नवीन लेखन...

मलेरिया – तापाचे अभयत्व विज्ञान ( Immunity )

काही व्यक्तींना निसर्गतःच मलेरिया विरुद्ध अभयत्व प्राप्त होते कारण त्यांच्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींना मलेरियाचे परोपजीवी भेदू शकत नाहीत . एका दृष्टीने हे त्या व्यक्तींना मलेरिया रोगमुक्तीचे मिळालेले वरदानच आहे . परंतु अशा व्यक्तींची संख्या फारच अल्प असते . हे अभयत्व प्रामुख्याने खालील दोन गोष्टींमुळे आढळून येते .

१ ) Duffy Antigen Negativity
२ ) Sickle Cell Trait

१ ) Duffy Antigen :
मनुष्याच्या रक्तातील तांबड्या रक्तपेशींमध्ये ABO रक्तगट प्रणाली असते . तसेच Duffy Antigen ही दुसरी एक प्रणाली सुद्धा असते . नेहमी करण्यात येणाऱ्या रक्तगटाच्या तपासणीत या दुसऱ्या प्रणालीला विचारात घेतले जात नाही . कारण त्याचा दर्जा हा दुय्यम स्वरूपाचा असतो . परंतु Duffy Antigen Receptor for Chemokines ( DARC ) ही तांबड्या रक्तपेशींवरील प्रथिने रक्तपेशींच्या आत शिरण्याकरिता परोपजीवींसाठी दिशा दाखविणारी असतात . त्या प्रथिनाच्या मार्गदर्शनामुळे मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींमध्ये सहजपणे आत शिरतात .

साधारणपणे जगातील बहुसंख्य लोकांच्या तांबड्या रक्तपेशीत हे प्रथिन असते . त्या लोकांना Duffy Positive असे म्हणतात , आणि ह्या कारणामुळेच मलेरियाचे परोपजीवी जास्तीत जास्त लोकांमध्ये सहजतेने प्रवेश करतात .

परंतु मानवी जनुकात जर जन्मत : काही बदल झाले तर अशा व्यक्तींमध्ये Duffy Antigen ( प्रतिजन ) तयार होत नाही . अशा अल्पसंख्य व्यक्तींना Duffy Negative असे संबोधिले जाते अनुभवावरून असे लक्षात आले आहे की याठिकाणी मार्गदर्शक प्रथिनाचा अभाव असल्यामुळे जी व्यक्ती Duffy Negative असते तिच्या रक्तपेशीत Plasmodium Vivax हे मलेरियाचे परोपजीवी शिरूच शकत नाहीत . त्यामुळे अशा लोकांना P. Vivax Resistant म्हणतात.

काही अफ्रिकेतील जमातींमध्ये Duffy Negative लोकांचे प्रमाण जास्त आहे . त्यांच्यात P. Vivax होत नाही . या शोधामुळे P. Vivax कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींत पसरला जातो यावर प्रकाश पडला आहे . P. Vivax वरील प्रथिने व Duffy Antigen प्रथिन यांचे संगनमत कोणत्या पद्धतीने होते याच्या अभ्यासातून लस बनविण्याची दिशा मिळू शकेल .

२ ) Sickle Cell Haemoglobin Trait : ( Hb As )
काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मत : जनुकांच्या एका जोडीमध्ये जर दोष असेल तर Sickle Cell Anaemia हा तांबड्या रक्तपेशींमधील रचनात्मक दोष निर्माण होतो . यामध्ये तांबड्या रक्तपेशी विळ्याच्या आकारासारख्या दिसतात . त्यामध्ये Haemoglobin चे प्रमाण कमी असते परंतु जर जनुकाच्या त्या जोडीमधील फक्त एकामध्येच जन्मत : दोष असेल तर तांबड्या रक्तपेशीत रचनात्मक दोष अंशत : च येतो . अशा व्यक्तींना Sickle Cell Trait Carrier म्हणतात . जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये पुरुष व स्त्री दोघेही Carrier असतील तर तेथे मात्र त्यांच्या मुलांमध्ये Sickle Cell Anaemia हा दोष आढळतो . असे पाहण्यात आले आहे की Sickle Cell Trait ( carrier ) असलेल्या व्यक्तींमध्ये Plasmodium Falciparum चे परोपजीवी तग धरु शकत नाहीत . त्यामुळे त्या लोकांना Falciparum पासून मलेरिया होत नाही .

परंतु ज्या लोकांमध्ये Sickle Cell Anaemia असतो त्यांना Falciparum पासून कोणतेही संरक्षण मिळत नाही . Sickle Cell Anaemia व Sickle Cell trait या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्ती अफ्रिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतात . महाराष्ट्रातील चंद्रपूर व गडचिरोली भागातील आदिवासींमध्ये Sickle Cell Anaemia व Trait चे लोक आढळून आले आहेत .

एकदा मलेरिया झाल्यानंतर त्याच्याविरूद्ध शरीरात तयार होणारी प्रतिबंधकारक शक्ती कायम स्वरूपाची राहत नाही . ( Permanent Immunity ) त्यामुळे एकदा मलेरिया होऊन पूर्णपणे रुग्ण बरा झाला म्हणजे त्याला आता पुन्हा परत कधी मलेरिया होणारच नाही अशी खात्री नसते याउलट बऱ्याच संसर्गजन्य रोगांबाबत असे आढळते की एकदा होऊन गेलेला आजार परत उद्भवतच नाही . अर्थात याला क्वचित अपवादही असू शकतात .

मलेरियाच्या परोपजीवांच्या अनेक अवस्था ( Stages ) असल्याने व त्या प्रत्येक स्थितीमधील प्रतिजने ( Antigen ) वेगवेगळी असल्याने अनेक प्रकारची प्रतिजने रक्तात फिरत असतात . तसेच P. Vivax आणि P. Falciparum या दोनही प्रकारच्या परोपजीवांमधील प्रतिजन क्षमता वेगवेगळी असते . याखेरीज निरनिराळ्या भौगोलिक विभागात असणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांतील प्रतिजनांत असणारा फरक अशा दुहेरी कारणांमुळे त्यांच्या विरुद्ध तयार होणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) रोगप्रतिबंधाला कार्यक्षम ठरत नाहीत . वारंवार वापरल्या गेलेल्या मलेरिया विरुद्धच्या औषधामुळे परोपजीवांच्या जनुकात आता बदल होत आहेत . ( Genetic Mutation ) त्यामुळे प्रतिबंधक शक्ती निर्माण होण्यावर मर्यादा पडत आहे व त्याचबरोबर हे परोपजीवी नेहमी वापरात असलेल्या औषधांना दाद देत नाहीत . ( Drug Resistant Strains ) या परोपजीवांच्या वाढीचे प्रमाण जबरदस्त असल्याने एका रुग्णातून दुसऱ्या निरोगी व्यक्तीत ते सहजरित्या पसरतात .

कही वेळा मात्र एखाद्या रुग्णास वारंवर एकाच तऱ्हेच्या परोपजीवांमुळे मलेरिया झाला तर काही महिन्यांनंतर त्यांच्यात प्रतिबंधकारक शक्तीची पातळी चांगली वाढते . परिणामी त्यांच्या रक्तात पुन्हा परोपजीवी आढळले तरी त्यांच्यात तापाचे प्रमाण फारच कमी असते . व या तापाबरोबर येणारी दुसरी काहीही लक्षणे दिसत नाहीत . थोडक्यात त्यांच्या शरीरात त्याच पध्दतीच्या ( Type ) परोपजीवांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते . उदाहरणार्थ – वारंवार P.Vivax होण्याने त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते परंतु तरीही P. Falciparum विरुद्ध ही क्षमता उपयोगास येत नाही . थोडक्यात अभयत्व एकाच गटाविरुद्ध मिळते .

माणसात होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांना फक्त मानवाचाच घरोबा आवडतो . ते दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात तग धरूच शकत नाहीत . त्यामुळे माणसातून माणसाकडे असा त्या परोपजीवांचा प्रवास विनासायास अखंडपणे चालू राहतो व त्यातही लहान मुलांच्या शरीरात मोठ्यांपेक्षा हे परोपजीवी अधिक काळ ठाण मांडून बसत असल्याने मुलांमध्ये मलेरियाचा रोग जास्त रेंगाळतो .

जगप्रसिद्ध शिकारी जिम कार्बेट याचे भारतात जवळजवळ ६० वर्षे वास्तव्य होते . उत्तर भारतातील बऱ्याच जंगलात पायी फिरत त्याने जंगलांचा सखोल अभ्यास व अनेक प्राणी पक्षांच्या शिकारीही केल्या होत्या . या काळात निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे त्याच्या हाताची स्थिरता कमी झाली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीटपणे सावजावर रोखण्यात त्याला अडचण येत असे . परंतु हळूहळू त्यावर जिम कार्बेटने मात केली होती . डासांचा प्रताप अशा या जगन्मान्य मोठ्या नावाजलेल्या शिकाऱ्यासही भोगावा लागला होता . तो लिहितो , ” बऱ्याच जंगलातल्या निरनिराळ्या प्रकारच्या मलेरियाच्या संसर्गामुळे माझ्या हाताची स्थिरता गेली होती . त्यामुळे शिकार करताना बंदूक नीट रोखण्यात काही वेळा अडचण येत असे पण हळूहळू मी त्यावर मात केली होती ” . – जिम कार्बेट – जंगल लोअर काळ १९४०

केस नंबर ५

श्री . श्रीपाद कुळकर्णी वय वर्षे ८२ , उत्तम तब्येत , मोठा असा कोणताही आजार गेल्या चाळीस वर्षांत त्यांना झालेला नव्हता . गेले काही दिवस म्हणजे जवळजवळ १५ दिवस अजिबात भूक लागत नव्हती . थकवा बराच आला होता , परंतु अंगात ताप नव्हता . थोडीसुद्धा कणकण जाणवत नव्हती . सहज म्हणून केल्या गेलेल्या रक्ताच्या तपासणीत हिमोग्लोबिन फक्त 4.5gm % व P.Vivax चे परोपजीवी सापडले . कोणतीही मलेरियाची लक्षणे नव्हती . असे असूनही मलेरिया विरुद्धच्या औषधांचा पूर्ण कोर्स व त्यासोबत ताकद येण्यासाठी दिली जाणारी इन्जेक्शने दिल्यावर १५ दिवसात तब्येत पूर्ववत झाली . श्रीपादरावांच्या शरीराचे अभयत्व चांगले असावे ज्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसली नाहीत , परंतु त्यांच्या बाबतीत अॅनेमिया मुळे रोगाचे निदान झाले.

–डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..