परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे. श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू लागला आहे. एक सत्य (ONE REALITY) हे सर्वोच्च कारण बनले आहे. यातूनच ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. ही सर्वोच्च जाणीव (Supreme coneiousness) विश्वभर पसरलेली आहे. ही जाणीव हा चैतन्याचा भाग आहे. प्रत्येक निर्मित सजीव वा पदार्थांत सुक्ष्म वा स्थुल भागात एक सत्य जाणीव म्हणून तो सर्वत्र असतो. (Real conciousness)
एक मोठा हार बघा. अनेक फुले, विविध रंगाची, आकारांची, सुवासांची सारी एका दोऱ्याने गुंफून त्याचा हार बनला. सर्वांचा वेगळेपणा कायम ठेवून एकत्र बंदीस्त केले आहे त्या एका दोऱ्याने. हा बाहेरून दिसत नाही परंतू असतो, ते एक सत्य. विश्वामधील सर्व प्रकारच्या पदार्थाना, सजीवांना ह्याच प्रकारे त्या सत्य जाणीवेने भारून टाकलेले आहे. हारातील दोरा निराळा (सर्व गुण धर्माने) व त्यांनी बांधलेली फूले ही देखील निराळी होत. परंतू दोऱ्यामुळेच हाराचे अस्तीत्व दिसते. प्रत्येक सजीव व्यक्तीत देह-मन-बुध्दी ही कार्यांनी स्वतंत्र्य असली तरी त्याच सत्य जाणीवेने चैतन्यमय असते. देह व त्याचे कार्य वेगळे. त्याला मिळणारी उर्जा वेगळी. देह स्वत:च्या गुणधर्मानुसार जीवनचक्राचे कार्य करतो. सत्य जाणीव फक्त उर्जा असते. उर्जेमुळे कार्य होणे निराळे परंतू त्या कार्याच्या गुण-रूपांत, परिणांमात त्या सत्य जाणीवेचा (उर्जेचा) सहभाग नसतो.
जगातील प्रत्येक निर्मित पदार्थाचे वा जीवांचे निरनिराळे गुणधर्म असतात. त्याला अस्तित्वाचा गुणधर्म म्हणतात (Low of being) किंवा त्या वस्तूचा धर्म म्हणतात. ज्याच्यामुळे त्या पदार्थाची ओळख निर्माण होते. ह्यालाच ईश्वरी गुणधर्म, नैसर्गिक गुणधर्म संबोधले गेले आहे. उदा. सूर्य-चंद्रातील प्रकाश, अग्नीमधील दाहकता, पाण्यातील द्रवता, फुलातील सुगंधता, फळातील मधुरता, आकाशातील भव्यता, धबधब्यातील प्रचंडता, पुरुषातील पुरुषत्व, स्त्रीमधील मातृत्व इत्यादी सर्व काही ईश्वरमयच असते. कोणत्याही वस्तूमधील वस्तूओळख हीच परमेश्वराची ओळख समजली गेली आहे.
म्हणून त्याच्या विषयी म्हटले की,
रंग, गंध, रस, स्पर्शात, तुझ्या अस्तित्वाची जाण,
तू लपलास गुणांत, तुला शोधणे कठीण
त्याचे अस्तित्व कोठे तर संपूर्ण विश्वांत, जगांत सूक्ष्मातून व स्थूलांत देखील. ‘जे पिंडी तेच ब्रम्हांडी’.अतिशय सूक्ष्म असलेला बीजाचाच प्रचंड वृक्ष होतो. जे गुणधर्म संपूर्ण वृक्षात दिसून येतात तेच सूक्ष्मतेने त्या बीजात सुप्तावस्थेत असलेले जाणवले. जीवंत प्राण्याचे संपूर्ण गुणधर्म हे सुक्ष्मरीतीने त्याच्याच देह्यातल्या सेल्स वा पेशीत आढळून येतात. सेल्स देहाची प्रतिकृती म्हणून अथवा बीज झाडाची प्रतीकृती म्हणून अस्तित्वात असतात. परमेश्वरी गुणधर्म म्हणतात ते ह्यालाच. अणूमधील प्रचंड उर्जाशक्ती हे परमेश्वराचेच स्वरूप आहे.
जीवनाच्या चाकोरीमधले कित्येक प्रसंग असे येत जातात की जेव्हां त्या निसर्गाच्या भवव्यतेचे, दिव्यतेचे स्वरूप आम्हास जाणवते. आम्ही आनंदी, उल्हासीत होतो. काही क्षण तर आम्ही आम्हाला व सभोवतालच्या जगाला पूर्ण विसरून जातो. रिम-झिम पडणाऱ्या पावसांत दिसणारे नयन मनोहर इंद्रधनुष्य, गारांचा पडणाऱ्या पावसात गारा जमा करताना आनंद, प्रचंड पडणाऱ्या धबधब्याचा लयबध्द आवाज, जमीनीवर वेगाने पडणाऱ्या पाण्याचे उडणारे तुषार , समुद्रकिनारी सुर्यास्ताचे देखावे, समुद्राच्या खडकाळ किनारी आदळणाऱ्या पाण्याच्या लाटा, कोकीळेच्या मधूर ताना, मोराचे पसारा फुलवित थुई-थुई नाचणे, फुलांच्या ताटव्यात उमललेली रंगीबेरंगी फुले, जंगलामध्ये स्वैर बागडणारे वन्य प्राणी, उंच पर्वताच्या रांगा, नदीचे संथ वाहणे, सूर्य किरणांमुळे सोनेरी छटा प्राप्त झालेले निरनिराळ्या आकाराचे चमकणारे ढग. एक नाही अनेक-अनेक प्रसंग तुम्ही त्या अप्रतीम निसर्गाच्या अविष्कारामध्ये आनंदाने एकरूप होतात. विचार करा, कसले हे निसर्गाचं दिव्य स्वरूप. हेच तर तुम्हाला मिळालेले परमेश्वराचे दर्शन नव्हे काय? ह्यालाच (Reality of Consciousness) वा सत्याची जाणीव म्हणतात. तसे बघीतले तर आपणास प्रासंगीक वाटणारी नैसर्गीक भव्यता ही सर्व ठीकाणी आणि सदैव असते. फक्त आपल्या दृष्टीची जागृतता असावी.
बाह्य जगात नैसर्गिक प्रत्येक वस्तूमध्ये शोध घेतला तर तेथेच त्या महान शक्तीची वा परमेश्वराची जाणीव होते. तशीच देहांत वा अतंरमनात देखील ती होते. अनेक विद्वान व्यक्तीने केलेले भाष्य, त्यांचे सुविचार आपल्याला खूप आवडतात. पुष्कळ वेळा प्रत्येकाला अनेक चांगले विचार सुचतात. असे सुविचार आपल्याला खूप आवडतात. त्याचे आश्चर्य व समाधानही वाटते. आपण एवढे ज्ञानी नसून इतके चांगले विचार आपणास कसे सुचले, त्याचे देखील आश्चर्य वाटते. केव्हा कुणाला एखादे काव्य सुचते, त्यात चांगला आशय असतो. कुणी अचानक कथा लिहू लागतो, प्रवास वर्णने करू लागतो, त्याला विचार सुचू लागतात, तो त्याची ज्ञान मर्यादा नसतानाही लेखन करू लागतो. कुणी वाचण्यात रूची घेऊ लागतो. कुणी हाती कुंचली घेवून निरनिरीळे चित्र रंगवितो. त्याला चित्रकलेत आनंद निर्माण होतो. कुणी सुर-ताल-नाद ह्याकडे आपले मन गुंतवितो. मधुर-लयबध्द तान मारताना तो स्वत:ला विसरून जातो. विणकाम असो भरतकाम असो शिवणकाम असो की हस्तकला अथवा इतर कोणतीही कला असो व्यक्ती आपापल्या रूचीनुसार त्यामध्ये स्वत:ला गुंतवून घेतो. ह्या सर्व कला आविष्कारातच त्या परमेश्वराचे अस्तित्व दडलेले असते. नव्हे तेच परमेश्वराचे अंग असून तशी आपल्याला केव्हां केव्हां जाणीव देखील होते. प्रत्येकजण करणारा व्यवसाय म्हणजे काय? प्रथम ज्ञानाच्या सागरातूनच त्यानी त्या संबधीचे ज्ञान घेतलेले असते. व्यवहार म्हणून जीवन चक्र म्हणून ती व्यक्ती त्यात व्यस्त होते.. ह्यात आनंद, समाधान मिळवताना ईश्वरी आविष्काराची जाणीव येवू लागते.
हे सर्व ईश्वरमय आहे हे प्रत्येकजण समजतो. परंतु तरी देखील त्या परमेश्वराच्या दर्शनाची आशा बाळगुन असतो. “तुझे आहे तुजपाशी परी तू जागा विसरलाशी” म्हणतात ते हेच नव्हे का? परमेश्वर अनंत, अविनाशी , सर्वत्र अणूरेणूमध्ये आहे. तो फक्त शक्तीस्वरूप आहे. आपल्या चंचल मनाला, विचाराला त्याच्याशी एकरूप करण्यासाठी सगुण स्वरुपाची संकल्पना असते. दुर्दैवाने प्रत्येकजण फक्त त्या सगुण कल्पीलेल्या आकारातच त्याची दिव्यता जाणवू इच्छितो. स्वत:च्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याची इच्छा बाळगतो. हेच त्याला अपूर्णते मध्येच ठेवणारे असेल. खरा आनंद, समाधान आणि शांतता ह्या पासून तो वंचित राहील. हे सारे विसरून म्हणजे मी हे जे बघतो, विचार करतो, कल्पना बाळगतो, ह्याला बाजूस सारावे लागेल. फक्त जगात आणि देहाच्या आत जो परमेश्वरी आविष्कार म्हणून अनुभवतो (Reality of Conseiousness) हाच तर परमेश्वर आहे. न मागणे, न घेणे, न देणे,फक्त अनुभवणे. जर मीच परमेश्वर असेल तर कोणत्या परमेश्वराकडे मी जावू?
त्या परमेश्वराचे स्वरूप कसे असेल ? हा सर्वसाधारण विचार येत होता. वाचन,मनन आणि चिंतन करीत गेलो. ध्यान धारणेत लक्ष दिले. जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळाले त्याने सर्व प्रश्न तर सुटले नाहीत, परंतु बरेचसे समाधान- आनंद-व शांतता मिळाली.
परमेश्वर अनंत, अविनाशी, संपूर्ण आणि सर्वत्र चराचरामध्ये पसरलेला आहे. त्याचे हे वर्णन सर्वांनी एकमुखाने मानले आहे. त्याचे स्वरूप आकाराने वर्णन केलेले नाही. तो निराकार निर्गुण आहे. जे सगुण रूप वर्णन केले ते केवळ मनाच्या केंद्रीत होण्यासाठीचे लक्ष्य म्हणून. प्रचंड चंचल असलेल्या मनाला एका बिंदूत, ध्येयात वा लक्ष्यात स्थीर करण्यासाठी.
कोणताही पदार्थ सूक्ष्म वा स्थूल स्वरूपात त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त अशा शक्तीसह (उर्जा) असतो. पदार्थ व त्यातील उर्जा हे एकरूप असतात. अवलंबून असतात आणि तरीही स्वतंत्र कार्य व अस्तित्वात असतात. घरामध्ये अनेक उपकरणे जसे दिवे, पंखे, हिटर, मॅक्रोवेव्ह, फ्रिज, ए.सी. टि.व्ही इत्यादी असतात. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. परंतु सर्वांचे कार्य चालते ते त्याच्यातून जाणाऱ्या विजेमुळे. विज ही उर्जाशक्ती आहे. विजेला तीच्या अस्तित्वासाठी पदार्थ अर्थात माध्यम लागते. विज आणि पदार्थ हे एकमेकास पुरक असतात. विज उपकरणांना फक्त शक्ती देते. उपकरणांनी कोणते कार्य करावयाचे हे त्यांचे गुणधर्म होत. जसे हवा, थंडी, गरमी, उजेड, छाया इत्यादी कोणी कोणते कार्य करावे हे त्या कार्याची असलेली शक्ती (उर्जा) ठरवित नसते. परंतु कार्यकारण्यासाठी ती लागते हे सत्य.
मानवी देहांची अशीच संकल्पना आहे. अनेक उपकरणांप्रमाणेच देहांमध्येहही अनेक इंद्रिये आहेत. अवयवे आहेत. प्रत्येकाचे कार्य निराळे, परिणाम निराळा. उपकरणांच्या कार्यासाठी जशी विज वा शक्ती लागते. त्याचप्रमाणे देहाच्या इंद्रियाच्या कार्यासाठी देखील शक्ती (उर्जा) लागते. हीला जीव वा जीवातत्मा म्हटले गेले आहे. स्वतंत्र असून देखील दोन्ही देह आणि जीव हे निराळे. त्यांचे अस्तित्व एकमेकांच्या विना असू शकत नाही.
देह आहे तर जीव व जीवासाठी देह समजले जाते. तरीदेखील जीव वा जीवात्मा हा फक्त शक्ती, उर्जा, चैतन्य
शरीराला देतो. शरीरांनी कोणते कार्य करावयाचे त्याची योजना व परिणाम ह्यासाठी शरीर स्वतंत्र असते. जीवाचा शरीराच्या कार्याशी तसा संबध नसतो.
प्रत्येक मानवाला निसर्गाने जन्मत: अनेक इंद्रिये दिलेली आहेत. ती आपल्यापरी कार्यारत असतात. उदा. मेंदू. एक प्रमुख इंद्रिय. सर्व शरीरावर त्याचा ताबा असतो. मन, बुध्दी हे भाग मेंदूमध्येच. शारीरिक कार्य (physical activities) आणि मानसिक कार्य (psychological activities) ह्यावरचे संपूर्म नियंत्रण मेंदूमार्फतच होत असते. वासना (Desire ) आणि आसक्ती (Attachment)अर्थात दोन्ही एकच म्हणून (synonymous). हे गुणधर्म निसर्गानेच उत्पन्न केलेले आहेत. देहाला ज्या गोष्टीची ओढ ह्याला वासना ( Desire )म्हणतात व देहानी अंतरंगात अनुभवलेल्या गोष्टीची ओढ ह्याला (Attachment) आसक्ती म्हणतात. दोन्हीही गोष्टीचा संबंध मन-बुध्दी अर्थात त्या देहाच्या मेंदू ह्या प्रमुख अवयवाशी येतो. अतंरंग आणि बाह्यरंग ह्यात उत्पन्न होणाऱ्या चेतना मेंदू हा संपर्कात येताच ग्रहण करतो व त्याची साठवणूक करतो. ह्यालाच आम्ही विचारांच्या आठवणी म्हणतो.
कंप्युटरला ज्याप्रमाणे फीड केले जाते त्याप्रमाणे तो सर्व विचारांची फोल्डर वा फाईलमध्ये साठवणूक करतो. कंप्युटरचे कार्य चालण्यास प्रमुख मदत असते ती विजेची. कंप्युटर काय व कसे साठवणूक करतो, कसे कार्य करतो ह्याच्याशी विजेचा संबंध नसतो. देहसुध्दा वासना (वा आसक्ती) ह्यांच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विचारधारे प्रमाणे मेंदुमार्फत कार्य करतो. देहाच्या वा त्यातील इंद्रियाच्या गरजेनुसार वासना उत्पन्न होतात. परंतु मेंदु (अर्थात बुध्दी) ह्या वासनांचे विश्लेषन करून योग्य वा अयोग्य परिणामांचा विचार केला जातो. नंतर इंद्रियामार्फत ते कार्य होते. वासना-आसक्ती हे जरी नैसर्गीक गुणधर्म असले तरी त्याच्या उत्पन्नाचे परिणामाचे मार्गदर्शन बुध्दी अर्थात मेंदू करतो. निसर्गाचे वरदान व योजना आहे की कुणी काय करावे. तुमचा अनुभव, बुध्दी अर्थात conscionsness जागृतता यांत तुमची साथ देते आणि यालाच कार्य म्हणतात. त्यामुळे कर्माचे स्वरूप हा सर्वस्वी बुध्दी वा मेंदूचा अधिकार असतो. जीवात्मा देहाला उर्जा देतो, शक्ती देतो. ज्यामुळे देह कार्य करू शकतो. तो त्या कार्याच्या स्वरूपात व नंतर होणाऱ्या परिणामात (कार्यफळ) संबधीत नसतो. निसर्गाने देहाला त्याच्या इंद्रियाना आंतरबाह्य अनुभव घेणे व कार्य करणे ह्याचे परिपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे.
जीव (जीवात्मा) ज्याला उर्जा म्हणतात तीच त्या परमेश्वराचे अंशात्मक स्वरूप आहे. सर्व विश्व, जगत हे त्याचे भव्य दिव्य स्वरुप आहे. त्याची अंशात्मक अस्थित्वाची जाणीव चराचरामध्ये पसरलेली अनुभवते. कम्पुटरवर काम करताना एक अनुभव आला, ५० फोल्डर्स स्क्रिनवर वेगवेगळे डिस्ल्पे झालेले होते. प्रत्येकाला ऍक्टीव्हेट करून सिलेक्ट केले गेले. प्रत्येक स्वतंत्र्य व वेगळ्याप्रमाणे ऍक्टीव्हेट झाला. कोपऱ्यात एक नवीन एम्टी फोल्डर तयार केलेले होते. त्या ५० फोल्डर्सपैंकी एकाला हलविताच सर्व फोल्डर्स एकमेकांशी बांधले गेलेले जाणवले. एकाला ड्र्याग करून Empty फोल्डरमध्ये टाकताच, सर्व ५० फोल्डर्स त्या नव्या फोल्डरमध्ये टाकले गेले. अशाच प्रकारे सर्व देहांचे जीवात्मे त्या परमात्म्याशी बांधले गेलेले असतात. किंवा परमात्म्याच्या विश्वात पसरलेल्या उर्जारूपी शक्तीमध्येच सर्व पदार्थ सजीव वा निर्जीव वास करतात. सर्व काही एक हेच ते परमेश्वरांचे स्वरूप नव्हे काय? इथे बघणे, जाणणे नव्हे तर फक्त अनुभवने हेच महत्त्वाचे. मला मीच अनुभवने म्हणजेच ते परमेश्वराचे दर्शन होय.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply