नवीन लेखन...

मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !

Mama Kane - A famous Restaurant serving Marathi Food

आज पन्नाशीच्या पुढच्या बहुतेक सर्वच मुंबईकरांना ‘मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !’ हे नाव माहित असणारच. नसेल तर तो खरा मुंबईकर नाही.

मामा काण्यांचा बटाटावडा हा आख्ख्या मुंबईत फेमस होता. दादर स्टेशनवर उतरलं की अनेकांची पावलं आधी पडत ती मामा काण्यांच्या या उपाहारगृहाकडे. वयाची शंभरी गाठलेलं हे मुंबईतील उपाहारगृह. मराठी माणसाचं आणि मराठी पदार्थ देणारं.

नारायण विष्णु काणे उर्फ मामा काणे हे मूळचे कोकणातील गणपतीपुळे जवळच्या रिळे केशपुरी गावातील. पोटापाण्यासाठी त्यांनी गावाला रामराम ठोकला आणि ते रायगड जिल्ह्यातील पेणला आले. पेणमध्ये त्यांनी काही दिवस गणपतीच्या कार्यशाळेत गणेशमूर्ती घडविण्याचे काम केले आणि नशीब आजमाविण्यासाठी त्यांनी १९०५ च्या सुमारास मुंबईचा रस्ता धरला.

त्या काळी दादर येथे मोठी बाजारपेठ होती. या बाजारपेठेतील व्यापारी, कर्मचारी, कामगार आणि ग्राहक यांची गरज ओळखून मामा काणे यांनी १० फेब्रुवारी १९१० रोजी ‘दक्षिणी ब्राह्मणांचे स्वच्छ उपहारगृह’ या नावाने चहा-पाणी आणि नाश्त्याचे दुकान सुरू केले. या उपाहारगृहात मिसळ, उसळ, कांदेपोहे असे अस्सल मराठमोळे पदार्थ मिळायचे. मामा काणे यांची आई आणि बहीण स्वत: जातीने हे पदार्थ बनवायच्या. उपाहारगृहातील स्वच्छतेकडे मामा काणे यांचे कटाक्षाने लक्ष असे. स्वस्त दरात घरगुती पदार्थ मिळणारे हे उपहारगृह अल्पावधीतच प्रसिद्ध झाले.

त्या काळी रेल्वे गाडीमध्ये आणि रेल्वे स्थानकांवरही आजच्यासारखे मुबलक खाद्यपदार्थ मिळत नसत. त्यामुळे दादरला रेल्वेतून उतरल्या उतरल्या प्रवासी मामा काणे यांच्या उपाहारगृहात जात असत. विविध ठिकाणांहून मुंबईत येणारे गवळी आणि भाजीवाले आपल्या कावडी येथे ठेऊन उपाहारगृहातून पुरी भाजी किंवा अन्य काही पदार्थ घेऊन मुंबईमध्ये कामासाठी जात. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा सकाळचा नाश्ता याच उपाहारगृहात ठरलेला असे.

उपाहारगृहातील गर्दी वाढू लागल्यामुळे पुढे जागा कमी पडू लागली. त्यामुळे दादर रेल्वेस्थानकाबाहेरील सेनापती बापट मार्गावरील ‘स्मृतीकुंज’ या इमारतीच्या तळमजल्यावर जागा घेउन उपाहारगृह तिथे स्थलांतरीत करण्यात आले. ‘स्मृतीकुंज’च्या तळमजल्यावरील छोटय़ा छोटय़ा खोल्यांमध्ये तसे मागील मोकळ्या जागेत ताडपत्रीचा आडोसा करून खवय्यांसाठी टेबल-खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कालांतराने ताडपत्रीची जागा पत्र्याच्या शेडने घेतली. तोवर उपाहारगृहाचा व्याप चांगलाच वाढला होता. मामांचे पुत्र शंकरराव हेही आपल्या वडिलांसोबत उपाहारगृहाचे कामकाज पाहू लागले. खवय्यांच्या आवडीनिवडी ओळखून शंकररावांनी उपाहारगृहात अनेक बदल केले आणि ते यशस्वी ठरले. सुरुवातीला मामांच्या उपाहारगृहात कांदेपोहे, मिसळ, साबुदाणा खिचडी, थालीपीठ मिळत असे. १९२८ मध्ये त्यांच्याकडे चविष्ट बटाटावडा मिळू लागला आणि हा-हा म्हणता म्हणता या बटाटावडय़ांनी खवय्यांवर मोहिनी घातली. उपाहारगृहात १९३५ मध्ये अवघ्या दोन आण्यामध्ये राइस- प्लेट मिळत असे. पुढे दाक्षिणात्य पदार्थ मुंबईत मिळू लागल्यानंतर मराठमोळे पदार्थ विकणार्‍या महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. तेव्हा आपल्या उपाहारगृहात इडली, डोसाही उपलब्ध करून देऊन मामा काणे उपाहारगृह या स्पर्धेतही पाय रोवून टिकून राहिले. आजही त्याच निग्रहानं ते आपलं मराठमोळेपण जपून आहे.

