नवीन लेखन...

मला माणूस हवंय

मोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते. फारशी वर्दळ नव्हती. नर्सेस शांतपणे वावरत होत्या. एकूण वातावरण अतिशय शांत व गंभीर होते.

मी ज्या काकांना भेटायला गेले होते त्यांच्या बाजूच्या बेडवर एक वृद्ध बाई होत्या.माझे त्यांच्याकडे लक्ष गेले, तेव्हा त्या मला काहीतरी म्हणत आहेत असे वाटले. त्यांना मी खुणेनेच ‘काय’ असे विचारले. त्यांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. जवळ कोणी नव्हते. त्या मला पुन्हा काहीतरी म्हणाल्या. नीट ऐकू आले नाही म्हणून मी काकांच्या बेडला वळसा घालून त्यांच्या जवळ गेले. मला वाटले त्यांना काही मदत हवी आहे. “काही हवंय का?,” मी विचारले. त्या चिडून म्हणाल्या,” मला माणूस हवंय”. मी चमकले. मला वाटले मी काहीतरी चुकीचे ऐकले. मी परत विचारले “काय हवंय?” त्या पुन्हा म्हणाल्या “मला माणूस हवंय “. मी विचारले, “तुमच्याबरोबरचे कुठे आहेत?” त्यावर चेहऱ्यावर अधिक त्रासिक भाव व आवाजात कडवेपणा आणून त्या म्हणाल्या, “असेल बाहेर कुठेतरी, पण मला ती नको, मला माझं माणूस हवंय.” त्या वातावरणात,त्या क्षणी त्यांचे ते वाक्य मला अगदीच अनपेक्षित होतं. मी विचारले,”काही त्रास होतोय का?” ” खूपच दुखतंय! हे आता बंद करायला सांगा नर्सला ” मशीनकडे बोट करत त्या म्हणाल्या. मी नर्सला बोलावले. ती आली व म्हणाली “आजी! थोडाच वेळ राहिला आहे. शांत रहा बघू!” मग माझ्याकडे वळून म्हणाली की यांच्याबरोबर ज्या आल्या आहेत त्या बाहेर बसल्या आहेत. या सारख्या त्यांच्यामागे डायलिसिस बंद करण्याचा लकडा लावतात व त्यांचा फार राग राग करतात. म्हणून त्या बाहेर थांबल्या आहेत. मग तिच्या बोलवण्यावरून एक तरुण मुलगी आत त्यांच्याजवळ आली, पण तिला पाहताच त्या आजींनी मान फिरवली.

नंतर मला समजले ते असे की त्या बाई एकट्याच असून ती तरुण मुलगी त्यांची केअरटेकर आहे. बाईंची मुलगी अमेरिकेत असते. ट्रीटमेंटचा सर्व खर्च ती पाठवते. बाईंना आठवड्यातून तीनदा डायलिसीस करावे लागते. त्यांनाॲम्ब्युलन्समधून येणे जाणे करावे लागते. त्या स्वतः ऊठबस करू शकत नाहीत.

हे समजल्यावर मला त्यांच्या ‘माणूस हवंय’ या शब्दांमधील आर्तता समजली. त्यांच्या त्राग्याचा अर्थ समजला. तो केवळ शारीरिक त्रास नव्हता त्याला अनेक भावनिक पदर होते. मला समजले की त्यांना नर्स, केअरटेकर असे कोणीच नको होते. कोणीतरी जवळचे, रक्ताचे, अगदी खास असे माणूस हवे होते. आणि दुर्दैवाने त्यांची मुलगी लाखो मैल दूर होती.मला अतिशय हळहळ वाटली.

असे हे केवळ एकच उदाहरण आहे का? अशी हजारो, लाखो माणसे आहेत, जी एकएकटी राहतात. त्यांची मुले परदेशात आहेत, ते सतत येऊ शकत नाहीत, आले तरी जास्त दिवस राहू शकत नाहीत. आई वडिलांच्या आजारपणाचा मोठा खर्च ते उचलतात पण सहवास देऊ शकत नाहीत. असे पाहिले की एकट्या राहणाऱ्या वृद्धांची समाजाला कणव येते व सरसकटपणे परदेशातील मुलांना दोष दिला जातो. काही अपवादही असतील पण त्यांनाही आई-वडिलांची उणीव भासत असेल ही शक्यता विचारात घेतली जात नाही.

शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक महत्त्वाकांक्षा बाळगणे व भौतिक संपन्नता मिळवणे ही सध्याच्या जीवनाची चौकट ठरलेली आहे. ही सामाजिक प्रतिष्ठेची सर्वमान्य प्रतिके ठरली आहेत. आई वडिलांनीच आपल्या मुलांच्या मनावर असे संस्कार केलेले असतात आणि ते मुलांना या वाटेवरून चालण्यास प्रोत्साहन देतात. त्यांचा अभिमान बाळगतात. हे चूक आहे असे अजिबात नाही परंतु कुठेतरी तारतम्य व मर्यादा घालायला हव्यातच. आपल्याला फक्त पैशाची श्रीमंती हवी की मनाचीही हवी ह्याचा विचार होणे ही आता काळाची गरज आहे.

या गोष्टीचे भान सुटले की काळाच्या प्रवाहात अशी एक अशी वेळ अपरिहार्यपणे येते की दोन पिढ्या भौतिक अंतराने दूर होतात. हळूहळू मनानेही दुरावतात. पैसे खर्चून कधीतरी येणे,जाणे, व्हिडिओ कॉल वर बोलणे, भेटवस्तू पाठवणे या प्रतिकात्मक स्तरांवर नात्यांची जवळीक तोलली जाते. दुर्दैव हे आहे की पैसा कितीही ओतला तरी त्याने फक्त सुविधा विकत घेता येतात. भावनांचा ओलावा, जिव्हाळा, प्रेम, ममता या गोष्टी पैशाने विकत मिळत नाहीत. मग अशा वेळी परिस्थितीला शरण जाण्याशिवाय गत्यंतर रहात नाही.

सर्व काही मिळवता येईल परंतु ‘आपलं माणूस’ पैशाने मिळत नाही. मग कधीतरी ‘मला माणूस हवं’ असं म्हणायची वेळ येते.

आराधना कुलकर्णी

Avatar
About सौ. आराधना अनिल कुलकर्णी 1 Article
सेवानिवृत्तजेष्ठ अधिव्याख्याता.कथालेखन व अनुवाद. काही पुस्तके प्रकाशित. वृत्तपत्रीय प्रासंगिक लेख व दै. प्रजपत्र साठी सदर लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..