नवीन लेखन...

मनं खुलविणारी माणसं

नमस्कार ……! कसे आहात …..!’

हे आपुलकीचे शब्द माणसाचे सौजन्य आणि संस्कृती दाखवून देतात. त्यातूनच मित्रत्वाचे, स्नेहाचे नाते जडते. कॅनडाच्या भुमित पहिल्याच दिवशी मला असेच कांहीसे शब्द ऐकायला मिळाले नि मनातील त्यांच्याविषयीचे गैरसमज दूर झाले.

विदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली.

हॅलिफॅक्सच्या उपनगरी भागात बेडफोर्ड येथील टर्नन गेटवर कन्येचे घर. आमच्या अपेक्षेपेक्षाही तिने सुंदर संसार थाटलेला. सारं पाहून प्रथम दर्शनीच समाधान वाटलं. प्रवासातील ताणतणाव, जागरण यामुळे पहिला दिवस विश्रांतीतच गेला. साडेतीन महिन्यांचा मुक्कामाचा बेत होता, त्यामुळे कॅनडातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची घाई नव्हती.

पहिल्या आठवड्यात शहरातील स्थानिक स्थळांनाच भेटी दिल्या. परंतु जे कांही मनाला भावलं, ते कल्पनेपलिकडचं होतं. पाश्चिमात्य व अमेरिकन देश, त्यांची संस्कृती याविषयी मनात अनेक गैरसमज होते. पण प्रत्यक्षात मात्र वेगळाच अनुभव आला.
हिवाळा संपून नुकताच कुठे उन्हाळ्याला सुरवात झाली होती. त्यामुळे थंडीने गारठलेल्या नि गोठलेल्या धरतीचं चित्र कुठेच पहायला मिळालं नाही. हिवाळ्यात सर्वत्र गुडघाभर साचलेला बर्फ व कापसाप्रमाणे कोसळणारा बर्फाचा पाऊस, पाने गाळलेले बोडके वृक्ष…… आदी दृश्य कन्येने संगणकातील व्हिडिओवरून दाखविले होते. हिवाळ्यात अगदी निष्पर्ण झालेले, कित्तेक वर्षानंतर भुमीतून खणून काढलेल्या सांगाड्याप्रमाणे दिसणारे वृक्ष मी पाहिले होते. परंतु आता बदलत्या ऋतुबरोबर वातावरणही बदलले होते. सृष्टीचे रूप पूर्णपणे पालटले होते. सारे वृक्ष नव्या पर्णभराने आता अलंक़ृत झाले होते. उन्हाळ्याच्या उबदारपणाबरोबरच धरतीवर अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यामुळे वातावरण आल्हादकारक बनले होते. धरतीमातेचे सौंदर्य अधिक खुलले होते. वृक्ष, वेलीना नवजीवन प्राप्त झाले होते. सृष्टीचं हे नव रूप पाहून मनाला प्रसन्नता वाटत होती.

संध्याकाळची वेळ. आम्ही फिरण्याच्या निमित्ताने सहज बाहेर पडलो. प्रथम दर्शनीच स्वच्छ, सुंदर रस्ते, मोकळ्या जागेतील हिरवळ, पिवळसर कोवळी नि हिरवीगार पाने परिधान केलेले वृक्ष………. साऱ्याच गोष्टीनी मनाला भुरळ घातली. त्यातही नवख्या लोकांनी केलेलं आदरातिथ्य पाहूनयेथील निसर्गच भुरळ घालणारा नाही तर, माणसंही मनं खुलविणारी आहेतयाचा प्रत्यय आला. लोकांमधील शिस्त, स्वच्छता, सौजन्य, स्वावलंबन व नियमांच काटेकोरपणे पालन करण्याची वृत्ती आम्हा भारतीयांना अनुकरणीय व बरच कांही शिकविणारी होती.

घरातून बाहेर पडून उजव्या बाजुच्या फुटपथावरून चाललो होतो, तोच समोरून येणाऱ्या सुंदर, गोऱ्यागोमट्या बाईने

‘हॅलो ऽऽ ! हाऊ आर यू ?’

असा प्रश्न केला व आमचे सुहास्य स्वागत केले. सोबत असलेल्या माझ्या कन्येची ओळख असावी, असे वाटून मी कांहीच प्रतिक्रीया दिली नाही. कन्येनेच-
वुई आर फाईन,……. हाऊ आर यू ?’

असा तिला प्रतिसाद दिला. कांहीसे पुढे गेल्यानंतर मीच तिला विचारले,

‘बाई कोणी ओळखीची आहे का ?’ त्यावर ती म्हणाली,

‘नाही, इथे समोर आलेल्यांशी असेच सौजन्याने व आदरांने बोलतात हे लोक. आपणही त्याला असाच प्रतिसाद देणे अपेक्षित असते.’

या तिच्या माहितीने मी प्रभावित झालो. भारतात कांही अपवाद वगळता ओळखीचे चेहरे सुध्दा मान वाकडी करून जाताना आपण पहातो. सौजन्य तर सोडाच त्यांच्या बोलण्यात आपुलकीचा लवलेशही नसतो.

पुढे असे अनेक अनुभव आले. त्यामुळे आदरातिथ्याच्या या गोष्टी अंगवळणी पाडवून घेणे आम्हालाही भाग पडले.

वाटेत भेटलेले लोक जुनी ओळख असल्याप्रमाणे-

‘गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड डे, हाऊ आर यू ? आय अँम फाईन ……. ‘ अशी आदरातिथ्य करणारी वाक्ये समयानुरूप बोलतात. त्यामुळे अनोळखीपणा नाहीसा होऊन एकप्रकारे त्यांच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण होते. त्यातून त्यांचा सुसंस्कृतपणाही दिसून येतो.

***
दुसऱ्या दिवशी इथल्या लोकांचा आनखी एक अनुकरणीय पैलू समजला नि त्याचा अनुभवही आला. बेडफोर्डच्या पूर्वेला अँटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवर आम्ही सहज फिरत होतो. याला महासागर म्हणण्यापेक्षा खाडी म्हणणेच योग्य ठरेल. कारण महासागराचे पाणी इथे जमीनीच्या अंतर्भागात शिरले आहे. सायंकाळचे आठ वाजले होते. सूर्य अस्ताला जात होता. (उन्हाळ्यात इथे रात्री नऊ नंतरच अंधार पडतो.) महासागरातून वाहत येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकीमुळे शरीराला आल्हादकारक गारवा जानवत होता. अशा वेळी बीचवर कॉफीचे घुटके घेत फिरण्यात मजा कांही औरच असते, कन्येने सर्वांसाठी फ्रेंच व्हॅनिलाचे कप आनून दिले नि बीचवरच्या बाकावर बसून आम्ही कॉफीची मजा लुटू लागलो. कॉफी पिऊन झाली नि मी रिकामा कागदी कप (युज अँड थ्रो) बाकड्या शेजारीच ठेऊन दिला. शेजारी बसलेल्या गोऱ्याने माझ्याकडे कांहीशा विचित्र नजरेने पाहिले. त्याच्या नजरेत नापसंतीचा भाव होता. जावईबापुंच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी सर्वांचे रिकामे कप उचलले नि शेजारी असलेल्या कचरापेटीत नेऊन टाकले. मी कांहीशा प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पहात होतो त्यावर ते म्हणाले,

‘पप्पा, इथे स्वच्छतेची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. डस्टबीनमध्येच कचरा टाकणे अपेक्षितच नाही तर, बंधनकारक आहे.’

मी कांहीसा खजील झालो. कॉफीचा रिकामा कप तसाच टाकून माझे भारतीयत्व मी दाखवून दिले होते. भारतीयांमध्ये अनेक चांगले गुण आहेत; परंतु स्वच्छतेकडे मात्र आम्ही कधी गांभिर्याने पाहिलेच नाही. त्याचा सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. इथल्या माझ्या वर्तनाची मलाच लाज वाटली.

कॅनडातील वास्तव्यात मला स्वच्छतेच्या बाबतीत पदोपदी अनुभव आला. घराचे अंगन, सार्वजनिक ठिकाणं, रस्ते, उपहारगृहे एवढेच नाही तर स्वच्छतागृहे सुध्दा किती स्वच्छ आणि चकचकीत ! कुठे कागदाची चिटोरी सुध्दा आढळून येणार नाही. शहरच नाही तर, ग्रामीण भागातही घरगुती कचरा वेळेत नेण्याची व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था करतात. ओला कचरा, सुका कचरा स्वतंत्रपणे नेण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणी लोक कचरा डस्टबीन मध्येच टाकतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही सक्त मनाई आहे. लोकांच्या सोईसाठी सार्वजनिक ठिकाणे, उपहारगृहे आदी ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय आहे.

***
कन्येच्या घराच्या मागीलबाजूस बादलीतील पाण्यात गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसली. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असल्याने ती अजून विरघळली नव्हती. मी विचारणा केली,
दीदी, (आम्ही लाडाने तिला दीदीच म्हणतो.) मुर्तीचं बादलीतच विसर्जन केलं का?’
‘हो’
‘हॅलिफक्समध्ये तर मोठमोठे तलाव, सरोवरे आहेत. तिन्ही बाजूनी महासागर आहे; मग बादलीत विसर्जन करण्याचे कारण?’

‘नद्या, तालाव, महासागरात…….. कचरा किंवा कोणत्याच गोष्टी टाकण्यास बंदी आहे. असे केल्यास तो गुन्हा ठरतो.’

‘मग निर्माल्याचं विसर्जन कुठे केलं ?’

‘देवाचं निर्माल्य कचऱ्यात टाकणं बरं नाही; म्हणून फुले वाहीलीच नाहीत. गजाननाला भक्तीचीच फुले अर्पण केली.’ ती गमतीने हासतहासत म्हणाली.

प्रसंग साधाच असला तरी तो बरच कांही शिकविणारा होता. आपपल्या दैवतांची पूजाअर्चा करण्यास कुणाची बंदी असण्याचे कारण नव्हते; मात्र हे करताना पर्यावरणाचे प्रदुषण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे मात्र बंधन होते. पर्यावरण स्वच्छ व निरोगी असेल तर समाजिक आरोग्यही चांगले रहाते, या साध्या, सरळ शास्त्रीय नियमाचे इथे पालन करण्यात येते. माझी मुलगी व जावई कॅनडाचे आता अधिकृत नागरिक झाले आहेत, पण आपल्या संस्कृतीचा त्यानी विसर पडू दिला नाही. गणेश मूर्तीचे पूजन करून त्यांनी आपली परंपरा कायम राखली होती नि मुर्तीच्या विसर्जनाबाबत कॅनडाच्या नियमाचे पालनही केले होते.

मला साऱ्याच गोष्टींचं अश्चर्य वजा कौतुक वाटत होतं. आपल्या देशात पर्यावरण संरक्षण व स्वच्छते विषयी थोडी जरी जागरुकता निर्माण झाली तरी बरेच कांही साध्य होईल. विदेशातील ही स्वच्छता पाहूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीस्वच्छ भारत अभियानहाती घेतले असावे. परंतु लोकांना त्याचे महत्व पटले नि त्याचे अनुकरण झाले तर…… ? सध्यातर कल्पनेच्या साम्राज्यातच वावरलेले बरे !

***
गमतीची वाटली तरी आनखी एक कौतुकास्पद गोष्ट मी पाहिली. इथल्या विशेषत: स्त्रीयांचे कुत्र्यावर जीवापाड प्रेम! आपल्या तान्ह्याला त्यानी कधी प्रेमाने काखेत घेऊन फिरलेले मी पाहिले नाही. पण कुत्र्यांना काखेत घेऊन त्यांना प्रेमाणे गोंजारणाऱ्या महिलांना मी पाहिले आहे.

एक दिवस हॅलिफक्समध्ये सायंकाळी आम्ही फुटपाथवरून चालत जात होतो. फूटपाथला लागून असलेल्या हिरवळीत एक गोरी बाई दोन कुत्र्यांशी खेळत होती. अचानक एका कुत्र्यांने फूटपाथशेजारीच शौच केले. लागलीच त्या महिलेने सोबत आनलेल्या प्लास्टीक पिशवित ती विष्टा भरून घेतली. आम्हाला हा प्रकार कांहीसा किळसवाना वाटला. मी कन्येला म्हणालो,

‘दीदी, हा काय प्रकार आहे? चक्क त्या बाईने कुत्र्याची विष्टा पिशवित भरून घेतली ….. कशासाठी ?’

पप्पा, इथली स्वच्छता पहाताय ना ! स्वच्छतेच्या बाबतीत इथला कायदा फार कडक आहे. कायद्याचे परिवर्तन आता इथल्या लोकांच्या संस्कारात झाले आहे.’

आता ती त्या विष्टेचे काय करणार ?’ माझा प्रश्न

‘त्यासाठी ठेवलेल्या डस्टबीनमध्ये टाकणार !’

हा प्रकार किळसवाणा असला तरी अनुकरणीय होता. आपल्या देशात कुत्र्यांना घेऊन फिरायला जाणारे महाभाग कमी नाहीत, पण त्यांच्या विष्टेमुळे रस्त्याच्या कडेने चालत जाणेही अवघड होते.

कॅनडात उपहारगृहात जा, स्वच्छतागृहात जा वा कुणा मित्राच्या घरी…..तुम्हाला हात पुसण्यासाठी कापडी टॉवेल किंवा रुमाल मिळणार नाही. पेपर टॉवेल किंवा टिश्यु पेपर देण्यात येतील. नॉन रिसायक्लेबल गोष्टींचा वापर इथे प्रामुख्याने टाळण्यात येतो. घर आणि परिसराची स्वच्छता लोक स्वत: करतात नि रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता स्थानिक प्रशासन करते. किंबहूना ती त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारीच आहे. आपल्या देशात कांही वेगळे नियम नाहीत. परंतु त्याची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे केली जाते, हा महत्वाचा विषय आहे. आम्हाला आमच्या हक्कांची जाणीव आहे; परंतु आमच्या कर्तव्याची नाही.  कॅनडात प्रशासन आणि नागरिक आपापली जबाबदारी प्रामाणिकपणे व कर्तव्याच्या भावनेतून पार पाडतात. म्हणूनच तिथे कमालीची स्वच्छता आहे.शहरात कचरा दाखवा नि एक हजार डॉलर मिळवाअसा सरकारने फलक लावला तरी कचरा सापडणे महा कठीण !

***
कन्या आणि जावई दोघेही कंपनीत नोकरीला……घरचे काम आटोपून कामावर जायचे म्हणजे त्यांची चांगलीच ओढा-ताण व्हायची. त्यामुळे मीच एक दिवस तिला म्हणालो,
दोघेही नोकरीला जाता, घरकामासाठी एखादी बाई का पहात नाही ?’ त्यावर ती म्हणाली,
इथे कुणी कामवाली बाई मिळत नाही. स्वत:ची कामे स्वत:च करावी लागतात.’
मग तुमच्या ऑफिसमध्ये कुणी शिपाई तरी आहे की नाही?’

नाही, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असोत की कनिष्ठ कर्मचारी….. साऱ्याना स्वत:ची कामे स्वत:च करावी लागतात. आठवड्यातून एक वेळ क्लिनर येऊन साफसफाई करुन जाते !’

मला या गोष्टीचे कौतुक वाटले. मी कॅनडातील कांही कंपन्या, संस्थाना भेट दिली. शिपाई (प्युन) हा प्रकार मला कुठेच आढळला नाही. साध्या लिपीकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण स्वत:ची कामे स्वत:च करीत होते. त्यांच्याकडून स्वसाह्यतेचा हा बोध घेण्यासारखा आहे. नाहीतर आपल्याकडे आराम खुर्चीत बसून शिपाई किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना हुकूम सोडणारे अधिकारी कमी नाहीत. कामापेक्षा अधिकार गाजविणारेच अधिक ! कॅनडात पदानुसार वेतनात जरूर तफावत आहे; परंतु कामात कुठेच उच्च, नीच हा भेद नाही. आपल्याकडील पदानुसारसर, साहेब…… ‘ असे संबोधन तिथे मुळीच नाही. एकमेकाशी बोलतांनामिस्टर जॉर्ज, मिस अंजू ……’ असे नावानेच बोलविण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वरिष्ठ, कनिष्ठ अशी भावना कुणाच्याच मनात निर्माण होत नाही. ‘आम्ही सारे सेवक’ याच भावनेतून सारेजण कार्य करतात. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

इथल्या साऱ्याच उपहारगृहात कुणी वेटर आढळणार नाहीत. बहूतेक ठिकाणीसेल्फ सर्व्हीसचाच प्रकार आहे. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर कागदी प्लेटस्‌, कागदी कप, टिश्यू पेपर ….. साऱ्या वस्तू ग्राहकांनीच तिथे ठेवलेल्या कचरा पेटीत टाकाव्या लागतात. उपहारगृहात स्वच्छता राखण्याची जबाबदारी उपहारगृहाच्या चालकांबरोबरच ग्राहकांवरही आहे. आपल्याकडेही सेल्फसर्व्हीस उपहारगृहे आहेत, पण ती पैसे देऊन चहा किंवा खाद्यपदार्थ घेण्यापुरतीच, स्वच्छतेशी ग्राहकांचे कांही देणेघेणे नाही किंबहूना कर्तव्याच्या भावनेतून कोणी ती राखण्याचा प्रयत्नही करीत नाही.
घर आणि परिसराच्या स्वच्छतेने तर मी भाराऊनच गेलो. मुख्य रस्त्यापासून घरापर्यंत चारचाकी गाड्या जाण्यासाठी प्रत्येक घरासमोर डांबरी रस्ता, मोकळ्या जागेत एका विशिष्ट प्रकारच्या गवताची (लॉन) केलेली लागवड. क्रीडांगण, मोकळी जागा, सार्वजनिक उद्यान….. सर्वच ठिकाणी सुंदर हिरवळ ! सारेच कसे विलोभनीय दृश्य !

जमीनीवरील हे तृण वेळोवेळी मशीनने छाटण्यात येत असल्याने जमिनीवर हिरवा गालिच्या पसरावा असे सुंदर व मनोवेधक सौंदर्य ! परिणामी रस्ते किंवा परिसरात कुठेच धूळ नाही, दुर्गंधीचा लवलेश नाही. डास किंवा इतर उपद्रवी किटकांचा पत्ताच नाही. परिणामी लोकांचे आरोग्यही अधिक सुदृढ! त्यामुळे गोऱ्या, गोमट्या लोकांचे देखणेपण अधिक खूलून दिसते. कृत्रिम अलंकार परिधान करण्याची गरजच वाटत नाही.

आम्ही कॅनडातील कांही खेड्यातही गेलो. सुविधांच्या बाबतीत शहर आणि ग्रामीण भाग यात विशेष फरक जाणवला नाही. किंबहूना इथले  80 टक्के लोक शहरी भागातच रहातात. प्रत्येक गावात डांबरी रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळा, आरोग्य या मुलभूत गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत.लोकसंख्या कमी, साधने अधिक’ अशी इथली परिस्थिती ! त्यामुळे बहुसंख्य लोक सुखी जीवन जगताना आढळून येतात.

— मनोहर (बी. बी. देसाई)

 

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..