
काही गोष्टी अजाणत्या वयात देखील मनाला अगदी खूप स्पर्श करतात. त्यावेळी त्या अजिबात समजत नाहीत. मनात मात्र काहीतरी उजळलेलं असतं. पुढे आयुष्यभर मनाच्या गंधगाभाऱ्यात त्या दरवळत राहातात. मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला… स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला …. हे गाणं असंच अगदी लहान असताना ऐकलं. ऐकलं म्हणजे ऐकू आलं. त्यावेळी कोणाकडे काही शुभकार्य असेल तर सकाळपासूनच लाऊड स्पीकर लावायची पद्धत होती. मुलुंड पूर्वेच्या, आमच्या मध्यमवर्गीय नवघर गावात तर खूपच. अशाच एका सकाळी हे गाणं ऐकलं…. त्यातल्या शब्दांनी, स्वरांनी आणि सुरांनी माझ्या बालमनाला जो सुंदर, मंगल स्पर्श केला तो आजतागायत तसाच आहे. त्या नकळत्या वयात जाणवलेली मंगलता आजही तशीच आहे. बाळ कोल्हटकरांच्या व्यासंगी, प्रासादिक लेखणीची आणि पंडित कुमार गंधर्वांच्या दैवी आवाजाची किमया अशी गेली अनेक वर्ष मराठी मनाला पुरेपूर व्यापून आहे.
पुढे जीवनाच्या अनेक गोष्टींना वरवर स्पर्श करत वय वाढत राहिलं. साठ वर्ष काहीना काही बघत, ऐकत, वाचत गेली. तरी संगीत, त्यातही शास्त्रीय संगीत याच्याशी विशेष संबंध, जाण आली नाही. लहान असल्यापासून, काहीही कळत नसलं तरी, उठी उठी गोपाला हे गाणं ऐकत राहावं, असं मात्र वाटायचं. पुढे थोडं मोठं झाल्यावर हे गाणं पं. कुमार गंधर्व यांनी गायलंय हे कळलं. वयाने मोठा होत गेलो तरी संगीतातलं काही फार कळायला लागलं, असं अजिबात झालं नाही. पण या गाण्यातल्या शब्दांची, सुरांची, स्वरांची दिव्यता मात्र वयानुरूप जाणवायला लागली. शास्त्रीय संगीतातल्या बारकाव्यांचा मागोवा न घेता गाणी, बंदिशी ऐकल्या जाऊ लागल्या. मग मात्र कुमारांच्या अनेक बंदिशी आवर्जून ऐकल्या. एखाद्या सुंदर शांत संध्याकाळी, शहरापासून दूर असलेल्या घराच्या अंगणात, प्रशस्त ओसरीत बसून मित्रांसोबत ऐकलेल्या त्यांच्या गाण्यांनी अपार आनंद दिला. अशाच एका तिन्हीसांजेला …त्यांनी गायलेलं जमुना किनारे मेरो गाव आम्ही मित्रांनी ऐकलं आणि शास्त्रीय संगीतातली दिव्यता पुरेपूर जाणवत गेली.
काही वर्षांपूर्वी गाडीने भोपाळला जात होतो. वाटेत देवास आलं. आपसूकच गाडी समोर दिसणाऱ्या टेकडीकडे वळली. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ‘भानुकूल’ जवळ थांबली. कलापिनी ताईंनी, आम्ही पूर्णपणे अनोळखी असूनही, मोठया मनाने आमचं स्वागत केलं. पंडितजींचा झोपाळा बघितला. ते साधना करत असलेली त्यांची प्रसन्न खोली बघितली. खूप मस्त वाटलं. आपण जसं देवाच्या दर्शनाला मनोभावे जातो, तसंच तिथे गेलो. मनोभावे नमस्कार केला. खूप समाधानाने निघालो. कलेच्या दिव्यतेची आणि सामान्य मनाची ती सुंदर अविस्मरणीय भेट होती.
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला ….. स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला हे गाणं अजरामर आहे. सकाळच्या शांत प्रहरी या गाण्याचे सूर ऐकू आले की आजच्या स्वार्थाने पुरेपूर वेढलेल्या प्रचंड कोलाहलात देखील मन क्षणात प्रसन्न, शांत होतं. एक वेगळीच मंगलता मनाला स्पर्श करू लागते. मन खूप मृदू होतं. धुपाचा गंध दरवळायला लागतो. घरापुढची रांगोळी समोर दिसायला लागते. मनावरची सगळी वाईट पुटं, काही क्षणाकरता का होईना, नाहीशी होतात. देवाची मनोभावे पूजा करावीशी वाटते. देसकाराच्या स्वरांमधलं चंदन मनाला वेगळाच सुगंध देत राहतं. मनात खरोखर अरुणोदय होतो. ज्ञानदीप उजळतो.
© प्रकाश पिटकर
9969036619
7506093064
जानेवारी १२, २०२३
…….
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला
पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघें गोधन गेलें यमुनेला
धूप-दीप-नैवेद्य असा हा सदुपचार चालला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला
रांगोळ्यांनीं सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन
सान पाउलीं वाजती पैंजण छुन छुन छुनछुन
कुठें मंदिरीं ऐकूं येते टाळांची किणकिण
एकतानता कुठें लाविते एकतारिची धून
निसर्ग-मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला
राजद्वारीं झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरीं ऋषिमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवी मुरली छान सूर लागला
तरुशिखरावर कोकिलकविनें पंचम स्वर लाविला
स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला
— बाळ कोल्हटकर
संगीत – वसंत देसाई
स्वर – पंडित कुमार गंधर्व
Leave a Reply