एक राजा होता. त्याला एकच मुलगा. एकुलता एक राजपुत्र म्हणून साहजिकच त्याचे बालपण खूप लाडात गेले. लाड करण्यामुळे त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तरुणपणीच त्याची प्रकृती बिघडली. काहीही खाल्लेले त्याच्या अंगी लागेना. त्यामुळे वरचेवर तो अतिशय दुबळा होत चालला. राजपुत्राच्या तब्येतीची राजाला खूप काळजी वाटू लागली. राजवैद्यानेही खूप उपाय केले. मात्र राजपुत्राच्या प्रकृतीत कसलाच फरक पडला नाही. त्यामुळे राजवैद्याचीही चिंता वाढू लागली. मात्र काहीतरी उपाय करणे आवश्यक होते. त्यांनी वेळकाढूपणा करण्यासाठी राजाला सांगितले की, मानससरोवरातील हंस पकडून आणून त्याचे मांस जर राजपुत्राला खाऊ घातले तर कदाचित त्याची प्रकृती सुधारू शकेल. राजाने प्रधानाला आज्ञा केली.
प्रधानाने काही सैनिकांना मानससरोवरात जाऊन हंस पकडून आणायला सांगितले. प्रवास खूप लांबचा व खडतर होता. तरीही सैनिक सार तेथे गेलेच. मानससरोवरापाशी गेल्यावर तेथे त्यांनी पाहिले की, एक साधू हंस पक्ष्याला काहीतरी खायला देत आहे. त्यामुळे बरेचसे हंस त्याच्याजवळ जमले होते. थोड्या वेळाने हंसांचे खाणे झाल्यावर तो साधू तिथून निघून गेला. सैनिकांनी ही वेळ साधली. सैनिकांनी काही हंसांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनिकांना पाहून हंस पळून जात. त्यामुळे एकही हंस त्यांच्या हाती लागला नाही. शेवटी एका सैनिकाला युक्ती सुचली. त्याने साधूचा वेष परिधान केला. हातात खाण्याच्या वस्तू घेतल्या व तो हंसांना बोलावू लागला. हंसांना वाटले तो पहिलाच साधू आहे. त्यामुळे खाण्याच्या आमिषाने ते सगळे त्या सैनिकाजवळ जमले. त्याबरोबर त्या सैनिकाने चार-पाच हंस पकडले व ते सर्वजण राजाकडे परत आले. आपण हंस कशाप्रकारे युक्ती करून पकडले हे त्यांनी राजाला सांगितले. ते ऐकून राजाचे मन द्रवले. फसवून आणलेल्या हंसांचे मांस खाऊन राजपुत्राची प्रकृती सुधारावी हे काही त्याच्या मनाला पटेना. त्याने त्या सर्व हंसांना सोडून देण्याचा सैनिकांना आदेश दिला. केवळ राजाचे मनःपरिवर्तन झाल्यामुळे त्या हंसांना जीवदान मिळाले होते.
— सुरेश खडसे
Leave a Reply