मामा काणे १९४० पर्यंत या उपाहारगृहाच्या कामात स्वत: लक्ष देत होते. त्यानंतर १९७८ पर्यंत शंकररावांनी उपाहारगृहाचे काम पाहिले. शंकररावांची मुले कमळाकर, रामकृष्ण आणि मुकुंद यांनीही पुढे या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. आज कमळाकर, रामकृष्ण आणि मुकुंद यांच्या जोडीला मामा काणे यांची चौथी पिढी उपाहारगृहात कार्यरत आहे. कमळाकर यांचे पुत्र श्रीधर आणि दिलीप आता उपाहारगृहाचे काम पाहू लागले आहेत. एकाच कुटुंबातील तीन पिढय़ांनी या उपाहारगृहाचा कार्यभार सांभाळल्यामुळे काणे कुटुंबीय आणि कर्मचारीवर्ग यांच्यामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत.

मराठी खाद्यसंस्कृती जपणार्‍या मुंबईतील मोजक्या उपाहारगहांमध्ये “मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह”चा क्रमांक बराच वरचा लागतो हे निश्चित.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !

  1. नमस्कार.
    – माझ्या आठवणीप्रमाणें, १०७० च्या दशकात मामा काणे यांच्या उपाहारगृहात थाळी एक रुपयाला मिळत असे.
    -आजही मामा काणे यांचा एक बटाटावडा हा इतरांच्या दोन बटाटावड्यांएवढा मोठा असतो.
    – बापूसाहेब म्हणून तिथें माहीत असलेले ( प्रथम नांव, माझ्या माहितीप्रमाणें , कमलाकर) हे, ( माझ्या माहितीप्रमाणे ) TIFR मध्ये सायन्टिस्ट होते. ते जुन्या काळातील कंप्यूटर एक्सपर्ट. त्यांना ‘डॉक्टर’ काणे असें अभिधान होतें व आहे. ( हें त्यांच्या ज्ञानामुळे असावें).
    – एवढें असूनही (कमलाकर) बापूसाहेब हे पूर्वी रोज कांहीं वेळ काउंटरवर बसत. मला आठवतें की मी कधी तेथें त्याना सहज भेटायला गेलो तर, मला काउंटरशेजारी बसवून एकीकडे गप्पा मारत, simultaneously जाणार्‍या गिर्‍हाइकांचा हिशेब करत ते पैसे मोजून त्याला उरलेले पैसे परत देत असत ; कधी कधी नोटा मोजत असत. मला याचें फार नवल वाटे.
    – त्यांच्या घरीं त्यांनी ‘रिंग वेल्’ करून पाण्याचें re-circulation करून पाणी-बचत केलेली आहे. रेस्टॉरंटमध्येही ते अशा प्रकारची कांहीं बचत करत असतात. त्यांना पर्यावरणाचें फार भान आहे.
    – हें सर्व लिहायचें कारण म्हणजे, या रेस्टॉरंटच्या मालकांच्या इतर अंगांबद्दलही माहिती व्हावी.
    सप्रेम
    सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..