पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली. मागील वेळेस जहाज जॉईन करताना दुबईहुन फ्लाईट असल्याने दुबईचे हवाई दर्शन झाले होते. सकाळी सकाळी दुबईला पोहचणार होतो आणि माल्टाला जाणारे कनेक्टिंग फ्लाईट दीड तासाने होते पण दुबईत गेल्यावर लगेज ट्रान्सफर होणार नव्हते ते कलेक्ट करून पुन्हा चेक इन करावे लागणार होते. दुबईत उतरल्यावर इंटरनॅशनल ट्रान्सफर मुळे लगेज आम्हाला न मिळता एअरपोर्टवरील मरहबा सर्विस कडून फ्लाईट मध्ये पाठवण्यात येईल असे एमीरेट्सच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले पण त्यासाठी पर पर्सन 50 USD द्यावे लागतील असे पण सांगितले. ऑफिस कडून लगेज कलेक्ट करण्याबाबत कल्पना देण्यात आली होती पण या मरहबा सर्विस बद्दल किंवा त्यांच्या चार्ज बद्दल सांगितलं नव्हतं. माझ्यासोबत इलेक्ट्रिक ऑफिसर आणि थर्ड मेट होता दोघेही कंपनीत पहिल्यांदा आणि मी फोर्थ इंजिनियर म्हणून माझ्या तिसऱ्या जहाजावर चाललो होतो. मागील दोन जहाजांवर आलेल्या अनुभवामुळे सोबत दोनशे डॉलर्स आणि शंभर एक युरो घेतले होते. त्यांनी सांगितले त्याप्रमाणे तिघांचे दीडशे डॉलर्स भरले आणि धावतपळत पुढच्या फ्लाईटचे गेट गाठले. विमानात लगेज ट्रान्सफर झालंय का ते नक्की करण्यासाठी सगळ्यात शेवटी बोर्डिंग करायचे ठरवले. बोर्डिंग पास दाखवताना गेटवर लगेज बद्दल विचारले असता कॉम्पुटर मध्य बघून लगेज ट्रान्सफर झालंय असे सांगण्यात आले. मागच्या जहाजावर एका खलाशाचे लगेज कनेक्टिंग फ्लाईट मध्ये ट्रान्सफर झाले नाही. डेस्टिनेशन वर पोचल्यावर त्याचे लगेज पुढल्या फ्लाईटने येईल असे सांगण्यात आले. फक्त अंगावर घातलेले कपडे घेऊन तो जहाजावर चढला होता. जहाज त्याला घेतल्यावर लगेच इस्तंबूल बंदरातुन निघाले त्याचे लगेज दुसऱ्या दिवशी पोचले पण जहाज निघून गेले होते आणि पुन्हा जेव्हा महिनाभराने इस्तंबूल बंदरातुन काळ्या समुद्रात जात होते तेव्हा त्याचे लगेज जहाजावर आले होते. पुढील पंधरा दिवसात जेव्हा एका इटालियन बंदरात जहाज गेल्यावर कॅप्टन ने त्याच्यासाठी एक जोडी कपडे मागवले होते तोपर्यंत फक्त एका शर्ट पॅन्ट वर दिवस काढले त्या खलाशाने. त्यामुळे प्रत्येक कनेक्टिंग फ्लाईट मध्ये प्रवेश करण्यापूर्वी लगेज कन्फर्म करायची सवयच लागली.
दुबई शहराचे पुन्हा एकदा नयनरम्य हवाई दर्शन फ्लाईट ने टेक ऑफ घेतल्यावर झाले. दुबई ते माल्टा फ्लाईट वन स्टॉप होते. भूमध्य समुद्रातील सायप्रस या बेटावरील लारनाका एअरपोर्टवर काही प्रवासी चढ उतार करून विमान पुढे निघणार होते. सायप्रस बेट आपल्या गोवा या राज्याएवढंच असावे बहुधा कारण विमान लँड करताना आणि टेक ऑफ घेताना संपूर्ण बेट नजरेस पडत असल्यासारखं वाटत होते. अथांग निळ्या समुद्रात सायप्रस सारख्या बेटाचे सौंदर्य जाणवत होते. तासाभरात विमानाने पुन्हा टेक ऑफ घेतला. माल्टा बेटाचे अप्रतिम सौंदर्य विमान लँड करताना दिसू लागले होते. आयव्हरी रंगाच्या खडकावर माल्टा बेट आहे की काय असे वाटत होते. माल्टा देश आहे की शहर आहे हे कळत नव्हतं. माल्टा बेट हा एक देश आहे आणि त्यात माल्टा नावाचेच एक आणि एकच शहर आहे असेच माल्टा एअरपोर्टवर उतरल्यावर वाटत होते. सगळीकडे पॉश घरे, पॉश रस्ते, पॉश गाड्या आणि त्याहून पॉश लोकं असल्याचे जाणवत होते. एजंट आम्हाला पिकअप करून त्याच्या कार मध्ये बसवून इमिग्रेशन फॉर्मॅलिटी करून एका स्पीड बोट मध्ये घेऊन गेला, जहाज किनाऱ्यापासून लांब होते स्पीड बोट असल्याने सुमारे पंधरा मिनिटात आम्ही जहाजावर पोचलो होतो. जहाजावर पोचता पोचता संध्याकाळ होत आली होती. मावळणाऱ्या सूर्याच्या किरणात माल्टा बेट सोनेरी असल्याचे भासत होते. त्याच सोबत जहाजावर येताच सोनेरी पिंजऱ्यात कैद झाल्यासारखं वाटत होते.
एअरपोर्ट वरून फॉर्मॅलिटी पूर्ण करून सरळ जहाजावर आल्यामुळे टुरिस्ट डेस्टिनेशन असलेल्या माल्टा बेटाबद्दल अजून जाणून घ्यायचे होते तेथील किनारे आणि बीच पाहायचे होते. दोनच महिन्यात जहाज पुन्हा एकदा माल्टा बंदरात आले. जहाजाला लांब लचक अँकर मिळाला होता, रोज संध्याकाळी गळ टाकून फिशिंग केले जात होते. बागडे आणि इतर लहान मोठे मासे गळाला लागत होते. जिवंत पकडलेले मासे लगेच कापून फ्राय किंवा मायक्रोवेव्ह मध्ये भाजून फस्त केले जात होते कारण हार्ड लिकर बंद झाली होती तरी पण बियरवर अजूनपर्यंत बंदी नसल्याने पिणारे फिशिंग करताना बियरच्या केस घेऊनच एकमेकांना बोलावत व कॅन रिकामे करत बसत. एक दिवशी शोअर लिव्ह मिळाली मी चीफ इंजिनियर आणि माझ्या वॉच मध्ये असलेला मोटारमन आम्ही तिघे जण लहान बोट ने किनाऱ्यावर आलो. चीफ इंजिनियर म्हणाला मी इथल्या बीच वर फिरतो तुम्ही सिटी सेन्टर कडे जाऊन या इथून बस आहे तिने जा. तो यापूर्वी इथे येऊन गेला असल्याने त्याला सगळी माहिती होती. ब्रिटिशांनी वर्चस्व गाजवलेल्या या बेटावर ब्रिटिश राजवटींच्या खुणा दिसत होत्या. सिटी सेन्टर मध्ये लहान मोठी दुकानें होती छोटी मोठी रेस्टॉरंट पण सगळं एकदम आकर्षक. एका भारतीयाचे पण दुकान दिसले माल्टा बेटावर पण त्यात यावेळेस काही नवल नाही वाटले. जर ब्राझील मध्ये ऍमेझॉन नदीच्या किनाऱ्यावर जे समुद्रापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या एका लहानशा शहरात गुजराती कुटुंब तीन दुकानें टाकू शकतात तर या टुरिस्ट प्लेस बद्दल काय नवल वाटणार. घडाइ केलेल्या दगडाचे रस्ते, स्वच्छ लहान तसेच मोठ्या गल्ल्या आणि त्यातून चालणारे गोरे पर्यटक आणि त्यांच्यातुन वाट काढणारे आम्ही दोघेजण एका उतारावरून खाली उतरत गेलो जिथे पर्यटकाना समुद्राच्या पाण्यात खेळताना बघून आम्हाला सुद्धा पोहायची ईच्छा झाली पण एकदा घड्याळाकडे नजर टाकली. माल्टा बेटावर एखाद्या पक्षासारखे काही तास स्वछंदपणे उडाल्याचे सुख मिळाले आणि पुन्हा एकदा आमच्या सोनेरी पिंजऱ्यात कैद होण्यासाठी मागे फिरायला लागले.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply