मलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो.
मलेरिया डास चावण्याने होतो व अशा डासांपासून विविध पद्धती वापरुन स्वतःचा बचाव कसा करावा याबाबतचे ज्ञान अगदी शाळेतील मुलांपासून सर्वांना असते. परंतु आजही डासाने मानव प्राण्यावर कुरघोडी केली आहे हे सत्य आहे.
१८०० ते १९४० या दरम्यानच्या काळात कलकत्ता व मुंबई हि शहरे म्हणजे मलेरियाची व पर्यायाने डासांची माहेरघरेच समजली जात असत. त्या काळात या शहरात स्थाईक होणाऱ्यांना मलेरिया होणार व त्यातील काहीजण दगावणार हा एक अलिखित नियमच होता. १९५० नंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये विलक्षण घट होत होत अखेरीला १९७० पर्यंत डॉक्टर मंडळींनी मलेरिया हा इतिहास जमा केला होता. परिस्थिती इतकी सुधारली होती की वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मायक्रोस्कोप खाली रक्तातील परोपजीवींना दाखविणे ही साधी गोष्टही दुरापास्त झाली होती.परंतु १९८० ते ८५ सालानंतर मलेरियाचे पुनरागमन होऊन लवकरच डासांनी भारतभर भक्कम पाय रोवले. एक क्षुद्र मच्छर तो काय परंतु आता लिटल ड्रॅक्युलाज बनत गेला व त्याने सर्व भारतवासीयांना सळो की पळो करून सोडले.
वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर |
यमस्तु हरति प्राणान् वैद्य:प्राणान धनानिच ||
या संस्कृत उक्तीच्या धर्तीवर आज डासाला उद्देशून असे म्हणण्याची वेळ आली आहे….
मशकदेव नमस्तुभ्यं यमराज सहचर |
यमस्तु हरति प्राणान् त्वं प्राणान् स्वास्थं च शोषितम् ||
यमराजाच्या सोबती असलेल्या हे डासदेवा, तुला माझा नमस्कार. ( अगदी कोपरापासून दोन्ही हात जोडून नमस्कार )
यम केवळ प्राणच घेतो, तू मात्र शरीराचे स्वास्थ्य, रक्त आणि प्राणही घेतोस. (याबाबतीत तू तर यमदेवाच्या वरचढ आहेस. )
डास हा मलेरियाच्या परोपजीवांचे प्रतिक्षालय आहे, असे असूनही ना त्याला ताप येतो, ना त्याचे मरण मलेरियामुळे होते. नोबेल पारितोषिक मिळविणारे इंग्लंडचे भूतपूर्व पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी इतिहासाचा शोध घेतल्याशिवाय भविष्याचा शोध घेता येत नाही असे भाष्य करून इतिहासाचे महत्त्व सांगितले आहे. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करताना त्याबाबत सर्वांगीण दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागतो. आज बहुतेक प्रगत राष्ट्रांनी काही विकसनशील देशांनी या अभ्यासाचे भान ठेवून मलेरियाचे उच्चाटन करण्यात ९९ टक्के यश मिळविले आहे, परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की आज भारतातील मलेरियाचे भयानक स्वरूप पाहता फार कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे.
सामान्य वाचकांना मलेरियाचा इतिहास, त्याच्या परोपजीवांचे जीवनचक्र, डास व त्याचे निर्मूलन याबाबतची शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न माझ्या `मलेरिया – कारणे आणि उपाय’ या पुस्तकात केलेला आहे. हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पुस्तक अजिबात नसून ढोबळ स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये गुंतागुंतीचे वैद्यकीय विश्लेषण टाळलेले आहे.
याच पुस्तकातल्या काही उतार्यांवर आधारित ही विशेष लेखमाला…
शेवटी प्रबोधनातूनही आशेचा किरण दिसतो. मलेरिया उच्चाटनाचा सुवर्णदिन आपल्या सर्वांच्या आयुष्यात लवकरच उगवावा हीच मनापासून सदिच्छा व ईश्वरचरणी प्रार्थना !
– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply