मल्हारी मार्तंड ! जय मल्हार !
जल्लोषाने ओथंबलेले स्वर आणि भंडार्याच्या मुक्त उधळणीने आसमंताला आलेले पिवळेपण! हे ठिकाण आहे उत्साह, आनंद आणि शक्तीची प्रेरणा अवघ्या महाराष्ट्राला देणार्या खंडोबाची जेजुरी ! आणि खंडोबा हे फक्त महाराष्ट्रातल्या लोकगीतांमध्येच नाही तर आधुनिक गाण्यांमध्येही लोकप्रिय आहे. खंडोबा हे दैवत महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही लोकप्रिय आहे.
जेजुरी हे गाव पुण्यापासून अगदी जवळ आहे. या गावातल्या टेकडीवर खंडोबाची दोन ठिकाणी मंदिरं आहेत. पैकी एकाला पठार म्हणतात तर दुसर्याला गडकोट. कर्हेपठार या मंदिराच्या काहीशा वरच्या बाजुला गडकोट आहे. या मंदिराभोवती तटबंदी असल्यामुळे याला गडकोट म्हणतात. मंदिरात जाण्यासाठी पायर्या आहेत. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजुंनी उंच दिपमाळा बांधल्या आहेत.
या मंदिराला प्रथम भव्य सोपा आहे. त्यानंतर सभा मंडप आणि मग गाभारा आहे. मंदिरासमोर येताच प्रथम लक्ष वेधून घेते ते २० फूट व्यास असलेले भले मोठे पितळी कासव. या कासवाशेजारीच बगाड घेण्याचा खांब आहे. बगाड घेणे हे आता कायद्याने बंद करण्यात आले आहे. बगाड हे या मंदिराचे वैशिष्ट्ये होते. खांबावर उंच स्वत:ला टांगून घेणे म्हणजे बगाडा घेणे. त्यावेळी लोक भंडारा उधळीत मल्हारी मार्तंडाचा जयघोष करायचे. हे बगाड घेणे आता बंद झाले आहे. या बगाडाच्या खांबालगत एक काहीसा उग्र असा पुतळा आपले लक्ष वेधून घेतो. हा पुतळा आहे ‘मणी’ नावाच्या राक्षसाचा.
मल्हारी मार्तंडाच्या अवताराची कथा अशी सांगितली जाते की, मणी, मल्ल या दैत्यांनी परिसरातल्या लोकांना, ऋषींना हैराण करुन सोडले होते. त्यांनी सगळ्यांनी शिवाची आराधना करुन त्यांचा नायनाट करण्याचा वर मागितला. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन दोन्ही दैत्याचा नायनाट केला. यासाठी शंकराने मार्तंड भैरवाच रुप घेतले होते. या मार्तंडाने जेव्हा मल्ल दैत्याला मारण्यासाठी शस्त्र उपसले तेव्हा त्याने वर मागितला की, यापुढे त्याच्या नावाने मार्तंड ओळखला जावा आणि तेव्हापासून मल्हारी मार्तंड या नावाने शंकराने येथे आपले वास्तव्य ठेवले. मार्तंडाने जे खड्ग: मणी आणि मल्लाचा नायनाट करण्यासाठी वापरले ते खड्ग: या मंदिराच्या सोप्यात बघायला मिळते. याला कालखड्ग: म्हणतात. चार फूट लांबीचे आणि ३५ किलो वजनाचे हे खड्ग: बघताच भितीने छाती धपापते.
मंदिराच्या गाभार्यामध्ये खंडोबा आणि त्यांची पत्नी म्हाळसा यांच्या तीन जोड्या आहेत. याशिवाय खंडोबा आणि म्हाळसाची दोन स्वयंभू लिंग आहेत. यांना चांदीचे मुखवटे घातले जातात. या मल्हारी मार्तंडाला दोन बायका आहेत. एक म्हाळसा आणि दुसरी बाणाई. म्हाळसा ही वाण्याची मुलगी तर बाणाई धनगराची. बाणाईसाठी खंडोबाने धनगर होऊन मेंढरे राखल्याच्या कथा पारंपारिक गीतातून येतात.
खंडोबा हे महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या असंख्य लोकांचे दैवत आहे. या देवाचा उत्सव चंपाषष्ठीपासून सुरु होतो. हा सर्वांत मोठा वार्षिक उत्सव असतो. याशिवाय सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या या दिवशी मोठी यात्रा असते.
वाघ्या मुरळी हे इथले आणखी एक वैशिष्ट्य. देवाचे नृत्य करुन गाणी गाऊन मनोरंजन करणे हे त्यांचे उद्दिष्ट. म्हणून जेजुरीच्या मंदिरात जाताना पैजणाचे आवाज, घंटाची किणकिण आणि येळकोट.. येळकोट.. जय मल्हारचा जयघोष ऐकू येतो आणि एकदा येथे दर्शन घेऊन आलेला माणूस सहजच गुणगणतो ‘चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ’
— अनिकेत जोशी
Leave a Reply