जगातील १० ९ देशांमध्ये मलेरिया नियमितपणे आढळतो . २००७ सालच्या आकडेवारीप्रमाणे ३४.७ कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती . त्यातील ८० टक्के रुग्ण अफ्रिका खंडातील होते . उर्वरित रुग्णात ८० टक्के रोगी हे भारत म्यानमार , पाकिस्तान , बांगला देश , इंडोनेशिया या देशात आढळून आले . जगभरात ९ कोटी लोकांचा मृत्यू मलेरियाने झाला . नेहमीच अशी आकडेवारी फक्त नोंद झालेल्या रोग्यांचीच असल्याने खऱ्या संख्येचा अंदाज येत नाही .
मलेरिया – निर्मूलनाच्या डावपेचांची आखणी मुख्य तीन घटक विचारात घेऊन करावी लागते .
अ ) मलेरियाच्या परोपजीवांचा माणूस हा मुख्य बळी आहे . अशा वेळी रुग्णाला पूर्णपणे गरज असलेली सर्व तऱ्हेची औषधे देऊन रोगमुक्त करणे हे पहिले कार्य होय . त्याचबरोबर ज्यांना मलेरिया झालेला नाही त्यांचे या रोगापासून पूर्णपणे संरक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे परंतु अतिशय कठीण काम आहे .
ब ) परोपजीवांच्या Asexual व Sexual अशा दोनही अवस्थांचा समूळ नायनाट होणे आवश्यक आहे . असे केल्यास डासांच्या शरीरात शिरण्यास ते शिल्लक उरणार नाहीत . याकरिता पूर्ण औषधोपचार होण्याची आवश्यकता आहे . अर्ध्यावर मधेच औषधे सोडणे अतिशय घातक आहे . त्यातच औषधे निकामी ठरविण्याची त्यांची प्रवृत्ती दर दशकागणिक एकेका औषधांच्या गटांबरोबर नियमितपणे चालत आलेली आहे .
क ) डास ( मलेरियाचे मुख्य वाहक ) त्याची अंडी , अळी , पुपा ( कोश ) यांचा संपूर्ण नायनाट विविध पद्धतीने करणे व डासांनी माणसाला चावण्याचे मार्ग विविध उपायांनी बंद करणे हे मलेरिया निर्मूलनाच्या कामातील दोन अतिमहत्त्वाचे घटक आहेत .
प्राचीन रोमन , इजिप्शियन इतिहासात तसेच राणी क्लिओपात्राच्या महालातील अंतपुराच्या वर्णनात मच्छरदाणीचा उल्लेख , इतकेच नव्हे तर नेपोलियन युद्धावर जाताना तंबूमधील सामानात आढळलेल्या मच्छरदाण्या यावरून हे सर्व डासांच्या विरोधात असल्याचे सूचित होते
डासांच्या चावण्यापासून पूर्णपणे सुटकेचा सर्वात उत्तम व खात्रीचा उपाय म्हणजे मच्छर दाणीत ३६५ दिवस झोपणे हाच आहे . World Health Organization ने मच्छरदाणी वापरणे यास पहिल्या नंबरचा उपाय म्हणून घोषित केलेले आहे . काही मच्छरदाण्या कीटकनाशक द्रावाचा फवारा मारूनच तयार केल्या जातात . आजकाल प्रवासात घडी मोडून नेता येणाऱ्या मच्छरदाण्याही मिळतात . उदा . बर्गे यामिनी या कंपनीच्या बनविलेल्या मच्छरदाण्या होय . मच्छरदाणीतून बाहेर पडताना कोणतीही फट न राहाणे आवश्यक असते . तसेच कोठेही फाटून भोक नाही याची खबरदारी घ्यावी . जेवढी जाळी बारीक व पक्की तेवढा डासाला प्रतिबंध अधिक , मच्छरदाणीत झोपण्याची सवय करणे म्हणजे तसे पाहू गेल्यास दिव्यच असते परंतु त्याला तरणोपाय नाही . मच्छरदाणीचा उपयोग दुहेरी पद्धतीने होतो . यामुळे मूलत : मादी डासाला मनुष्याचे रक्त शोषण्यास मिळत नाही व हे मुख्य अन्नच न मिळाल्याने मादी डासाकडून अंडी टाकण्याची प्रक्रियाच थांबते व अर्थात त्यामुळे डासांची प्रजोत्पत्तीच खुंटल्याने त्यांच्या संख्येत प्रचंड घट होते . दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे मलेरियाच्या रुग्णाचे रक्त डासांना न मिळाल्याने मलेरियाचे परोपजीवी डासाच्या शरीरात शिरू शकत नाहीत . त्यामुळे परोपजीवांच्या जीवनचक्राला खीळ बसते .
मादी डासाची अंडी तुंबलेल्या पाणथळीत सर्वात जास्त प्रमाणात असतात . अशी साचलेली डबकी बनण्याची अनेक कारणे आहेत . फुटक्या काचेच्या बाटल्या , प्लॅस्टिकच्या बाटल्या व पिशव्या , मोटारी व दुचाकींचे टाकून दिलेले रबरी टायर्स अशा अनेक माध्यमातून पाण्याची डबकी तयार होतात . परंतु ह्याबरोबरच आज शहरांत तयार झालेली डासांची आगरे मुख्यत : नवीन टॉवर्सची बांधकामे , मेट्रो रेल्वे , वॉक वे ची कामे , उड्डाणपूल बांधकामे ह्या जागा आहेत . स्लॅब टाकताना , सिमेंट क्युरींग करताना २ ते ३ आठवडे साठविले जाणारे पाणी , उंच टॉवर्सच्या बांधकामापूर्वी खोलपर्यंत पायासाठी होणारी खोदाई ( जणु तो गढूळ पाण्याचा तलावच असतो ) या सर्व गोष्टींमुळे डासांसाठी जागोजागी उत्तम वसतीस्थानेच तयार होतात . या सर्व कामांच्या ठिकाणी काम करणारा मजूर वर्ग अतिशय गरीब , कुपोषणाने ग्रासलेला व बरेच मजूर हे बाहेरील प्रदेशातून आलेले असतात . जेथे मलेरियाने कायमचे ठाण मांडलेलेच असते . त्यातील बऱ्याच मजूरांना मलेरिया हा रोग आधी झालेला असतानाच कामाकरिता ते शहरात आलेले असतात . त्यातही कामाकरिता लागणारे पाणी अशा जुन्या विहिरीतून घेतलेले असते ज्यामधील पाण्यात डासांचे कायमचे वास्तव्य असते . त्यामुळे अशा बांधकामांच्या जागांमुळे हे डास व मलेरियाचे परोपजीवी या दोघांचा प्रसाद अखंडपणे शहरवासियांना मिळत असतो . या सर्व समस्येवर युद्ध पातळीवर योजना आखणे
आवश्यक आहे . पावसाळ्यात ही परिस्थिती जास्त गंभीर असते परंतु वर्षभर मलेरिया चालूच असतो . कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे बिल्डर्स दुर्दैवाने या समस्येकडे गांभिर्याने लक्ष देत नाहीत व हवालदील झालेले शहरवासी मुकाट्याने मलेरिया विरुद्ध लढत असतात .
सर्व इमारतींच्या बाहेरील बाजूस पाण्याचा निचरा होण्याकरिता उत्तम बांधकाम योजनेची गरज आहे . घराच्या सर्व खिडक्या व दारांना उत्तम बारीक जाळी लावून घेणे हा एकमेव उपाय आहे . याबाबतचा कायदा प्रथम अमेरिकन बिल्डर असोसिओशनवर जारी करण्यात आला होता व तो देशभर कसोशीने पाळला गेला आहे . डास घरात शिरण्याच्या वेळा संध्याकाळी ५ ते ७ व पहाटे ४ ते ६ अशा आहेत . त्यावेळात घरात शिरलेले डास लपून राहून केव्हाही चावण्यास तत्पर असतात . तेव्हा यावर बारीक जाळी लावणे हा एकमेव ठाम उपाय आहे .
पाण्यातील विरघळलेल्या विविध क्षारांच्या प्रमाणावर डासांची अंडी वाढणे वा वाढ रोखणे अवलंबून असते . पाण्यात मीठाचे प्रमाण जास्त असल्यास डासांची वाढ रोखली जाते . समुद्राचे पाणी ठराविक प्रमाणात डबक्यातील पाण्यात मिसळल्यास डासांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो . याचा उपयोग केरळ राज्यात ‘ कोचिन समुद्र पाणी ‘ वापरून डासांची वाढ रोखण्यासाठी केला गेला आहे .
डास वाढीतील पुढला टप्पा म्हणजे लार्व्हे वा अळी अवस्था यांचा नायनाट Themiphos , Fenthion या रसायनामुळे करता येतो . या रासायनिक द्रव्यामुळे अळ्या गुदमरुन मरण पावतात . काही जातीचे जलप्राणी , जिवाणू ( Bacteria ) विषाणू ( Virus ) यांचा उपयोग अळ्या नष्ट करण्यासाठी करतात . या बाबतचे नवीन शास्त्र विकसित होत आहे . Guppy , Gambusia जातीचे मासे नुकतेच वाढणारे लार्व्हे फस्त करतात . ते त्यांचे आवडीचे खाद्य असल्याने या जातीच्या माशांची वाढ करून ते विविध डबक्यांमध्ये सोडतात . Bacillus spaericus , Bacillus thuringiensis , Mermitid Nematode , Notonecid ( bug ) , Amblyospora ( protozoa ) , Coelomomyces ( Fungus ) Nuclece Polyhedron ( Virus ) , Cyclopoid ( crustacean ) असे हे विविध जलचर , जिवाणू , विषाणू लार्व्हेची वाढ रोखण्यास मदत करतात .
काही गमतीशीर अनुभवांचे किस्से खाली देत आहोत .
सरकारी फतवा व डासांची होणारी वाढ :
कच्छ हा रेताड वाळवंटाचा प्रदेश , तेथे डासांची वाढ अत्यल्प होत असे . शेतीसाठी त्या भागात दिवसा पाणीपुरवठा होत असे . डासांच्या वाढीसाठी तेथे कोणतीच गोष्ट पूरक नव्हती . पुढे विद्युतभार नियमन आले आणि सरकारने दिवसा विद्युतपुरवठा कारखान्यांसाठी व रात्रीला पाण्याचा पुरवठा शेतीला देण्यास सुरवात केली . प्रथम काही महिने शेतकरी रात्र रात्र जागून पाण्याचे नियोजन व्यवस्थित करीत . सरकारच्या धोरणात कोणताच बदल होत नव्हता . शेतकरी रात्रीच्या जागरणांना कंटाळले व त्यांनी शेतात पाणथळी तयार केली . त्यामध्ये रात्रभर पाणी भरुन वाहू लागले . आजूबाजूला चिखल व दलदल सुरू झाली . डासांचे फावले व हा हा म्हणता डासांची प्रजा प्रचंड वाढू लागली . मलेरिया होऊ लागला . एका वीज नियमनाच्या धोरणाने डासांचे मात्र फावले .
एक साधुबाबा खेड्यात रहात . त्यांच्याबद्दल अशी ग्वाही देत असत की ते उघड्यावर , सांडपाण्याजवळ जरी झोपले तरी त्यांना डास कधीही चावत नसत . या साधुबाबांचे अन्न हे विविध तऱ्हेची पाने , त्यांचा रस हेच असे . त्यांच्या शरीरामधून उर्त्सजित होणारे घटक डासांना धोकादायक असल्याने साधुबाबांच्या वाटेला ते जात नसत .
एका लहान मुलांच्या अनाथगृहातील एका विशिष्ट खोलीत राहणाऱ्या मुलांना मलेरिया होत असे . यासंबंधित कारण शोधताना एका जुनाट बाटलीतील पाण्यात पाणवेल ठेवल्याने डासांच्या अळ्या तयार झालेल्या होत्या व त्यातून डासांची फौज तयार होत असे .
डासांचा नायनाट करण्याच्या पद्धती :
डासांचा रासायनिक पद्धतीने नाश करण्याचा ओनामा D.D.T. Dichlorodiphenyltrichloroethane ) या जगप्रसिद्ध कीटकनाशकाच्या शोधापासून सुरू झाला . Paul Hermann Muller यांना १ ९ ४८ सालातील वैद्यकीय शास्त्रातील Physiology विभागाचे नोबेल पारितोषिक D.D.T. संशोधनाकरिता मिळाले होते .
१९४५ साली मलेरिया निर्मूलन हा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून हाती घेणारा व्हेनेझुएला हा जगातील पहिला देश होता . तेव्हापासून जगभर D.D.T. ह्या कीटकनाशकाचा उपयोग डास निर्मूलनाकरिता राष्ट्रीय पातळीवर जोरात सुरू झाला . पहिली पंधरा वर्षे डासांची प्रजा नष्ट करण्यात जबरदस्त यश आले व मलेरियावर मात करण्याचा विजय दृष्टीक्षेपात दिसू लागला . १ ९ ५५ च्या सुमारास D.D.T. ला दाद न देणारे ( Resistant ) डास प्रथम ग्रीसमध्ये आढळले व हळूहळू जगभर ही समस्या उभी राहात गेली . D.D.T. च्या नुसत्या फवाऱ्याने सुद्धा डासांच्या घरात शिरण्याच्या पद्धतीत अडथळा येतो . रसायनाचा थोडा अंश घराच्या भिंतीवर बरेच दिवस टिकतो त्यामुळे डासांनी जरी घरात प्रवेश केला तरी त्यांची मनुष्याला चावण्याची क्षमता नाहिशी होते . याला संपर्क विषबाधा म्हणतात .
डासांना पिटाळून लावणारी विविध रसायने :
१ ) D.D.T. व Pyrethrum यांचे फवारे
२ ) Melethion ( organo phosphorus ) मैदानात , इमारतींच्या बाजूच्या मोकळ्या जागेत पसरविणे
३ ) 30 % Pyrethrum Extract
४ ) Diethyl Tolumide हे ओडोमस मधील मुख्य रसायन
५ ) Citrona मिश्रित मेणबत्या ( सोकिंग कॉईल्स )
६ ) कापराच्या ( Camphor ) वड्या मंदपणे Coil वर जळत ठेवणे . अथवा कापराच्या वड्या गार किंवा कोमट पाण्यात ठेवल्याने त्याचा वास हळूहळू खोलीत पसरतो .
७ ) कांदा फोडून पाण्यात पसरट बशीत खोलीच्या कोपऱ्यात ठेवणे
८ ) Citronella याला डास – वनस्पतीच म्हणतात . त्यापासून तयार केलेली तेल , मलमे अंगाला लावतात .
९ ) Ageratum या वनस्पतीच्या फुलातून निघणारा Coumarin हा द्राव डासांना घातक असल्याने ते या झाडापासून दूर पळतात .
१० ) Deep cantrip , Horsemint या वनस्पती घराच्या बाहेरील अंगणात लावल्यास डास घरात शिरत नाहीत .
११ ) कडुनिंबाची सुकलेली पाने जाळणे .
१२ ) गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांचा धूर करणे .
१३ ) अंगाला लावण्याची तेले युकॅलिप्टस , जर्मेनियम , लवंग , नीम , संत्रे , लिंब यांचा एकत्रित बनविलेला रस , कडुनिंब नारळ वा ऑलिव्ह तेल मिश्रण १ : ४ प्रमाणात बनविणे
१४ ) डबक्यात टाकण्याची रसायने पॅरीस ग्रीन , रॉकेल , कॉपर सल्फेट या सर्व रसायनांचा फवारा छोट्याशा यंत्राद्वारे संपूर्ण मोठ्या गावात करता येतो . फवारणीनंतर काही महिने त्यांचा प्रभाव राहू शकतो त्याला Residual Spraying effect म्हणतात .
१५ ) Bacillus Thuringiensis Variety
Israelensis ( BTI ) हे जंतूपासून निघणारे विषारी द्राव डास निर्मुलनात मुंबई महानगरपालिका वापरण्याच्या विचारात आहे . त्याबाबतची तपासणी हाफकिन इंस्टिट्युट मध्ये चालू आहे . या रसायनाकडे प्रथम डास आकर्षित होतात . नंतर त्यांच्या शरीरात ते रसायन पसरले जाते व ते डास मारले जातात . एकदा मारलेल्या फवाऱ्याचा परिणाम महिनाभर राहू शकेल असा कंपन्यांचा दावा आहे .
या सर्व रासायनिक फवाऱ्यांचे व अंगाला लावल्या जाणाऱ्या मलमांचे , तेलाचे श्वसन संस्था ( खोकला , सर्दी , दम्याचा Attack ) त्वचेवर येणारे पुरळ , लाली या सर्व प्रकारांनी मनुष्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार होणे तितकेच गरजेचे आहे .
डासांना मारण्यासाठी बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या रॅकेटस आलेल्या आहेत . त्याने १०० % डास मरतात परंतु अशा पद्धतीतून किती डास मारले जाणार हाही एक मोठा प्रश्न आहे .
गडद रंगाचे कपडे घालणाऱ्या व्यक्तिकडे तसेच ज्यांच्या घामामध्ये कार्बनडाय ऑक्साईड व लॅक्टिक अॅसिड यांचे प्रमाण जास्त असते अशा लोकांकडे डास हे जास्त प्रमाणात आकर्षित होतात . नैसर्गिक घटकांपासून बनविलेली मलमे लावल्याने डासांना घामामधील रासायनिक द्रव्यांचा सुगावा लागत नाही व पर्यायाने डासांना माणसाचे अस्तित्व जाणवत नाही .
डी.आर.डी.ओ. या संस्थेने मॅक्सो मिलिटरी , मेक्सो सेफ व सॉफ्टवारप अशी मलमे बनविली आहेत . या मलमांचे टिशु पेपर ही उपलब्ध आहेत . डासांना फसविणाऱ्या रेणूंचा यात वापर केला आहे . बऱ्याच मलमांचा सुवास डासांना पिटाळून लावणारा असतो .
मलेरिया नियंत्रण आखणी
सिसिली ( इटाली ) मध्ये २५०० वर्षांपूर्वी तापाची साथ आटोक्यात आणण्यासाठी पाण्याची डबकी बुजविण्याचे यशस्वी प्रयोग करण्यात आले होते . ( मात्र तेव्हा मलेरिया परोपजीवी – माणूस – डास यांच्या संबंधाबाबतचे काहीही ज्ञान नव्हते ) १ ९ व्या शतकात ब्रिटनमध्ये अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम राबविण्यात आले होते . १ ९ ०१ मध्ये लाहोर ( पाकिस्तान ) जवळील मियाँमीर या गावात इंग्रज सरकारने असाच कार्यक्रम राबविला होता . परंतु त्यामध्ये फारसे यश मिळाले नव्हते . पुढे अमेरिका व युरोपियन देशात बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला . सांडपाण्याची व्यवस्था चोख झाली आणि डासांचे निर्मूलन जवळजवळ १०० % यशस्वी झाले व मलेरिया नाहीसा झाला .
१ ९ ५७ मध्ये मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाची महत्त्वाकांक्षी योजना जागतिक आरोग्य संस्थेने आखली परंतु ही योजना अफ्रिका , भारत , श्रीलंका , पाकिस्तान या देशात बऱ्याच अंशी अपयशी ठरली . काही भागांमध्ये तर साथीने थैमान घातले . तेव्हा हा कार्यक्रम वस्तुनिष्ठ असण्याची गरज भासली . यानंतर त्याची आखणी निर्मूलनाऐवजी नियंत्रण अशी करण्यात आली .
मलेरिया हा ऋतूशी निगडीत असून भारतात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान त्याचे प्रमाण सर्वात जास्त असते . १८ ते ३० सेंटीग्रेड तापमानात डासाच्या शरीरात मलेरिया परोपजीवांची व्यवस्थित वाढ होते . अति थंड व अति उष्ण हवामानात मलेरिया होण्याचे प्रमाण कमी होते . वातावरणातील आर्द्रतेचा डासाच्या अपेक्षित आयुष्यमानाशी जवळचा संबंध असतो . सापेक्ष आर्द्रता कमी असल्यास डास जास्त काळ जिवंत राहू शकत नाहीत . आर्द्रता अधिक असल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते व ते जास्त अन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात , म्हणजे ओघानेच जास्त लोकांना चावण्याचा सपाटा सुरू करतात .
साधारणपणे पावसामुळे डासांची पैदास वाढते व त्यामुळे मलेरिया होण्याचे प्रमाण तेव्हा जास्त असते . काही वेळा त्याचे साथीत रूपांतर होते . मात्र धुवाधार पावसात डासांची पैदास करणाऱ्या डबक्यांच्या जागा वाहून गेल्याने मलेरिया पसरविणाऱ्या अॅनॉफेलीस जातीचे डास या विपरीत हवामानात सहसा आढळत नाहीत .
मलेरिया नियंत्रण
१ ) डास निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे . या कामाच्या पाठीमागे सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती व पैशाचे पाठबळ यावरच निर्मूलन किती प्रभावी ठरेल हे सर्वस्वी अवलंबून आहे .
२ ) रोगाचे निदान झाल्यावर लवकरात लवकर योग्य औषधे चालू करणे .
३ ) रक्तामधील निदानाप्रमाणे योग्य औषधाची निवड
४ ) औषधांना दाद न देण्याचे परोपजीवांचे प्रमाण किती आहे यावर रोग आटोक्यात येणे अवलंबून आहे .
५ ) देशा – देशाप्रमाणे माणसांमधील प्रतिबंधकारक शक्तीची पातळी निरनिराळी असल्याने औषधांचा परिणाम सारखाच राहू शकत नाही .
६ ) औषधांच्या किमती ही गरीब देशातील जनतेसमोर गंभीर समस्या आहे . महाग किमतीच्या औषधांचा वापर करणे अशक्य असते व ती न वापरता आल्याने रोग नियंत्रणात आणणे कठीण जाते .
७ ) ज्या प्रदेशात मलेरियाचा प्रादुर्भाव नसतो तेथील प्रवासी संयोगाने मलेरिया ग्रस्त भागात गेल्यास त्याला मलेरिया होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते .
या सर्व मुद्द्यावर सविस्तर चर्चा घडवून जागतिक आरोग्य संघटनेने ( W.H.O. ) मलेरिया निर्मूलन कामासाठी कार्केन पद्धतीची योजना आखलेली आहे . ज्यायोगे जगभर समान धोरण अवलंबिले जावे या दृष्टीकोनातून नियमावलीची आखणी केलेली आहे . यामुळे मलेरिया रोगाचे निर्मूलन शक्य होणार आहे .
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply