त्यावेळी मी पुण्यातील एका वृत्तपत्रात काम करीत होतो. वृत्तपत्राचं कार्यालय म्हटलं, की तिथं येणाऱया- जाणाऱयांची गर्दी असतेच. इतर काही नसलं, तर संपादक विभागातील मंडळीही चर्चा, गप्पा, वाद यातून एक वेगळंच वातावरण निर्माण करीत असतात. सर्वसाधारण वृत्तपत्रात असतात तशी त्यावेळी वेगवेगळी दालनं नव्हती. आम्ही सर्वच सहकारी एकत्र बसत असू.
अशातच त्या मोठ्या सभागृहाच्या दालनात एक अपरिचित व्यक्ती आली. 10-15 मिनिटं झाली. ती व्यक्ती एकेकाशी बोलत होती. कोणीही त्या व्यक्तीला हवा तसा प्रतिसाद देताना दिसत नव्हते. मला राहावलं नाही. मी म्हटलं, “अहो तुमचं नाव काय? इकडे या तुम्ही.” तो गृहस्थ माझ्याकडे आला. टेबलाशी आम्ही सहा-सात जण तरी असू. “काय काम आहे?” मी विचारलं. त्यानं त्याचं नाव सांगितलं. आता ते स्मरत नाहीये; पण तो प्रसंग ताजा आहे मनात.
तो गृहस्थ इंदूरचा होता; पण प्रवासामध्ये असताना त्याचे पाकीट चोरीला गेले. पुणे-इंदोर अशा प्रवासासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कोणाची ओळख नव्हती. स्वाभाविकपणे तो वृत्तपत्राच्या कचेरीत मदतीसाठी आला होता. त्याची कथा माझ्यासह सर्वांनीच ऐकली; पण त्याला मदत करावी, यासाठी मात्र कोणी पुढे यायला तयार नव्हते. “अशा कथा सांगणारे पायलीला पन्नास मिळतात” एक प्रतिक्रिया आली. दुसरा म्हणाला, “पाकीट चोरीला जाईपर्यंत काय झोपला होतात का?” “चला इथं थांबू नका. कामं करू द्यात लोकांना.” तिसरा बोलून गेला.
त्या माणसाच्या चेहऱयावर निराशा स्पष्टपणे जाणवत होती. बहुधा त्यानं बराच वेळ काही खाल्लेलंही नसावं. मी म्हणालो, “रोख मदत करणं तर कठीण; पण चहा घेऊ, काही खायचं असेल तर खाऊही” “नको” तो म्हणाला. “आता काही खाण्याऐवजी मला घरी जाणं आवश्यक आहे. मी परतल्याबरोबर तुमचे पैसे पाठवीन. विश्वास ठेवा. मी कोणी ठग नव्हे. आता अडचणीत आहे हे खरं आहे.”
टेबलाच्या पलीकडे आमच्याकडे वार्ता विभागात काम करणारा सतीश हे सगळं ऐकत, पाहात होता. तो म्हणाला, “इकडे या. किती पैसे लागतील?” त्यानं उत्तर दिलं. “70 रुपये” सतीश क्षणभर थांबला. खिशातून पाकीट काढलं. म्हणाला, “हे 80 रुपये घ्या. जाताना काही खाऊन घ्या. हा माझा पत्ता. तुम्ही पोहोचलात, की या पत्त्यावर मला मनिऑर्डर करा.”
त्यानं पैसे घेतले. कृतज्ञता त्याच्या चेहऱयावर स्पष्टपणे ओसंडत होती. काही न बोलता तो निघून गेला. तो गेल्यावर पुन्हा एकदा दालनात गलका सुरू झाला. “सत्या, पैसे जास्त झालेत वाटतं. अरे एखादी पार्टी केली असती. त्याने जाम उल्लू बनवलं तुला. अरे, पत्रकारच फसायला लागले, तर इतराचं काय?” अशा एका ना दोन अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
मी उठलो. सतीशला म्हटलं, “चल, चहा पिऊ ..!” चहा हे निमित्त होतं. सतीश असं का वागला? हे मला समजून घ्यायचं होतं. सतीश हा तर क्राईमचं काम पाहणारा. तो कसा फशी पडला? हा माझ्या मनातला प्रश्न होता. सतीश म्हणाला, “हे बघ किशोर, हे 80 रुपये गेले. ते येणार नाहीत हे गृहीत धरून मी ते दिले आहेत; पण तो फसवतच होता हे गृहीत धरलं तर ते बरोबर आहे. समजा, तो खरंच अडचणीत असेल आणि आपण कोणीच त्याला मदत केली नाही तर काय होईल? अडचणीच्या काळातही माणसाला माणूस म्हणून कोणी मदत करीत नाही. हा त्याचा विश्वास कायम होईल. माणसाचा माणसावरचा विश्वास कायम राहावा यासाठी मी जर 80 रुपये खर्च केले तर ती काही फार मोठी रक्कम ठरणार नाही!” सतीश शांतपणे चहा पिऊ लागला.
त्यानंतर हा प्रसंग आम्ही विसरलो. 10-20 दिवस झाले असतील. मंगळवारची संपादक विभागाची बैठक झाली, तशी सतीशनं घोषणा केली, `आज माझ्यातर्फे सर्वांना चहा.’ इंदोरच्या माणसानं 80 रुपये परत पाठविलेत. माणूस म्हणून आपण माणसालाच मदत केली. या सतीशच्या भावनेला बळ मिळालं होतं. `त्याचं काही पत्र वगैरे.’ एक प्रश्न आला. सतीश म्हणाला, `पत्र नाहीये; पण मनिऑर्डर स्लीप आहे.’ त्याच्या संदेशाच्या जागेवर लिहिलं होतं, “तुमची लाख मोलाची मदत मी विसरणार नाही. अडचणीत तुम्ही मला मदत केलीत, मीही यापुढे तसंच करीन.”
आज सतीश पुण्याला, मी नागपूरला तर तो इंदूरनिवासी अन्य कुठे असेल; पण माणसा-माणसातला हा संवाद तर अखंड राहील, असा भरवसा निश्चित देता येईल.
भगवान कल्कींच्या प्रेरणेनं तो असाच अखंड राहो.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply