मलेरिया (हिवताप) या रोगाचा प्रतिबंध करणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हानच आहे. पावसाळ्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात ॲनोफिलिस डास हे मलेरियाच्या ‘जंतू वाहकाचे’ काम करीत असतात. मलेरिया हा अॅनोफिलीस डासाची मादी चावल्याने पसरणे. सरकारला डासांचे निर्मूलन करण्यात अपयश आले याचा आक्रोश केला जातो; परंतु सरकार बरोबरच डासांची उत्पत्ती रोखायची जबाबदारी आपण सर्वांची आहे. ॲनोफिलीस हा डास स्वच्छ, साठलेल्या पाण्यात अंडी घालतो. अंड्यापासून डास निर्माण व्हायला जवळजवळ ८ ते १० दिवस लागतात. आपल्या घरात व आजूबाजूच्या साठलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते. डासांची उत्पत्ती थांबवायची असेल तर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे.
घरातील पाण्याचे साठे, हौद, रांजण, माठ, टाकी इत्यादी झाकणाने पूर्णपणे बंद ठेवा. यामुळे डासांना अंडी टाकण्यास प्रतिबंध होतो. गच्चीवरील, माळ्यावरील टाक्यासुद्धा घट्ट झाकणाने बंद ठेवा. घरातील साठविलेले पाणी आठवड्यातून एकदा पूर्णपणे काढा. साठवलेले पाणी झाडांना, धुण्या-भांड्यासाठी वापरू शकता. तेवढीच पाण्याची बचत होईल.
फुलदाण्या, कुंडीखाली ठेवलेल्या बशांमध्ये साचलेले पाणी आठवड्यातून काढा. ती साफ कोरडी करा म्हणजे डासांची अंडी नाश पावतात. पाण्याची कारंजी आठवड्यातून एक दिवस बंद करावी. एक दिवस नियमितपणे निश्चित करावा. . यामुळे डासांची अंडी नाश पावतात. पावसाळ्यात पाणी साचेल, अशी कुठलीही वस्तू किंवा भंगार आवारात ठेवू नका. करवंट्या, टायर्स, रंगाचे डबे, रिकाम्या बादल्या, बाटल्या इत्यादींचा नायनाट करणे जरूरीचे आहे. पाण्याच्या टाकीला कोठलेही छिद्र किंवा फट नसावी. पाण्याच्या टाकीला योग्य ती शिडी असल्यास टाकी साफ करायला सोपे जाते, तसेच झाकण व्यवस्थित बसले आहे, की नाही हे पण पाहता येते. विहिरीवर सीमेंट काँक्रीटचे झाकण असणे योग्य. वातानुकूलित यंत्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित विज्ञानं जनहिताय निचरा करा व रेफ्रीजरेटर्स व कुलर्समधील पाणी पण आठवड्यातून एकदा बदला, तसेच पाणवनस्पतीच्या भांड्यातील पाणी बदलावे. पाण्याच्या मोठ्या साठ्यात (विहिरी, कारंजे, डबकी) गप्पी मासे सोडावेत. हे मासे डासांच्या अळ्या खातात. डासांची पैदास थांबवायची असेल तर घर व परिसर स्वच्छता आवश्यक आहे. हे आपले जनतेचे कर्तव्य आहे.
डॉ. दक्षा पंडित
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply