वैद्यकीय शास्त्राने विविध रोगांविरुद्ध लस निर्माण करण्यात गेल्या शतकात अशी गरूड भरारी मारली की ज्यामुळे अनेक रोग आज इतिहासजमा झाले आहेत . प्लेग , देवी , कांजण्या , पोलिओ , घटसर्प , डांग्या खोकला अशा अनेक संसर्गजन्य रोगांवर परिणामकारक लसीची निर्मिती झाली . अर्थात मग मलेरिया या रोगावर लस का नाही हा प्रश्न सामान्य माणसाला कोड्यात टाकतो .
मलेरियाच्या परोपजीवांचे माणसाच्या शरीरात येईपर्यंत व आल्यानंतरही अनेक अवस्थांतून संक्रमण हाते . त्यामुळे मलेरियाच्या रोगासाठी लस एक किंबहुना अनेक पद्धतींनी बनवावी लागेल . तसेच मलेरियाची लस दिल्यानंतर माणसाला त्यापासून कायमचे अभयत्व मिळते किंवा नाही ही महत्त्वाची अडचण आहे . हे सर्व अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न असून त्यावरून सरळ सकारात्मक उत्तर मिळणे हे आजमितीला तरी दुरापास्त दिसते . म्हणून या विषयाची केवळ तोंड ओळखच या प्रकरणात दिली आहे .
लस निर्मितीमध्ये खालील पद्धतीचा अवलंब केला आहे .
१ ) मलेरिया परोपजीवांच्या विविध स्थिति ( Stages ) मधील प्रतिजनांच्या ( Antigens ) सखोल अभ्यासाच्या निष्कर्षातून जवळजवळ ३० वेगवेगळी प्रतिजने विविध पद्धतीने मिसळून त्यांच्या विरुद्ध प्रतिपिंडे ( Antibodies ) निर्माण केली गेली आहेत . ही सर्व प्रतिजने ( P. Falciparum ) पासून तयार केलेली आहेत .
२ ) डासांच्या लाळेमधून माणसाच्या शरीरात शिरणाऱ्या Circumspores वा Sporozoites पासून तयार केलेली प्रथिने ( Proteins ) प्रतिजन म्हणून वापरून त्याविरुद्ध ( CSP Antigen ) प्रतिपिंडे तयार केली गेली . ह्या प्रतिपिंडांची योजना यकृतामध्ये परोपजीवी शिरू शकणार नाहीत व त्यातूनही थोडे ( Sporozoites ) चकवून यकृतात शिरलेच तर त्यांचा नायनाट ही प्रतिपिंडे व शरीरातील अभयत्व देणाऱ्या T. lymphocytes पेशी करतील या भूमिकेतून आखली होती . या प्रयोगातून Sporozoites निकामी ठरल्यानंतर पुढच्या स्थितीतील परोपजीवी निर्माणच होणार नाहीत हा हेतू होता . परंतू या पद्धतीच्या लसीला शरीरातून योग्य प्रतिसाद मिळाला नाही . यामुळे यात नवीन तांत्रिक बदल केले गेले आहेत .
३ ) CSP Antigen व Hepatitis B Virus ( एका पद्धतीचे कावीळीचे विषाणू ) ज्याचा वाहक म्हणून उपयोग करून लस बनविण्यात आली आहे .
४ ) परोपजीवांतील जनुकांमधील DNA , रासायनिक वाहक , आणि T. lymphocytes या तिघांच्या मदतीने प्रतिबंधकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे .
५ ) Pattrraya लशीमध्ये परोपजीवांमधील विविध प्रथिनांचे मिश्रण ( Cocktail ) बनविले आहे ज्यामध्ये 35KD , 55KD , 83KD असे प्रतिजनांचे मुख्य घटक आहेत . या विरुद्ध तयार झालेली प्रतिपिंडे तांबड्या रक्तपेशींभोवती ढालीसारखा पडदा निर्माण करतात ज्यायोगे परोपजीवांना तांबड्या रक्तपेशीत शिरताच येत नाही . या पद्धतीप्रमाणे Glaxo SKF कंपनीने Mosquirix नावाची लस तयार केलेली असून आतापर्यंत याच्या निर्मितीसाठी ३०० दशलक्ष डॉलर्स खर्च झालेला आहे . प्राथमिक प्रयोग अफ्रिकेतील लहान मुलांवर करण्यात येत असून ५५ ते ६० टक्के यश हाती येईल असा कंपनीचा दावा आहे .
६ ) भारतात हैद्राबाद येथील Bharat Biotech मधील शास्रज्ञ डॉ . चेतन चिटणीस यांनी गेली १० वर्षे या विषयावर सखोल संशोधन केलेले आहे . परोपजीवी कोणत्या पद्धतीने तांबड्या रक्तपेशींना भेदतात . या संशोधनावर आधारित ह्या लसीची निर्मिती केलेली असून २०१२ सालापर्यंत ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे . या त्यांच्या बहुमोल कामाबद्दल Infossys या कंपनीने २०१० मधील ५० लाख रुपयांचे विज्ञान पारितोषिक या लस संशोधनासाठी दिले आहे .
७ ) परोपजीवांचा मनुष्य – डास – मनुष्य हा प्रवास खंडित करण्याचे महत्त्वपूर्ण काम लसी मार्फत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू आहे . ह्या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे मलेरिया झालेल्या रुग्णाला ही लस टोचल्यावर त्याचे परिणाम त्याच्या शरीरात न होता , त्या रुग्णाला जे डास चावतील त्यांच्यावर होऊन मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र थांबविण्यात यश मिळेल
लस निर्मितीतील संभाव्य अडचणी अशा आहेत .
