“मालगुडी डेज’सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.
या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.
मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्याच पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट.
Leave a Reply