नवीन लेखन...

मालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !

Malegaon - The Unreal Story of So Called Hindu Terrorism

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेला हा लेख जनजागरणासाठी शेअर करत आहे. 

जेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार देहलीच्या तिहार कारागृहातून फरार झाला होता. देशभरातील लोकांच्या तोंडी त्याचे नाव होते. चार्ल्स शोभराज हाच तो माणूस ! तिहारच्या रखवालदारांना गुंगी आणणारे काहीतरी खाऊ घालून, हा कैदी सहीसलामत निसटला होता. मग त्याला शोधून काढण्याचे आणि कह्यात घेण्याचे मोठे नाट्य रंगले होते. ज्यांनी त्याला सर्वप्रथम शिताफीने पकडले होते, त्याच एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यावर ही कामगिरी सोपवली गेली. त्याचे नाव होते मधुकर झेंडे ! त्यांनीच मग सापळा लावून शोभराजला गोव्यात अटक केली होती. असा चार्ल्स शोभराज याने केलेले विधान महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, मी ३०-३५ देशांत गुन्हे केले आहेत; पण कुठलेच पोलीस मला गजाआड टाकू शकले नाहीत. भारतातच मी फसलो; कारण येथे खोटे पुरावे बनवण्याची कायदेशीर तरतूद आहे आणि न्यायालयातही खोटे पुरावे खरे सिद्ध करण्याची कायदेशीर मुभा आहे. आज मालेगावच्या स्फोट प्रकरणातून दीर्घकाळ अकारण तुरुंगवास सहन करून मुक्त झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत ऐकल्यावर, मला त्या चार्ल्स शोभराजची आठवण झाली; कारण त्याचाच मुद्दा नव्याने पुढे आलेला आहे. इतकी वर्षे ज्यांना हिंदु आतंकवादी म्हणून गजाआड डांबण्यात आले आणि जामिनाची संधीही नाकारली गेली, त्यांच्या विरोधात कुठले पुरावे होते अन् कशासाठी त्यांना डांबण्यात आले, त्याचा खुलासा कुणीही करत नाही; पण त्यांच्या सुटकेविषयी मात्र अश्रू ढाळले जात आहेत. शरद पवार दीर्घकाळ प्रशासकीय दायित्व पार पाडलेले राजकारणी आहेत आणि त्यांना असे हवेत बोलून भागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची छाननी करण्याची मागणी करूनही त्यांना हात झटकता येणार नाहीत; कारण याला प्रारंभच मुळात पवार यांच्या एका विधानापासून झाला होता.

शरद पवार यांच्या एका विधानाने मालेगाव स्फोटाच्या तपासाची दिशा पालटली !

मालेगावचा स्फोट झाल्यानंतर, अलिबाग येथे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर भरले होते. तेथे त्यांनी मालेगावचा उल्लेख करून एक मत व्यक्त केले होते. कुठेही स्फोट वा घातपात झाल्यावर एकाच धर्माचे लोक पकडले जातात. दुसर्‍या कुणाकडे संशयानेही बघितले जात नाही. ही बाब गंभीर आहे, असे पवार म्हणाले होते. त्यानंतर त्या स्फोटाच्या तपासाची दिशाच बदलून गेली. संशयित म्हणून आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्ने) आधी काही मुसलमान तरुणांना पकडले होते; मात्र पवार बोलले आणि तत्कालीन नवे एटीएस् प्रमुख हेमंत करकरे यांनी नव्या दिशेने तपास चालू केला. त्यात त्यांना मालेगावात हिंदु आतंकवाद्यांनी घातपात केल्याचा शोध लागला. त्यानुसार धरपकड चालू झाली. त्याच संदर्भात पवार यांचे एक विधान आणखी शंकास्पद आहे, शुक्रवारी मुसलमानांचा पवित्र दिवस असतो आणि अशा वेळी कुणी मुसलमान घातपात वा हिंसा करणार नाहीत. थोडक्यात हा सगळा तपास शरद पवार यांच्या एका गृहितावर झालेला होता. ते गृहीत सिद्ध करण्यासाठी पुरावे आणि आरोपी शोधण्याचे कष्ट करकरे यांनी घेतले, असे म्हणता येईल. त्यालाही हरकत असायचे कारण नाही; पण करकरे यांचा तपास योग्य दिशेने चालला होता आणि खरेच आरोपी त्यात पकडलेले होते, तर त्याच्याही आधी ज्या मुसलमान तरुणांना त्याच गुन्ह्यातील आरोपी म्हणून अटक झाली होती, त्यांनाही दीर्घकाळ कोठडीत का डांबून ठेवले होते ? कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंह हेच खरे आरोपी असतील, तर आधी पकडलेल्या मुसलमान तरुणांची विनाविलंब मुक्तता व्हायला हवी होती; पण तसे केव्हाही घडले नाही. एकाच वेळी दोन भिन्न दिशांनी झालेल्या तपासांतील आरोपी गजाआड पडलेले होते. म्हणजे महाराष्ट्र्रातीलच पोलीस मालेगावला मुस्लीम जिहादचा गुन्हा ठरवत होते आणि हिंदु घातपाती म्हणून इतरांनाही गजाआड डांबून ठेवत होते. या विरोधाभासाचे काय ? पवार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मुक्तीविषयी शंका घ्यायला हरकत नाही; पण तसा त्यांना विश्‍वासच असेल, तर आधीच पकडलेल्या मुसलमान तरुणांना विनाकारण कारागृहात ठेवल्याविषयी यापूर्वी ते कधीच का बोलले नाहीत ? करकरे यांचा तपास योग्य दिशेने जाणारा होता, तर आधीच्या चुकलेल्या तपासातील संशयितांच्या सुटकेसाठी पवार यांनी काय केले ?

आरोपींविरुद्ध पुरावे नसल्यानेच मकोकाचा वापर !

शोभराज म्हणतो, तसा सगळा प्रकारच बिनबुडाचा असला, तर दुसरे काय व्हायचे ? पवार यांना अलिबागच्या चिंतन शिबिरात जो साक्षात्कार झाला होता, तेथून मालेगावच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली आणि आरोपीही कह्यात घेतले गेले; पण त्याच साक्षात्काराला खरे ठरवण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे कुठून आणायचे ? ही समस्या होती आणि तिचे उत्तर पवारांपाशी नव्हते कि करकरे यांच्याकडेही नव्हते. म्हणून तर तपास दिशाहीन झाल्यावर आधी मकोका कायद्याचा वापर करण्यात आला. मकोका कायदा हा आतंकवाद्यांसाठी नसून संघटित गुन्हेगारीसाठी बनवला गेला आहे. त्यामध्ये टाडाच्या अनेक तरतुदी आहेत. कुणालाही विनाजामीन दीर्घकाळ आत ठेवायचे असेल, तर मकोका हे उत्तम हत्यार आहे. म्हणूनच कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांना तो लावला गेला. पुरावे सादर करून अटकेवर शिक्कामोर्तब करण्याची मुदत संपत आली असतांना अकस्मात या आरोपींना मकोका लावला गेला. तोच करकरे यांच्या तपासातील सर्वांत दुबळा दुवा आहे. पुरावे असते, तर मकोकाचा आडोसा घ्यावा लागला नसता कि दीर्घकाळ खटला चालवण्यात कालापव्यय करण्याची पळवाट शोधावी लागली नसती; पण तसे करावे लागले; कारण ज्या गोष्टी पवार यांना किंवा राजकारणाच्या चिखलफेकीला पुरावे म्हणून वापरता येतात, त्याच्या आधारे न्यायालये निकाल देत नसतात. तेथे विवेकाच्या आणि न्यायाच्या कसोटीवर टिकणारे पुरावे आवश्यक असतात. त्याचाच दुष्काळ असल्यावर कुठल्या न्यायालयात पवार-करकरे यांचा शोध टिकणार होता ? पुरोहित यांच्या घरात आर्डीएक्स सापडण्यापासून त्यांनी लष्करी छावणीतून ते स्फोटक मिळवल्यापर्यंत तमाम गोष्टी बिनबुडाच्या होत्या. त्या खरोखर असत्या, तर या खटल्याला ७ वर्षे विलंब झाला नसता कि आज पुरावेच नाहीत म्हणायची नामुष्की राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेवर आली नसती. अर्थात् सरकार पालटले असल्याने हे पुरावे होते आणि आता ते पुरावे नष्ट केले, असाही आरोप होऊ शकतो; पण पुरावे होते, तर ते कुणापाशी होते आणि वेळीच न्यायालयात का सादर केले नाहीत, याचेही उत्तर द्यावे लागेल. न्यायालयाच्या कह्यात असलेले पुरावे सरकार नष्ट करू शकणार नाही. मग हे इतके भक्कम पुरावे न्यायालयापासून का लपवून ठेवण्यात आले ? त्याचाही खुलासा व्हायला पाहिजे. केवळ करकरे कसाबकडून मारले गेले म्हणून त्यांनी केलेल्या विधानांना पुरावा मानता येणार नाही. त्यांचे हौतात्म्य ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांनी केलेले काम वेगळी बाब आहे. येथे त्याची गल्लत व्हायचे कारण नाही; पण एकूण मालेगाव प्रकरणाला हिंदु आतंकवाद ठरवण्याचा जो तमाशा मागील साडेसात वर्षे चालला, त्याचा खरेखोटेपणा तपासून बघण्याचीही आवश्यकता आहे.

मकोका कायम राखण्यासाठी आरोपींना अन्य गुन्ह्यांत अडकवले !

हे प्रकरण न्यायालयात गेले आणि मकोका न्यायालयानेच त्या गृहिताला दणका दिला. किमान २ गुन्हे प्रविष्ट असल्याखेरीज मकोका लावता येत नाही, म्हणून कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील मकोका उठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तेव्हा त्यांना विनाविलंब जामीन द्यावा लागला असता म्हणून मकोका कायम राखण्यासाठी पुढली कसरत चालू झाली. त्यासाठी मग या हिंदु आतंकवाद्यांना आणखी कुठल्या गुन्ह्यांत घातपातामध्ये गुंतवता येते, त्याचा शोध चालू झाला. तेव्हा समझौता एक्स्प्रेस, मक्का मशीद स्फोट, अजमेर दर्गा स्फोट अशा एकामागून एक आरोपात हेच आरोपी असल्याचा शोध लावला गेला. त्यातही कुणाला पुराव्याची आवश्यकता भासली नाही. समझौता प्रकरणाचा तर तपास पूर्ण होऊन त्यात सिमीच्या माजी नेत्याने त्याचा गुन्हा मान्य केला होता. तरीही त्याच आरोपपत्रात पुरोहित यांचे नाव घुसडले गेले. त्यामध्ये नुसत्या नावाखेरीज अन्य काही संदर्भ नसल्याचे आता सांगितले जात आहे. इतकी वर्षे समझौता आरोपपत्रात ज्याचे नाव घातले, त्याच्या विरोधातील पुरावा का जोडला गेला नाही ? तीच गोष्ट अजमेर आणि मक्का मशिदीच्या संदर्भातही आहे. नुसती आरोपपत्रात नावे घालायची आणि आरोपांची राळ उडवायची. तपास चालल्याचे दावे करायचे. बाकी शून्य ! आज तपास यंत्रणाच म्हणते की, पोलिसांनीच पुरोहितच्या घरामध्ये आर्डीएक्स दडवून ठेवले होते आणि ते तेथे कुठून आणले, त्याविषयी कुठलीही नेमकी माहिती नाही. लष्करात कुठेही हे स्फोटक वापरले जात नाही आणि पुरोहित यांना तर त्याची माहितीही असण्याचे कारण नाही. पुरोहित यांनीच काहींना घातपाताचे आणि बॉम्ब बनवण्याचे, शस्त्रास्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे; पण पुरोहित हे लष्करी गुप्तचर विभागात काम करत होते आणि त्यांना स्फोटकाचे प्रशिक्षणच दिले जात नाही. मग जो त्यातील काही शिकलाच नाही, तो इतरांना त्याचे प्रशिक्षण कसे देणार ? एकूणच सर्व प्रकरण कपोलकल्पित होता आणि न्यायालयाच्या छाननीत त्याची लक्तरे उघडकीस येऊ नयेत, म्हणून मकोकाचा हत्यारासारखा वापर झाला.

राहुल गांधी आणि सरकारी यंत्रणांचा हिंदुद्वेष !

अर्थात् हे प्रकरण केवळ मालेगावपुरते नव्हते किंवा नसावे. भारतात हिंदु आतंकवाद फोफावतो आहे आणि जिहादींपेक्षा भारताला हिंदूंच्या हिंसक प्रवृत्तीचा धोका मोठा आहे, असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूताशी बोलतांना केले होते. मग त्याला पुष्टी देणारे पुरावे निर्माण करण्याचा उद्योग चालू झाला. त्यातूनच मग कुठल्याही मुसलमान वस्तीतील घातपाताचा किंवा हिंसेचा संदर्भ घेऊन हिंदु आतंकवाद अशी भाषा सेक्युलर माध्यमांतून चालू झाली. भारतात मुसलमान वस्त्यांमध्ये दडी मारून बसलेल्या जिहादी वृत्तीला संरक्षण देण्याचे जे शासकीय धोरण संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कारकीर्दीत स्वीकारले गेले, त्याचे मालेगाव हे एक उपकथानक आहे. इशरतजहाँ चकमकही त्याचेच एक उपकथानक आहे. गुजरात दंगलीवरून जगाच्या व्यासपिठावर माजवण्यात आलेले काहूर, ही त्याची एकूण पटकथा आहे. म्हणूनच इशरतजहाँ प्रकरणात संयुक्त पुरोगामी आघाडीचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ती लष्कर-ए-तोयबाची हस्तक असल्याचे संसदेत सांगितले होते. मालेगाव प्रकरणात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री आबा पाटील यांनीच मुसलमान संशयितांना अटक केल्यावर स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. काँग्रेसच्याच तत्कालीन हरियाणा सरकारने समझौता एक्स्प्रेसच्या तपासात मुस्लीम जिहादी सिमीचे हस्तक असल्याचा निर्वाळा दिला होता; पण राहुल गांधींनी हिंदु आतंकवादाचा शोध लावला आणि मग एकेका जुन्या प्रकरणातील हिंदु आतंकवादाचे धागेदोरे नव्याने शोधणे चालू झाले. त्यासाठी सरकारी यंत्रणेला आणि तपास पथकांना कामाला जुंपले गेले. ज्यांचे सहकार्य त्यात मिळाले नाही वा ज्यांनी खोटेपणा करण्यास नकार दिला, अशा यंत्रणांना व अधिकार्‍यांनाही मग त्यातले गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल गेली. अर्थात्च हे सर्व सेक्युलर भूमिकेतून जनहितासाठी केलेले असणार, हे आपण समजून घेतले पाहिजे. शरद पवार यांचा खोटारडेपणा !

जनहितार्थ आपण कितीही धडधडीत खोटे बोलू शकतो आणि लोकांची दिशाभूल करू शकतो, असे शरद पवार यांनी यापूर्वीच मान्य केले आहे. म्हणूनच मालेगावच्या स्फोटात हिंदु आतंकवाद असल्याचे ते खोटेच बोलले असणार, याविषयी निश्‍चिती बाळगायला हरकत नसावी. त्यात पवार यांचा हातखंड आहे ना ?

वर्ष १९९३ मध्ये मुंबई पहिल्यांदा स्फोटमालिकेने हादरली. त्या दिवशी संध्याकाळी मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार दूरदर्शन कॅमेर्‍यासमोर येऊन बसले आणि त्यांनी जनतेला विश्‍वासात घेऊन धडधडीत खोटी माहिती सादर केली. मुंबईत एकूण ११ स्फोट झाले होते; पण पवारांनी १२ स्फोट झाल्याचा दावा केला. मशीद बंदर येथे तो बारावा स्फोट झाल्याचे त्यांनी सांगून टाकले होते. तमाम ११ स्फोट बिगर मुस्लीम वस्तीत वा हिंदु वर्दळीच्या जागी घडले होते. त्यामुळे मुसलमानांविषयी जनमानसात संशय निर्माण होईल, अशी त्यांना शंका होती. म्हणून मुसलमान दाट वस्तीतही स्फोट झाल्याची धडधडीत खोटी माहिती पवार यांनी दूरदर्शनवर बोलतांना दिली. इतक्या संकटप्रसंगी महाराष्ट्र्राचा मुख्यमंत्री म्हणून पवार खोटे बोलत असतील, तर अन्य प्रसंगी राजकीय हेतू साधण्यासाठी पवार किती खोटे बोलू शकतील ? याचा नुसता अंदाज केला तरी पुरे ! मालेगावचा स्फोट मुसलमानांनी घडवला नाही, हे सिद्ध करायला असे पवार कुठल्या थराला जातील ? मालेगावचा हिंदु आतंकवादी हल्ला कुठे शिजला, त्याचा हा पुरावा आहे. एकदा सरकारने वा त्याच्या सूत्रधाराने त्यात हिंदु आतंकवाद असल्याचे ठरवले आणि त्यालाच पुष्टी देण्याचे काम करकरे यांच्यावर सोपवलेले असेल, तर त्यांनी कुठून पुरावे निर्माण करायचे ? ते न्यायालयात कसे सिद्ध करायचे ? आताही पवार यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विश्‍वासार्हतेची चिंता ग्रासत आहे; पण बारावा स्फोट घडल्याचे बेधडक खोटे सांगतांना पवारांना कधी आपल्या विश्‍वासार्हतेची चिंता वाटली होती का ? पवारांचीच गोष्ट कशाला, एकूण मागील १० वर्षांत संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणून जो कारभार चालला होता, तो किती विश्‍वासार्ह होता ? ज्यामध्ये इशरतजहाँ सारख्या जिहादीला निर्दोष ठरवण्यासाठी भारतीय गुप्तचर विभागाच्या वरिष्ठांना मारेकरी ठरवण्यापर्यंत मजल मारली गेली.

मुंबई आक्रमणाचे खापरही हिंदूंच्याच माथी फोडण्याचा घाट !

माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांचे गाजलेले पुस्तक हू किल्ड करकरे विसरून चालेल का ? कशासाठी, कशाच्या आधारे हे पुस्तक लिहिले गेले ? कसाबच्या आक्रमणात अनेक पोलीस अधिकारी मारले गेले. त्या हत्याकांडात किडामुंगीप्रमाणे माणसे मारली गेल्याचे जगाने बघितले; पण मुश्रीफ म्हणतात, करकरे यांना भारतीय गुप्तचर विभागाच्या मारेकर्‍यांनीच ठार मारले. यासारखा भयंकर विपर्यास असू शकत नाही. करकरे यांना हिंदु आतंकवादी मानसिकतेने मारल्याचे दाखवून देण्याचा हा प्रयास आणि मालेगाव येथील स्फोटात कर्नल पुरोहित इत्यादींना गुंतवण्याचा डाव, एकाच कथेची उपकथानके नाहीत का ? हे एकूण कारस्थान किती गूढ आणि गुंतागुंतीचे आहे, त्याचा खुलासा व्हायला बराच काळ लागणार आहे. मुश्रीफ यांचा भारतीय गुप्तचरांवरचा आरोप आणि त्याची डेव्हिड कोलमन हेडलीने केलेली सज्जता विसरून चालेल का ? आपण मुंबई आक्रमणाची पूर्वसिद्धता करतांना हल्लेखोर हिंदु वाटावेत, याचीही योजना केल्याचे हेडलीने सांगितले आहे ना ? त्यासाठी सिद्धीविनायक वा अन्य कुठल्या देवळापाशी मिळणारे भगव्या रंगातील मनगटाला बांधायचे दोरे हेडलीने खरेदी करून नेले होते ना ? म्हणजे करकरे ज्या आक्रमणात मारले गेले, त्यातील कसाब पोलिसांच्या हाती जिवंत लागला नसता, तर ते मुंबई आक्रमण हिंदु आतंकवाद्यांनीच केले आणि पाकिस्तानचे फुकट नाव गोवले आहे, असा आरोप करण्याची संपूर्ण पटकथा सज्ज होती. मालेगावच्या आक्रमणात साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना गुंतवण्यापासून मुंबई आक्रमणापर्यंतच्या घडामोडींमागे एक सूत्रबद्ध नियोजन लपून रहात नाही. आपण अशा गोष्टी तुकडयांनी बघतो आणि विसरून जातो. त्याचे परस्पर संबंध शोधायचा वा जुळवायचा प्रयत्नही करत नाही. किंबहुना अशा विविध घटनांचा परस्पर संबंध आपल्या लक्षात येऊ नये किंवा आपल्याला शंकाही येऊ नये, म्हणून ही कथानके तुकड्यांनी आपल्या पुढे आणली जातात. त्यातील काही भाग जाणीवपूर्वक लपवून ठेवला जातो. म्हणूनच मालेगाव स्फोटातील आरोपी, करकरे यांचा तपास, त्यांच्या हत्येचे बालंट, मुश्रीफ यांचे पुस्तक, पवारांची विविध विधाने, हेडलीचा जबाब किंवा इशरत प्रकरणाचे धागेदोरे यांचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता असते.

सेक्युलर राजकारणी वा पत्रकार आपल्याला  काय सांगत आहेत, त्यापेक्षा ते आपल्यापासून काय लपवत आहेत, याचा वेध घेणे आवश्यक !

पवार असोत किंवा सेक्युलर म्हणवून घेणारे बुद्धीमंत पत्रकार असोत, ते आपल्याला काय सांगत आहेत, त्यापेक्षा काय लपवाछपवी करत आहेत, त्याचा वेध घेतल्यास सत्यापर्यंत पोहोचता येईल. एकट्या मालेगावचा विचार करून काहीही हाती लागणार नाही. मालेगाव प्रकरणातील सरकारी अधिवक्त्या रोहिणी सालियन यांचेच विधान आपण बघू शकतो. काही मासांपूर्वी त्यांनी सरकारचा आपल्यावर दबाव असल्याचे सांगितले होते. मालेगाव खटल्यात धिम्या गतीने चाला, असे सरकारी अधिकार्‍यांनी आदेश दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचा अर्थ काय ? या अधिवक्त्याने किती वेगाने हा खटला चालवला होता ? साडेसात वर्षांत ज्याच्या सुनावण्या होऊन कुठलाही निर्णय होऊ शकला नाही, असा हा खटला आहे. म्हणजे त्यात आधीच विलंब आणि वेळकाढूपणा म्हणावा इतकी अल्प गतीच होती. त्याला अल्प गतीने चालवायचे म्हणजे काय ? बरे, इतके सांगून त्यांनी वकीलपत्र सोडले. त्या कालावधीत यातील कागदपत्रे आपल्याकडे अन्वेषण यंत्रणेने मागितली; पण ती आपल्याकडे नसल्याचे यंत्रणेला कळवल्याचेही सालियन म्हणतात. मग ती कागदपत्रे कुठली आणि त्याशिवाय खटला चालवला म्हणजे काय ? पण अशा बातम्या आणि माहिती सोयीनुसार सादर केली जाते अन् जनमानसात केवळ गोंधळ उडवला जातो.

हिंदु आतंकवाद ही संकल्पनाच भ्रामक !

आरोप करायचे आणि एक भ्रामक प्रतिमा उभी करायची, असा हा खेळ चालू असतो. मग त्यातून मालेगाव, हिंदु आतंकवाद, संघवाद, मनुवाद असे बॅन्ड शब्द बनवले जातात. त्यांचा सर्रास वापर केला जातो. लेबल म्हणून त्यांचा सरसकट वापर केला जातो. आजवर कित्येक घटनांचे खटले चालले आणि त्यात अनेक घातपाशी शिक्षेला पात्र ठरले. त्यातून इस्लामी आतंकवाद किंवा जिहादी घातपात असे शब्द प्रचलित झाले; पण हिंदु आतंकवादाची एकही घटना कुठेही सिद्ध झालेली नाही कि कुणाला गुन्हेगार म्हणून न्यायालयाने शिक्षापात्र ठरवलेले नाही; पण तरीही गेल्या ६-७ वर्षांत नुसत्या आरोपाच्या आतषबाजीने हिंदु दहशतवाद हा शब्दप्रयोग लोकांच्या गळी मारला गेला आहे. मालेगाव हा तसाच शब्द बनला आहे.
कालांतराने करकरे खरे बोलण्याचा

धोका असणार्‍यांकडूनच त्यांची हत्या ?

या खेळात फसलेल्या करकरेंना कुणी मारले, हा म्हणूनच कळीचा प्रश्‍न आहे. मालेगाव प्रकरणाच्या तपासातील निरर्थकता पाहिली, तर करकरे खरेच कसाब टोळीकडून मारले गेले कि मालेगाव नाटकाच्या सूत्रधारांनी करकरे यांचा काटा पद्धतशीरपणे काढला, असाही प्रश्‍न निर्माण होतो. आज ज्या गोष्टी बाहेर येत आहेत, त्याकडे बघता जिवंत करकरे अशा लोकांसाठी धोका ठरले असते. जसे इशरत प्रकरणात पिल्ले आणि मणी यांनी आज आपले तोंड उघडले आणि आपल्यावर खोटे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी दबाव आणला गेल्याची स्वीकृती दिली आहे, तसे करकरे यांनी केले नसते का ? जे पुरावे नव्हते आणि जो गुन्हा घडलाच नव्हता, त्यात निरपराध्यांना गोवण्यासाठी आपल्याला भाग पाडण्यात आले, असे करकरे बोलण्याचा धोका कुणाला होता ? त्यांनीच करकरेंना संपवून हिंदुत्ववाद्यांवर त्यांच्या हत्येचे खापर फोडणे स्वाभाविक नाही का ? जिवंत करकरे हिंदुत्ववाद्यांसाठी धोका नव्हते, तर सेक्युलर खोटेपणाला धोका होते ना ? मग त्यांना कुणी मारले असेल ? हू किल्ड करकरे ? मालेगाव तपासातील हे सर्वांत मोठे रहस्य आहे.

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई
(संदर्भ – साप्ताहिक विवेक, २९ मे ते ४ जून २०१६)

दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांच्या हत्येचे खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडण्यामागेही मालेगावप्रमाणेच पटकथा रचल्याची शक्यता !

दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे सापडत नाहीत; पण त्याचेही खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडणे सहजासहजी झालेले नाही. त्यामागे एक मोठी पटकथा रचलेली असणार. इशरतजहाँ आणि मालेगाव प्रकरणाचा खुलासा हे हिमनगाचे टोक आहे. अजून अशा पटकथेचे अनेक पदर उलगडायचे आहेत. जेव्हा ती चित्रकथा पूर्ण होईल, तेव्हा आजवर महानायक म्हणून वावरलेले मिरवलेले किती खलनायक विवस्त्र होतील, त्याचा अंदाजही करणे अवघड आहे. पुराणात मायावी राक्षसाच्या गोष्टी आहेत. त्यात ते राक्षस रूप बदलून उजळमाथ्याने वावरतात. तसे किती मायावी राक्षस आज आपल्या आसपास आहेत, त्याची सूचीच या निमित्ताने होऊ शकेल.

– श्री. भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

— संकलन – अशोक  साने

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..