१ ) मलेरियाचे परोपजीवी तांबड्या रक्तपेशींवर पोसले जात असताना या परोपजीवांच्या भोवती अतिशय पातळ प्रथिनांचे आवरण निर्माण होते . त्याचप्रमाणे प्रत्येक परोपजीवाच्या आवरणात सूक्ष्म स्वरूपातील रासायनिक विविधता असते . या विविधतेसाठी लागणारा रासायनिक बदल हा परोपजीवांमधील जनुकांमार्फत दिला जातो . या समस्येमुळे एकाच रासायनिक सूत्राचे प्रतिजन बनविणे कठीण असल्याने लस बनविण्यात तांत्रिक अडचणी उत्पन्न होतात .
२ ) प्रतिजनांमधील विविधतेमुळे शरीरात तयार होणारी प्रतिपिंडे तयार होतानाच कमकुवत असतात . त्यांची रक्तातील पातळी कायम न राहता हळूहळू कमी होत जाते व क्षमताही कमी होते .
३ ) परोपजीवांच्या गुणसूत्रात विविध औषधामुळे सतत रासायनिक बदल होत असतो .
४ ) मलेरियाचे परोपजीवी शरीरात वाढत असताना काही वेळा ते एवढ्या मोठ्या संख्येने तयार होतात की औषधांचा मारा तिथे अपुरा पडतो . त्यामुळे त्यांचे उत्पादन पूर्णपणे थांबविण्यात औषधे असफल ठरतात . यामधूनच परोपजीवांची तयार होणारी नवी पिढी औषधांना तर प्रतिसाद देत नाहीच परंतु वापरण्यात येणाऱ्या लसीचा शरीरातील अभयत्वासाठी होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणते .
आजमितीला निसर्गाने परोपजीवांना झुकते माप देत लस निर्मितीच्या कार्यक्रमात अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत .
मलेरियावरील प्रभावी लस निर्मिती – ऑक्टो . २०११
ग्लॅक्सो SKF कंपनीचे प्रमूख वैज्ञानिक डॉ . जो . कोहेन यांनी RIS , S / AS02A या नावाची लस मलेरियासाठी शोधून काढली आहे . या लसीचा उपयोग अफ्रिकेतील ५ ते १७ महिन्यांच्या ६००० बालकांमध्ये करण्यात आला . परिणामी ५७ टक्के बालकांना मलेरियापासून मुक्तता मिळाली व शंभरातील ४७ मुलांना झालेल्या मलेरियाची तीव्रता अतिशय कमी स्वरूपाची आढळली .
अफ्रिका खंडातील बर्कोना , फासो , गॅबॉन , केनिया , मालावी , मोझांबिक , टांझानिया अशा सात देशात अकरा ठिकाणी २ वर्षांच्या कालावधीसाठी चाचण्या घेण्यात आल्या . अशा या चाचण्यांच्या निरीक्षणामधून निघालेल्या सकारात्मक निष्कर्षांमुळे मलेरिया विरुद्ध निघालेली पहिली लस अशी जगन्मान्यता या लसीला मिळाली आहे . दहा वर्षांच्या अथक प्रयत्नातून या लसीचा शोध लावण्यात आल्याने आता मलेरिया निर्मूलनासाठी अंतिम दरवाजा उघडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे . २०१५ सालापर्यंत जगभर ही लस वापरण्यास सुरवात होईल असा ठाम विश्वास डॉ . जो कोहेन यांनी व्यक्त केला . आजपर्यंत कोणत्याही परोपजीवाविरुद्ध लस निर्मिती झालेली नसल्याने जगभरातील मनुष्यप्राण्याला पछाडणाऱ्या मलेरिया या रोगाविरुद्ध लस मिळाल्याचे सांगताना डॉ . कोहेन यांचे डोळे पाणावले होते . पुढच्या टप्यातील चाचणी १५४६० नवजात बालकांमध्ये घेतली जात आहे . तीन वेळा क्रमाने दिल्या जाणाऱ्या या लसीला इतर रोगांसाठी दिल्या जाणाऱ्या लसींसोबत देण्याची योजना आखली गेली आहे . लस शीतपेटीत ठेवण्याची गरज आहे . सर्वात मुख्य समस्या ही लसीच्या किमतीशी निगडीत आहे . जोपर्यंत १०० टक्के यश येत नाही तोपर्यंत देणगी दाते पुढे येण्यास कचरतात . परंतु आजच्या या निष्कर्षांमुळे त्यांचा या कार्यक्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकतेत बदलत आहे , अर्थात हेही नसे थोडके ! उदाहरणार्थ बिल गेट फाउंडेशन सारखी श्रीमंत संस्था या उपक्रमाला मदत देण्याचा गंभीरपणे विचार करीत आहे .
या पार्श्वभूमीवर आमच्या मुंबई शहरातील ही बातमी वाचा .
जुहू गल्ली , मुंबई येथे ३०० मुलांना मलेरियाविरुद्ध लस देण्याची फसवेगिरी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे . अजूनही बाजारात जी लस उपलब्धच नाही अशा लसीचे इन्जेक्शन मुलांना देण्यात आले व सोबत बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रत्येक मुलाला दिले गेले . त्यानंतर कांही मुलांच्या पालकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना ही प्रमाणपत्रे दाखविली व त्यातून हा घोटाळा उघडकीला आला आहे . मुले मलेरियापासून पूर्णपणे मुक्त झाली आहेत अशी पालकांची चुकीची समजूत करून देण्यात आली होती .
– ( Midday या वृत्तपत्रातील १० नोव्हेंबर २०११ मधील बातमी ) A80 खरे तर लस बाजारात येण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील.
–डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply