मन अथांग सागर, उफाळत्या लाटांचा,
मन आवर्तनी भोवरा,
सखोल पाणथळाचा, –||1||
मन बिंदूंचे अवकाश,
विस्तीर्ण मन पसरट,
भावनांचे उठती कल्लोळ,
अतुल आणि अलोट,–||2||
मन पाण्याचा डोंगर,
एकावर एक पार,
शुभ्रतम* भासे चढ,
*निळसर पण उतार,–||3||
मन किरणी प्रभाव,
झेलत साऱ्या दिनभर,
सोनेरी कलत, झुकत,
आभाळ उदंड त्यावर,–||4||
मन समुद्री वादळ,
वारे अखंड वाहत,
जीवाची नौका चालण्या,
शीड आत्म्याचे उभारत,–||5||
मन माशांचे घर ,
कधी गोंडस कधी घातक,
उत्साही ते खळाळत,
कल्पना-साम्राज्य पूरक,–||6||
मन लाटेवरचे उधाण,
संजीवनी अपार स्त्रोत,
जीवघेण्या केव्हा तुफानात, नयनातून सागरी बरसात,–||7||
मन तुला न कळत,
मन मला न आकळत,
मन मनुजा न गवसत,
उलघाल सगळी अंतरात,–||8||
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply