूर्वक आठवण हा देखील पूजा अर्चाचाच एक भाग असल्याची जाणीव होत होती. ते एक कर्मकांडच होते. जर देव दिसला, भेटला तर कदाचित श्री जगदंबेच्या स्वरूपात असेल ही मनाची पक्की खात्री झाली. परंतू ही सारी जर तर ची भाषा होती, समज होती.

(क्रमशः)

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..