वळणा मागुनि राजस वळणे टाकित मागे,
भाव-फुलांचे सडे पसरुनि मार्गावरी,
प्रेमांत वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलीस केव्हां, एकसष्ठीच्या वळणावरती ।
अगं ताई, आलीस केव्हां, एकसष्ठीच्या वळणावरती ।।धृ।।
किती करावे अन् काय करावे, उत्साहाला उधाण आले ।
अंतरीच्या तव, ओलाव्यांतुनि, सारे तुजला, सारे जमले ।।
नित वाहुनि चिंता भावंडांची, तव जन्माचे सार्थक केले ।
अथक दंग राहुनि, साठी अमुच्या, तूं, अवघे आयु वेंचले ।।
कधी न कळले, कसे वाढलो, अंतरीच्या अपार स्नेहावरती ।।१।।
नित्य नवा ध्यास उरीं, जिवापाड आम्हास जपण्याचा ।
जगावेगळा छंद आगळा, हौसेस अमुच्या दाद देण्याचा ।।
जिद्दी परी हट्टी मोठअ, नूतन सारे आम्हांस देण्याचा ।
आभेत प्रभेच्या, होता विश्वास दृढ अमुच्या कल्याणाचा ।।
माये पाठी, माय होऊनि, आम्ही वाढलो, तव ममते वरती ।।२।।
वात्सल्याच्या उर्मीपोटी, झालीस तूं माय आमुची ।
सुरेल अमुच्या मार्गांसाठी, केलीस तूं, होळी स्वार्थाची ।।
प्रेमे घेऊनि अंकी, पदराखाली, केलीस पखरण प्रीतीची ।
स्तन बाळांपरी जपले, मऊ होऊनी, साय दुधावरची ।।
नत-मस्तक सदैव आम्ही, प्रेम-स्वरुप तव मूर्ती पुढती ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
२ सप्टेंबर २००७
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply