मिलिंद राधिकाला घेऊन, डाॅ. परांजपे यांच्या मॅटर्निटी होममध्ये आला होता. गेल्याच वर्षी त्याचं राधिकाशी, शुभमंगल झालं होतं. वर्षभरातच ‘बाप’ होणार असल्याची गोड बातमी, राधिकाने त्याच्या कानात हळूच सांगितली होती.
रिसेप्शनिस्टनं राधिकाचं नाव पुकारल्यावर, दोघेही डाॅक्टरांच्या केबिनमध्ये गेले. डाॅक्टरांनी राधिकाची तपासणी करुन काही गोळ्या व टाॅनिक्सची नावं त्यांच्या असिस्टंटला लिहून द्यायला सांगितली. त्या लेडी असिस्टंटकडे पाहून, मिलिंदला काॅलेजमधील दिवस आठवले. ती असिस्टंट, मीरा ही त्याची मैत्रीण होती. पुढच्याच महिन्यांत डिलीव्हरीची तारीख असल्याने डाॅक्टरांनी राधिकाला काळजी घ्यायला सांगितली.
मिलिंद रोज ऑफिसमधून लवकर घरी येत होता. राधिकाला काही हवं नको ते पहात होता. मिलिंदचे आई-वडीलही येणाऱ्या बाळाचं स्वागत करायला उत्सुक होते. मिलिंदला रात्री झोपताना, मीराच्या आठवणींमुळे तासनतास झोप येत नसे.
राधिकाला सांगितलेल्या तारखेच्या आधीच कळा येऊ लागल्याने, त्रास होऊ लागला. मिलिंद ऑफिसवरुन त्वरीत आला व राधिकाला घेऊन डाॅ. परांजपेंकडे गेला. तिथे गेल्यावर त्याला समजलं की, डाॅक्टर तर बाहेरगावी गेलेत. त्यांच्याऐवजी डाॅक्टरांची असिस्टंट, डाॅ. मीरानं राधिकाला ॲडमीट करुन घेतले.
डाॅ. मीराला पहाताक्षणी मिलिंदला, दहा वर्षांपूर्वीचे काॅलेजचे दिवस आठवले. मीरा सायन्स तर मिलिंद काॅमर्स शाखेत शिकत होता. एका वार्षिक स्नेहसंमेलनात, वादविवाद स्पर्धेत दोघेही समोरासमोर होते. त्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी म्हणून मीरानं पारितोषिक जिंकलं होतं! त्यामुळे मिलिंदचा अहंकार दुखावला गेला होता. रागाच्या भरात मिलिंदने एकदा, तिच्या मैत्रिणींसमोर मीराचा पाणउतारा केला होता.
काॅलेज पूर्ण झाल्यावर दोघांचेही रस्ते वेगळे झाले. मिलिंदला एका कंपनीत ऑफिसर म्हणून नोकरी मिळाली. दहा वर्षांत कंपनीच्या भरभराटी बरोबर मिलिंदलाही बढती मिळत गेली.
आज इतक्या वर्षांनंतर मीराला पाहून, त्याला सर्व काही आठवलं. मीरानं मात्र मिलिंदला ओळखूनही, न ओळखल्याचं दाखवलं. राधिकाला इंजेक्शन देऊन, तिच्या वेदना मीरानं कमी केल्या होत्या. बाहेर खुर्चीवर बसलेल्या मिलिंदच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले होते. राधिकावर, मीरा नीट उपचार करेल ना? की मी तिला दुखावल्याचा, ती बदला घेईल?
मिलिंद विचारांच्या तंद्रीत असतानाच, मीरा समोर येऊन उभी राहिली व त्याची फाॅर्मवर सही घेण्यासाठी पॅड पुढे करुन बोलू लागली, ‘मिस्टर जोशी, पेशंटची अवस्था अतिशय नाजुक आहे, नाविलाजास्तव सिझर करावे लागणार आहे. प्लीज ऑपरेशनला संमती असल्याची सही करा.’ मिलिंदच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. त्याचा हात थरथरु लागला. राधिकाच्या काळजीने तो व्याकुळ झाला.
मीराने, मावशीला बोलावून काॅफी मागवली. मिलिंदने सही करुन पॅड मीराच्या हातात दिले व तो शून्यात नजर लावून बसून राहिला. मीरा ऑपरेशन रुममध्ये निघून गेली.
मिलिंद, सारखा भिंतीवरील घड्याळाकडे व ऑपरेशन रुमच्या दरवाजाकडे, आळीपाळीने पहात होता. त्याने बेचैनीत तासभर वाट पाहिल्यानंतर, ऑपरेशन रुममधून मीरा बाहेर आली. मिलिंद ताडकन उठून उभा राहिला. त्याने काही बोलायच्या आधीच, मीरा बोलू लागली.
‘मिलिंद, अभिनंदन!! राधिकाला मुलगी झाली! काळजी करु नकोस. दोघीही सुखरुप आहेत. तू जेव्हा पहिल्यांदा इथे राधिकाला घेऊन आलास, तेव्हाच मी तुला ओळखलं होतं. तासाभरापूर्वी फाॅर्मवर सही करताना तुझ्या मनात कोणते विचार थैमान घालत असतील, ते मी जाणलं होतं. तुला काय वाटलं? मी तुझ्यावरचा राग, राधिकावर काढेन? मिलिंद, एक लक्षात ठेव, सगळ्याच स्त्रिया कैकेयी नसतात. ज्या वेळ आली की, बदला घेतात. आम्ही डाॅक्टर, रुग्णांची मनोभावे सेवा करतो. ती करताना राग, द्वेष, सूड, अपमान अशी कोणतीही भावना मनात कदापिही ठेवत नाही. पेशंटच्या वेदना कमी करुन, त्याला संभाव्य धोक्यातून सुरक्षितपणे वाचवणं हेच आमचं एकमेव ध्येय असतं.
पूर्वी तू माझ्याशी जे वागलास, त्याचं मला फार वाईट वाटलं. स्त्रियांना सन्मान, आदर द्यावा. त्यांना कधीही कमी लेखू नये. आजच्या स्त्रिया आत्मनिर्भर झालेल्या आहेत. त्यांनाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मान द्यावा, एवढीच तुम्हा सर्वांकडून माफक अपेक्षा आहे. ती अपेक्षा तुम्ही सर्वांनी पूर्ण केली तरच आजच्या जागतिक महिला दिनाचं महत्त्व अबाधित राहील.
थोड्या वेळानंतर, तू आत जाऊन राधिकाला पाहू शकतोस. तुझी परी, अगदी आपल्या आईवर गेलेली आहे! तिचं नाव ‘मीरा’ ठेवशील? तेवढीच माझी ‘आठवण’.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-३-२२.
Leave a Reply