शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे.
खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो.
शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास करताना कधीतरी चुकुन, जुन्या सवयीमुळे उपासाला न चालणारा पदार्थ पटकन तोंडात गेला, म्हणून फार मोठे आभाळ कोसळणार नाही, की कोणी फाशी देणार नाही, जिथे चुक लक्षात आली तिथून देवाची क्षमा मागून, पुढे उपास सुरू ठेवावा.
आपण सोयीस्कर अर्थ काढून, “नाहीतरी आता उपवास मोडलाच आहे, तर आता वडा भजी ऊसळ मिसळ पण खाऊन घेऊया.” असा विचार करणे चुकीचे ठरेल.
उपास कोणासाठी करायचा आहे ? देवासाठी की देहासाठी ?
खाण्यासाठी की देण्यासाठी ? आणि असे केलेले उपवास काही फलदायी होत नाहीत.
उपवास करायचा असेल तर एक विशिष्ट मानसिकता बनवावी लागते. मनाला संयमात ठेवावे लागते, मोहाचा त्याग करावाच लागतो.
जी गोष्ट किंवा वस्तु सोडल्याशिवाय ती मला हितकर होणार नाही, हे आपल्या मनाला आधी पटले पाहिजे.
म्हणजे वैद्याने सांगितलेले पथ्यपालन करणे, हा देखील एक उपासच झाला ना !
ज्याचा हव्यास संपत नाही ते सुख ! आणि सुख जिथे संपते तिथे समाधान सुरू होते, हे जर खरे असेल तर उपास म्हणजे उपभोग घेण्याच्या मानसिकतेतून (यालाच माया असेही म्हणतात) बाहेर येणे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे म्हणजे उपवास.
समर्थ म्हणतात,
आपण खातो अन्नासी
अन्न खाते आपणासी ।
सर्व काळ मानसी,
चिंतातुर ।।
आज संकष्टी आहे, पण रविवार बुधवार पण आहे, आता काय धरावे की संकष्टी सोडावी असा प्रश्न जरी मनात निर्माण झाला, तरी अशी कष्टाने केलेली संकष्टी कशी पावणार ? त्याने समाधान कसे मिळणार ?
उपासाला सात्विक अन्न खावे.
नेमकं सात्विक म्हणजे काय ?
जरूर असेल तेव्हाच आणि तेवढेच अन्न खाणे म्हणजे सात्विक होय. मुख्य म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताची (शास्त्रीची वा वैद्याची सुद्धा ) आठवण राहिली पाहिजे.
नाम घेता ग्रासोग्रासी
तो जेविता राहिला,
उपवासी, असं तुकाराम महाराज पण सांगतातच !
आपल्या प्रकृतीचा विचार न करता, भुकेचा ( अग्निबलाचा ) विचार न करता, आजारांचा विचार न करता, स्वतःच्या मनाने ठरवून केलेला उपास हा फक्त अशक्तपणाच आणतो.
प.पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रापंचिक गोष्टींकरीता उपास ही गोष्टच मला मान्य नाही.
आपल्या मनामध्ये काहीतरी मिळावे म्हणून कितीही उपासासारखे कष्ट केलेत तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही.
महाराज म्हणतात,
उपासना करा.
उपास ना करा.
Leave a Reply