हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म १ जानेवारी १९११ रोजी झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं. मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत.
मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्यां महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो.
उदा., त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडत. मा.मन्सूर यांचे गाणे म्हणजे विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन असे. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.
मध्य प्रदेश सरकारने १९८१ पासून सुरू केलेला, एक लाख रूपायांचा कालिदास सन्मान प्रशस्ती पुरस्कार सर्वप्रथम मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. तद्वतच कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभाग सुरू करून त्या विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले आहे. आपली संगीतविद्या मुक्तपणे मन्सूर तेथे देत असतात. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरूप्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट