मना पालटे वादळा तले वारे
मना सर्व जाणुनी घेऊ नको रे
मना सत्य ओठी का टिकत नाही
मना विचारें सुख विकतका घेई
मना संग्रही थोर विचार ठेव
मना कप्पे साधे नीट आवरून ठेव
मना गोष्टी नको ज्यात दुःख आहे
मना दुरुनी कशास सुख पाही
अर्थ–
जे दिसत नाही त्यात इतकं सामर्थ्य आहे की जर त्या न दिसणाऱ्या मनाने ठरवलं तर वादळ क्षणांत शांत होऊ शकतं. हवा दिसत नाही तरी हवेचा जोर सारं काही पालटू शकतो तसेच मन ही जाणीव अनेक समस्या, संकटं बेधडक पणे परतवून लावू शकतं.
मनाला जेवढं सांभाळून ठेवता येईल तितके ठेवावे, उगाच त्याला चिकित्सक बनवू नये. मला यातलं हे कळलं पाहिजे, मला सारं समजलंच पाहिजे हा हट्ट सोडला तर मन शांत होऊ शकते आणि पर्यायाने आपले जगणेसुद्धा.
समोरच्याला आपण दुखवू म्हणून किंवा मला हवं तेच मी करेन म्हणून सत्य टिकून राहू शकत नाही. आजकाल सत्यवचन घेणारे आणि पाळणारे यात भरपूर फरक आहे. समाधानी वृत्ती कमी झाल्यामुळे सुख, संपत्ती ही आजकाल मिळत नाही तर विकत घ्यावी लागते आणि तिथे मनाची होणारी पडझड कधीच थांबवता येत नाही.
यातून सुखं, शांती, समाधान प्राप्त करण्यासाठी हे मना तुझ्यात चांगले, थोर अशा उंचीचे विचार ठेव. तुझ्यातले हजारो कप्पे असतील त्यातले जे नकोत ते बंद करून बुजवून टाक. ज्यात दुःख लपलेलं आहे ते म्हणजे लोभ, वासना यांना दूर ठेव आणि ज्यात सुख आहे ते म्हणजे समाधान त्याला आपलंसं कर.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply